खयचीही भाषा आणि ज्या मुलखात ती भाषा बोलतत, तो मुलूख, हेंचे आठवणी कशे विणलेल्या वस्त्रासारखे असतत बहुधा. धागे एकमेकांत कशे घट गुतलेले असतत! मालवणीत कायतरी लिही म्हणान सांगितला, तसा माका माझ्या आजोळाची याद झाली पयली. ह्या एक आसता. कोकणातल्या माणसांका कोणी कोकणातून भायेर काढीत, पण त्यांच्या मनातला कोकण कधी भायेर निघूचा नाय. भायल्या जगातल्या सगळया चकमकाटातही तेंच्या मनात कोकणातला आपला अंगण, अंगणाच्या कोपर्यातला चाफ्याचा झाड, दारासमोरची तुळस, ओवळी, गोड पाण्याची बावी, कौलारू घर, वाहणारे व्हाळ, चुलीपाशी बसलेला घरातला माजार... असा कायबाय जपून ठेवलेला असता. ते आठवणी सदाबहार आसतत.