एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराच्या डायरीच्या निमित्ताने
मायबापहो,
१० जुन पासुन मी दैनिक बोम्बाबोम्ब मधला प्रशिक्षणार्थी पत्रकार प्रमोद भोंडे (पम्या) याची डायरी मिसळपावमार्फत आपल्यापर्यंत घेवून आलो. जरी मराठी माणुस असलो अन वाचन हे माझे व्यसन असले तरी अशाप्रकारचे लिखाण मी करण्याची ही पहिलीच वेळ. अर्थातच त्यात अनेक त्रुटी होत्या. पण आपण माझा हा वानवळा गोड मानुन घेतला, रोज मी जे वेडेवाकडे लिहिले ते वाचले, माझे उदंड कौतुक केले, प्रतिसाद दिले अन प्रोत्साहनही यासाठी आपले सर्वांचे आभार मानावे तेव्हढे थोडेच आहेत.
ही डायरी लिहीत असताना अनेक जणांनी मी कोण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, काहींनी अचुक अंदाज बांधले तर काहींनी मला तसे विचारलेही. प्रत्येकाला मी एकच उत्तर दिले, योग्य वेळ आल्यावर मी नक्की सांगेन. आता ती वेळ आली आहे.
मी कोण, मी काय करतोय! तसे पाहिले तर साधा सरळ प्रश्न पण हाच प्रश्न काही वेळा एव्हढा गहन होतो की त्यावर दार्शनिकांमधे वाद होतात! प्रत्येकजण या प्रश्नाला सामोरा जातो, अगदी जन्मापासुन म्हणुन तर नवजातच्या टॅहॅ च्या आवाजात दार्शनिकांना कोहं चा प्रश्न ऐकु येतो. मग प्रत्येकजण आपल्यापुरती त्याची उत्तरे शोधतो. हा शोधप्रवास म्हणजेच तर आयुष्य असते ना? माझाही हा प्रवास सुरुच आहे.
साध्या सरळ भाषेत सांगायचे तर मी एक पत्रकार... पुण्यनगरीतल्या एका इंग्रजी दैनिकात काम करणारा, अठरा-एकोणिस वर्षांचा या व्यवसायातला अनुभव गाठीशी जोडून मधल्या फळीत खेळणारा खेळाडू. पत्रकारीतेच्या अफाट सागरातला एक छोटासा बिंदु. मला खूप काही कळते असा माझा दावाही नाही अन समजही!
एव्हढे दिवस सगळ्यांची मापे काढत डायरी लिहिल्यावर मी जेव्हा म्हणतो की मी पत्रकार आहे तेव्हा ती वेळ असते माझ्या व्यवसायाच्या अन व्यवसायबंधुंच्या समर्थनार्थ उभे रहाण्याची. मला माझे ते कर्तव्य पार पाडलेच पाहीजे. या डायरीचा कथानायक प्रमोद भोंडे (पम्या) हे पात्र पुर्णपणे काल्पनिक आहे. या नावाचा कुठलाही पत्रकार मला माहिती नाही. डायरीत आलेल्या ईतर पात्रांबाबत आणि दैनिक बोम्बाबोम्ब बाबत ही असेच.
या डायरीत लिहिलेले किस्से खरे आहेत का? माझी मनोमनी इच्छा आहे की ते खरे नसावेत. पण अशा प्रकारचे अनेक किस्से मी माझ्या व्यवसायबंधुंकडुन अन काही वरिष्ठांकडुन पण ऐकले आहेत. प्रत्येकवेळी या किश्श्यांसंदर्भात मी व्यवसायात कार्यरत असलेल्या लोकांची नावे ऐकली आहेत अन ते खरे असल्याबद्दलचे निर्वाळेसुद्धा. काही किस्से तर मी स्वतः अनुभवलेले, पाहीलेले आहेत.
आता उरतो सर्वात महत्वाचा प्रश्न: मी स्वतः पत्रकार आहे, मला मी जे करतो त्याचा गर्व म्हणावा एवढा अभिमान आहे तर मी ही डायरी का लिहिली? कारण सरळ आहे, मी स्वतःला नीतीमान पत्रकार समजतो. माझा वाचक हा माझा देव अन मी रोज करतो ते काम ही त्या देवाची पूजा बांधण्याचे माझे उपचार आहेत. पण जेव्हा हा देव रुसतो, नाराज होतो तेव्हा माझ्यासारखा भक्त व्यथित होतो, त्यालाही देवाला काही सांगावे असे वाटते त्यासाठीच ही डायरी.
पत्रकार म्हणुन काम करताना रोज अनेक लोकांशी संबंध येतात, अन त्यांची मते ते व्यक्त करतात. अशा अनेक चर्चांमधे मला जाणवला तो पत्रकारितेचा दर्जा खालावलाय, पत्रकारांची अन वृत्तपत्रांची विश्वासार्हता संपली आहे हा सुर. प्रथम मी या सुराकडे नसती कुरकुर, असंतुष्टांची पोटदुखी म्हणुन दुर्लक्ष केले पण जसजशी व्यावसायीक उन्नती होत गेली, जबाबदार्या वाढत गेल्या, तसतसा माझा दृष्टीकोणही बदलत गेला. त्याबरोबरच आली प्रचंड अस्वस्थता. मला वाटले आपण प्रस्थापित झालोय अन त्यामुळे माझी समाजाशी नाळ तुटत चाललीय त्यामुळे असे होत असेल. मग एक दिवस मी निर्णय घेतला चांगली सुरु असलेली नोकरी सोडून स्वतः विस्थापित होण्याचा. तरी अस्वस्थता तशीच राहीली, अन कारणे शोधताना मला लक्षात आले, फक्त माझीच नव्हे तर समाजातील अनेक घटकांची, अन त्यात पत्रकारितातील अनेक लोक पण आलेच, समाजाशी नाळ तुटत चालली आहे. हा समाज एकसंध न रहाता अनेक न्युक्लीअर घटकांचा विस्कळीत समुदाय होत चालला आहे. अन त्याचा परिणाम माझ्या व्यवसायावर प्रकर्षाने होणे साहजिकच आहे.
प्रत्येक अळी सुरवंट नसते, प्रत्येक सुरवंटाचे फुलपाखरु होत नाही तर त्यातली काही अकालीच नष्ट होतात अन प्रत्येक फुलपाखरु सुंदर दिसावे असे कितीही वाटले तरी तसे होत नाही हा तर जगाचा न्याय आहे. मग पत्रकारीता त्याला कसा अपवाद ठरेल? पत्रकारिता या व्यवसायात सामान्यता अनेक प्रकारचे लोक येतात. सामाजिक बांधिलकी वगैरे ध्येयवादी विचार बाळगणारे काही थोडे, पत्रकारीतेच्या ग्लॅमरला भुललेले काही अन कधीच काही करता येणार नाही असे ज्यांच्याबाबत सगळ्यांना वाटत असे बरेच टगे....
यातल्या बर्याचजणांना या व्यवसायात येताना त्याबाबत पुर्ण माहीतीदेखील नसते. पण एकदा व्यवसायात ते शिरले की हळुहळु ती होत जाते, व्यावसायीक कौशल्ये विकसीत होत जातात अन हळुहळु ते सामावले जातात. अशा वेळी कोणी समर्थ अन चांगला मार्गदर्शक भेटला तर तो पत्रकार चांगलाच होतो. पण ही प्रक्रिया सुरु असताना इतर अनेक घटक तीवर परिणाम करीत असतात.
सर्वात मोठे दोन घटक म्हणजे पत्रकारांना मिळणारे वेतन अन त्यांची जीवनशैली. बहुतेक वृत्तपत्रे पत्रकारांना कंत्राट पद्धतीने घेतात अन त्यांना कुठल्याच कायद्याचे संरक्षण नसल्याने पत्रकारांच्या आयुष्यात कायम असुरक्षितता रहाते. साहजिकच त्याचा परिणाम त्यांच्या सर्व आयुष्यावर होतो. पत्रकारांची जीवनशैली देखील कमालीची विस्कळीत असते. केव्हा कुठली माहिती मिळेल अन काम सुरु करावे लागेल याचा भरवसा नसतो. बहुतेक पत्रकार दिवसाचे बारा-पंधरा तास काम करतात. व्यावसायिक संबंधांखेरीज अन्य अनेक गोष्टी, ज्या सामान्य माणुस त्याच्या खाजगी, सार्वजनिक आयुष्यात करतो, त्या त्यांना कधीच अनुभवता येत नाहीत. वेतन अन भत्ते अपुरे असल्याने अन खर्च भरमसाठ असल्याने पत्रकार आयुष्यभर भणंग रहाण्याचीच शक्यता अधीक. यामुळे अनेकदा पत्रकाराच्या मनात कायम द्वंद्व सुरु असते. बरे हा व्यवसाय नोबेल प्रोफेशन वगैरे असल्याने हे प्रश्न कुणाच्याच प्रायॉरिटी लिस्ट वर (खरे तर गिनतीत) नसतात.
असा हा पत्रकार पण गरीब बिचारा कधीच नसतो. खरेतर भारतात अभिव्यक्तीस्वातंत्र्य असल्याने मुक्त पत्रकारिता फोफावायला हवी पण या स्वातंत्र्याचा घास घेणारे अनेक फॅक्टर असतात अन त्याचा परिणामही होत असतोच. पत्रकारांवर अनेकदा आरोप होतो की ते प्रशासनावर पुरेसा अंकुश ठेवत नाहीत. पण अनेकदा पत्रकारांना भीती असते की सत्ताधारी, पैसेवाले बडे नोकरशहा इत्यादी मातब्बर अन निरंकुश कारभार करणार्यांवर जास्त टीका केली तर हे लोक त्यांच्या अधिकारांचा वापर करुन त्या पत्रकाराची कोंडी करतील, त्याला बातम्या मिळणार नाही अशी व्यवस्था करतील.
दुसरा मोठा मुद्दा येतो तो पत्रकाराच्या सामर्थ्याचा. वस्तुत: पत्रकाराला सामान्य माणसापेक्षा अधिक असे कोणतेही अधिकार नसतात. परंतु त्याच्या व्यवसायामुळे तो ज्यांच्याकडे जबरदस्त अधिकार असतो त्यांच्या खूपच जवळपास वावरत असतो अन त्या जवळीकीमुळे अनेकदा त्याला अप्रत्यक्ष अधिकार गाजवता येवू शकतात जसे क्राईम रिपोर्टरव्या एखाद्या मित्राला सिग्नल मोडल्याकरता पोलिसाने थांबवले अन दंड भरायला सांगितला तर तो मित्र पत्रकाराच्या एखाद्या फोननंतर दंड न भरता सुटतो. यामुळे अनेकदा गुर्मी येते अन असे करणे आपला अधिकारच असल्याच्या अविर्भावात पत्रकार वावरु लागतो. ही अर्थातच त्या पत्रकाराची चूक आहे पण त्याच्या जागी स्वतःला कल्पा अन पहा हे प्रलोभन टाळणे किती अवघड आहे ते!
हे सर्व ज्ञान (किंवा अज्ञान) मांडुन तुमचा छळ का? ही एका पत्रकाराची कैफियत आहे का? या प्रश्नांना माझे उत्तर सरळ आहे. आम्ही पत्रकार कारु-नारु जे काही करतो ते कश्यासाठी तर वृत्तपत्रात बातम्या छापुन माहिती तुमच्यासारख्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. मग आम्ही जे काही करतो ते तुम्हाला आवडत नसेल, पटत नसेल तर तुमचे प्रश्न, तुमच्या आवडी आमच्यापर्यंत तुम्हीच पोहोचवायला हव्यात. हा विचार माझा स्वतःचा नाही किंवा नविनही नाही. याच कारणाकरता बहुतेक सर्व वृत्तपत्रे अन मीडीया गेली कित्येक वर्षे सिटीझन जर्नॅलिस्ट सारखे प्रयोग करत आहेत. पण त्याची फलनिष्पत्ती काय, काही लोक त्याचा वापर स्वतःची पोळी भाजुन घेण्याकरता करतात तर अनेकदा लोक त्यांचे अगदी वैय्यक्तिक प्रश्न सोडवण्याकरता, किंवा कुणालातरी "अद्दल घडवून सरळ करण्याकरता" अश्या व्यासपीठांचा वापर करतात. पण समाजाचे प्रश्न वगैरेचा विचार करण्याची कुवत असलेला विचारवंत, जो बहुधा मध्यमवर्गीय वगैरे असतो, तो या सगळ्यापासुन स्वतःला अलिप्त ठेवतो. जोवर हा समाजात बहुसंख्य असलेला वर्ग कार्यरत होत नाही तोवर ही परिस्थिती बदलण्याची शक्यता मला स्वतःला वाटत नाही. हा जो विचार मी करतोय तसाच विचार करणारे अनेक पत्रकार मला माहीती आहेत.
मायबापहो, जरा स्वतःच स्वतःभोवती विणलेल्या कोशातुन बाहेर या! जरा आम्हा पत्रकारांनापण तुमच्या भावविश्वात सामील करुन घ्या. शेवटी आम्ही पण तुमच्यातलेच आहोत अन आमचे अस्तित्वही तुमच्याचसाठी आहे. अरे या मीडीयाला कुणीतरी समजवा रे असा फक्त ओरडा करण्याऐवजी तुमचे प्रश्न काय आहेत हे आम्हाला कळवा अन ते एकत्र मिळुन सोडवायला मदत करा. आपण सर्व जर एकत्र आलो तर खूप फरक पडु शकेल. हेच सांगण्यासाठी केलाय हा सगळा अट्टाहास!
आपलाच,
पुणेरी पत्रकार मित्र!
प्रसन्नकुमार केसकर
वाचन
6104
प्रतिक्रिया
0