Skip to main content

अनुभवातील व्यक्ति, प्रकृती आणि प्रवृत्ती -१

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 02/05/2022 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
मनुष्य स्वभावाचे बरेच अजब नमुने निमसरकारी नोकरीत असताना पहायला आणि अनुभवायला मिळाले. भले, बुरे, खरे, ढोंगी, सरळ, वाकडे, वेडे, झपाटलेले ! काहीना काही आठवणी, ठसे मनात ठेवून गेलेले. त्यातल्या काहींची मनाने जपलेली नोंद इथे नोंदवण्याचा हा प्रयत्न . उमेदवारीच्या पहिल्या काही वर्षात क्षेत्रीय कामाचा अनुभव घेतला तेव्हा ग्राहकांशी थेट संबंध आलेला. त्यामुळे लोकसंपर्काच्या कळी माहिती झालेल्या. काही अधिकारी याबाबतीत वरचढ. तोंडावरची रेघही हलू न देता ग्राहकांना धादांत खोटी माहिती किंवा आश्वासने देऊन कसे रस्त्याला लावायचे हे यांच्याकडून शिकावे.

गोम.

लेखक भागो यांनी सोमवार, 02/05/2022 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
गोम. डॉक्टर अजिंक्य ननवरेंना सन २२४२ सालच्या वार्षिक विज्ञान परिषदेचं निमंत्रण आलं ह्यात आश्चर्यकारक वाटण्यासारखं काहीच नव्हतं. ते दरवर्षी येतच असतं. तसं ते ह्यावर्षीही आलं. काही झालं तरी डॉक विज्ञान परिषदेच्या सुकाणू कमिटीचे सन्माननीय सदस्य होते. डॉक्टर ननवरे पुण्याच्या पुणेकर कॉलनीत राहतात. ह्या कॉलनीत त्यांचा एक छोटासा बंगला आहे. त्याला ते प्रेमाने “मठी” असं संबोधतात. त्या “मठी”ला कॉलनिकर निरनिराळ्या नावांनी ओळखतात. कॉलनिकरांची चूक नाही. कारण डॉक्टरच त्यांच्या मठीचे नाव मनाला येईल तेव्हा बदलतात. लोक आपल्या बंगल्यांची नावे “पितृस्मृति”, “मातृछाया”, अशी एकूण कौटुंबिक ठेवतात.

मी, मराठी आणि माझं मराठी असणं

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी रविवार, 01/05/2022 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
हो. मी मराठी आहे. म्हणजे नक्की कोण आहे? आणि मला मराठी का म्हणायचं? दोन-अडीच हजार वर्षांचा इतिहास असलेली एक राजसि भाषा बोलतो, वाचतो, लिहितो म्हणून? की अपरांतापासून ते विदर्भापर्यंत आणि सातपुड्यापासून करवीरापर्यंत पसरलेल्या प्रदेशात राहतो म्हणून? पोहे, मोदक, पुरणपोळी, पिठलं, शिरा खातो म्हणून की घरी गणपती बसवतो, गुढी उभारतो, भंडारा उधळतो म्हणून? पृथ्वी, अग्नि, जल, वायु आणि आकाश ह्या पंचतत्वांनी सर्व चराचर सृष्टी बनली आहे, तसाच मी ही. पण तो "मी" म्हणजे फक्त माझं शरीर झालं. मी आज जो काही आहे त्या "मी" ला घडवण्याचं काम गेली शेकडो, कदाचित हजारो वर्षं चालू आहे.

रांगो - एक विलक्षण ऍनिमेटेड कथा

लेखक साहना यांनी रविवार, 01/05/2022 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
रांगो - एक विलक्षण ऍनिमेटेड कथा काहींना पर्वत आवडतात, तर काहींना नदीकिनारा, काहींना फेसाळणार्या अथांग सागराचे प्रेम असते तर विलक्षण भव्य मानवनिर्मित गोष्टींचे. मला मात्र लहानपणापासून वाळवंट खूपच आवडत आले आहे. आणि ते सुद्धा सौदी अरेबियन किंवा आपल्या राजस्थानी पद्धतीचे वाळूचे नाही तर कोलोरॅडो किंवा मोहावे वाळवंटाचे प्रेम. डोंगर, नदी, समुद्र ह्यांत सजीवता असते, एक गतिशीलता असते. इथे जीव आहे, इथे काळ ह्या प्रकाराला महत्व आहे. समुद्राची प्रत्येक लाट आपल्यासोबत काळ कसा निघून जात आहे ह्याची जाणीव घेऊन येते. पण वाळवंटाचे तसे नाही. इथे काळ जणू थांबलेला असतो. ह्यांत एक गूढ आहे.

यांनी घडवले माझे मराठी...

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 01/05/2022 05:53 या दिवशी प्रकाशित केले.
(दि. २७/२/२०२२ रोजी झालेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा लेख अन्यत्र प्रकाशित झाला होता. आजच्या मराठी राजभाषा दिनानिमित्त तो काही सुधारणांसह इथे प्रसिद्ध करत आहे. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !) …… आपली मातृभाषा आपल्या कानावर बालपणापासून पडू लागते. पुढे आपले विविध टप्प्यांवरील शिक्षण आणि जनसंपर्क यातून ती विकसित होते. माझी मराठी भाषा विकसित होण्यात माझ्या अनेक गुरुजनांचा वाटा आणि मार्गदर्शन आहे.

वाया जाण्याच्या आधीच्या गोष्टी

लेखक पाटिल यांनी शनिवार, 30/04/2022 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
असं काय आहे की जे करण्यासारखं असतं, हा एक प्रश्न त्याच्यापुढे आता असतो. आता असले प्रश्न पडायला वाव आहे, म्हणजे त्याची परिस्थिती बरी असणार, हे ओघाने आलेच समजा. पण तेव्हा ती तशी नव्हती. ती संध्याकाळची कातर वेळ होती. सूर्य अस्ताला गेला होता. आकाश तांबूस लालसर छटांनी व्यापलं होतं. पक्षी आपापल्या घरट्यांकडे निघाले होते. अशा वेळी तो त्याच्या शैक्षणिक कारकीर्दीच्या एका नव्या उंबरठ्यावर उभा होता. त्यामुळे त्याच्या मनात एक प्रकारची हुरहूर दाटून आली होती. कसं असेल हे नवीन गाव? कॉलेज कसं असेल? तारूण्याच्या वाटेवरचा आपला प्रवास कसा होईल? नवीन मित्र चांगले मिळतील का?

माझी राधा - ४

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 30/04/2022 06:16 या दिवशी प्रकाशित केले.
तो चेहेरा दिसताच माझ्यात काहीतरी बदल होताना मला जाणवतोय. ते मोहक हसू माझ्या ही चेहेर्‍यावर पसरत जाते. मघा बासरी वाजवताना ऐकू आलेल्या पैंजणाच्या आवाजाची ओळख पटते मागील दुवा http://misalpav.com/node/49987 मी बासरी वाजवताना मुग्ध होऊन पहाणारा. हा चेहरा मी पहिल्यांदा पाहिला ते ही डोळ्यासमोर उभे रहाते. कदम्बाच्या झाडाला टेकून बासरी वाजवत होतो. त्या वेळेस रागदारी वगैरे काही असतं हेच माहीत नव्हते. बासरी वाजवत होतो. माझे लक्ष्य नव्हते. समोरच्या पायवाटेवरून काही गवळणी पाणी आणायला म्हणून निघाल्या होत्या. माझी बासरी ऐकून त्या काही काळ थांबल्या असतील.

वसंतात मृगजळ खास

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 29/04/2022 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
काठावरचे गुपित झेलता अनु'मतीची महत्ता विशेष वसंताचे मृगजळ खास कटी बंधात उष्म निश्वास नभी नाभी ताम्र गोल चा'लते जातो तोल आर्त कुंजन आस पास पर्ण विरहीत पुष्प तटी दाट दिंगबर सुरेख मदन पाझरतो . . . . . . . स्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)

वैशाखाची ऊन्हं ..

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 29/04/2022 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
वैशाखाची ऊन्हं जेव्हा नको नको झाली, वळीवाची आठवण उमलून आली. बहाव्याने केली रिती फुलांची पखाल, पंगा-याच्या अंगावर खुळावली लाली.. सावरीच्या म्हातारीला पंख पंख फुटे, वयासंगे उडुनिया गेले तिचे काटे. चाफ्याचा बहर जणू बैराग्याची झोळी, धरू धरू म्हणताना काहीतरी सुटे. सुकलेले पात्र, मधे खोल खोल डोह, सुटता सुटेना कसा जीवनाचा मोह. काठावर कुणी वेडा सूर तोलणारा, कंठी त्याच्या मल्हाराचा ओला अवरोह. ऐकुनिया बकुळी ती लाजली जराशी, चित्त तिचे उडुनिया गेले कुणापाशी? नादावले मन तिचे उतू उतू जाई पायापाशी म्हणूनच नव्हाळीची राशी. वैशाखाची उन्हं मग गंधमय झाली वळीवाची आठवण दूरदूर गेली...

रावळगुंडवाडी स्पेशल : हुलग्याची ओट्टिगे आमटी

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी शुक्रवार, 29/04/2022 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आमटीची दीक्षा मला आमच्या मल्लाप्पा नावाच्या शेजार्‍याने दिली. मल्लाप्पाने दोन लग्नं केली. पहिली बायको एका वर्षातच गेली. मल्लाप्पाची पहिली बायको त्याची प्रेयसी. तिला साखरपुड्याच्या दिवशी मल्लाप्पाने कुडल संगमाला पळवून नेली आणि लग्न केले. मूळची रेसिपी तिची असं मल्लाप्पा म्हणतो. नंतर ती वारल्यावर मल्लप्पाच्या आईनं त्याचं लग्न परस्पर ठरवून टाकलं. लग्नाच्या दिवशी हा परत कुडल संगमाला एकटाच पळून गेला. दोन दिवस तसाच ऐक्य लिंगाजवळ बसून राहिला. शेवटी कुणी भटक्या साधूने त्याला समजावून परत प्रपंचात ढकलले.