कळ
....
तिच्या हसऱ्या फोटोवर एक नजर फिरवली. सगळे प्राण बोटाच्या अग्राशी आणून डिलीटचा ऑप्शन वापरला. मोबाईल बंद केला. एक भला मोठ्ठा दगड मनाच्या दाराशी ठेवला आणि कौशिकदा उठले.
Backstage वाले आपापल्या कामात मग्न होते. खिळे, फळकुट, हातोडे, गिरमीट, हा कपडा, तो स्टूल, तो आरसा, ही पिशवी कुठे अडकवायची.... एक ना दोन! शुभारंभाच्या प्रयोगाची तारीख जवळ येत होती. तयारी जोरात चालू होती. कौशिकदा या नाटकाचे दिग्दर्शक. सगळी हयात ‘नाटक’ या एकाच विषयात गेलेली. आपण केलेली नाटकं संख्येत मोजण्यात त्यांना फारशी रुची नव्हती. सतत नाविन्याचा ध्यास. प्रयोग करीत रहायचे.