जडण-घडण 11
माझ्या या पहिल्या-वहिल्या ऑफीस जॉबमध्ये मला लाभलेले रिपोर्टींग बॉस अर्थात कंपनीचे मालक सुद्धा छानच होते. कुटुंबवत्सल गुजराथी गृहस्थ. फक्त एकच तक्रार होती यांच्याबद्दल. साधारण वर्षभर काम केलं असेल मी तिथे. त्या संपूर्ण काळात किंवा त्यानंतरही त्यांनी मला माझ्या योग्य नावाने हाक मारली नाही. माधुरी ऐवजी माधवी म्हणायचे. मला व्यक्तीश: कोणीही माझ्या नावाची मोडतोड केलेली किंवा ते बदललेलं रूचत नाही. पहिल्यांदा त्यांनी मला माधवी म्हणून हाक मारली, तेव्हा त्यांना थांबवत मी नावातली दुरूस्ती लक्षात आणून दिली. त्यानंतर पाच-सहा वेळा हा प्रकार झाल्यावर मी काहीशी वैतागलेच. त्यांना स्पष्टच विचारलं, सर, आप मुझे मेरे नाम से आवाज क्यू नही देते? मेरा नाम माधुरी है और आप मुझे हमेशा माधवी नाम से बुलाते है... त्यावर त्यांचं भन्नाट उत्तर, आपका नेचर सॉफ्ट है, आपकी बाते भी आपके नेचर जैसी है। ऐसे में आपके नाम में र जैसा हार्श लेटर सूट नही करता। माधवी नाम एकदम सॉफ्ट है और आपको सूट भी करता है। मी हतबुद्ध! तरीही म्हटलं, लेकीन सर, मेरा नाम तो माधुरी है । मुझे अपना नाम पसंद है। अगर आप मुझे माधवी नाम से बुलाते रहेंगे, तो मुझे हर बार आपको याद दिलाना होगा। मुझे कोई ऐतराज नही, लेकीन आगे चलके आप बुरा नही मानना। ठीक है, म्हणून हसत त्यांनी तो विषय तिथेच संपवला.
या सरांना मराठी भाषेची चांगली आवड होती आणि शुभेच्छा पत्रांमध्ये खूप काळ घालवल्यामुळे मजकुरातले बारकावे ते बरोबर ओळखायचे. मी मुलगी, त्यामुळे खूप वेळा माझ्या मजकुरामध्ये फेमीनाईन (स्त्रीलिंगी) क्रियापदं यायची. मग सर सांगायचे, आप न्यूट्रल लिखने की कोशीश किजिए। कार्ड देनेवाला लडका या लडकी कोई भी हो सकता है। ज्यादातर कार्ड बर्थ डे के होते है। वैलेंटाईन या भाई-बहन - माता- पिता जैसे रिश्तों के लिए गिने-चुने कार्ड बनते है। ऐसे में अंग्रेजी में You लिखना काफी आसान हो जाता है, लेकिन हम मराठी में ऐसे नही लिख सकते।
मग मी कॉपीत दुरूस्ती करायचे किंवा मग नवीनच कॉपी लिहून दाखवायचे. माझी कॉपी माझ्याच तोंडून ऐकायची, हा त्यांचा नेम. मराठी भाषा ऐकायला खूप आवडायचं सरांना. कदाचित वर्षानुवर्षं इंग्रजी भाषेत काम केल्यामुळे तोच तो पणा जाणवत असेल...
शुभेच्छापत्र किंवा शुभेच्छा संदेश लेखनाचा माझा पाया इथे खूपच पक्का झाला. अगदी दुसऱ्याच महिन्यात मला हजार रूपयांची पगारवाढ मिळाली. हळू-हळू काही वेगळं करून बघावंसं वाटू लागलं. मग कधी एखादं विनोदी कार्ड तर कधी एखाद्या संकल्पनेवर आधारीत संदेश, असं सुरू झालं. पण आधी म्हटल्याप्रमाणे तेव्हा मराठी शुभेच्छापत्रं पदार्पण स्थितीत होती आणि कंपनीचे मालक फार वेगळा प्रयोग करायला अनुकुल नसायचे. जास्तीत जास्त फ्लोरल (फुलांच्या चित्रांवर आधारीत) काम करायला ते प्राधान्य द्यायचे. मात्र दिवाळी सारखे सण किंवा नात्यांचे वाढदिवस अशा विषयांमध्ये मला थोडंफार स्वातंत्र्य घेता यायचं.
सुरूवातीचे सात-आठ महिने मजेत गेले. नंतर मग कामातला तोच-तोच पणा त्रास देऊ लागला. सतत जनरल बर्थडे लिहून लिहून इतका कंटाळा आला की आपण खूप यांत्रिकपणे हे काम करतोय ही जाणीव अस्वस्थ करू लागली. कंपनीला मजकुरात किंवा डिझाइनमध्ये वेगळे प्रयोग किंवा चाकोरी बाहेरचं काम करायचं नव्हतं आणि तोवर बाजारात वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारीत शुभेच्छापत्रं येऊ लागली होती. सर्व्हे साठी बाहेर पडलं की हा फरक आणखी जाणवायचा.
खरं तर शुभेच्छा देणं हा आनंददायी अनुभव असणं अपेक्षित असतं. मला मात्र, आपण शब्दांचे खेळ करतोय, तेच शब्द, त्याच चाकोरीत अडकलोय आणि काहीच वेगळं करत नाही हा विचार अस्वस्थ करू लागला होता. मग मध्येच एक पोस्टरचं काम आलं. त्यात वेगवेगळ्या चार विषयांवर जगभरातले तत्वज्ञ, विचारवंत आणि तत्सम लोकांचे विचार मराठी भाषेत अनुवादित करायचे होते. असाच एक Quote होता, God could not be everywhere, therefore he made mother.
याचा मराठी अनुवाद अगदी सहज उतरला, तो असा...
ईश्वराचं सगळीकडे अस्तित्व एकाच वेळी शक्य नाही म्हणूनच त्याने घडवलं नातं, ते म्हणजे "आई"
तो अनुवाद आणि ती संपूर्ण सीरीज खूप समाधान देऊन गेली. त्या निमित्ताने वेगळ्या प्रकारचं वाचनही झालं. कामाचं कौतुकही झालं. पण पुन्हा तेच. ये रे माझ्या मागल्या...
साधारण महिनाभर खूप विचार केला, कामात रमायचा प्रयत्नही केला. बाहेर नोकरीसाठी फार अनुकुल वातावरण नसताना आणि शिक्षण क्षेत्रातल्या राजकारणाला विटल्यानंतर पुन्हा त्या क्षेत्राकडे इतक्यात वळायची फारशी इच्छा नसताना हातातली नोकरी फक्त साचेबद्ध आहे म्हणून करत राहायची का, किंवा ती सोडणं योग्य आहे का, यावर विचार केला. पण मग आपण आपली स्वत:ची फसवणुक नाही करू शकत. प्रत्येक वेळी कॉपी लिहिताना, हे कृत्रिम आहे असा विचार मनात यायचा. हे शुभेच्छापत्र देणारा किती मनापासून देईल, पण त्या शब्दांमधला फोलपणा, निर्जिवता मला बोचत राहायची.
मनाविरूद्ध काम करणं नाही जमत मला. मग घरातल्यांशी बोलले, मोकळी झाले. मला नाही करावंसं वाटत हे काम. कदाचित फ्री लान्सींग करता येईल, याची कल्पना दिली. घरचे माझ्यासोबत होतेच. मग सरांशी बोलून राजीनामा दिलाच. ऑफीसमधल्या सगळ्यांनी मला ब्रेक घे हवा तर, पण नोकरी सोडू नको. सतत तेच लिहून असं होऊ शकतं, स्वत:ला थोडा वेळ देऊन बघ, असं सांगितलं. पण मागे फिरायला मनाची तयारी होईना. परतावंसं वाटलं तर आवर्जुन यायचं, असं सरांनी आग्रहाने सांगितलं. अगदी मनापासून आशिर्वाद आणि शुभेच्छा दिल्या त्यांनी. सहकाऱ्यांनीही निरोप दिला. भरल्या मनाने आणि डोळ्यांनी खूप चांगले अनुभव आणि पुढच्या काळात टिकणारी अनमोल मैत्री असा मोलाचा ठेवा घेऊन मी माझ्या पहिल्या ऑफीस जॉबचा निरोप घेतला...
क्रमश:
जडण-घडण १
http://www.misalpav.com/node/28093
जडण-घडण २
http://www.misalpav.com/node/28102
जडण-घडण ३
http://www.misalpav.com/node/28126
जडण-घडण 4
http://www.misalpav.com/node/28163
जडण-घडण ५
http://www.misalpav.com/node/28270
जडण-घडण 6
http://www.misalpav.com/node/28354
जडण-घडण 7
http://www.misalpav.com/node/28383
जडण-घडण 8
http://www.misalpav.com/node/28437
जडण-घडण 9
http://www.misalpav.com/node/28519
जडण-घडण १०
http://www.misalpav.com/node/28600
Book traversal links for जडण-घडण 11
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सुरेख. या आधीचे भाग वाचलेले नाहीत. पण लिखाण आवडले.
वाचतोय.
असंच संवेदनशील मन जपा.
छान!
हा पण भाग आवडला...
किती सुंदर शब्दांकन आणि सहज
सुंदर
खूप छान लेखन
वाचतेय हं!
दोन भागांमधला विराम थोडा जास्त लांबलाय याची कल्पना आहे...
खूप सुंदर!
चायला...इथे १२-१२ तास काम
धन्यवाद...
छान!