Skip to main content

पुन्हा

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 09/08/2009 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
वाटते भय का प्रकाशाचे पुन्हा? वाहती वारे विनाशाचे पुन्हा यायचे नव्हते तुला येथे कधी, का बहाणे हे खुलाशाचे पुन्हा? वादळाहातीच ज्याचे होडके, कोण साथी त्या प्रवाशाचे पुन्हा? कोरडे रडणे, उमाळे बेगडी, दु:ख का फसवे उसाशाचे पुन्हा? सोंगट्यांनी डाव केव्हा साधला? का बदलले दैव फाशाचे पुन्हा? बोट माझे का वळे माझ्याकडे शोधताना मूळ नाशाचे पुन्हा?

बोलली जाते मराठी, मान ते घर आपुले

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 21/07/2009 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
माजले परके.... मराठी चेहरा उरला कुठे? भूमिपुत्रांना स्वदेशी आसरा उरला कुठे? भ्रष्ट नेत्यांच्यामुळे ही वाळवी आली घरी एकही शाबूत ऐसा कोपरा उरला कुठे? टॉवरांचे रान झाले चाळ माझी पाडली आपुलेपण सांगणारा उंबरा उरला कुठे? दारची जास्वंद गेली कार पार्किंगच्यामुळे परसदारी बहरणारा मोगरा उरला कुठे? बोलली जाते मराठी, मान ते घर आपुले मग 'अगस्ती' सांग तुजला, पिंजरा उरला कुठे? ---- धोंडोपंत

अलिप्त

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 16/07/2009 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
का अलिप्त जगणे माझे? मी प्रवाहात का नाही? परिचित वा आप्त कुणीही या जमावात का नाही ? दु:खाचे फक्त मुखवटे, अन् मोल दिलेले रडणे आर्तता, शोक, व्याकुळता या विलापात का नाही ? पातकी, पतित, पथभ्रष्ट, मूर्तिमंत पाप जरी मी, कोसळताना पहिल्यांदा तू दिला हात का नाही ? रुतणा-या कंटकवाटा, जखमी पायांनी फिरणे एकही सुगंधित थांबा या प्रवासात का नाही ? का उलटे पडती फासे ? का जिंकुनही मी हरते ? हा डाव रडीचा इथला संपून जात का नाही ?

आठवणी.....

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 03/07/2009 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणी..... सरी पावसाच्या नभी दाटलेल्या ऊरी आठवांच्या लडी साठलेल्या ! तशा मावल्या ना तुझ्या आवडी ही सदाच्याच अमुच्या झोळ्या.....फाटलेल्या ! कफल्लक कवीच्या न वाट्यास नट्टा, तरी शृंगार भरल्या.....गझल थाटलेल्या ! अवचित् कधी शेपटा त्या वेणीचा जरा स्पर्शताही .....मुठी.. चाटलेल्या ! सखे राहिले ना वसंतास भान बघुनी तुला त्या.....यौवनी घाटलेल्या ! अता एकदा हा मोगरा माळू दे ना तुझ्या मोकळ्या केसांत्.....काटलेल्या ! करपून गेला बहर बघ कधीचा अता कृष्ण म्लान .....गौळणी बाटलेल्या !
Taxonomy upgrade extras

अजूनही

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 28/06/2009 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
ठाव ना तुझा तुला अजूनही काय शोधसी मला अजूनही? जागल्या कळ्या; सुकून चालल्या, गंध मात्र राहिला अजूनही ओळखू कसा तुझा स्वभाव रे? जाणले न मी मला अजूनही लांब जात सावल्याहि पांगल्या तू दिवा न लावला अजूनही सावळा न राधिका, न गोपिका एकटा रिता झुला अजूनही मीच जिंकले तरी हरायचा डाव का न संपला अजूनही? तोच नांदतो म्हणे चराचरी का मला न भेटला अजूनही?
Taxonomy upgrade extras

आज का

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 17/06/2009 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
आज का मुरलीधराच्या पावरीची साद नाही? आज का राधे तुझ्याही पैंजणांचा नाद नाही? शब्द झाले मूक, जागी नेत्रभाषा, स्पर्शभाषा मौन झाले बोलके; मग सांग, हा संवाद नाही? हाक माझी दशदिशांचा उंबरा स्पर्शून आली आसमंतातून सा-या एकही पडसाद नाही निर्गुणी भजने कुमारांची कधी ना ऐकिली तू, भीमसेनांच्या स्वरांचा घेतला आस्वाद नाही! सोड हे सुकणे, फुलांची पालखी दारात आली स्वागताला हो पुढे, यासारखा आल्हाद नाही या तुझ्या असण्यास वा दिसण्यास का जगणे म्हणावे? खोलली त्याने कवाडे, अन् तुझा प्रतिसाद नाही! आज छेडू या सुरांना, विसरुनी चिंता उद्याच्या आजचे गाणे खरे, येथे उद्याला दाद नाही!
Taxonomy upgrade extras

आकांत

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 15/06/2009 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्राण झाला शांत आता संपला आकांत आता यायचे ना फिरुन येथे, सोडला हा प्रांत आता तोडले सारेच धागे, का पडावी भ्रांत आता? सावल्यांच्या संगतीने बोलतो एकांत आता सोहळे सोसून फसवे जीव झाला क्लांत आता वादळाचे धुमसणे हे का न होई शांत आता?
Taxonomy upgrade extras

बालगझलः झुऽम झुऽम झुऽम

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 12/06/2009 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
टारगेट वयोगटः २ ते ७ वर्षे ( + काहिश्या निरर्थक नादमय कवितेची मजा घेऊ शकणारा इतर कोणत्याहि वयाचा) इथे झुऽम झुऽम झुऽम ला अर्थ देणारी एखादी हस्तमुद्रा/हावभाव/अंगविक्षेप पालकांनी/शिक्षकांनी करून दाखवणे अपेक्षित आहे. तसेच शेवटाचे कडवे मुल अगदी लहान असेल व दूध पित नसेल तर या तालात पिऊन टाकते असा अनुभव आल्याने टाकले.. एरवी म्हणताना गाळले तरी चालेल =========================== विमान झेपावे कसे?

बाकी आहे.....

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 02/06/2009 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
'सप्रे'म नमस्कार ! परवा म्हणजे रवेवार ३१ मे '०९ रोजी , गडकरी रंगायतन ठाणे येथे "बांधण" प्रतिष्ठान तर्फे मराठी गज़लांचा सुरेख कार्यक्रम झाला.त्यावेळी प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री आप्पा ठाकूर यांनी त्यांची एक अप्रतिम गझल सादर केली ती पुढे देत आहे. फारच सुंदर अशी लय आणि गेयता आहे या गझलीला , खेरीज आपांच्या आवाजात कै.शांता जोग यांच्या आवाजातील कंप पण असल्याने त्यांनी ही गझल म्हटलेली ऐकताना ती कधी संपूच नये असे वाटत होते ! एक फारच सुखद अनुभव ! पुढील मोठा कार्यक्रम पुणे येथे होणार आहे २०१० सालचा , लोकसत्ता, म.टा.
Taxonomy upgrade extras

पत्रांमधुनी

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 30/05/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
असेच भेटत राहू आता पत्रांमधुनी सुखदु:खाच्या सांगत गाथा पत्रांमधुनी "फुले मिळाली?" विचारले, अन् पुढे म्हणालिस, "फुलांसवे जर गंधहि जाता पत्रांमधुनी!" वळवाची सर जशी झरावी तसे भेटलो जालावरती येता जाता पत्रांमधुनी खुळ्यासारखे रुसवे-फुगवे, भांडण-तंटे, नको उगाळू त्या कटु वार्ता पत्रांमधुनी मनावेगळ्या मनात जपलेले क्षण हळवे कधी फिरुन येतिल का हाता पत्रांमधुनी? हळूच भिजल्या पापण्यांतला चंद्र हासला, पुन्हा तुझे प्रतिबिंब पहाता पत्रांमधुनी तुला वाचले, तुला जाणले, भरुन पावले! चित्र नको, तू ये ना आता पत्रांमधुनी! अवांतर :-या गझलचं सगळं श्रेय चुचुताईला!