बंध माळेचे
डायरीचे पान मिटवून भैय्याजींनी एक दीर्घ निश्वास सोडला. आजचा नामजप पूर्ण झाला होता. तस म्हटलं तर अजूनही जास्त करता आला असता. पण आज नको. आज रविवार असल्यामुळे सुशांत घरीच होता. एरवी तो कामावर गेला, आणि छोट्याला शाळेत पोहचवले की घरात फ़क्त भैय्याजी, बायको-प्रमिला आणि सून. कसा शांत आणि भरपूर वेळ मिळायचा. भैय्याजी नाम-सागरात, किंवा एखाद्या पुस्तकात स्वत:ला बुडवून घेत. सासु सुनेची स्वयंपाक घरातील आवरासावर संपली, की पूर्ण घर निस्तब्धतेच्या डोहात बुडून जायचे. अशा वेळी नामस्मरण करण्यात कशी वेगळीच अनुभुती यायची. रविवारी घरातील सगळे उगाचच प्रचंड उत्साहाने कोलाहल करीत असायचे.