"नाना, उद्यापासून ह्यालाही घेऊन जाल का पोहायला?" मला नानांच्यापुढे उभे करत आईने विचारले.
"हो गं त्यात काय, दे उद्या सकाळी ७ वाजता पाठवून. काढतो ह्यालाही सगळ्या पोरांबरोबर पोहायला!" नाना माझ्याकडे पाहत तोंडभर हसत म्हणाले.
नाना आणि इन्ना कुलकर्णी म्हणजे मिरजेच्या माझ्या आजोळच्या वाड्यातलं एक जगमित्र कुटुंब होतं. माझ्या आई, मामा, मावशींच्या पिढीला तर नानांनी पोहायला शिकवलं होतंच आणि आता ते त्यापुढच्या पिढीला म्हणजे आम्हा मावस, आत्ते-मामे भावंडांनाही पोहायला शिकवत होते.
मी ८-१० वर्षांचाच असेन त्यावेळी.