श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन पडे.
श्रावण महिना सुरू होत आहे. दरवर्षीप्रमाणे या महिन्यात आकाशातील पांढरे-काळे ढग, सरसर येणाऱ्या पावसाच्या सरी, मध्येच दिसणारे निरभ्र आकाश, पुन्हा पडणारा रिपरिप पाऊस हे निसर्गचित्र नेहमीचंच असतं.
मिपावरचे लेखन-प्रतिसाद-प्रतिप्रतिसाद असेच असतात, नाही का?
श्रावण मास हा हिंदूंचा पवित्र काळ असतो. नागपंचमी, राखीपौर्णिमा, पोळा यांची धामधूम सुरु असते. बेसिकली, उत्सवी वातावरणाची, व्रतवैकल्याची, उपवास-निराहारांची सुरुवात या इथून सुरु होते.
मिपाकरांना श्रावण मासाच्या आगाऊ शुभेच्छा.
संसदेत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात - परिसीमन विधेयक, आयकरसुधारणा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३३ वरून ३७ पर्यंत वाढवणारं विधेयक, FCRA विधेयक, MSME साठी विलंबित पेमेंट्सवरचं संरक्षण देणारं विधेयक अशी प्रमुख विधेयकं सरकारच्या अजेंड्यावर आहेत. यातली FCRA दुरुस्ती विधेयक आणि उच्चशिक्षण नियामकांना एकत्र आणणारं VBSA विधेयक हे दोन विरोधकांच्या रडारवर आहेत, काँग्रेसने या दोन्हींना विरोध करण्याचं आधीच जाहीर केलंय. शिवाय NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरही चर्चा होत आहे. यांतील काही विधेयकं मंजूर झाली आहेत काही होतील.
परिसीमन विधेयकावरून सरकार व विरोधी पक्षांत नुकतीच वैठक पार पडली. या मुद्द्यावर संसद चांगलीच तापणार आहे. जंतरमंतरवरचं आंदोलनात अजून काही काळ धुगधुगी राहील असे दिसते आहे.
नुकत्याच झालेल्या विविध विधानसभांच्या पोटनिवडणुकांत भाजपचा एक विजय आणि दोन पराभव असा निकाल लागला आहे.
आर्थिक आघाडीवर सरकारने भारतीय स्मार्टफोन ब्रँड्स जगात पुढे यावेत यासाठी साडेबासष्ट हजार कोटींची योजना जाहीर केलीय, चिनी-कोरियन ब्रँड्सच्या तुलनेत भारतीय कंपन्या किती पुढे सरकतात ते बघावे लागेल.
शेतीसाठी ऑगस्ट महिना नेहमीच कसोटीचा असतो. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात पावसाची चातक प्रतीक्षा, हे नेहमीचं विषम चित्र यंदाही आहे.
माझ्या स्वतःच्या निरीक्षणानुसार मागच्या दहा वर्षांत भारतातील पावसाळा हा जून ते सप्टेंबर असा पारंपारिक न राहता जुलै मध्य ते नोव्हेंबर असा पुढे सरकला आहे. शेतकऱ्यांनी पेरणी वेळापत्रकात त्यानुसार बदल करावा असे सरकार चारपाच वर्षांपासून सांगते आहे पण सगळेच शेतकरी त्याला प्रतिसाद देतात असे नाही. (आम्ही मात्र आमची मराठवाड्यातील शेती पावसावर अवलंबून ठेवलीच नाहीय!)
या वर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केलीय; कुस्ती-बॅडमिंटन-हॉकीसारखे हुकमी मेडल मिळवणारे खेळ नसतानाही बॉक्सिंग-ज्युदो-ट्रॅक अँड फील्डच्या जोरावर पदकतालिकेत भारत बऱ्यापैकी वर सरकलाय, हे विशेष कौतुकास्पद.
भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६, शनिवारी साजरा होईल.
बाकी महिनाभरात काय काय घडतं, कोणत्या बातम्या गाजतात ते इथे नोंदवत जाऊया. चर्चा करत राहु या.
- कांदा लिंबू
प्रतिक्रिया
५ दिवस उशीराने का होईना, पण…
५ दिवस उशीराने का होईना, पण ऑगस्ट धागा निघाला हे चांगले झाले.
अमेरिका - इराण युद्ध २-३ दिवसांपासून थंडावले आहे. अत्यंत चिवट इराणला शरण आणून वाटाघाटींच्या मेजावर बसायला लावण्यात अमेरिका संपूर्ण अपयशी ठरलीये. ट्रंपच्या सर्व वल्गना हवेत विरून गेल्या. आता कोठूनतरी ट्रंपला आपल्या गळ्यात अडकलेले इराणचे हाडूक बाहेर काढायचे आहे. इराण पाठवित असदेली स्वयंचलित मानशरहित विमाने पाडण्यासाठी अमेरिकेची ८० टक्के प्रतिहल्ला शस्त्रे संपली आहेत. प्रचंड नुकसान होऊनही इराण ताठ उभा आहे.
लवकरात लवकर हे युद्ध कायमस्वरूपी थांबावे ही सदिच्छा.
अरेच्या !
चालू घडामोडी ऑगस्ट धागा तर हा दिसला होता
कदाचित आपल्या पाहण्यात नसेल. संपादकांनी कुठलाही एक उडवून टाकावा समजून उमजून, उगाच धागा द्विरुक्ती करण्यात काहीच हशील नाही.
बाकी श्रावण मासाच्या समस्त हिंदू धर्मीय तसेच श्रावण पाळणाऱ्या बिगर हिंदू जनतेला हार्दिक शुभेच्छा.
ह्या निमित्ताने बालकवींच्या ह्या मधुर ओळी लिहिण्याचा मोह टाळता येत नाहीये
श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात सरसर शिरवे पडती
क्षणात फिरुनी ऊन पडे
बांकीपूरचा धडा
बांकीपूरमध्ये भाजपला जोरदार धक्का बसला आहे. १९९५ पासून भाजप सातत्याने जिंकत आलेल्या जागेवर पोटनिवडणुकीत पराभव झाला आहे. त्यातही ती जागा भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांची असल्याने हा धक्का नक्कीच मोठा आहे. त्याची कारणे काय आहेत यावर बरेच काही लिहिले/बोलले गेले आहे. त्यात फिका उमेदवार देऊन मोदींच्या नावावर दगडही निवडून येईल हा आत्मविश्वास भोवणे, आधी जाहीर केलेला उमेदवार बदलणे, नितीश कुमारांच्या तुलनेत सम्राट चौधरी एकदर निस्तेज मुख्यमंत्री वाटत आहेत, नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदावरून काढल्याने जदयुच्या मतदारांची नाराजी वगैरे वगैरे बरेच काही मुद्दे आहेत. ते जे काही असेल ते असेल. मला इथे वेगळाच मुद्दा मांडायचा आहे. त्यासाठीचा सॅम्पल सेट फक्त बांकीपूरची पोटनिवडणुक इतका लहान आहे. तो राष्ट्रीय पातळीवर सोडाच राज्यपातळीवरही एक्स्ट्रापोलेट होईल किंवा होणार नाही याविषयी आता काही बोलता येणार नाही.
भाजपविरोधात प्रस्थापितविरोधी नाराजी वाढली असायची शक्यता नक्कीच आहे. त्यात बिहारमध्ये गेल्या २० वर्षांपासून तेच लोक सत्तेत आहेत त्यामुळे राज्य पातळीवर आणखी जास्त. इन जनरल लोकांची नाराजी मोदींविरोधात आहे असे वाटत नाही पण भाजपचे स्थानिक पातळीवरील अनेक लोक यावच्चंद्र दिवाकरौ सत्ता आपल्याकडेच राहणार आहे या गुर्मीतून सत्तेचा माज दाखवत आहेत तो लोकांना फारसा आवडत असेल असे वाटत नाही. त्यामुळे अशी नाराजी कधीतरी कोणत्यातरी स्वरूपात उमटणे स्वाभाविक आहे. पण अशी नाराजी उमटली तर त्याचा फायदा बांकीपूरमध्ये कोणाला झाला? मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजद उमेदवार रेखा कुमारींना जवळपास ३०% मते होती. ती घटून ११% झाली. म्हणजे भाजपची मते घटली त्याबरोबरच राजदची पण मते घटली हे महत्त्वाचे आहे. म्हणजेच भाजपविरोधातील नाराजीचा फायदा प्रमुख विरोधी पक्षाला न मिळता नव्या पर्यायाला झाला आहे. तामिळनाडूमध्येही गेल्या ६० वर्षांपासून द्रमुक आणि अण्णा द्रमुकला कंटाळलेल्या मतदारांनी द्रमुकला सत्तेतून खाली खेचताना मते प्रमुख विरोधी पक्ष अण्णा द्रमुकला नाही तर नव्या टीव्हीके पक्षाला दिली. त्याचीच काहीशी पुनरावृत्ती बांकीपूरमध्ये झालेली दिसते.
म्हणजे काय? बांकीपूरमध्ये लोक भाजपला (आणि तामिळनाडूमध्ये लोक द्रमुकला) कंटाळले होते. पण ते प्रमुख विरोधी पक्षापेक्षा नव्या पर्यायाला संधी द्यायला तयार होते. याचाच अर्थ सत्ताधारी पक्षाला लोक कंटाळले असले तरी विरोधी पक्ष आणखी कमी विश्वासार्ह वाटतो- त्यापेक्षा सत्ताधारी पक्ष बरा अशी मानसिकता आहे का? समजा बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर आणि तामिळनाडूमध्ये थळपती विजयचा पक्ष नसते तर? या जर-तरच्या गोष्टी झाल्या. नक्की काय झाले असते हे १००% खात्रीने सांगता येणार नाही पण त्या स्थितीत सत्ताधारी पक्षानेच विजय मिळवला असता ही शक्यता मला जास्त वाटते.
बांकीपूर हा भाजपला धडा आहे त्यापेक्षा मोठा धडा राजदला आहे. तामिळनाडूत द्रमुकला दणका बसला त्यापेक्षा जास्त मोठा दणका (कदाचित जागांच्या गणितात नसेल पण द्रमुकविरोधी मते आपल्याकडे वळवायला आलेले अपयश या अर्थी) अण्णा द्रमुकला बसला. देशात भाजपला हरवता येणार नाही असे नक्कीच नाही पण तो हरविणारा कोण असेल? कदाचित प्रस्थापित पक्ष नसतील तर वेगळाच, आता नावही माहित नसलेला आणि अस्तित्वातही नसलेला पक्ष असेल का? वर म्हटल्याप्रमाणे सॅम्पल सेट एकदम लहान आहे आणि तसेच सगळ्या देशात होईल किंवा होणार नाही याविषयी आता काहीही म्हणणे घाईचे ठरेल. पण तामिळनाडूपाठोपाठ बांकीपूरने ती शक्यता दाखवून दिली आहे हे नक्की.
नेतृत्वाच्या बाबतीत भाकरी…
In reply to बांकीपूरचा धडा by चंद्रसूर्यकुमार
नेतृत्वाच्या बाबतीत भाकरी फिरवण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रस्थापितविरोधी नाराजी कमी…
In reply to बांकीपूरचा धडा by चंद्रसूर्यकुमार
प्रस्थापितविरोधी नाराजी कमी असावी कारण तशी असती तर विरोधी पक्षाला लाभ होतो. प्रुमुख विरोधी पक्ष राजदची मते कमी झाली आहेत, परंतु विधानसभा निवडणुकीत एकही जागा न जिंकलेल्या जनसुराज पक्षाला विजय मिळाला.
याचा अर्थ माझ्या मते प्रस्थापितविरोधी नाराजी कमी आहे, राजदविरूद्ध सुद्धा तीव्र नाराजी आहे आणि तरीही भाजप उमेदवार हरला कारण नितीशकुमारच्या संजद समर्थकांनी भाजप उमेदवार विरोधात मत दिले असावे.
जवळपास २० वर्षे मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर ३-४ महिन्यांपूर्वी नितीशकुमारांनी मुख्यमंत्रीपद सोडले (की सोडावे लागले?) व भाजपचा मुख्यमंत्री झाला. हा बदल नितीशच्या मनाविरूद्ध असावा व राजद समर्थकांनाही हा बदल आवडला नसावा. त्यातून नितीशकुमारांना राज्यसभेवर घेऊनही अजून केंद्रीय मंत्रीपद दिले नाही. याचा एकत्रित परिणाम म्हणून राजद मतदारांनी भाजपविरोधात मते देऊन भाजप उमेदवाराला पाडले असावे.
अर्थात यामागे नितीशकुमारांची सुद्धा योजना असावी. भारतातील सर्वाधिक तीन विश्र्वासघातकी नेत्यांमध्ये नितीशकुमार प्रथम क्रमांकावर आहेत. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसणे हा त्यांचा आवडता छंद आहे.
अपेक्षा
देशात भाजपला हरवता येणार नाही असे नक्कीच नाही पण तो हरविणारा कोण असेल? कदाचित प्रस्थापित पक्ष नसतील तर वेगळाच, आता नावही माहित नसलेला आणि अस्तित्वातही नसलेला पक्ष असेल का?
तो पक्ष हिंदूंना न्याय देणारा असावा ही अपेक्षा.
धर्म स्वातंत्र्य कायदा 30 जुलै पासून लागू झाला
महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा, २०२६ हा महाराष्ट्रात बळजबरीने, फसवणूक करून, आमिष दाखवून किंवा विवाहाच्या खोट्या आधाराने होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतरास प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार दोषींना ७ ते १० वर्षांपर्यंतचा कारावास आणि ५ लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा तरतूद आहे.
परवा विकांताला नागपूरला गेलो…
परवा विकांताला नागपूरला गेलो होतो. हैदराबादहून तिथे जाण्याच्या येण्याचा अनुभव, तिथे फिरण्याचा अनुभव, महाराष्ट्र तर रस्त्यांच्या दुरावस्थेच्या माध्यमात येणाऱ्या बातम्या इत्यादी पाहून मी महाराष्ट्रात न राहता तेलंगणात राहतो याचा पुन्हा एकदा म्हणजे कितव्यांदा तरी आनंद झाला.
सहा महिन्यांपूर्वी सांगली ते कोल्हापूर या रस्त्याने जाताना तसेच वाटले होते.
मिपावरच्या ताज्या घडामोडी
शाळा सुटली
पाटी पुसली !
;-)