आमचा बॉस आणि आम्ही, एकत्र राबतो. बॉस राबवतो. आम्ही 'राब'तो. आम्हाला कधीतरी ऑफीसला जायला उशीर होतो. नेमका तेंव्हाच, आमचा बॉस लवकर आलेला असतो. आम्हाला पाहून आमचा बॉस एकवार आमच्याकडे बघतो आणि एक वेळ घड्याळाकडे. आमच्या मनात विचार येतो ' घड्याळाच्या जागी आमच्या बॉसलाच लटकवावा' , पण... चेहेर्यावर 'आपल्याच घड्याळाचे काटे मोडल्याचा' भाव आणावा लागतो.
आमचा बॉस विचारतो, "उशीर का झाला?"
आम्ही सांगतो, " ट्रेन लेट"
"मग तूमच्या बरोबरचे देशपांडे वेळेवर कसे?"
" ट्रेन पकडायला लेट. " आम्ही उत्तरात थोडासा बदल करतो.
आमचा बॉस आमच्या हजेरी बूकात एक फूली मारतो. आम्ही बॉसला मनातल्या मनात ३ ते ४ 'फूल्या' वहातो.