लेखकचतुरंगयांनी गुरुवार, 11/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी प्रेरणा एखादीच कविता असते पण काहीवेळा कवितेसोबतच इतरही धाग्यांचा दंगा एवढा भरपूर असतो की समजत नाही नेमकी प्रेरणा कोणती...जाऊ दे प्रेरणेची काळजी 'मंगेशाला'!
लेखकजयवीयांनी गुरुवार, 11/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
दाव तोच जीवना लावतो पुन्हा पुन्हा
मृत्युला जगायला शिकवतो पुन्हा पुन्हा
चांदणी कधी कुण्या अंबरास भार ना
चंद्र मग उगाच का हरवतो पुन्हा पुन्हा
आसवे न ढाळली मी कधीच पांगळी
का तिच्यापुढेच मी भेकतो पुन्हा पुन्हा
माज ही जुनाच शिरजोर आज ती पुन्हा
आग तीच मी परी पोळतो पुन्हा पुन्हा
हां...कबूल दुश्मनी जन्मजात लाभली
बांध घालुनी दुवा सांधतो पुन्हा पुन्हा
हात जोडुनी उभे सौख्य मजपुढे सदा
व्यर्थ दशदिशात मी शोधतो पुन्हा पुन्हा
जयश्री
लेखकजयवीयांनी मंगळवार, 09/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
फुलणे नव्याने नको आणखी
उमलून मिटणे नको आणखी
घायाळ व्हावे पुन्हा मीच का
इष्कात झुरणे नको आणखी
गंधात न्हालो तुझ्या साजणी
निशिगंध चाफे नको आणखी
येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी
नजरेत जरबी कट्यारी तुझ्या
बंदी, पहारे नको आणखी
धुंदी चढावी सुरांनी तुझ्या
कुठले बहकणे नको आणखी
जगतोच आहे तुझ्याही विना
आधार फसवे नको आणखी
जवळीक नाही अताशा कुठे
जखडून घेणे नको आणखी
जयश्री अंबासकर
लेखकचतुरंगयांनी सोमवार, 08/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंच्या सुंदर गजलेत असं काही वाचलं की पुन्हा एकदा जुन्या दिवसांशी 'धोका' झाल्याची जाणीव प्रबळ होते आणि मग....
पृष्ठ वरचे, 'खास मेनू' अन सलोखा
बायडी आभास नुसता, रोज धोका!
बंद केली 'डायराने' सर्व दारे
आयडी आला कसा, नसता झरोका?
बारश्याला मीच 'मामा', कर्म माझे?
सोडला हातातला प्रत्येक मोका!
सोबती संपादकत्त्वाचा उबारा,
आणि शिल्लक मेंबरांचा मंद ठोका
बास आता सोंग हे वैचारिकांचे
कंड 'चतुरंगास' सुटला हा अनोखा!
-चतुरंग
लेखकक्रान्तियांनी रविवार, 07/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हास्य वरचे, आत दु:खाशी सलोखा
बेगडी आयुष्य देते रोज धोका
बंद केली मी सुखाची सर्व दारे,
एकही नाही घराला या झरोका
हारणे हा वारसा की धर्म माझा?
सोडला हातातला प्रत्येक मोका!
सोबती काळोखगर्भाचा उबारा,
आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका
ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा
अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा
लेखकजयवीयांनी सोमवार, 01/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
न काट्यास कळले सलावे कुठे
रुतावे कुठे अन् दुखावे कुठे
विषाला अता या उतारा नको
कळे पूर्ण त्याला भिनावे कुठे
बरसता जमावे तळे लोचनी
असे पापण्यांनी झरावे कुठे
उरी वेदना, हास्य गालावरी
अशा सोसण्याचे पुरावे कुठे
तिरस्कार झेलून थकलो अता
अशा गुंतण्याचे निभावे कुठे
तुझे चांदणे गोंदले या नभी
निशेच्या नशेने वहावे कुठे
सुरांनी तुझ्या कोसळावे पुन्हा
असे श्वास द्यावे नि घ्यावे कुठे
अवेळी कसा लोपला सूर्य हा
रित्या अंबराने लपावे कुठे
जयश्री अंबासकर
लेखकउदय सप्रेयांनी शुक्रवार, 22/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कोडगं सूख.....
अंदाज पावलांचा माझ्या मला न आला
हातात हात माझा ,घेता तुला न आला !
सर्वस्व उधळले अन् मी जाळले स्वतःला
तो प्रेम'चांदवा' पण , बघता तुला न आला !
केसांत मोकळ्या मी हरवून स्वतःला गेलो
चेहेरा कधीच माझा , धरता तुला न आला!
तू चुंबतेस आता निष्प्राण हात माझे
सत्कार असा ओठांचा , करता तुला न आला!
मी कोडगा किती पण , तरिही सुखावलो बघ !
हुंदका दाटुनी येता , आवरता तुला न आला !
लेखकचतुरंगयांनी बुधवार, 20/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानेश यांची अप्रतीम गजल 'कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा' वाचली आणि सगळे भास खरे वाटायला लागले! ;)
कुठे भास होतो मला 'कोंकणा'चा, 'रिया' रोज स्वप्नी बुलावे कुठे...
हजारो दिशांनी मला हाक येते, कलत्रास सोडून जावे कुठे?
'पमी'ची, 'निशे'ची, 'नितू'ची, कधीची जरी लाख आलीत आमंत्रणे..
रमेनेच ज्याला असे वात अणला, अशा दादल्याने पहावे कुठे?
तसे झाकले खूप काही परंतु, तरी राहिले खूप झाकायचे
मिळाले तिला फोन माझे अरेरे, कळेना अता मी लपावे कुठे?
लपावे जरासे अशी रूम नाही.. करी तात वेडा पहारा खडा
असे बंधुही ज्या मुलीचा घिसाडी..
लेखकअनिरुद्ध अभ्यंकरयांनी शुक्रवार, 01/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही
पूर्वीगत पण त्याचे काही वाटत नाही
खरेच का पण आपण इतके बोथट झालो
खरेच का आवाज आतवर पोचत नाही
बंद घेतली करून माझी सगळी दारे
मलासुद्धा मी हल्ली येथे भेटत नाही
भेटलोच तर हल्ली आता वरवर हसतो
नजरेमध्ये नजर घालुनी बोलत नाही
काय मिळाले इतक्या ह्या तडजोडीनंतर
हिशोब याचा अजून काही लागत नाही
पुढे जायचे आहे येथे प्रत्येकाला
कुणाचसाठी कोणी आता थांबत नाही
असल्या जरि ह्या जखमा तरि ह्या तुझ्याच साऱ्या
उगाच मी त्या अभिमानाने मिरवत नाही
खूप शोधतो रोज तुला उघड्या डोळ्यांनी
मिटून डोळे आत स्वतःच्या शोधत नाही