आमच्या नदीकाठाला लागून एक झोपडपट्टी आहे. आडवी तिडवी वाढलेली, कोणाची भीडभाड न ठेवणारी, आपल्याच मस्तीत जगणारी. याच वस्तीत एक 'अफलातून' जमात राहते. ह्या जमातीत पूर्णपणे स्त्रियांचं राज्य आहे, त्यांचीच हुकूमत चालते, त्या म्हणतील ती पूर्वदिशा मानली जाते. पुरुषाला दुय्यम लेखलं जातं. त्याच्यावर अधिकार गाजवला जातो!
घरातली म्हणजे झोपडीतली छोटी मोठी कामे तोच करतो. पोरं सांभाळणे, धान्य निवडणे, दळून आणणे, धुणी धुणे, भांडी घासणे, पोरांचं आवरणे (त्यात शी शू आलेच.) इ. इ. (स्वयंपाक तेवढाच काय तो स्त्रिया करतात.)
बाहेरचे आर्थिक व्यवहार स्त्रियांकडेच.