मी जरा लवकरच म्हणजे २:४५ ला चक्क हाफ डे घेऊन निघालो. विचार केलं ३:३० च्या आसपास कुठली तरी फास्ट लोकल मिळेल. आशेला नेहेमीच अपेक्षांचे पंख असतात नाही का? ऑफिस लोअर परळ येथे असल्याने दादरच्या गर्दीचा ससेमिरा चुकवण्यासाठी भायखळापर्यंत जाणे परवडते. बरं, भायखळ्याला गेलं की गाडीत चढायला मिळणार हे नक्की. ती शाश्वती दादरला उभे असणारे टीसी देखील देऊ शकणार नाहीत. बऱ्यापैकी वेळ असल्या मुळे रमत गमत भायखळा स्टेशन वर पोचलो. नवरात्रीचे दिवस, रिकामा प्लाटफॉर्म, त्यामानाने खुपच कमी गर्दी होती. पुरुषांच्या प्रथम वर्गाच्या डब्याच्या इथे तर आम्ही मोजून २-३ जण पण स्त्रियांच्या डब्याजवळ गर्दी फार होती.