मी कामाला जाताना डबा न्यायला लागलो, त्याला आता १२ वर्षे होउन गेली. शाळा, कॉलेज घराजवळ होते , त्यामुळे, मधल्या सुट्टीत, घरी जेवायला येत होतो. नंतर इंजिनिअरींगला असताना, कॉलेज मेस आणि हॉस्टेल एकाच कॅम्पसमध्ये असल्यामुळे, तिथेही डब्याचा संबंध आला नाही.
पुण्याला,जॉब सुरु केल्यावर,डबा सुरु झाला. बॅचलर असताना, आमच्या कंपनीत एक डबेवाला यायचा. त्याचा डबा असायचा छान, पण अगदीच कमी पडायचा. त्याला आम्ही, "काय भोसले आज वाटाण्याच्या उसळीत फक्त २५ वाटाणे होते, तिसरया घासाला पोळी संपली” असं खुलेआम चिडवलं तरी त्याची क्वांटीटी काही वाढायची नाही. डब्याचे पैसे मात्र वेळेवर घ्यायला यायचा.