Skip to main content

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी रविवार, 22/04/2012 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
जंगल! परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! जंगल म्हटलं की वाघोबाच्या डरकाळीपासुन ते टारझनच्या आरोळीपर्यंतच्या आठवणी मनात घर न करतील तरच नवल. अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जिवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपण जंगालाचंही काहीतरी देणं लागतो हे मात्र आपण सामान्य माणसं सोयिस्करपणे विसरतो. जादव पायेंग मात्र विसरभोळा नाही. सोयिस्करपणे विसरणे तर त्याच्या गावीही नाही. आणि रेताड, ओसाड शिवाय दुर्लक्षीत अश्या १३६० एकर जमिनिवर आपलं आयुष्य खर्ची घालत एक संपुर्ण अरण्य फुलवल्यानंतर तो, तुमच्या-आमच्यासारखा सामान्यही रहात नाही. होय. आसाममधल्या जोरहट जिल्ह्यातल्या जादव पायेंगचं आयुष्य कुठल्याही दंतकथेपेक्षा कमी नाही. या भागावर राज्य चालतं ते 'ब्रम्हपुत्र' नदिचं. अ-कारान्त पुल्लींगी नाव असणारी कदाचीत ही एकमेव नदी असावी. वेग, विस्तार आणि विध्वंस करण्याची क्षमताही एखाद्या विर पुरूषालाच साजेशी. सागरासमान विशाल अश्या ब्रम्हपुत्रच्या पात्रात अनेक छोटीछोटी बेटे तयार झालीत. तीस वर्षापुर्वी याच ब्रम्हपुत्र नदिच्या पात्राजवळून सुरू झालेली जादव पायेंगचीही अरण्ययात्रा आज तब्बल ५५० हेक्टर जमीनीवर एक छोटं अभयारण्य तयार करण्य़ापर्यंत येऊन पोचलीय. हे एकमेवाद्वीतीय मनुष्यनिर्मित अरण्य आज चार वाघ, तीन गेंडे, शंभरेक हरणं, शेकडो माकडं, ससे आणि ईतर जनावरांचं हक्काचं घर आहे. कित्येक प्रवासी पक्षी पाहूणे म्हणुन ईथे येतात. जवळपास सव्वाशे जंगली हत्तींचा कळप येथे वर्षातले सहा महिने वास्तव्यास असतो. मात्र १९७९ साली सोळा वर्षाच्या एका पोरट्याने या बेटावर पाय ठेवला होता, तेव्हा परिस्थीती अगदीच वेगळी होती. ब्रम्हपुत्र नदिच्या विद्धंसकारी पुराने सगळं काही वाहून नेलं होतं. अगदी छोटीछोटी झुडुपे देखील ठेवली नव्हती. बी रूजायला मातीच नव्हती. नजर जाईल तेथे रेती आणि रेती नसेल तेथे खडक. होते नव्हते ते सगळे जीव वाहून गेले. राहिले ते फक्त सरपटणारे प्राणी. पण पूर ओसरला, उन पडलं, आणि सावलीचा कुठेच पत्ता नसल्याने त्यांनीही उन्हाने पोळून निघून जीव सोडले. त्याच्या कबिल्यात ज्यांची पुजा व्हायची त्या शेकडो साप, अजगर आणि ईतर प्राण्यांचे तडफडून जीव गेलेले पाहून त्या सोळा वर्षाच्या मुलाला अश्रृ आवरले नाहीत. त्याने ठरवलं की, या बेटावर पुन्हा जंगल निर्माण करायचं. रोपटी मागायला तो वनविभागाच्या कर्मचा-यांकडे गेला. सहाजीक सगळ्यांनी त्याला मुर्खात काढलं. या ओसाड जागेवर बांबु उगवला तरी भरून पावलं, असा विचार करून कुणीतरी बांबुची रोपटी दिली. मग बांबुचं वन उभारण्याचा ध्यासच या पोराने घेतला. 'मुलई' म्हणायचे त्याला घरचे आणि गावचे लोक. म्हणुन मग त्याने उभारलेल्या जंगलाचं नाव पडलं 'मुलई कथोनी' म्हणजे मुलईचं जंगल. बांबुच्या बनापासुन सुरू झालेल्या या जंगलाला आज अभयारण्य दर्जा मिळण्याईतपत जैवविविधता ईथे आहे. मुलईच्या अथक परिश्रमाचंच ते फळ. येथे अथक म्हणजे अगदी शब्दशः अथक! खडकाळ मातीत लाल मुंग्या राहिल्या तर मातीचा दर्जा बदलतो. ती सुपीक होते असा गावक-यांचा अनुभव लक्षात घेऊन मुलईने आपल्या खेड्यातून लाल मुंग्या पकडून आणुन त्यांचं पुनर्वसन या बेटावर करायला सुरूवात केली. गावापासुन बेटावर पोचण्यासाठी आधी तीस किलोमिटरचा चिंचोळा रस्ता, नंतर होडीत बसुन तासभर केलेला प्रवास आणि त्याहीनंतर तब्बल सात आठ किलोमीटरचा पाई प्रवास या मुंग्यांना जवळ घेऊन करत असतांना त्यांनी घेतलेले अगणीत चावे त्याने कसे सहन केले असतील? बांबुच्या या बनाला एक संपुर्ण अरण्य बनवण्यासाठी भटकंती करत वालकोल, अर्जुन, इजर, गुलमोहर, कोरोई, मोज आणि हिमोलू ची रोपटी जमवत फिरणा-या मुलईला सरकार, गावातले लोक आणि कुटुंबानेही मदत नाकारल्यावर कुणाच्या भरवश्यावर तो उभा राहिला असेल? लावलेली रोपटी जगावीत, म्हणुन तब्बल तीस वर्षापासुन न चुकता सकाळ-संध्याकाळ त्यांना नदिवरून आणून पाणी टाकणा-या मुलईला हे सगळं करत राहण्याची प्रेरणा त्या जंगलात कुठुन बरं मिळाली असेल? विश्वास बसणार नाही ईतकं या जंगलाशी मुलईचं दृढ नातं आहे. ईथले वाघही त्याला ओळखतात आणि एकशिंगी गेंडेही. आजुबाजुच्या गावात विध्वंस करणारे जंगली हत्ती गावक-यांच्या प्रकोपापासुन वाचण्यासाठी याच जंगलात येतात. कारण त्यांना मारायला जमलेल्या गावक-यांना सामोरा जाऊन 'आधी मला मारा. मग हत्तींवर गोळ्या चालवा' असं जाहिर आव्हान हा शिडशिडित प्रकृतीचा बुटकासा माणुसच फक्त देऊ शकतो. एकशिंगी गेंड्यांच्या शिका-यांची तक्रार तो त्त्वरीत वनवीभागाकडे सोपवतो. अध्ये मध्ये गावक-यांना जंगल तोडण्याची हुक्की आली, की झाडांना कवटाळून बसतो. एखादा नवा पक्षी पाहूणा म्हणुन आलेला पाहिला की त्याचा पाहूणचारही करतो. गेल्या तीस वर्षापासुन मुलई हे काम निःस्वार्थ भावनेने करतो आहे. त्याच जंगलात त्याच्या जुन्या झोपडीतच तो अजुनही राहतो. बायको, दोन मुले आणि एक मुलगी अश्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ तो घरात पाळलेल्या गाई आणि म्हशिंचं दूध विकून चालवतो. प्रसिद्धी, पैसा किंवा सन्मान यांची त्याला दूरदूरपर्यंत पुसटशीही आशा नाही. पण पैसा आणि सन्मान सोडले, तरी प्रसिद्धी मात्र त्याच्या वाट्याला थोडीफार आली आहे. तेही अगदी अलीकडे २००८ नंतर. त्याचं झालं असं, की जंगली हतींच्या कळपाच्या पाठलागावर आलेल्या वनविभागाच्या लोकांना नदिच्या मधोमध ईतकं संपन्न अरण्य पाहून धक्काच बसला. बेटावर मुलईचा शोध घेतल्यावर जुन्या वन अधिका-यांना त्याची ओळख पटली. जवळपास पंचवीस वर्षापुर्वी वनवीभागाने हाती घेतलेल्या एका योजनेसाठी काम करणारा एक साधा मजुर आपलं आयुष्य खर्ची घालतो, आणि हजारो एकरामध्ये एकहाती ईतक्या भव्य अरण्याची निर्मीती करतो, हा त्यांच्यासाठी कुतुहलाच तसाच अभिमानाचा विषय झाला. वनवीभागाच्या गस्ती मग या भागात वाढू लागल्या. गेंड्याची शिकार करणा-यांचं रॅकॅटच या भागात कार्यरत आहे. मुलईच्या मदतीने त्यांना या शिका-यांनाही अटक करता आली. सुंदरबन बघायला येणा-या पर्यटकांसाठीही 'मुलई कथोनी' हे 'हॅपनींग डेस्टीनेशन' बनलं. ब्रिटिश डॉक्युमेन्ट्रीकार टॉम रॉबर्ट याने या जंगलात काही काळ राहून एक अप्रतीम माहितीपटही बनवला. त्यामाध्यमातून मुलईचं नाव आणि कार्य जगभर माहिती झालं. बाहेर देशातल्या एनजीओ आणि जंगलप्रेमींनी चौकशी केल्यावर मग ओरीसा सरकारलाही जाग आली. मुलईच्या कार्याची दखल घेत त्यांनी त्याचा गौरव केला. निसर्ग रक्षणाच्या गोष्टी करणा-या आणि भाषणे देणा-या पेज थ्री 'ईनव्हायर्नमेन्ट ऍक्टीव्हीस्टस' लोकांपेक्षा आपल्या कर्तृत्त्वाने आदर्श घालून देणा-या मुलईला आज देश विदेशांतून मार्गदर्शनासाठी बोलावलं जातंय. पण आपलं जंगल सोडून कुठेही जायला तो तयार नाही. सरकार आणि वनवीभागाने 'मुलई कथोनी' च्या संरक्षणाची संपुर्ण जबाबदारी घेतली, तर आपण देशातल्या ईतर ठीकाणी जाऊनही अरण्यनिर्माणाचा प्रयोग करू शकतो, असा त्याला विश्वास आहे. त्यासाठी या जंगलाला अभयारण्य घोषित करण्याची नितांत आवश्यकता आहे. सरकारी स्तरावर सरकारी गतीने ते प्रयत्न सुरू आहेत, पण मुलईचं त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही. जगभर आज वसुंधरा दिवस साजरा होत असतांना आपल्या अवघ्या आयुष्याचाच वानप्रस्थ करून दररोजच वसुंधरा दिवस साजरा करणा-या या अवलीयाचं अरण्यक असंच सुरू राहणार आहे. जे असतील त्यांच्यासह, जे नसतील त्यांच्याशिवाय!

वाचने 47900
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

नुकतेच १३ वे गिरिमित्र संमेलन महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे संपन्न झाले. जादेव पायेंग हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या निमित्ताने ज्या भटक्यांना त्यांच्या बद्दल माहिती नव्हती त्यांना अगदी जवळून त्यांच्याशी मोडका तोडका का होईना संवाद साधता आला. त्यांच्या अफाट कार्याची माहिती सर्वाना झाली. मिपावरील आपल्या लेखामुळे त्यांना भेटण्याची उत्कंठा निर्माण झाली होती ती पूर्ण झाली. मिपाला आणि आपल्याला मनापासून धन्यवाद.

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

गिरिमित्र संमेलनाविषयीही लिहा, वाचायला आवडेल. थोडंसं संबंधितः कालच एक विरोप वाचायला मिळाला; त्यानुसार 'कल्पवृक्ष' ही संस्था 'सह्याद्री - एक अनमोल ठेवा' हे ४०० पानी पुस्तक प्रकाशित करण्याच्या मार्गावर आहे, प्रत्येकी २०० रुपये किंमतीस हे उपलब्ध असेल. याविषयीची आधिक माहिती विरोपातून खाली देतो आहे (ज्यांना या प्रकाशन प्रकल्पात काही मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी माझ्याशी व्यनितून संपर्क केला तर त्यांची प्रकल्प-चालकांशी इ-गाठ घालून देउ शकेन): We are happy to announce that our Marathi handbook on the Sahyadri region of Maharashtra - "Sahyadri - Nisargacha Anmol Theva" is ready to go to print. The mountain ranges of the Western Ghats of Maharashtra – popularly known as the Sahyadris – is a unique landscape which harbours a huge variety of plant and animal life, some which are not found anywhere else in the world. They support several tribal groups which are leading traditional lifestyles. Due to rapid urbanization, there are several threats which are impacting the region. There are steps being taken by the government as well as communities to reduce these impacts, and to conserve the region. This book offers information on various aspects like ecosystems, biodiversity, threats and conservation measures with specific focus on the Sahyadri region in Maharashtra.An effort has been made to simplify scientific concepts as far as possible for a layperson’s understanding. Visually attractive with photos and illustrations, the book also contains sample activities after every chapter which could be adapted by users according to their context.

In reply to by यशोधरा

उपलब्धता: BNHS India: http://bnhs.org/bnhs/index.php?option=com_virtuemart&view=productdetail… बुकगंगा: http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5722580869706533510 Sahyadri - Nisargacha Anmol Theva Rs. 490/- 200pgs all photos in colour Published by Sakaal Papers in Marathi कल्पवृक्षच्या दुव्यावरून थोडी माहिती: This handbook on the Sahyadri region of Maharashtra focuses on mountain ranges of the Western Ghats of Maharashtra , popularly known as the Sahyadri s , forming a unique landscape which harbours a huge variety of plant and animal life, some which are not found anywhere else in the world. They support several tribal groups which are leading traditional lifestyles. Due to rapid urbanization, there are several threats which are impacting the region. There are steps being taken by the government as well as communities to reduce these impacts, and to conserve the region. This book offers information on various aspects like ecosystems, biodiversity, threats and conservation measures with specific focus on the Sahyadri region in Maharashtra. An effort has been made to simplify scientific concepts as far as possible for a layperson’s understanding. Visually attractive with photos and illustrations, the book also contains sample activities after every chapter which could be adapted by users according to their context. The book will be of interest to teachers, environment educators, the government officials (specially Education dept, Forest Department, and Tribal department), wildlife tourists, groups involved in tourism, NGOs and concerned individuals. We would be happy to give a discount on bulk order (above 5) or if there is genuine need for a concession (for e.g. use in a rural school). PDF Sampler (A selection of random pages): http://kalpavriksh.org/images/Publications/Sahyadribooksampler.pdf

In reply to by बहुगुणी

धन्यवाद, हो, मध्यंतरी पगमार्क संस्थेनी पुरस्कृत केलेले एक प्रदर्शन पाहिले होते, तिथे ते पुस्तक पाहिले मी.

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

या गिरिमित्र संमेलनाच्या निमित्ताने जादेव पायेंग यांची म.टा. मधे प्रसिध्द झालेली मुलाखत. पैजारबुवा,

वा! कित्येक शतके टिकणारा वारसा!! केवढे हे कर्तृत्व!! (लेख सुचविल्याबद्दल स्वॅप्स यांचे आभार!)

एका अवलियाबद्दल तितक्याच संवेदनशीलपणे लिहिलेला लेख!

सलाम !!