Skip to main content

चालू घडामोडी । ऑगस्ट २०२६ । श्रावण १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी बुधवार, 05/08/2026 15:20 या दिवशी प्रकाशित केले.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन पडे.

 

श्रावण महिना सुरू होत आहे. दरवर्षीप्रमाणे या महिन्यात आकाशातील पांढरे-काळे ढग, सरसर येणाऱ्या पावसाच्या सरी, मध्येच दिसणारे निरभ्र आकाश, पुन्हा पडणारा रिपरिप पाऊस हे निसर्गचित्र नेहमीचंच असतं.  

मिपावरचे लेखन-प्रतिसाद-प्रतिप्रतिसाद असेच असतात, नाही का?

श्रावण मास हा हिंदूंचा पवित्र काळ असतो. नागपंचमी, राखीपौर्णिमा, पोळा यांची धामधूम सुरु असते. बेसिकली, उत्सवी वातावरणाची, व्रतवैकल्याची, उपवास-निराहारांची सुरुवात या इथून सुरु होते.

मिपाकरांना श्रावण मासाच्या आगाऊ शुभेच्छा. 


संसदेत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात - परिसीमन विधेयक, आयकरसुधारणा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३३ वरून ३७ पर्यंत वाढवणारं विधेयक, FCRA विधेयक, MSME साठी विलंबित पेमेंट्सवरचं संरक्षण देणारं विधेयक अशी प्रमुख विधेयकं सरकारच्या अजेंड्यावर आहेत. यातली FCRA दुरुस्ती विधेयक आणि उच्चशिक्षण नियामकांना एकत्र आणणारं VBSA विधेयक हे दोन विरोधकांच्या रडारवर आहेत, काँग्रेसने या दोन्हींना विरोध करण्याचं आधीच जाहीर केलंय. शिवाय NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरही चर्चा होत आहे. यांतील काही विधेयकं मंजूर झाली आहेत काही होतील.

परिसीमन विधेयकावरून सरकार व विरोधी पक्षांत नुकतीच वैठक पार पडली. या मुद्द्यावर संसद चांगलीच तापणार आहे. जंतरमंतरवरचं आंदोलनात अजून काही काळ धुगधुगी राहील असे दिसते आहे.

नुकत्याच झालेल्या विविध विधानसभांच्या पोटनिवडणुकांत भाजपचा एक विजय आणि दोन पराभव असा निकाल लागला आहे. 

आर्थिक आघाडीवर सरकारने भारतीय स्मार्टफोन ब्रँड्स जगात पुढे यावेत यासाठी साडेबासष्ट हजार कोटींची योजना जाहीर केलीय, चिनी-कोरियन ब्रँड्सच्या तुलनेत भारतीय कंपन्या किती पुढे सरकतात ते बघावे लागेल.

शेतीसाठी ऑगस्ट महिना नेहमीच कसोटीचा असतो. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात पावसाची चातक प्रतीक्षा, हे नेहमीचं विषम चित्र यंदाही आहे. 

माझ्या स्वतःच्या निरीक्षणानुसार मागच्या दहा वर्षांत भारतातील पावसाळा हा जून ते सप्टेंबर असा पारंपारिक न राहता जुलै मध्य ते नोव्हेंबर असा पुढे सरकला आहे. शेतकऱ्यांनी पेरणी वेळापत्रकात त्यानुसार बदल करावा असे सरकार चारपाच वर्षांपासून सांगते आहे पण सगळेच शेतकरी त्याला प्रतिसाद देतात असे नाही. (आम्ही मात्र आमची मराठवाड्यातील शेती पावसावर अवलंबून ठेवलीच नाहीय!)

या वर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केलीय; कुस्ती-बॅडमिंटन-हॉकीसारखे हुकमी मेडल मिळवणारे खेळ नसतानाही बॉक्सिंग-ज्युदो-ट्रॅक अँड फील्डच्या जोरावर पदकतालिकेत भारत बऱ्यापैकी वर सरकलाय, हे विशेष कौतुकास्पद.

भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६, शनिवारी साजरा होईल. 


बाकी महिनाभरात काय काय घडतं, कोणत्या बातम्या गाजतात ते इथे नोंदवत जाऊया. चर्चा करत राहु या. 

 

- कांदा लिंबू 

 


वाचने 25
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

५ दिवस उशीराने का होईना, पण ऑगस्ट धागा निघाला हे चांगले झाले.

 

अमेरिका - इराण युद्ध २-३ दिवसांपासून थंडावले आहे. अत्यंत चिवट इराणला शरण आणून वाटाघाटींच्या मेजावर बसायला लावण्यात अमेरिका संपूर्ण अपयशी ठरलीये. ट्रंपच्या सर्व वल्गना हवेत विरून गेल्या. आता कोठूनतरी ट्रंपला आपल्या गळ्यात अडकलेले इराणचे हाडूक बाहेर काढायचे आहे.‌ इराण पाठवित असदेली स्वयंचलित मानशरहित विमाने पाडण्यासाठी अमेरिकेची ८० टक्के प्रतिहल्ला शस्त्रे संपली आहेत.‌ प्रचंड नुकसान होऊनही इराण ताठ उभा आहे. 

 

लवकरात लवकर हे युद्ध कायमस्वरूपी थांबावे ही सदिच्छा.


चालू घडामोडी ऑगस्ट धागा तर हा दिसला होता 

कदाचित आपल्या पाहण्यात नसेल. संपादकांनी कुठलाही एक उडवून टाकावा समजून उमजून, उगाच धागा द्विरुक्ती करण्यात काहीच हशील नाही. 

बाकी श्रावण मासाच्या समस्त हिंदू धर्मीय तसेच श्रावण पाळणाऱ्या बिगर हिंदू जनतेला हार्दिक शुभेच्छा. 

ह्या निमित्ताने बालकवींच्या ह्या मधुर ओळी लिहिण्याचा मोह टाळता येत नाहीये 

 

श्रावण मासी हर्ष मानसी 

हिरवळ दाटे चोहीकडे 

क्षणात सरसर शिरवे पडती 

क्षणात फिरुनी ऊन पडे