नन्दिनीची डायरी - निर्णय
वेटिंग रूममध्ये ती एकटीच बसली होती. "एला" मी हलक्या आवाजात हाक मारली. तिने मान वर करून माझ्याकडे पाहिलं. पंचविशीच्या आसपास, अतिशय रेखीव चेहरा, पिंगट डोळे, केस मात्र कोरडे, फिस्कारलेले, काळजी न घेतले गेल्यासारखे. आणि चेहर्यावर मलूल असा भाव. मला पाहून कसनुसं हसू तिच्या चेहर्यावर उमटलं पण ते वरवरचं होतं.
माझ्या मागोमाग ती आत आली. समोरच्या सोफ्यावर बसली. नजर जमिनीवर लावून ठेवलेली. सुरुवातीच्या औपचारिक गप्पा चालू झाल्या. एला तिच्या पार्टनरसोबत राहत होती. हा देश आता लिव्ह इन रिलेशनशिप बरोबर की चूक या वादाच्या पुष्कळ पुढे गेला आहे.