हाथ छुटे भी तो...!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
10 Oct 2011 - 2:00 pm

आज पुन्हा एकदा खूप काही हरवलं आहे. पोटात खूप काही तुटतं आहे. जगजीत सिंग साहेबांसारख्या एका मनस्वी सुरील्या, भावतरल गळ्याच्या धन्याला आज आपण मुकलो आहोत. एक खूप मोठा कलाकार आज आपल्यातून निघून गेला आहे.

जगजित सिंग यांच्याच एका गाण्याचे रसग्रहण करण्याचा माझा हा एक प्रयत्न. हीच माझी त्यांना विनम्र आदरांजली..!

हाथ छुटे भी तो..!
(इथे ऐका)

'पिंजर' चित्रपटातलं उतम सिंग यांचं संगीत असलेलं जगजित सिंग यांनी गायलेलं हे गाणं. केवळ अप्रतीम. हे गाणं ऐकलं की काव्य, संगीत आणि गायन या सर्वार्थाने एक अत्यंत उच्च दर्जाचं गाणं ऐकल्याचं समाधान मिळतं, जीव तृप्त होतो!

हाथ छुटे भी तो रिश्ते नही छुटा करते,
वक्त की शाख से लम्हे नही टुटा करते!

पुरियाधनाश्रीचे बेचैन स्वर. राग पुरियाधनाश्री. समाधीचा राग..!

'वक्त की शाख से लम्हे..' या ओळीतील 'लम्हे'वर कोमल धैवत विसावतो, उदास सायंकालच्या सावल्या लांबतात आणि ते 'लम्हे' काळजात घर करतात..!

जिसने पैरों के निशा भी नही छोडे पिछे,
उस मुसाफिर का पता भी नही पुछा करते..!

क्या केहेने..! या ओळीचं चित्रिकरण तर विशेष सुरेख आहे!

जिसने पैरो के..' ही ओळ जेव्हा तार षड्जाला स्पर्ष करते तिथे पुरियाधनाश्री जीव कासावीस करतो. ते पुरियाधनाश्रीचं समर्पण! आणि त्यानंतरची पंचामवरची अवरोही विश्रांती. हा खास पुरियाधनाश्रीतील पंचम. प्रार्थनेचा पंचम..! आणि ही सारी जगजितसिंग साहेबांच्या सुरांची आणि त्यांच्या विलक्षण भावपूर्णता असलेल्या ओल्या रसिल्या गळ्याची किमया..!

'छुट गये यार ना छुटी यारी मौला..' चा कोरस सुंदर. कोरसचं सरगम गायनही अगदी परिणामकारक. गाण्याच्या चित्रिकरणातील उर्मिला अभिनयात, दिसण्यात नेहमीप्रमाणेच लाजवाब!

प्रिय जगजित सिंग साहेब,

हाथ छुटे भी तो रिश्ते नही छुटा करते,
वक्त की शाख से लम्हे नही टुटा करते!

खरं आहे आपण म्हणता ते. आज आपण आम्हा सर्वांचा हात सोडून निघून गेला आहात, परंतु आपल्यातलं सुराच नातं कधीही तुटणार नाही. आम्हाला तृप्ती, समाधान आणि आनंद देणर्‍या आपल्या अनेक मैफलींमधले, गायकीमधले लम्हे कधीही पुसले जाणार नाहीत, विसरले जाणार नाहीत.

सुरांनी बांधलेली नाती कधीही तुटत नाहीत हेच खरं..!

-- तात्या अभ्यंकर.

संगीतवाङ्मयआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

तृप्ती, समाधान आणि आनंद

अगदी..

जगजीतजींच्या आवाजाने मिळणार्‍या गोष्टी एवढ्या तीन शब्दात चपखलपणे सांगितल्यात.

त्यांना श्रद्धांजली.

मन१'s picture

10 Oct 2011 - 2:17 pm | मन१

सहमत.

तिथला प्रतिसाद इथे पुन्हा देतोय.
जगजित हे त्यांच्या जगजित्-चित्रा सिंग ह्याबद्दल किंवा प्रेमविषयक गझलांबद्दल प्रसिद्ध आहेतच. पण मला त्यांचा "insight" हा चिंतनात्मक संग्रह जास्त भावला. ह्यात सारेच काही एकाहून एक, खोलवर जाण्वणारे असे काही होते.
"बदला न अपने आपको" आणि मुंह की बात सुने हर कोई दिल के दर्द को जाने कौन म्हणत त्यांनी एखाद्या अबोल, काहिशा एकट्या, एकांती मनाचे चित्र मस्त उभे केले.

"गरज बरस प्यासी धरती को फिर पानी दे मौला" मधून तर थेट ज्ञानेश्वरांचे "पसायदान"च ऐकू येतं.

त्याच insight मधील दोहे सुद्धा सुंदरच. हे शब्द धन लिहिणार्‍या निदा फाज़ली ,कबीर ह्यांना व त्यांना सुरेल स्वरसाज चढवून अंतर्मुख करणार्‍या जगजित सिंग ह्यांना सलाम!
http://www.dishant.com/album/jagjit_singh_-_insight.html इथे तो अल्बम पूर्ण उपलब्ध दिसतोय.
त्यांची सामान्यपणे प्रचलित गाण्यांचे उल्लेख येतीलच, हे मुद्दाम काहिसे अनवट पण अत्युच्च उंचीचे वाटले म्हणून इथे देतोय.

जगजित हे गझलगायक म्हणून अधिकारी आहेतच, पण Different strokes इथे त्यांचे शास्त्रीय गायनही दिसते.
त्यांचा तराणाही क्लासच (भैरवीतला असावा वाटतो; जाणकारांनी भाष्य करावे)...

स्वरवर्षा करणार्‍या स्वरवरूणाला पुनश्च सलाम.....

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

10 Oct 2011 - 2:13 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मला काय वाटत आहे ते तंतोतंत शब्दात उतरवल्याबद्दल तात्यांचे मनापासून आभार!
असचं त्यांनी गायलेल्या गझल बद्दल सांगता येईल.
बरच काही लिहावेसे वाटते आहे, पण सध्या शब्द धुसर झालेत....
इश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. :(

पैसा's picture

10 Oct 2011 - 2:18 pm | पैसा

या आवाजात गायलेली आणखी नवी गाणी यापुढे येणार नाहीत याचं वाईट वाटतं.

जगजित सिंग यांना आदरांजली.

तिमा's picture

10 Oct 2011 - 8:17 pm | तिमा

'मन उदास' अशी अवस्था झाली आहे. अनेक वर्षांपूर्वी अनोळखी शहरात, शेजार ओळखीचा नसताना, हवेवरुन 'आहिस्ता आहिस्ता' चे सूर तरंगत आले आणि मग एका थोर गायकाचा ध्यास लागला.
तात्या, तुमचा लेख खूपच आवडला.