'कविता'
दुःखाच्या डोहामधुनी
करुणेची येते गाज
कुठलेसे पान तरंगत
लहरींना देते व्याज
दुःखाच्या डोहामधुनी
करुणेची येते गाज
कुठलेसे पान तरंगत
लहरींना देते व्याज
सत्वर ये तू निघोनी आता
निबीड अरण्यी कंटक वाटा
हे अंतर आता पाश म्हणू कि
नाश जीवाचा करिल ऐसा
तुझ्या रुपाचा तीर्थघटाचा
जन्मजान्हवी, श्वास मिटावा
नकोच आता वियोग असा कि
दो तीरांचे वा हिमालयाचे
बंध तोडूनी पाश टाकूनी
माझे उरले संचित आता
तुझ्या रुपाशी मिळून जावे
जिथून आले हासत खेळत
तिथेच माझे असणे नसणे...
इतकेच होवो पुण्यसलीले,
तुझ्या तटाशी भंजन व्हावे
भस्मचिता अन् बंधमोक्षही
उरू नये ते काही काही....
सत्वर ये तू निघोनी आता
निबीड अरण्यी कंटक वाटा....
शिवकन्या
सोनसावळी स्वप्ने सगळी सुखेच लेवुन आली
सोनपावले कुणा परीची हळुच उमटली दारी
कुणी रेखिल्या त्या गालावर मोरपिसांच्या ओळी
गाल गोबरे, गोड गुलाबी राजकुमारी प्यारी
नाजुक काया प्राजक्तासम कुरळे कुंतल भाळी
अप्सरा कुणी, शापभ्रष्ट ती मदनशराची स्वारी
लेक असावी एक गोडशी नको धनाच्या राशी
कुशीत घेवुन तिज सांगावी रोज कहाणी न्यारी
हातात तिचे बोट कर्दळी जबाबदारी खाशी
कोण परी ही? वळता नजरा, सुख वाटावे भारी
तिने रुसावे, रुसुन बसावे, कासाविस मी व्हावे
डोळ्यात तिच्या मला दिसावी माझी सौख्ये सारी
कोवळे काही ऋतू अंगावरुन गेले...
मोहराने रान सारे बावरुन गेले!
लालिमा चढला कसा शब्दांस आज माझ्या?
गीत माझे कोणत्या ओठावरुन गेले!
प्रेरणा : यारहो ...
दादाश्रींची विनम्र माफी मागुन ..... अर्ज़ किया है ....
ह्या उन्हाचा जोर आहे वाढलेला यारहो
शोधुया नजदीक साधा एक बियर बार हो
ड्रॉट ज्या त्या ब्रॅन्ड्ची तिथलीच बॉटल चांगली
पण अता चालेल काही फक्त असु दे गार हो
मागवा चकली चना अन हाफ चीकन तंदुरी
कावळ्यांना भूक आहे लागलेली फार हो
ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले
दावले "जमवून" मग "ठरवून" वारंवार हो
एकदा केसांस वेडे मोकळे सोडून बघ
नेत्रसुख असती गडे हे झाकले उभार* हो
पानगळीचा मौसम येतो,उगाच होते सळ-सळ नुसती...
आठवणींचा कप्पा म्हणजे,जुनी-जुनेरी अडगळ नुसती!
काळ गतीचा वेडा असतो,क्षणात घेतो वळणे नवखी...
वाट कुणाची पाहत नाही,जमात त्याची भटकळ नुसती!
"हे राम शिव शंकरा..Sssss"
होय मी धार्मिकच आहे.
रोज निद्राधीन होताना
मनाची कवाडं बंद करण्याआधी
ही शब्दफुलं अंतरात्म्याला वहावीच लागतात मला.
त्याशिवाय ह्या देव्हाऱ्यात रात्रीचा निरव येत देखील नाही. त्याचे कर्तव्य करायला.
देहाची कुडी जन्माला आलो तेंव्हा अमुक एका धर्माचा ठसा घेऊन आली नव्हती.तो धर्मच नव्हे तिचा!
हां., पण आधाराची गरज हा मात्र तिचा मूलभूत स्थायीभाव! ती तहान मात्र अत्यन्त नैसर्गिक,शाश्वत, अविनाशी!
जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा
कळू लागले जीवनाचे फिरंगी,इशारे पुन्हा!
कुण्या डोंगरी एक पणती सुखाने,जळू लागली
तमाच्या तमेचे तिला येत गेले,पुकारे पुन्हा!
कळ्या वेचल्या काल माझ्या करांनी,गुन्हा जाहला
फुलू लागले श्वास-श्वासांत माझ्या,निखारे पुन्हा!
(मौसम तरही का छाया है, तो गुस्ताखी माफ! पण तरहीच्या ओळीसाठी विशाल व क्रांतीताईंचे आभार,तसेच अगंतूकपणे तरही लिहिल्याबद्दल क्षमस्व!)
सूर्य मावळता कधीही व्हायचे नव्हते मला
या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला!
पावले वळली कितीदा त्याच त्या वळणावरी
ज्या जुन्या शहरात पुन्न्हा जायचे नव्हते मला!
आजही डोळ्यांत माझ्या धुंद ही आली कशी?
मी पुन्हा प्यालो..खरेतर, प्यायचे नव्हते मला!
वेळ नाही,काळ नाही,ना ऋतूंना लाजही
थेंब-थेंबाला विचारा,न्हायचे नव्हते मला!
भावनांना भाव नव्हता मैफलींमध्ध्ये तुझ्या
गात आलो गीत मी,जे गायचे नव्हते मला!
प्रीती तुझ्यावरी पण,समजे मलाच नाही.
या अनाकलनाचा,मी काय अर्थ घ्यावा?
शब्दात सांगताना,उरते मनात काही.
या गूढ शांततेचा,मी काय अर्थ घ्यावा?
एका किनारी तूही ,दुसय्रास स्पर्श माझा.
मधल्या प्रवाहितेचा,मी काय अर्थ घ्यावा?
मोडून एक काठ,वळते नदी जराशी.
मग शांत त्या तळाशी,कोठून सूर द्यावा?
जमले मनावरी हे, शेवाळ दाट सारे.
गहिरे कसे म्हणू मी?निसटंताचं अर्थ व्हावा!
आता मनावरूनी, सोडून देतं सारे.
दिसली फुले जरी ही,निरं-माल्य अर्थ व्हावा!
सोडून काय देऊ? सारेच क्षणभराचे.
हे रोजचेच आहे, साधाच अर्थ घ्यावा.