Skip to main content

कविता

पॉझिटिव्ह - निगेटिव्ह

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी सोमवार, 17/05/2021 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
पॉझिटिव्ह - निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्हचा खेळ, जणु फुली अन् गोळा, सर्वांच्याच स्वप्नांचा, करतोय चोळामोळा... कोणीही आता कोणाकडे, जराही नाही फिरकत, प्रत्येकाच्या मनात लपलीय, मृत्यूची मोठी दहशत... पशुपक्ष्यांची भरते शाळा, ते करती सारे मजा, बंदिवान झालीत माणसं, भोगतात घरी सजा... कधी सारं संपेल, घेईन मोकळा श्वास, मानवाच्या अंतरीची, ही एकच आस... ह्या नियतीची क्रूर परीक्षा, पुरे झाली आता, देवा लवकर धाव घे, तूच आमचा त्राता.....!! जयगंधा.. १७-५-२०२१.

सांग कधी कळणार तुला (विडंबन)

लेखक OBAMA80 यांनी रविवार, 16/05/2021 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला? रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला? सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला? /१/ गंधित नाजुक पानांमधुनी, सूर छेडिते अलगद कुणी अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सुरातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला?/२/ निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला?/३/ जुळता डोळे एक वेळी, धीट पापणी झुकली खाली खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला?

मधाळलेल्या कुण्या मिठीची...

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 14/05/2021 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
मधाळलेल्या कुण्या मिठीची चव लाघवी पीठीसाखरी, झळा भोवती वैशाखी तरी गोड सावली आम्र पाखरी. एकच पुरतो कटाक्ष तिरका नजर अशी की तिख्खी मिर्ची, पेटवते मग रंध्रांध्रातून अन्वर ज्वाला आसक्तीची. दातांचा तो चिमणी चावा करकरीत जणु कैरी कच्ची, शिरशिर अंगी हवीहवीशी कशी लपावी नाजूक नक्षी? स्पर्श असा की शामक अमला तनामनाचा दाह उतारी, कषाय जणू तो प्याल्यामधला क्षणात देतो कशी उभारी. खट्ट्या मिठ्ठ्या श्वासांमध्ये शब्द बिचारे हरवून जाती. नमकीन काही घडून जाते अर्थ उगाचच शोधत बसती..

आज जरी

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 11/05/2021 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रधगीने रातराणी उत्फुल्लपणे- परिमळेल तेव्हा व्याधविद्ध मृगशीर्ष जरासे मावळतीवर- ढळेल तेव्हा केतकीत नागीण निळी टाकून कात- सळसळेल तेव्हा नि:शब्दांची धून खोलवर रुजून ओठी- रुळेल तेव्हा वास्तवतळिचे अस्फुट अद्भुत कणाकणाने- कळेल तेव्हा... ....वीज शिरी कोसळली तरीही, सावरेन मी अद्भुत अवघे विरून, वास्तव क्षणोक्षणी मग- छळेल तेव्हा... ....आज जरी निष्पर्ण तरी बहरेन उद्या मी
काव्यरस

काही बोलायचे आहे ( विरसग्रहण)

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 11/05/2021 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही हाय का डेरिंग बोलायचं? डेरिंगच नाय तर कसा बोलशील. अन डेरिंग करुन बोललाच तर फुकाट जोड खाशीन याच भ्याव हाये ना. आन नको तोलु देवळाच्या दारात भक्ती. भक्तीत खोट निघाली तर चारचौघात खोटा पडशीन! माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही आरं ते प्लास्टिकच फूल हाये फुलाचा शेंट मारलेला डिट्टो फुलावानी दिसतय. मधमाशाबी फशीत्यात.
काव्यरस

देव

लेखक अनुस्वार यांनी बुधवार, 05/05/2021 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
देव म्हणजे हवा, नाही अगरबत्तीचा सुगंध तो अन्नात आहे, उपवासात नाही. देव दानशूर मोठा, लाचार नाही न्यायी आहे देव, नवसाचा व्यापारी नाही. देव आहे सदाचारात, अन्यायाचा शत्रू देव मुहूर्त नाही, अनंत काळ आहे. देवही भक्त आहे, भावाचा भुकेला देव नाही खजिनदार-पुजारी. देव देवळात नाही फक्त, आहे सगळीकडे देव दाढीत नाही, शेंडीतही नाही. जीवन देव आहे, मृत्यूही तोच प्रचारात देव नाही, तो प्रकांड आहे. देव म्हणजे गंभीर गोष्ट माणूस त्याची गंमत करतो. गुलाबजाम जणू पाकातला हलवायाची व्याख्या करतो. देव म्हणजे साधा माणूस जरा अधिक जरा उणा. देव म्हणजे तुम्ही-मी आपल्या आईच्या नजरेतले.

......अजूनही !

लेखक फिझा यांनी मंगळवार, 04/05/2021 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
......अजूनही ! आसमंत व्यापून टाकलेल्या त्या मखमली ढगांमधून वीज चर्र्कन धरणीमध्ये निघून जावी .... ------असेच त्यांचे ते शेवटचे शब्द .... सगळं काही भेदून विस्कळीत करून टाकणारे..... अगदी क्षणार्धात ! स्वप्नांनी तुडुंब भरलेल्या आपल्या मनाला ..... अगदी रिक्त करून डोहाच्या तळाशी नेऊन ठेवल्यासारखे ! आता सगळं अगदी रिकामं झालंय ..... जे ते जिथल्या तिथल्या किनाऱ्यावर सोडून खळाळत निमूटपणे वाहणाऱ्या नदीसारखी .... मीही वाहत आहे आता ...... एकटीच ! पहाटेच्या मंद प्रकाशात रेंगाळत असतील तुझ्या आजूबाजूला ......

जपून ठेव!

लेखक अनुस्वार यांनी शनिवार, 01/05/2021 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी जरा बाहेर जातोय माझे शब्द जपून ठेव. काही तुला आवडलेले काही मुद्दाम न वाचलेले. रात्रीचे, पहाटेच्या स्वप्नांतले बोललेले आणि अबोल राहिलेले. अर्थाच्या शोधात पडू नको तो मलाही लागत नाही. आता शब्दही तुझेच आहेत माझा कोरा कागद पतंग व्हायचं म्हणतोय. अलगद हाताळ या शब्दांना मुलायम असले तरी घावही घालतात. दिसत नाहीत नेहमीच पण असतात जरूर अश्वत्थाम्याप्रमाणे शब्दांनाही शाप आहे अमरत्वाचा. तुझ्याशी नीटच वागतील हे शब्द हृदयातली खळबळ त्यांनी जवळून पाहिलीये. परतीचा प्रवास नाहीच शक्य झाला, तर शब्दांसोबत माझी एक आठवण सुद्धा ठेव. स्वतःला जपून ठेव!

सवय

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 30/04/2021 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
साखरझोपेच्या डोळेजड सीमेवरून हाकारणार्‍या अनघड कल्पनांची वास्तवाच्या धगीत कापूरवाफ होताना बघण्याची आता सवय करून घेतोय मास्कावगुंठित श्वासात अवकाळी पावसाचा विषण्ण मृद्गंध ऊरफोड भरून पाऊसगाणे गाण्याची आता सवय करून घेतोय हताशेच्या महासाथीची "न"वी लाट सकारात्मक विचारांच्या प्लासिबोने नेस्तनाबूत होईलच हे स्वत:ला वारंवार पटविण्याची आता सवय करून घेतोय
काव्यरस

चक्कर

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 29/04/2021 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्न आयुष्याचा असतो उत्तर असते आयुष्याचे. आपण निव्वळ कोरे कागद नशीब छपाईच्या कामाचे. शब्दांना का कळतो अर्थ लिहिणाऱ्याच्या मनातला? अर्थ कोणता जीवनाला मग जन्म देत असे अज्ञातातला. मृत्यू म्हणजे शेवट कसला? पितरांच्या शांतीत काकही फसला. अनुभवाचे गाठोडे सोडून वर्तमानावर भूतकाळ हसला. विश्वाचे मुळ गूढ भयंकर सोबत नाही एकही शंकर. अंधाराला शोधीत भास्कर पृथ्वीस सांगे, "मारत राहा चक्कर"!