वेळ रात्री बारा सव्वा बाराची, नदीकाठचा परिसर, डोळ्यात कुणी बोट घातले तरी कळणार नाही असा दाट अंधार,अमावाश्येचीच रात्र ती. सगळीकडे काळोखाचेच साम्राज्य,दूर गावाच्या बाजूला ग्राम पंचायतीचे दोन तीन दिवे क्षीणपणे लुकलुकताना दिसत होते.परंतु इथे स्मशानात त्यांचा काहीही उपयोग नव्हता. इथे त्याला फक्त अंधार नि अस्वस्थ करणारी शांतता यांचीच सोबत होती. .
मस्त गार वारे सुटले होते तरी त्याला घाम आला होता. चेहऱ्यावरचा घाम पुसत त्याने घड्याळात पहिले. सव्वा बारा, धक्का बसून त्याने पुन्हा घड्याळ पहिले सव्वा बाराच वाजले होते. म्हणजे त्याला तिथं येऊन फक्त पंधराच मिनिटे झाली होती.