✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग

च
चैतन्य गौरान्गप्रभु यांनी
Sun, 04/22/2012 - 22:49  ·  लेख
लेख
जंगल! परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! जंगल म्हटलं की वाघोबाच्या डरकाळीपासुन ते टारझनच्या आरोळीपर्यंतच्या आठवणी मनात घर न करतील तरच नवल. अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जिवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपण जंगालाचंही काहीतरी देणं लागतो हे मात्र आपण सामान्य माणसं सोयिस्करपणे विसरतो. जादव पायेंग मात्र विसरभोळा नाही. सोयिस्करपणे विसरणे तर त्याच्या गावीही नाही. आणि रेताड, ओसाड शिवाय दुर्लक्षीत अश्या १३६० एकर जमिनिवर आपलं आयुष्य खर्ची घालत एक संपुर्ण अरण्य फुलवल्यानंतर तो, तुमच्या-आमच्यासारखा सामान्यही रहात नाही. होय. आसाममधल्या जोरहट जिल्ह्यातल्या जादव पायेंगचं आयुष्य कुठल्याही दंतकथेपेक्षा कमी नाही. या भागावर राज्य चालतं ते 'ब्रम्हपुत्र' नदिचं. अ-कारान्त पुल्लींगी नाव असणारी कदाचीत ही एकमेव नदी असावी. वेग, विस्तार आणि विध्वंस करण्याची क्षमताही एखाद्या विर पुरूषालाच साजेशी. सागरासमान विशाल अश्या ब्रम्हपुत्रच्या पात्रात अनेक छोटीछोटी बेटे तयार झालीत. तीस वर्षापुर्वी याच ब्रम्हपुत्र नदिच्या पात्राजवळून सुरू झालेली जादव पायेंगचीही अरण्ययात्रा आज तब्बल ५५० हेक्टर जमीनीवर एक छोटं अभयारण्य तयार करण्य़ापर्यंत येऊन पोचलीय. हे एकमेवाद्वीतीय मनुष्यनिर्मित अरण्य आज चार वाघ, तीन गेंडे, शंभरेक हरणं, शेकडो माकडं, ससे आणि ईतर जनावरांचं हक्काचं घर आहे. कित्येक प्रवासी पक्षी पाहूणे म्हणुन ईथे येतात. जवळपास सव्वाशे जंगली हत्तींचा कळप येथे वर्षातले सहा महिने वास्तव्यास असतो. मात्र १९७९ साली सोळा वर्षाच्या एका पोरट्याने या बेटावर पाय ठेवला होता, तेव्हा परिस्थीती अगदीच वेगळी होती. ब्रम्हपुत्र नदिच्या विद्धंसकारी पुराने सगळं काही वाहून नेलं होतं. अगदी छोटीछोटी झुडुपे देखील ठेवली नव्हती. बी रूजायला मातीच नव्हती. नजर जाईल तेथे रेती आणि रेती नसेल तेथे खडक. होते नव्हते ते सगळे जीव वाहून गेले. राहिले ते फक्त सरपटणारे प्राणी. पण पूर ओसरला, उन पडलं, आणि सावलीचा कुठेच पत्ता नसल्याने त्यांनीही उन्हाने पोळून निघून जीव सोडले. त्याच्या कबिल्यात ज्यांची पुजा व्हायची त्या शेकडो साप, अजगर आणि ईतर प्राण्यांचे तडफडून जीव गेलेले पाहून त्या सोळा वर्षाच्या मुलाला अश्रृ आवरले नाहीत. त्याने ठरवलं की, या बेटावर पुन्हा जंगल निर्माण करायचं. रोपटी मागायला तो वनविभागाच्या कर्मचा-यांकडे गेला. सहाजीक सगळ्यांनी त्याला मुर्खात काढलं. या ओसाड जागेवर बांबु उगवला तरी भरून पावलं, असा विचार करून कुणीतरी बांबुची रोपटी दिली. मग बांबुचं वन उभारण्याचा ध्यासच या पोराने घेतला. 'मुलई' म्हणायचे त्याला घरचे आणि गावचे लोक. म्हणुन मग त्याने उभारलेल्या जंगलाचं नाव पडलं 'मुलई कथोनी' म्हणजे मुलईचं जंगल. बांबुच्या बनापासुन सुरू झालेल्या या जंगलाला आज अभयारण्य दर्जा मिळण्याईतपत जैवविविधता ईथे आहे. मुलईच्या अथक परिश्रमाचंच ते फळ. येथे अथक म्हणजे अगदी शब्दशः अथक! खडकाळ मातीत लाल मुंग्या राहिल्या तर मातीचा दर्जा बदलतो. ती सुपीक होते असा गावक-यांचा अनुभव लक्षात घेऊन मुलईने आपल्या खेड्यातून लाल मुंग्या पकडून आणुन त्यांचं पुनर्वसन या बेटावर करायला सुरूवात केली. गावापासुन बेटावर पोचण्यासाठी आधी तीस किलोमिटरचा चिंचोळा रस्ता, नंतर होडीत बसुन तासभर केलेला प्रवास आणि त्याहीनंतर तब्बल सात आठ किलोमीटरचा पाई प्रवास या मुंग्यांना जवळ घेऊन करत असतांना त्यांनी घेतलेले अगणीत चावे त्याने कसे सहन केले असतील? बांबुच्या या बनाला एक संपुर्ण अरण्य बनवण्यासाठी भटकंती करत वालकोल, अर्जुन, इजर, गुलमोहर, कोरोई, मोज आणि हिमोलू ची रोपटी जमवत फिरणा-या मुलईला सरकार, गावातले लोक आणि कुटुंबानेही मदत नाकारल्यावर कुणाच्या भरवश्यावर तो उभा राहिला असेल? लावलेली रोपटी जगावीत, म्हणुन तब्बल तीस वर्षापासुन न चुकता सकाळ-संध्याकाळ त्यांना नदिवरून आणून पाणी टाकणा-या मुलईला हे सगळं करत राहण्याची प्रेरणा त्या जंगलात कुठुन बरं मिळाली असेल? विश्वास बसणार नाही ईतकं या जंगलाशी मुलईचं दृढ नातं आहे. ईथले वाघही त्याला ओळखतात आणि एकशिंगी गेंडेही. आजुबाजुच्या गावात विध्वंस करणारे जंगली हत्ती गावक-यांच्या प्रकोपापासुन वाचण्यासाठी याच जंगलात येतात. कारण त्यांना मारायला जमलेल्या गावक-यांना सामोरा जाऊन 'आधी मला मारा. मग हत्तींवर गोळ्या चालवा' असं जाहिर आव्हान हा शिडशिडित प्रकृतीचा बुटकासा माणुसच फक्त देऊ शकतो. एकशिंगी गेंड्यांच्या शिका-यांची तक्रार तो त्त्वरीत वनवीभागाकडे सोपवतो. अध्ये मध्ये गावक-यांना जंगल तोडण्याची हुक्की आली, की झाडांना कवटाळून बसतो. एखादा नवा पक्षी पाहूणा म्हणुन आलेला पाहिला की त्याचा पाहूणचारही करतो. गेल्या तीस वर्षापासुन मुलई हे काम निःस्वार्थ भावनेने करतो आहे. त्याच जंगलात त्याच्या जुन्या झोपडीतच तो अजुनही राहतो. बायको, दोन मुले आणि एक मुलगी अश्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ तो घरात पाळलेल्या गाई आणि म्हशिंचं दूध विकून चालवतो. प्रसिद्धी, पैसा किंवा सन्मान यांची त्याला दूरदूरपर्यंत पुसटशीही आशा नाही. पण पैसा आणि सन्मान सोडले, तरी प्रसिद्धी मात्र त्याच्या वाट्याला थोडीफार आली आहे. तेही अगदी अलीकडे २००८ नंतर. त्याचं झालं असं, की जंगली हतींच्या कळपाच्या पाठलागावर आलेल्या वनविभागाच्या लोकांना नदिच्या मधोमध ईतकं संपन्न अरण्य पाहून धक्काच बसला. बेटावर मुलईचा शोध घेतल्यावर जुन्या वन अधिका-यांना त्याची ओळख पटली. जवळपास पंचवीस वर्षापुर्वी वनवीभागाने हाती घेतलेल्या एका योजनेसाठी काम करणारा एक साधा मजुर आपलं आयुष्य खर्ची घालतो, आणि हजारो एकरामध्ये एकहाती ईतक्या भव्य अरण्याची निर्मीती करतो, हा त्यांच्यासाठी कुतुहलाच तसाच अभिमानाचा विषय झाला. वनवीभागाच्या गस्ती मग या भागात वाढू लागल्या. गेंड्याची शिकार करणा-यांचं रॅकॅटच या भागात कार्यरत आहे. मुलईच्या मदतीने त्यांना या शिका-यांनाही अटक करता आली. सुंदरबन बघायला येणा-या पर्यटकांसाठीही 'मुलई कथोनी' हे 'हॅपनींग डेस्टीनेशन' बनलं. ब्रिटिश डॉक्युमेन्ट्रीकार टॉम रॉबर्ट याने या जंगलात काही काळ राहून एक अप्रतीम माहितीपटही बनवला. त्यामाध्यमातून मुलईचं नाव आणि कार्य जगभर माहिती झालं. बाहेर देशातल्या एनजीओ आणि जंगलप्रेमींनी चौकशी केल्यावर मग ओरीसा सरकारलाही जाग आली. मुलईच्या कार्याची दखल घेत त्यांनी त्याचा गौरव केला. निसर्ग रक्षणाच्या गोष्टी करणा-या आणि भाषणे देणा-या पेज थ्री 'ईनव्हायर्नमेन्ट ऍक्टीव्हीस्टस' लोकांपेक्षा आपल्या कर्तृत्त्वाने आदर्श घालून देणा-या मुलईला आज देश विदेशांतून मार्गदर्शनासाठी बोलावलं जातंय. पण आपलं जंगल सोडून कुठेही जायला तो तयार नाही. सरकार आणि वनवीभागाने 'मुलई कथोनी' च्या संरक्षणाची संपुर्ण जबाबदारी घेतली, तर आपण देशातल्या ईतर ठीकाणी जाऊनही अरण्यनिर्माणाचा प्रयोग करू शकतो, असा त्याला विश्वास आहे. त्यासाठी या जंगलाला अभयारण्य घोषित करण्याची नितांत आवश्यकता आहे. सरकारी स्तरावर सरकारी गतीने ते प्रयत्न सुरू आहेत, पण मुलईचं त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही. जगभर आज वसुंधरा दिवस साजरा होत असतांना आपल्या अवघ्या आयुष्याचाच वानप्रस्थ करून दररोजच वसुंधरा दिवस साजरा करणा-या या अवलीयाचं अरण्यक असंच सुरू राहणार आहे. जे असतील त्यांच्यासह, जे नसतील त्यांच्याशिवाय!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
भूगोल
देशांतर
राहती जागा
शिक्षण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
अभिनंदन
माध्यमवेध
लेख
बातमी
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती
चौकशी
वाद

प्रतिक्रिया द्या
47726 वाचन

💬 प्रतिसाद (87)

प्रतिक्रिया

उत्तम लेख आणि चांगली माहिती

बहुगुणी
Sun, 04/22/2012 - 23:05 नवीन
चै गो: वसुंधरा दिवसाचं निमित्त साधून फार uplifting लेख लिहिलात, धन्यवाद! जादव पायेंग ची दखल इतर देशातल्या लोकांनी जितकी घेतली तितकी भारतीयांनी नाही. जालावर शोधून त्याचं प्रकाशचित्र इथे टाकतोयः Image removed.
  • Log in or register to post comments

समयोचित लेखाबद्दल आभारी आहे.

अन्या दातार
Sun, 04/22/2012 - 23:06 नवीन
समयोचित लेखाबद्दल आभारी आहे. नेहमीप्रमाणे उत्तम ओळख करुन दिलीत.
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Mon, 04/23/2012 - 13:08 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

सुंदर लेख! खूप खूप

श्रीरंग
Mon, 04/23/2012 - 00:20 नवीन
सुंदर लेख! खूप खूप धन्यवाद! असंख्य कतृत्वशून्य फडतूस तथाकथित सेलेब्रिटीजची टीव्ही वरची गर्दी दिसली, की अशा खरोखरच्या उत्तुंग लोकांकडे माध्यमांचं होत असलेलं दुर्लक्ष पाहून खंत वाटते.
  • Log in or register to post comments

+१

कवितानागेश
Mon, 04/23/2012 - 13:05 नवीन
....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

जय महाराश्ट्र??

कौतिक राव
Mon, 04/23/2012 - 00:57 नवीन
आप्ल्या राज्यात चान्गला स्कोप आहे जादवान्ना!! या महापुरुशा ला आपल्या देशाचा पर्यावरण मन्त्री का करु नये.. अशी एक कारणे दाखवा नोटीस काढायला हवी..
  • Log in or register to post comments

माहिती फारच आवडली.

रेवती
Mon, 04/23/2012 - 02:52 नवीन
माहिती फारच आवडली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद...

चैतन्य गौरान्गप्रभु
Mon, 04/23/2012 - 04:04 नवीन
सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद!! अन्या दातार, आणि सरपंच यांचे 'विषेश उल्लेखनिय' असे धन्यवाद!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सहज
Mon, 04/23/2012 - 06:16 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

बोलती बंद झाली . अरण्य ?

स्पंदना
Mon, 04/23/2012 - 07:26 नवीन
बोलती बंद झाली . अरण्य ? अरण्य उभा केल यान? बापरे. एकच सुचना 'ब्रम्हपुत्र' हा 'नद' आहे. या प्रवाहाचा पात्रविस्तार अन लांबी यावर आधारित हा एक्मेव 'नद ' म्हणुन ओळखला जाणारा प्रवाह .
  • Log in or register to post comments

>एकच सुचना 'ब्रम्हपुत्र' हा 'नद' आहे

नेत्रेश
Tue, 04/24/2012 - 00:32 नवीन
नद म्हणजे काय? नदी पेक्षा नद वेगळा कसा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

येथे पहा. तुम्हाला थोडी माहीती मिळेल.

स्पंदना
Wed, 08/14/2013 - 05:22 नवीन
नद हा अतिविशाल पात्र अन प्र्चंद ओघ असलेला प्रवाह असावा अस मला वाटतय. पण कायमच ब्रह्मपुत्र नदीचा उल्लेख नद असा ऐकला आहे. http://in.answers.yahoo.com/question/index?qid=20090408084705AAmCsMx
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

तुमचे लेख नेहमीच हटके आणि

यकु
Mon, 04/23/2012 - 08:14 नवीन
तुमचे लेख नेहमीच हटके आणि प्रेरणादायक असतात. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

रिअल हिरो.

VINODBANKHELE
Mon, 04/23/2012 - 09:02 नवीन
आपल्या कचकड्याच्या दुनियेतील रिअल हिरो. धन्यवाद
  • Log in or register to post comments

सुपर्ब!

प्यारे१
Mon, 04/23/2012 - 15:02 नवीन
सुपर्ब!
  • Log in or register to post comments

पुन्हा वाचलं नि पुन्हा

प्यारे१
गुरुवार, 09/05/2013 - 21:43 नवीन
पुन्हा वाचलं नि पुन्हा नखशिखांत शहारलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

चैतन्य गौरान्गप्रभु साहेब, अतिशय अप्रतिम लेख...

निश
Mon, 04/23/2012 - 15:42 नवीन
चैतन्य गौरान्गप्रभु साहेब, अतिशय अप्रतिम लेख... लेखात अतिशय थोर माणसाची ओळख करुन दिली आहात. खुप खुप आभार .
  • Log in or register to post comments

+१

आयुर्हित
Fri, 07/18/2014 - 03:36 नवीन
सहमत. खुप खुप आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

उत्तम

निशदे
Tue, 04/24/2012 - 00:48 नवीन
फारच समयोचित आणि माहितीपूर्ण लेख. असे कितीएक ध्येयवेडे प्रसिद्धीची तमा न बाळगता आपल्या मार्गाने जात असतील. धन्यवाद चैतन्य..... :)
  • Log in or register to post comments

अतिशय उत्तम ओळख एका अविश्वनीय

टुकुल
Tue, 04/24/2012 - 09:47 नवीन
अतिशय उत्तम ओळख एका अविश्वनीय माणसाची. --टुकुल
  • Log in or register to post comments

वाचनखूण साठवली आहे. मस्त लेख

यशोधरा
Tue, 04/24/2012 - 17:16 नवीन
वाचनखूण साठवली आहे. मस्त लेख आणि ओळख. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

ग्रेट!

पैसा
Tue, 04/24/2012 - 19:16 नवीन
अगदी समयोचित लेख आणि उत्तम ओळख. असे कितीतरी लोक हवे आहेत तरच आपली जंगलं वाचतील.
  • Log in or register to post comments

सलाम...

मन१
Tue, 04/24/2012 - 19:39 नवीन
आभाळाएवढ्या कार्याला सलाम. खरच कुणा एकट्याला एवधं सगळं जमेल ह्यावर विश्वास बसत नाही. शंका:- त्याचा पोटापाण्याचा व्यवसाय सध्या काय? तो पूर्वी (जंगल उभारणीच्या काळात) काय करायचा? किंवा तो हे कसे करु शकला? ह्याच सर्व शंका मला बिहारमधील "पहाडबाबा" ह्या थोर माणसाबद्दलही आहेत.
  • Log in or register to post comments

श्री मन जी...

चैतन्य गौरान्गप्रभु
Wed, 04/25/2012 - 00:37 नवीन
बायको, दोन मुले आणि एक मुलगी अश्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ तो घरात पाळलेल्या गाई आणि म्हशिंचं दूध विकून चालवतो. हे वाक्य त्या लेखात आहे. माझ्या मते आपल्या प्रश्नाचे उत्तर या वाक्यात आहे.
  • Log in or register to post comments

अत्यंत मोलाचे कार्य ! सुंदर

मदनबाण
Wed, 04/25/2012 - 07:37 नवीन
अत्यंत मोलाचे कार्य ! सुंदर माहिती. :)
  • Log in or register to post comments

जादव पायेंग ह्यांच अरण्यक

यशोधरा
Tue, 02/12/2013 - 10:19 नवीन
जादव पायेंग ह्यांच अरण्यक अजूनही सुरु आहे का?
  • Log in or register to post comments

सुरेख

चाणक्य
Tue, 02/12/2013 - 17:28 नवीन
यशोधरा, बरं झालं हा लेख वरती आणलात.
  • Log in or register to post comments

मिपावरच्या काही अतिशय आवडत्या

यशोधरा
Wed, 02/13/2013 - 06:09 नवीन
मिपावरच्या काही अतिशय आवडत्या लेखांपैकी हा एक. अशा लेखांना भरपूर प्रतिसाद मिळत नाहीत ह्याचे वाईट वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

+१

एस
Wed, 02/13/2013 - 23:02 नवीन
हे मात्र दुर्दैवाने खरे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

उत्तम लेख

शुचि
Tue, 02/12/2013 - 20:15 नवीन
खरच वसवा जंगलं.
  • Log in or register to post comments

_/\_

राघव
Tue, 02/12/2013 - 21:57 नवीन
सुंदर माहिती. खूप खूप धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेख भावला...

एस
Tue, 02/12/2013 - 23:40 नवीन
मिपावर पर्यावरणाबद्दल फारसे लेख आलेले वाचण्यात नाहीत. बहुसंख्य मिपाकर पर्यावरणाच्या बाबतीत 'मला काय त्याचे?' असे आहेत की काय असाही माझा ग्रह झालाय. पण हा लेख मात्र फार आवडला. काही दुवे येथे देत आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या खूपशा गोष्टी करण्याआधी आपण विचार करायला शिकूयात ही आशा. http://www.storyofstuff.org/ लाखमालाची गोष्ट - http://vimeo.com/10132338
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

सुबोध खरे
Tue, 02/12/2013 - 23:46 नवीन
चैतन्य गौरान्गप्रभु आपल्याला सुंदर लेखाबद्दल सलाम जादव पायेंग यांना साष्टांग दंडवत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे आदर्श उदाहरण
  • Log in or register to post comments

+ १

अक्षया
गुरुवार, 02/14/2013 - 11:17 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अप्रतिम

अभ्या..
Wed, 02/13/2013 - 02:06 नवीन
सुरेख, एकदम अप्रतिम अशी ओळख करुन दिलीत. अत्यंत उत्तम अशा लेखनाबद्दल चैतन्य साहेबांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अप्रतिम कार्याचे वर्णन करणारा

बॅटमॅन
गुरुवार, 02/14/2013 - 19:10 नवीन
अप्रतिम कार्याचे वर्णन करणारा मस्त लेख. कसा सुटला नजरेतून काय माहिती. या अशा लोकांबद्दल आपण काहीही लिहिणे म्हणजे नळाने समुद्राचे वर्णन करणे होय. असो. काही मासिकांतून याबद्दल आधी वाचलं होतं, या लेखाच्या निमित्ताने पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला, बहुत बहुत धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

हा खरा जंगलवेडा. बाकीचे सगळे

नगरीनिरंजन
Fri, 02/15/2013 - 09:16 नवीन
हा खरा जंगलवेडा. बाकीचे सगळे आयत्या जंगलात वाघ पाहायला जाणारे स्वतःच्या काल्पनिक जंगलप्रेमाच्या प्रेमात पडलेले नार्सिसिस्ट!
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण

अस्मी
Fri, 02/15/2013 - 11:31 नवीन
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा परिस्थितीत ह्या मनुष्याने एवढं काही करून दाखवलं! खरंच सलाम!!
  • Log in or register to post comments

अवलिया

NiluMP
Sat, 02/16/2013 - 00:56 नवीन
एका अवलियाची ओळख करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

चागला लेख ,फक्त ऑरिसा नाही आसाम

रजनिश
Sat, 02/16/2013 - 16:01 नवीन
ऑरिसा नाहि , आसाम
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा लेख वर आणण्यासाठी

यशोधरा
Tue, 08/13/2013 - 07:50 नवीन
पुन्हा एकदा लेख वर आणण्यासाठी हा प्रतिसाद. संमं, दखलमध्ये घेता येईल का हा लेख?
  • Log in or register to post comments

__/\__

vrushali n
Wed, 08/14/2013 - 10:39 नवीन
तोन्डात बोटे घालणारी बाहुली...
  • Log in or register to post comments

अप्रतिम

विटेकर
Wed, 08/14/2013 - 12:46 नवीन
सुरेख ! तेथे कर माझे जुळती !!
  • Log in or register to post comments

जंगल उभं केलं? एखाद-दुसरं झाड

पिशी अबोली
Sat, 08/17/2013 - 14:34 नवीन
जंगल उभं केलं? एखाद-दुसरं झाड वाढवणं किती कठीण असतं... ______/\_______ साष्टांग
  • Log in or register to post comments

माहितीबद्दल अनेक धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/17/2013 - 14:53 नवीन
माहितीबद्दल अनेक धन्यवाद ! अशी माणसेच खरे मानवतेचे काम करत आहेत... बाकीचे सगळे टिव्हीच्या शोधातले बगळे ! जंगलप्रेमींनी चौकशी केल्यावर मग ओरीसा सरकारलाही जाग आली इथे बहुतेक "...आसाम सरकारला..." असे म्हणायचे असावे.
  • Log in or register to post comments

प्रेरणादायी लेखन

उर्मिला००
Sat, 08/17/2013 - 15:37 नवीन
तुमचे लेखन अतिशय सोप्या ओघवत्या भाषेत,प्रभावी असे आहे.सदर लेखातुन वाचकांना नक्की प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख!

अनन्न्या
Sat, 08/17/2013 - 18:27 नवीन
जादव पायेंगला सलाम!
  • Log in or register to post comments

हा खरा 'माणुस'!!!

अर्धवटराव
Sun, 08/18/2013 - 08:57 नवीन
_/\_ अर्धवटराव
  • Log in or register to post comments

सर्वांचा सहभाग आवश्यक.

प्रभाकर पेठकर
Mon, 08/19/2013 - 02:38 नवीन
आधी वाचनात आला नव्हता. आता यशोधराने उत्खनन करून हा लेख वर काढल्यावर नजर पडली. खूप छान आणि प्रेरणादायी माहीती आहे. आपापल्या शहरात, राहत्या जागेच्या आजूबाजूस किमान ५ तरी झाडे लावण्याचा (आणि वाढवण्याचा) संकल्प करूयात.
  • Log in or register to post comments

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग

भ ट क्या खे ड वा ला
Mon, 08/19/2013 - 20:17 नवीन
अत्यंत सुंदर लेख , काय अचाट माणूस आहे हा अहो जंगल काय हा तर जग घडवणारा माणूस
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा