✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?

च
चित्रगुप्त यांनी
Mon, 10/19/2015 - 08:26  ·  लेख
लेख
मित्रहो, नुक्ताच वयाच्या पासष्ठाव्या वर्षात प्रवेश करता झालो. खूप पूर्वी होतो, तसा पुन्हा आता मी एकदम फिट आणि उत्साही झालेलो आहे. गेली पंधरा-वीस वर्षे मात्र मी असा नव्हतो. यासाठी मी कोणताही औषधोपचार वा खास व्यायाम केलेला नाही. फक्त आहारात बदल केल्याने हे सर्व कसे घडून आले, हे मी या लेखात सांगतो आहे. १. आरोग्यातून अनारोग्याकडे वाटचाल : पंचविशी - तिशीत सडपातळ आणि उत्साह- ऊर्जेने भरलेला मी पुढे चाळीशी-पन्नाशीत हळूहळू स्थूल, आळशी, निरुत्साही कसा होत गेलो, हे कळलेही नाही. अपचन, सुटलेले पोट, वाढलेले वजन, प्रमाणाबाहेर कोलेस्टरोल, यातून आता आपली सुटका नाही या विचाराने आणखीनच नैराश्य येऊ लागले. 'क्रॉनिक फटिग सिंड्रोम' ची लक्षणे माझ्यात दिसत होती, आणि वर्षानुवर्षे 'फिस्टुला' च्या वेदना मी भोगत होतो. फिस्टुलावर शस्त्रक्रिया हाच उपाय असल्याचे सर्जनने सांगितले, परंतु जालावर हुडकता शस्त्रक्रिया करून सुद्धा पुन्हा फिस्टुला उद्भवतो असे समजले. अ‍ॅलोपाथीची औषधे घेणे मला कधीच भावत नसल्याने आता करावे तरी काय, हेच कळेनासे झाले. पूर्वी नियमित व्यायाम करायचो, तोही आळस आणि निरुत्साहामुळे बंद झाला. गोड, तळकट खाणे सोडवले जात नव्हते. अतिशय निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली होती. रेक्झीन च्या खुर्चीवर बसल्याने, सिंथेटिक कापडाची विजार घातल्याने, कॉफी प्यायल्याने लगेच फ़िस्टुला होतो हे लक्षात आल्यावर कॉफी पूर्ण बंद केली, सुती पटलूण घालू लागलो, आणि सिनेमाला जातानासुद्धा बुडाखाली ठेवायला सुती बस्कुर नेऊ लागलो. या उपायांनी फिस्टुला होण्याचे प्रमाण जरा कमी झाले खरे, परंतु पुढे मूळव्याधीने पण मला ग्रासले. --- आता मात्र माझी पाचावर धारण बसली. जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे "मै अपनी जिंदगीसे तंग आ चुका था… मेरी बीवी मुझसे नफरत करने लगे थी " --- असे झालेले होते, पण ... " फिर एक दिन मुझे पिंटो मिला, उसने मुझे xxxxx के बारे मे बताया" ... असे मात्र काही घडून येत नव्हते. २. आशेचा किरण : अश्या परिस्थितीत २०१४ च्या जुलै महिन्यात अमेरिकेत येऊन पहुचलो. मुलाचे घर पहिल्या मजल्यावर होते, तो एक जिना चढायलाही मला जड जात होते. आलो, त्याच दिवशी मुलाने ' Fat, Sick and Nearly Dead' हा सिनेमा दाखवला आणि त्यात दाखवल्याप्रमाणे आपण सर्वजण एक आठवडा फक्त भाज्या-फ़ळांचा रस घेऊन राहूया, असा प्रस्ताव मांडला. मला आणि पत्नीला ही कल्पना अशक्य कोटीतील वाटली. नुसत्या रसाने पोट कसे भरणार ? प्रोटीन्स, कार्बोहायड्रेटे, दूध-तूप वगैरेंशिवाय शक्ती कशी राहणार ? एक दिवस सुद्धा जेवणात पोळी नसेल तर आपण त्रस्त होतो, सात दिवस कसे काढणार ? वगैरे शंका होत्या, पण मुलगा एवढे म्हणतो आहे तर करून बघू, झाला तर फायदाच होईल, अगदी रहावले गेले नाही तर खाऊया काहीतरी, असा विचार करून आम्ही संमती दिली. ३. रस-आहारावर वीस दिवस आणि 'काळ-सर्प वियोग' मग लगेचच बाजारात जाऊन ज्यूसर खरेदी केला आणि काकडी, हिरवी सिमला मिर्च, दुधी भोपळा, पालक, पोदिना, सेलरी, केल वगैरे हिरव्या भाज्या, हिरवी (ग्रॅनी स्मिथ) सफ़रचंदे, पिवळी-लाल सिमला मिर्च, गाजरे, संत्री, टमाटर, ग्रेपफ़्रूट, बीटरूट, लाल सफ़रचंदे, अननस, कलिंगड, वगैरे लाल-पिवळ्या भाज्या आणि फळे, आले, ओली हळद, लिंबू असे सर्व सामान नीट धुवून फ्रिज मध्ये ठेऊन सज्ज झालो. . दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले. ... रसासाठी भाजी आणि फळे आणताना ती हिरवी, पिवळी, नारंगी, लाल, जांभळी, काळी वगैरे विविध रंगांची असतील हे बघत होतो. . रोज सकाळ-संध्याकाळ वजन बघणे आणि थोडे पायी फिरणे सुरु केले. रोजची शी कशी होते, यावर देखील लक्ष ठेवले होते. दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापासून पुढले काही दिवस विष्ठेतून भोवताली खूप तंतू असलेले, हलके, पाण्यावर तरंगणारे विचित्र आकाराचे 'आयटम' (जीव-जंतु ?) निघत होते. . पाचव्या दिवशी हातभर लांब, काळे, रबरासारखे वेटोळेच्या वेटोळे बाहेर निघाले (त्याचे मी 'काळसर्प' असे नामकरण केले) ते बघून अगदी थक्क झालो. लगेच स्वतःचे वजन केले, ते एक किलो कमी भरले. आतड्यात वर्षानुवर्षे साचून घट्ट बसलेली घाण निघाली, हे लगेचच लक्षात आले. गंमत म्हणजे मला एकदम दहा वर्षांनी तरूण झाल्यासारखे वाटले, आणि मोठ्याने एकादे 'आयटम साँग' म्हणत धावत सुटावेसे, नाचावेसे वाटू लागले... ... सहाव्या दिवशी पण एक लहानसा 'काळसर्प' निघाला. या काळसर्प-वियोगानंतर दहा-पंधरा दिवसातच मूळव्याध आणि फिस्टुलाच्या भयंकर व्याधीतून माझी कायमची सुटका होऊन पुन्हा पूर्वीसारखा उत्साह वाटू लागला. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो, त्याने आणखी आरोग्यलाभ झाला. अमेरिकेला जाण्यापूर्वी मी भारतातून ३८-३९ इंच कंबरेच्या पटलूणी नेल्या होत्या, त्या अगदी ढगळ होऊ लागल्या, आणि ३३ इंची घ्याव्या लागल्या. वजन ५ किलो कमी झाले. ४. यानंतरचा काळ : भारतात आल्यानंतरही रोज एक-दोन ग्लास जूस पिणे चालू ठेवले. थोडासा ताजा आवळ्याचा रस, नारळ पाणी यांची आणखी भर पडली. शिवाय दही, पिकलेले केळे, खजूर आणि ज्यूस काढताना निघालेला थोडासा चोथा हे सर्व मिक्सर मध्ये पाण्यासह घुसळून बनवलेली स्वादिष्ट लस्सी/स्मूदी पिऊ लागलो. . ब्रेड, तळकट आणि मैद्याचे पदार्थ, मिठाई याविषयीचे आकर्षण आपोआपच संपलेले असल्याने मुद्दाम स्वत:वर ताबा ठेवावा न लागता हे पदार्थ आहारातून बाद झाले. 'ग्लूटेन फ्री' खायचे म्हणून गव्हाच्या पोळ्या खाणे अगदी कमी केले. ही झाली माझ्या आरोग्य संपादनाची हकीगत. मागे पुण्यात मिपाकरांसोबतच्या 'पाताळेश्वर कट्ट्या'त मी हा सर्व अनुभव सांगितला होता. त्यापैकी समीर शेलार याने मनावर घेऊन हा प्रयोग केला, त्याचा त्याला खूपच फायदा झाला. कुणाला या विषयी जास्त माहिती हवी असेल, तर अवश्य व्यनि करावा. सध्या मी हे सर्व कसे घडून आले, यामागचे विज्ञान काय आहे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. या उपायाचे प्रवर्तक ऑस्ट्रेलियातील 'जो क्रॉस' यांच्या खालील वेबसाईट वर अनेक जूस, स्मूदी, सलाद, सूप वगैरेंच्या पाककृती दिलेल्या आहेत. http://www.rebootwithjoe.com Fat Sick and Nearly Dead: https://www.youtube.com/watch?v=8o0pSnp0Xs8
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
समाज
जीवनमान
राहणी
औषधोपचार
विज्ञान
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
अनुभव
शिफारस
सल्ला
माहिती
मदत

प्रतिक्रिया द्या
274225 वाचन

💬 प्रतिसाद (317)

प्रतिक्रिया

खरेजी, या प्रतिसादाबद्दल शतश:

तर्राट जोकर
Wed, 10/21/2015 - 14:03 नवीन
खरेजी, या प्रतिसादाबद्दल शतश: धन्यवाद! सोनाराने कान टोचणे आवश्यक असतेच. काही लोकांच्या प्रतिक्रियांवरुन आपण योग्य तोच अंदाज लावला आहे. यामागची मानसिकता विषद करण्याचा प्रयत्न करतो. बरेचदा होते असे की वजन "काहीही न करता" वाढले ना मग ते तसेच "काहीही न करता" कमी व्हावे असे जनसामान्यांत भावना असते. आपल्या आप वजन वाढले, त्यात आपण स्वतः इन्टेन्शली काही केले नाही. आपली काही चूक झालीच नाही तर पनीशमेंट (व्यायाम, पथ्य, रुटीन-चेंज) का भोगा? अशी एक मानसिकता असते. बहुतेक लोकांना शरीरस्वास्थ्य राखायला काहीतरी करावेच लागते हे मनोमन पटत नाही. आजुबाजूला तशी उदाहरणेही असतात. कित्येक लोक दीवसभर अंगमेहनतीची कामे करतात पण पोट सुटलेली दिसतात. काही लोक काडी इकडची तिकडे करत नाहीत पण चांगली सडसडीत असतात. अनेक लोक कधी व्यायाम केलेलाच नसल्याने (आपली दिव्य अभ्यास-एके-अभ्यास संस्कृती) व्यायामाने शरिरात होणारे बदल रोकडा व्यवहार असतो हे जाणवलेलेच नसते. दुसर्‍यांचे अनुभव ट्राय करून बघता येत नाहीत. एखाद्याने फेरारी घेतली तर एक टेस्ट ड्राइव करता येईल. पण शरीर कमावले तर त्याचा टेस्ट ड्राईव करता येत नाही. त्यामुळे फेरारी विकत घ्यायची इच्छा बळकट करणारे टेस्ट ड्राईव शरिराच्या बाबतीत होत नाही. लोक पहिली स्टेप व त्यानंतरच्या असंख्य स्टेप्स उचलतच नाहीत. आहेत तिथेच राहतात. पण समाजातून, वावरातून एक मानसिक दबाव येत असतो, की बाबारे वजन वाढलंय, उतरायला पाहिजे. तेव्हा झट्पट उपचार, तोशीस न लागता, रुटीन न बदलता, सोपे वाटणारे(इज ऑफ युज) गोळ्या-पावडरी वापरण्याकडे कल वाढतो. कारण तिथे वजन कमी करणे हे एक आणि एकमेव ध्येय असतं. वजन कमी झाल्यावर कसं वाटेल याचा आंतरिक परिणाम माहित नसल्याने, फक्त बाह्य (विज्युअल) परिणामांवर लक्ष केंद्रित केल्याने कोणत्याही उपचारांचा परिणाम होत नाही. झालेला टिकत नाही. कारण स्वस्थ शरिर हे काय असतं हेच कधी अनुभवलेलं नसतं मग बेन्चमार्क काय असावा हे कसे कळेल? झटक्यात वजन कमी झाले तर इतर त्रास असतातच. पण व्यायाम व आहार-विहारातून योग्य प्लानिंगने आरोग्यपूर्ण शरिर जेव्हा मिळतं तेव्हा वजन कमी झाले हा बाय-प्रॉडक्ट असतो. तेजःपुंज, जोमदार, उत्साही शरीर-मन हे खरं ध्येय असलं पाहिजे. विपश्यना करतांनाही लोक चिंता कमी होतील काय, मानसिक आजार कमी होतील काय? वैगेरे काहीबाही विचार करतात. विपश्यना त्यापलिकडे आहे. शांत मन हे त्याचं बाय-प्रॉडक्ट आहे, शरिरातले बदल हे बाय-प्रॉडक्ट आहे. बाय-प्रॉडक्ट वर लक्ष केंद्रेत केलं तर मेन-प्रॉडक्ट तर मिळत नाहीच, बाय-प्रॉडक्टही मिळत नाही. आणि भलतेच विकार जडून बसतात. मी हे मार्क केलंय की जेव्हा लोकांना रूटीन बदलण्यास सांगितले जाते, जसे विपश्यनेत दहा दिवस मौन असेल इत्यादी, तेव्हा लोक त्या कल्पनेनेच बेचैन होतात. डिंगा मारायला लागतात की आम्ही तिथे जाऊन गोंधळ माजवू, आम्हाला काय कोण रोखू शकणार नाही, आम्हाला हाकलून लावतील इतपर्यंत आम्ही तिथे दंगा करू, किंवा आपल्याला जमणारच नाही, शक्यच नाही असे बोलायला लागतात. लोकांना रुटीन बदलणे हे दुसर्‍यांनी आपल्यावर सत्ता गाजवल्यासारखे, जबरदस्ती, हुकुमशाही केल्यासारखे, जेलमधे टाकल्यासारखे वाटते, म्हणुन ते पळवाटा शोधतात. ध्येयाकडे लक्ष देण्याऐवजी भलत्याच गोष्टी करतात. म्हणजे मला एका ठिकाणी जायचे आहे आणि कोणी सांगितले की पायीच जावे लागेल. तर बाकीचे सगळे सोडून मी त्या "पायीच" वर फोकस करतो. त्याला कसे ब्रेक करता येईल, किंवा टाळता येईल याचा विचार करतो. पण आपल्याला काय 'अचिव' करायचे आहे हे विसरून जातो. तिसरी गोष्ट, पैसे टाकून सगळं मिळतं, झटपट, सुविधाजनक होतं याची अंगवळणी पडलेली सवय. तसे बघितले तर इथे ज्युस प्या, तरूण व्हा असा एकोळी मंत्र प्रथमदर्शनी दिसतो. पण त्यात किती कष्ट आहेत हे फक्त चित्रगुप्त यांनाच माहिती. पिराताईंनी त्या गोष्टीला आपल्या प्रतिसादात अचूक पकडले आहे. वर जे मी पंधरा दिवसाचे कोष्टक टाकले आहे. ते वाचूनच मला घाम फुटला. बाप रे बाप किती काम आहे हे? पण ते काम केले तरच सपाट पोट आणि तंदुरूस्त शरीर मिळेल ना..? नुसतं ज्युस पिणे नाहीये ते. तर शरीराची गरज ज्युसद्वारे भागवून व्यायाम, चालणे, पोहणे इत्यादीद्वारे चरबी घटवणे, त्यात सातत्य ठेवणे असे इतरही बरेच उद्योग आहेत. ज्युसचा ग्लास प्रथमदर्शनी दिसतो पण त्यामागे किमान दहा कामे आहेत जी केली तरच ते ध्येय साध्य होईल. काही लोक तयार ज्युस विकत घेण्याचा विचार करतील. तिथे मूळ उद्देशालाच हरताळ फासल्या जाईल आणी हे एक फॅड-डायट होऊन बसेल. या ज्युस-डायटमधे अवैज्ञानिक, अंधश्रद्धा असे काही नाही. पण जो करतोय त्याने तशी भावना ठेवली तर परिणाम मिळणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सत्यवचन डॉ...

स्वप्नांची राणी
Wed, 10/21/2015 - 16:00 नवीन
परखड शब्दांबद्दल क्षमस्व..... क्षमस्व कसलं डॉक्टर, अभिनंदन तुमचं!!! मला स्वता:लाच या धाग्यावर परखड लिहावं असं वाटत होतं. ..(कर्टसी घरातलीच रजीस्टर्ड न्युट्रीशनिस्ट डायटेशीयन!!) पण मग ईथले काही संभावीत वार आठवले आणि विचार केला की ज्याचं त्याचं आरोग्य आणी ज्याचं त्याचं नशिब!! चित्रगुप्त काका आता पासष्टीला पोचलेत...पण ईथले बरेचसे वीर जे अजून त्यांच्या चाळीशीत आहेत, त्यांच्यासाठी हे डाएट म्हणजे डीझॅस्टर ठरेल. या ज्युस थेरपीत शरीरा चे बिल्डींग ब्लॉक्स ज्यांना म्हटलं जातं त्या प्रथिनांचा काहीच विचार केलेला नाहीये. दिर्घ काळ प्रोटीन्स न घेतल्याने मग कदाचित कधीच काहीच न घेण्याची वेळ ही येऊ शकते. कुठल्याही फळाचा किंवा भाजीचा, अगदी कारल्याचा आणी दुधीचाही ज्यूस म्हणजे त्या त्या फळातली किंवा भा़जीतली कॉन्संट्रेटेड साखरच असते. असे ज्युस दिर्घ काळ घेतले तर रक्तातली शुगर लेव्हल धोकादायक रीत्या फ्लक्चूएट होऊ शकते. याचा परीणाम दृष्टी मंदावणे, प्रचण्ड थकवा येणे आणि वजनात घट (वावावा...जीव गेला तरी चालेल, वजन तर कमी झालंच ना..!!) सतत ज्यूस घेतल्याने पॉटेशीयम ची लेव्हल वाढते, मिनरल्स ची लेव्हल वाढते. परीणामी किडनीवर अतिरीक्त ताण येऊन कीडनी फेल्युअर होऊ शकते. दिर्घ काळ ज्यूस थेरपी घेत असल्यास शरीरातील एलेक्ट्रोलाईट्स चा इइंबॅलॅन्स होतो आणी स्नायु मधले फॅट शरीराला जगवण्ञासाठी वापरले जाते. या सगळ्या ऊटपटांग डायेट्स चा शरीरावर फार फार वाईट परीणाम होतो. आपल्याला जगण्यासाठी अन्न हवं असतं. तेच मिळालं नाही तर शरीर वेगवेगळे उपाय करतं. उदा...मॅटॅबॉलीस्म रेट कमी होणे. आणि सततच्या फॅड डायेट्सनी कमी झालेला मॅटॅबॉलीक रेट मग कायम कमीच राहतो...परीणामी डायेट सुटले की माणूस हाहा म्हणता फुगत जातो. प्लीज प्लीज प्लीज.... a BIG NO NO to fad diets...!! हे ऊंटावरून शेळ्या हाकणे नाहीये. मी स्वतः दिवसातून ६ वेळा खाते. आणि ५३ म्हण्जे ५३ वरच राहतेय गेली कित्येक वर्षं....(प्यारे can vouch for me...क्यूं प्यारे..??) पण त्याच्याच जोडीला दिवसातून कमितकमी २ तास, विभागून, चालणे (with Leslie, at home) किंवा बाहेर चालणे (उन कमी असेल तर), किंवा ईलीप्टीकल क्रॉस ट्रेनर्स असले वेगवेगळे एग्झरसाईझेस करत असते. वजन उतरवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो, तिथे कठोर परिश्रमाला पर्याय नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पण त्याच्याच जोडीला दिवसातून

बॅटमॅन
Wed, 10/21/2015 - 16:04 नवीन
पण त्याच्याच जोडीला दिवसातून कमितकमी २ तास, विभागून, चालणे (with Leslie, at home) किंवा बाहेर चालणे (उन कमी असेल तर), किंवा ईलीप्टीकल क्रॉस ट्रेनर्स असले वेगवेगळे एग्झरसाईझेस करत असते. वजन उतरवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो, तिथे कठोर परिश्रमाला पर्याय नाहीये.
हे एकदम पटलं. वायाम तं पायजेच. बाकी ते हे
मी स्वतः दिवसातून ६ वेळा खाते. आणि ५३ म्हण्जे ५३ वरच राहतेय गेली कित्येक वर्षं....(प्यारे can vouch for me...क्यूं प्यारे..??)
काय म्हणे नक्की? आयमीन व्हाऊचर बद्दल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

ईश्श्य...काय हे विचारणं...??

स्वप्नांची राणी
Wed, 10/21/2015 - 16:09 नवीन
प्यारे पण आमचा लाडका वगैरे...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खी खी खी.

बॅटमॅन
Wed, 10/21/2015 - 16:14 नवीन
खी खी खी. अता कोण कुणाचा कसा अन किती लाडका असेल हे अम्ही कय संगावे? पण अंमळ रोचक वतला तपशिल म्हणुन विच्यारले. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

That is/ was/ and shall be a

प्यारे१
Wed, 10/21/2015 - 16:24 नवीन
That is/ was/ and shall be a compliment for your hardwork from my side. you are gorgeous.... and inspiration for all काकूस and काकाज like me. Period!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

धन्यवाद!! ...पण आता विषयाकडे

स्वप्नांची राणी
Wed, 10/21/2015 - 16:27 नवीन
धन्यवाद!! ...पण आता विषयाकडे वळूया...या धाग्याच्या म्हणते मी... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हाहाहा!

प्यारे१
Wed, 10/21/2015 - 16:32 नवीन
हाहाहा! आम्ही सरळ सरळ सरळ च आहोत. कुठेही वळलो नव्हतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

बाकी ते vouch वगैरे ज़रा जास्त

प्यारे१
Wed, 10/21/2015 - 16:40 नवीन
बाकी ते vouch वगैरे ज़रा जास्त होतंय बरका. ज़रा स्वत:चं कौतुक कमी करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

प्यारे...कितनी बार कहा है की

स्वप्नांची राणी
Wed, 10/21/2015 - 16:43 नवीन
प्यारे...कितनी बार कहा है की चारचौघोंमे ऐसा मत कहो ना....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अंत:पुरात चला

प्यारे१
Wed, 10/21/2015 - 16:46 नवीन
अंत:पुरात चला -यदाकदाचित नाटकातला ड्वायलोक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

काय प्रेमळ संवाद चाल्लाय ;)

टवाळ कार्टा
Fri, 10/23/2015 - 15:55 नवीन
काय प्रेमळ संवाद चाल्लाय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

स्वप्नांची राणी, तुम्ही

बिन्नी
Wed, 10/21/2015 - 21:47 नवीन
स्वप्नांची राणी, तुम्ही दिलेली माहिती चांगली आहे! तुम्ही ५३ म्हणजे ५३ वर आहात म्हणजे खरोखरच तुम्हाला स्वत:ला ओवाळून घ्यायचा हक्क आहे. या वयात हे नक्की कौतुकास्पद! सलाम तुम्हाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

अरे देवा....या वयात....???

स्वप्नांची राणी
Wed, 10/21/2015 - 22:08 नवीन
अरे देवा....या वयात....???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिन्नी

म्हणजे?

स्टुपिड
गुरुवार, 10/22/2015 - 15:42 नवीन
राणी काकू विंग कमांडर ओक साहेबांपेक्षा मोठ्या आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिन्नी

कमाल आहे.

सालस
गुरुवार, 10/22/2015 - 16:42 नवीन
बापरे म्हणजे या त्रेपन्नाव्या वर्षी त्रेपन्न किलो __/\__ त्याप्रमाणे मी पस्तीस किलो हवा. फारच जाड आहे मग मी :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्टुपिड

:)

सायकलस्वार
गुरुवार, 10/22/2015 - 22:38 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सालस

पीरियड नंतर टिंब द्यायचा असतो

बॅटमॅन
Wed, 10/21/2015 - 16:30 नवीन
पीरियड नंतर टिंब द्यायचा असतो हो, उद्गारचिन्ह नाही काही =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कोणे रे तिकडे. करा दुरुस्ती.

प्यारे१
Wed, 10/21/2015 - 16:33 नवीन
कोणे रे तिकडे. करा दुरुस्ती. आम्ही सगळ्याच बाबतीत अडाणी आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+१

कपिलमुनी
Wed, 10/21/2015 - 16:48 नवीन
चांगला प्रतिसाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

हुश्श कोणीतरी वेगळा मुद्दा पण मांडला

पुणेकर१
Wed, 10/21/2015 - 17:03 नवीन
लेख चांगला आहे आणि लेखाबद्दल अतीव आदर आहे. परंतु जे दुसर्याला लाभले तेच आपल्याला पण लाभेल असे काही नाही हे कळत नाही बहुदा. हुश्श कोणीतरी वेगळा मुद्दा पण मांडला त्याबद्दल खरे साहेबांचे आणि तुमचे अभिनंदन. मला काही हे पटत नव्हते. १० दिवस प्रयोग म्हणून ठीक आहे. शिवाय अमेरिका आणि युरोप सारख्या ठिकाणी चालायला, पाळायला, सायकल चालवायला निर्धोक असे रस्ते असतात आणि कोणीही तुम्हाला हिडीस फिडीस करत नाही किंवा तुमच्या अंगावर गाड्या घालायला येत नाही. हा खूप मोठा फरक आहे. पण मुदलात जितके पोटाला पुरेल तितकेच खाल्ले तरी अपोआप वजन आहे तितके राहते. कमी झाले नाही तरी वाढत नाही असा स्वानुभव आहे. थोडक्यात तोंडावर कंट्रोल आणि शारीरिक व्यायाम ह्याला काहीही पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

ज्युस थेरपीत शरीरा चे

रामचंद्र
Sat, 01/28/2023 - 18:03 नवीन
ज्युस थेरपीत शरीरा चे बिल्डींग ब्लॉक्स ज्यांना म्हटलं जातं त्या प्रथिनांचा काहीच विचार केलेला नाहीये. दिर्घ काळ प्रोटीन्स न घेतल्याने मग कदाचित कधीच काहीच न घेण्याची वेळ ही येऊ शकते. यावर अधिक माहिती मिळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

ज्युस थेरपीत शरीरा चे

रामचंद्र
Sat, 01/28/2023 - 18:11 नवीन
ज्युस थेरपीत शरीरा चे बिल्डींग ब्लॉक्स ज्यांना म्हटलं जातं त्या प्रथिनांचा काहीच विचार केलेला नाहीये. दिर्घ काळ प्रोटीन्स न घेतल्याने मग कदाचित कधीच काहीच न घेण्याची वेळ ही येऊ शकते. कुठल्याही फळाचा किंवा भाजीचा, अगदी कारल्याचा आणी दुधीचाही ज्यूस म्हणजे त्या त्या फळातली किंवा भा़जीतली कॉन्संट्रेटेड साखरच असते. असे ज्युस दिर्घ काळ घेतले तर रक्तातली शुगर लेव्हल धोकादायक रीत्या फ्लक्चूएट होऊ शकते. याचा परीणाम दृष्टी मंदावणे, प्रचण्ड थकवा येणे आणि वजनात घट (वावावा...जीव गेला तरी चालेल, वजन तर कमी झालंच ना..!!) यावर अधिक माहिती मिळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

@रामचंद्रः दीर्घ काळ म्हणजे किती ?

चित्रगुप्त
Sat, 01/28/2023 - 19:36 नवीन
@ रामचंद्रः दीर्घ काळ म्हणजे किती अभिप्रेत आहे ? सुरुवातीला तीन-चार वा किमान एक दिवस तरी करून बघा. महत्व स्वतः करून बघण्याचे आहे. सैद्धांतिक चर्चेला काही अंत नाही. आम्ही तिघांनी (मी, बायको आणि मुलगा) रसाहाराचा प्रयोग केला तो निर्हेतुकपणे केला होता. त्यातून वजन कमी होणे, मूळव्याध बरी होणे असा कोणताही हेतु नव्हता. परंतु अनपेक्षित मिळालेला फायदा आठ वर्षानंतर अजूनही टिकून आहे. जो क्रॉस च्या वेबसाईटवर बरीच माहिती मिळेलः https://www.rebootwithjoe.com/juicing/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

धन्यवाद. मी उद्याच बेंडेक्सची

रामचंद्र
Sun, 01/29/2023 - 00:17 नवीन
धन्यवाद. मी उद्याच बेंडेक्सची गोळी घेऊन (मला जंताचा त्रास नाही पण केमिस्टला विचारून) परवापासून रसाहार सुरू करणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

@ रामचंद्र -उपक्रमासाठी हर्दिक शुभेच्छा. हेही वाचा- बघा.

चित्रगुप्त
Sun, 01/29/2023 - 01:37 नवीन
खाली दिलेला जो क्रॉस याच्या दुव्यावरील विविध माहिती तसेच सबा जैन यांचे यूट्यूबवरील विविध व्हिडियो बघून घ्यावेत म्हणजे तुमच्या शंकांना उत्तरे आणि पूरक माहितीही मिळेल. तुमच्या उपक्रमासाठी हर्दिक शुभेच्छा. इथे माहिती देत रहावी. जो क्रॉसः https://www.rebootwithjoe.com/juicing/ सबा जैन (Satvic Movement) : https://www.youtube.com/@SatvicMovement
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

@ रामचंद्र आणि. प्रा. डॉ. बिरूटे सर : हे पण बघा

चित्रगुप्त
Sun, 01/29/2023 - 01:43 नवीन
यांचे बाकीचे खूप विडियो पण आहार आणि आरोग्य याबद्दल चांगली माहिती देणारे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

पर्फेक्ट. म्हणजेच

यशोधरा
Wed, 10/21/2015 - 23:11 नवीन
पर्फेक्ट. म्हणजेच चित्रगुप्तकाकांनी अवलंबलेला ज्यूसिंगचा/ आहाराचा मार्ग + व्यायाम हे दोन्ही एकमेकांस पूरक प्रमाणात केल्यास वजन कमी होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अतिशय योग्य प्रतिसाद.

चित्रगुप्त
Wed, 10/21/2015 - 14:43 नवीन
वरती तजो यांनी अगदी योग्य सांगितले आहे. मात्र जूसिंग हा माझ्यासाठी तरी एक अत्यंत आनंददायी अनुभव असतो. मी तर जन्मभर करायला तयार आहे. अर्थात अधूनमधून 'वाट्टेल ते' खाणेही चालते. वजन कमी होते खरे पण त्याहीपेक्षा कमालीचा उत्साह आणि ऊर्जा वाढणे हा फायदा फार मोठा आहे. परिणामी व्यायाम व अन्य चांगल्या सवयी लावणे सहज शक्य होते.
  • Log in or register to post comments

प्रत्येकाचा आपला एक दृष्टीकोन

तर्राट जोकर
Wed, 10/21/2015 - 14:53 नवीन
प्रत्येकाचा आपला एक दृष्टीकोन असतो व तोच त्याचं बरंवाईट करत असतो. जसे वर वेल्लाभट यांनी सांगितले की मन तयार असेल तर मग शरीरही तयार होतं, एकदा नवीन रुटीन सुरु झालं की एकामागोमाग एक अशा चांगल्या गोष्टी घडत जातात. डोमिनो इफेक्ट..! पण पहिले सोंगटी पाडणेच बर्‍याच जणांना जड जाते. ती कितीही छोटी आणि हलकी असली तरी.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

असो, खरे साहेब मनःपुर्वक

द-बाहुबली
Wed, 10/21/2015 - 17:12 नवीन
असो, खरे साहेब मनःपुर्वक धन्यवाद. काल पासुन जुसिंगवर होतो. मगाशी मस्त कचोरी, एक डेरी मिल्क सिल्क, चार इडली हिरव्या चटनी सोबत, आणी ४ मंच कॅटबरी खाल्या. शरीराला एकदम जड वाटलं पन मन अतिशय हलकं झालं. माझ्या १०३ किलो वजनाने आता काही फरक पडणार नाही विचार करुन पुन्हा एक आख्खा अननस खाल्ला. मन अतिशय प्रफुल्लीत झालं. व्यायाम करुन सगळं नियंत्रणात येत असतेच. पण मला ४-६ महिन्यातुन पंचकर्म सेंटरला भेट देउन शरीरशुध्दी करणे जास्त सोपे वाटते. कारण व्यायाम सोडलारे सोडला की अंगाने डबल झालात म्हणुन समजा. चित्रगुप्त साहेब यावयात आपण जे नेटाने करत आहात त्याबद्दल अभिमान वाटतोच आहे पण आपला व आमचा रस्ता नक्किच वेगळा आहे.. तो फिर मिलेंगे कभी कीसी नये मोड पर नये प्रतिसादोंके साथ....
  • Log in or register to post comments

व्यायाम सोडलारे सोडला की

नाव आडनाव
Wed, 10/21/2015 - 17:46 नवीन
व्यायाम सोडलारे सोडला की अंगाने डबल झालात म्हणुन समजा हे लई बेकार. ऊंचीच्या मानानं माझं वजन कमीच होतं, पण तरी वाटलं जरा ढेरी कमी करू आणि व्यायाम सुरू केला. २ महिन्या नंतर बंद केला आणि पुढच्या दोन महिन्यात वजन ७५ :(. च्यायला, त्या जीमचं तोंड काळं. फास्ट चालण्याचा ऊपाय आधी करून बघितला होता आणि वजन कमी झालं पण होतं. उगंच त्या जीमच्या नादी लागलो. आता आयुक्षात जीमचं तोंड बघणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

हाय इंटेन्सिटी व्यायामाचा हाच

बॅटमॅन
Wed, 10/21/2015 - 17:48 नवीन
हाय इंटेन्सिटी व्यायामाचा हाच तोटा आहे. त्यापेक्षा लो इंटेन्सिटीवाले वायाम या बाबतीत परवडले बरेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव

हा हा हा... हे म्हंजे अभ्यास

अस्वस्थामा
गुरुवार, 10/22/2015 - 18:37 नवीन
हा हा हा... हे म्हंजे अभ्यास करुन केस गळतात, डोळ्यांना चश्मा लागतो.. म्हणून अभ्यासच करायला (शिकायला) नको बुवा. असे म्हटल्यासारखे आहे. थोडक्यात,
हाय इंटेन्सिटी व्यायामाचा हाच तोटा आहे.
याबद्दल असहमत.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

व्यायामाबद्दल

चित्रगुप्त
गुरुवार, 10/22/2015 - 19:08 नवीन
व्यायामाबद्दल या पुस्तकात बाईंनी चांगली माहिती दिलेली आहे म्ह्णे. Image removed..Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

सावकाश

चित्रगुप्त
गुरुवार, 10/22/2015 - 19:17 नवीन
मला आपल्या वयाचा आणि कुवतीचा विचार न करता केलेल्या जॉगिंग, ब्रिस्क वॉकिंग आणि डंबेल्स या तिन्हीतून दुखापत झाली आणि खूप दिवस अजिबात काही करता आले नव्हते. ऋजुता दिवेकरांच्या या पुस्तकातून असे होण्याचे नेमके कारण कळले. आता मी अतिशय सावकाश हालचालीचे ची-गाँग, ताई-ची चे प्रारंभिक व्यायाम्, आसने वगैरे करतो, ते अतिशय प्रभावी आहेत. सावकाश हालचालींचे व्यायाम करण्यातून आणखी एक फायदा म्हणजे हल्ली आपण उगाचच प्रत्येक गोष्टीची घाई करत असतो (उदा. विमान थांबले रे थांबले की लगेच वरचे सामान काढून गर्दीत ताटकळत उभे रहाणे, लोकल मधून उतरल्या उतरल्या धावत सुटणे, बका बका खाणे इ.) त्या सवयीतून सुटका होते, आणि आयुष्य हे शांतपणे, विना घाई-गडबडीचे जास्त चांगल्या रीतीने जगता येते, हे उमगते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

सुंदर माहिती मिळत्ये कालपासून

मांत्रिक
गुरुवार, 10/22/2015 - 19:57 नवीन
सुंदर माहिती मिळत्ये कालपासून या धाग्यावर! अगदी मनापासून धन्यवाद चित्रगुप्त साहेब. फार महत्वाचा विषय मांडलात समोर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

सहमत. ऋजुताबाईंचे वरील

रेवती
गुरुवार, 10/22/2015 - 21:58 नवीन
सहमत. ऋजुताबाईंचे वरील चित्रात असलेले पुस्तक वाचलेले नाही पण त्यांच्या पहिल्या पुस्तकात उल्लेख आहे. प्रत्येकाने आपापल्या तब्येतीला अनुसरून व्यायाम निवडावा. फायदा होतोच! चुकीच्या प्रकारे व्यायामास सुरुवात करून जी दुखापत होते, त्याने अनेक दिवस व्यायाम करताच येत नाही. जसे, ट्रेनिंगशिवाय म्यारेथॉन धावणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

सावकाश हालचालींचे व्यायाम

अस्वस्थामा
Tue, 10/27/2015 - 22:32 नवीन
सावकाश हालचालींचे व्यायाम करण्यातून आणखी एक फायदा म्हणजे हल्ली आपण उगाचच प्रत्येक गोष्टीची घाई करत असतो (उदा. विमान थांबले रे थांबले की लगेच वरचे सामान काढून गर्दीत ताटकळत उभे रहाणे, लोकल मधून उतरल्या उतरल्या धावत सुटणे, बका बका खाणे इ.) त्या सवयीतून सुटका होते, आणि आयुष्य हे शांतपणे, विना घाई-गडबडीचे जास्त चांगल्या रीतीने जगता येते, हे उमगते.
या बाबत सहमत न होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हो काका. पण हे फक्त व्यायामास लागू होत नाही. शांत पणे जेवण करणे. झोपण्याआधी डोक्याला काहीतरी फीड करण्यापेक्षा शांत पडणे अशा बर्‍याच गोष्टी यासंदर्भात येतात. व्यायाम हा "यापैकी एक" असा आहे. तुमच्या मताशी सहमत आहे परंतु वरती मी हाय इंटेसिटी व्यायामाबाबत व्यक्त केलेल्या मताबाबत असहमत होतो त्याबद्दल यायोगे कारण सांगतो. तुम्ही म्हणालात "मला आपल्या वयाचा आणि कुवतीचा विचार न करता केलेल्या जॉगिंग, ब्रिस्क वॉकिंग आणि डंबेल्स या तिन्हीतून दुखापत झाली". तुमच्या वयाबद्दल मान्य पण मी विशीतल्या बरेच जणांना याचा चुकीचा अर्थ काठताना पाहिलेय. अचानक ५-१० किमी अगदी ३० मिनिटात धावू पाहणे हे गैरच पण म्हणून कोणी धडधाकट विशीतला माणूस (बाई) माझी ते अंतर (अगदी तिप्पट वेळ का लागेना) धावणे/जॉगिंग करण्याची कुवत नाही म्हणत असेल तर ते चूकच. जर तुम्हाला कोणतीही गंभीर व्याधी/विकार नसेल तर थोडा थोडा प्रयत्न या गोष्टी साध्य करु शकतो यावर माझा विश्वास आहे. आणि चाळिशीच्या आत असाल तर नक्कीच शक्य आहे हे पण. फक्त थोडे थोडे योग्य दिशेने प्रयत्न हवेत. बाकी तर वरती डॉकनी वरती सांगितल्याप्रमाणे,
परंतु एकदा तुमचा व्यायाम किंवा आहार थांबला कि झपाट्याने हे पाणी शरीरात शोषले जाऊन वजन "जैसे थे" येते
ही वस्तुस्थिती आहे. पण व्यायाम सुटल्यानंतरच्या भितीने व्यायाम करायचाच नाही हे पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मी ह्या पुस्तकाचा उल्लेख इथे

पिलीयन रायडर
Fri, 10/23/2015 - 13:54 नवीन
मी ह्या पुस्तकाचा उल्लेख इथे करणारच होते.
ज्या लोकांना खरोखरच व्यायाम करायचा आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावे. मस्ट रिड!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

दिवेकर बाईंची दोन्ही पुस्तके

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 10/28/2015 - 13:32 नवीन
दिवेकर बाईंची दोन्ही पुस्तके (डोन्ट सिरीझ) वाचायला सोपी आणि सल्ले आचरणात आणायला सोपे आहेत! पहिल्यात घरबसल्या जास्त काही आहारबदल न करता आहारात हेल्दी बदल घडवून कसे घडवून आणायचे ह्यांचे चांगले सल्ले आहेत. दुसर्यात व्यायामाविषयी सगळ काही आहे. मी व्यवस्थित प्लान करून ९ किलो कमी केल होत, पण आता ३ किलो परत वाढलाय. कारणे: आहारनियम न पाळणे आणि व्यायामात सातत्य नसणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

डायटेशियन

कपिलमुनी
Wed, 10/21/2015 - 17:15 नवीन
लोक्स एखाद्या डायटेशियन भेटून डायट का ठरवत नाहीत ?
  • Log in or register to post comments

काकांनी सांगितलं तेव्हा हा

सूड
Wed, 10/21/2015 - 18:04 नवीन
काकांनी सांगितलं तेव्हा हा प्रकार मला रोचक वाटला होता. पण खाणे आणि वर्कआऊट्/खेळणे/पोहणे काहीही जोवर एकत्र करत नाही तोवर शरीरावर त्याचा फरक दिसत नाही असा माझा तरी अनुभव आहे. गेला एक महिना वर्कआऊट नाही/ पुण्यात पावसाच्या कृपेने स्विमींग पूल बंद त्यामुळे निव्वळ खाण्यावर कंट्रोल ठेवला आहे. पण वर्कआऊट किंवा स्विमिंगनंतर दिवसभर जो तरतरीतपणा असायचा तो तेवढा कुठेतरी कमी वाटतोय. नुसत्या डाएटने होणारे सो कॉल्ड चमत्कार क्षणभंगूर असतात असं माझं मत आहे.
  • Log in or register to post comments

अनुभव की अंदाज ??

चित्रगुप्त
गुरुवार, 10/22/2015 - 16:29 नवीन
नुसत्या डाएटने होणारे सो कॉल्ड चमत्कार क्षणभंगूर असतात असं माझं मत आहे.
हे मत अनुभवाने झालेले आहे की हा एक अंदाज वा समजूत आहे ? माझी मूळव्याध आणि वीस-पंचवीस वर्षापासून असलेला फिस्टुला (याच्या वेदना आणि त्रास ज्याला होतो तोच जाणे) अवघ्या पंधरा ते वीस दिवसात कायमचा बरा झाला. वजन आणि पोटाचा घेर जो कमी झाला, तो या दीड वर्षात वाढलेला नाही, तेंव्हापासून वाढलेली उर्जा-उत्साह आणि संपलेली-निराशा, आळस ... याला क्षणभंगुर म्हणावे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

खालिल दुव्यावरील महोदय स्वत:

तर्राट जोकर
Wed, 10/21/2015 - 18:09 नवीन
खालिल दुव्यावरील महोदय स्वत: डॉक्टर आहेत. ते ह्या डायटला रेकमेंड करत आहेत. वर काही प्रतिसादांमधे काही डॉक्टर्स त्याला विरोध करत आहेत. नक्की कोण योग्य आहे...? http://drhyman.com/blog/2014/04/20/need-reboot/
  • Log in or register to post comments

गुड, असेच ट्यार्पी मिळवायचे

सूड
Wed, 10/21/2015 - 18:14 नवीन
गुड, असेच ट्यार्पी मिळवायचे प्रयत्न करत राहा. वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

त्या डॉक्टरसाहेबांचे झटपट

सायकलस्वार
Wed, 10/21/2015 - 18:18 नवीन
त्या डॉक्टरसाहेबांचे झटपट डायेटची पुस्तके , सीड्या, सप्लिमेंट्स वगैरे विकण्याचे दुकानच आहे हो! http://store.drhyman.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

वोक्के सार, ज्यांचे दुकाने

तर्राट जोकर
Wed, 10/21/2015 - 21:52 नवीन
वोक्के सार, ज्यांचे दुकाने नस्तात ते डॉक्टर योग्य बोलतात..... धन्यवाद! ज्ञानात भर टाकल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार

(facepalm)

सायकलस्वार
Wed, 10/21/2015 - 23:53 नवीन
कोण योग्य बोलत आहे, कोण नाही यावर मी काहीच म्हणत नाहीये. दुकान प्रत्येकजणच लावून बसलेला असतो. गिर्‍हाईकानेच तारतम्य बाळगावं अशी अपेक्षा आहे. मी ज्युस डाएट डिसक्रेडिट करत नाही. पण वस्तू विकणार्‍याकडूनच वस्तूचं सर्टिफिकीट आणून दाखवणं गमतीदार वाटलं. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

हे काय होत?

मीउमेश
Wed, 10/21/2015 - 18:43 नवीन
दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापासून पुढले काही दिवस विष्ठेतून भोवताली खूप तंतू असलेले, हलके, पाण्यावर तरंगणारे विचित्र आकाराचे 'आयटम' (जीव-जंतु ?) निघत होते ,
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा