Skip to main content
लेखक श्वेता२४ यांनी शनिवार, 07/03/2026 21:12 या दिवशी प्रकाशित केले.

अक्षरांचे पंख 

होऊनी परकी मला मी प्रश्न आज विचारते

 बेहिशेबी जीवनाचा ताळमेळच मांडते

 

 का कला साहित्य सारे ठेविले वेशीवरी 

अन् कुणाची पत्नी होऊन माप हे ओलांडते 

 

त्या नळाचे गीत सोबत ताल साधे भाकरी

 तान्हुल्याचा गोड चेहरा चंद्र म्हणूनी पाहते 

 

चांदण्यांचे शब्दमोती विखुरले दारी सडा 

कल्पना सारूनीही घर लख्ख माझे झाडते 

 

सोडुनी मज अन्य सर्वांना इथे प्राधान्य पण

 मीच मजला उचलूनी मग अग्रस्थानी ठेवते! 

 

अक्षरांचे पंख मजला हार का मग मानू मी? 

घेउनी स्वप्ने आभाळी मुक्त मी झेपावते...!!

 

 — श्वेता२४ © 2026

लेखनविषय:

वाचने 693
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

आपली ही अतिसुंदर कविता वाचून इंदिरा संत यांची आठवण झाली. यात तुम्ही सर्व च समावेशले आहे, की कशी एक स्त्री आपले प्रतिभेचे पंख मिटून घरट्यात समर्पित झाली आहे, आपली उडान अर्पण करून. अभिनंदन.

परिस्थितीला भेदून आशावादी आणि आनंदी होण्याची कल्पना आवडली. जगात विविध देशांत स्त्रियांना जे स्वातंत्र्य आहे त्यात भारत अगदी वरती आहे. फक्त त्यांनी पाऊल पुढे टाकायचे आहे.

In reply to by कंजूस

आपल्या प्रतिसादाबद्दल व कविता प्रकाशित करण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मनापासून धन्यवाद __/\__

छान आवडली रचना. लिहिते राहावे. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

आपल्याला रचना आवडली हे वाचून आनंद झाला. आपल्या मार्गदर्शन व प्रोत्साहनासाठी आभारी आहे.

मला कळत नाही महिला एव्हढ्या गोंधळलेल्या का आहेत?

महाकवी बोरकरांपासून ते आजच्या कवी संदिप खरे सर्व  मान्यवर कवींनी महिलांचे पुरूषांच्या आयुष्यातले स्थान किती महत्वपूर्ण 

आहे याचे गोडवे गायले आहेत.

तू गेल्यावर....

तू गेल्यावर फिके चांदणे,घर परसूंही सुने-सुके

मुले मांजरापरी मुकी अन् दर दोघांच्या मधे धुके

तू गेल्यावर घरांत देखिल पाउल माझे अडखळते

आणि आटुनी हवा भवतिची श्वासास्तव मन तडफडते

तू गेल्यावर या वाटेने चिमणी देखिल नच फिरके

कसे अचानक झाले न कळे सगळे जग परके परके

तू गेल्यावर जडून पनगत लागे पिंपळ हाय गळू

गळ्यांतले मम गाणे झुरते : वाटे मरते हळूहळू

तू गेल्यावर दो दिवसांस्तव जर ही माझी अशी स्थिती

खरीच माझ्या आधी गेलीस तर मग माझी कशी गती?

- बा.भ. बोरकर

कवी संदिप खरे यांच्या "नसतेस घरी तू जेंव्हा"

तुज वाचून वर काय अफलातून मराठी भाषेचे शक्तिप्रदर्शन केले आहे. अर्थात 

ना अजून  झालो मोठा

ना स्वतंत्र अजूनी झालो

तुज वाचून उमगत जाते

तुजवाचून जन्मच अडतो

-संदिप खरे

आमची सौ. घरी नसताना माझी काय अवस्था होते यावर मिपावर एक जिल्बी पाडली आहे.

असतेस घरी तू जेंव्हा दह्या दुधाचे हांडे... नसतेस घरी तू जेंव्हा वाहती दुधाचे लोंढे.

-कर्नल तपस्वी

https://www.misalpav.com/story/51194

आपली कविता निःसंशय चांगली आणी आवडली हे. वे. सा. न.

 

बादवे,प्रस्तुत विषयवास्तूवर मिपाकर खुप व्यक्त  झाले आहेत.