Skip to main content

प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन ) संगे !

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 20/08/2017 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
हातात सामान घेऊन मी रेल्वे स्टेशनच्या एका फलाटावर उभा आहे. माझी गाडी थोड्याच वेळांत येथे येत असल्याची घोषणा झाली आहे. माझ्याकडे प्रवासाचे आरक्षित तिकीट आहे. त्यामुळे माझा बसायचा डबा जिथे थांबणार आहे तिथे मी थांबलेलो आहे. गाडीला नेहेमीप्रमाणेच खूप गर्दी आहे. माझा डबा हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित गटातील असल्याने त्यात फक्त आरक्षित तिकीटधारकांनीच चढावे अशी माझी अपेक्षा आहे ! खरे तर तसा नियमही आहे. पण वास्तव मात्र तसे नाही. माझ्या डब्याच्या जागेवर बिगरआरक्षित प्रवाशांची अधिक झुंबड आहे. खरे तर या मंडळींनी ‘जनरल ‘ डब्यात जायला हवे आहे. परंतु, सामान्य तिकीट काढूनही आरक्षित डब्यात घुसणे हा त्यांचा शिरस्ता आहे ( नियम बियम कोणाला सांगता राव ?). ok आता गाडी फलाटाला लागते. अनारक्षित तिकीटवाले (व बिगर तिकीटवालेही) झुंडीने डब्यात घुसू लागतात. आम्ही आरक्षित तिकीटवाले बापडे मात्र शहाण्यासारखे दम धरून त्यांना आधी चढू देतो. शेवटी घामाघूम झालेल्या अवस्थेत मला एकदाचा डब्यात प्रवेश मिळतो. माझ्या आरक्षित आसनावर आक्रमण केलेल्या घुसखोराला मी उठवतो व माझे बूड टेकतो. हुश्श ! कामानिमित्त मी नियमित रेल्वे प्रवास करतो. डब्यात शिरतानाचा हा अनुभव नेहेमीचाच. बस, रेल्वे व विमान या तीनही प्रवासांमध्ये माझे रेल्वेवर आत्यंतिक प्रेम आहे. जेव्हा एखाद्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध असतो तेव्हा मी इतर पर्यायांचा विचारही करत नाही. आतापर्यंत केलेल्या भरपूर रेल्वे प्रवासामुळे ट्रेन ही माझी प्रेयसीच झाली आहे – जणू माझी सफर-सखीच. या प्रवासांचे अनेक भलेबुरे अनुभव माझ्या गाठीशी आहेत. .... माझा आजचा प्रवास सुरू झालाय. गाडीने आता वेग घेतलाय. काही तास आता मी ट्रेनमध्ये असणार आहे. आज मला तीव्रतेने वाटतंय की माझी प्रवासातील सुख दुख्खे माझ्या या सखीलाच सांगावित. तर एक सखे, तुझ्या नि माझ्या सहवासाचे काही किस्से ...... लहानपणी तुझ्यातून प्रवासाची खूपच मज्जा वाटायची. त्या काळचे तुझ्या प्रवासाचे तिकीट अजून आठवते. ते पुठ्याच्या कागदाचे छोटेसे आयताकृती तिकीट होते. ते तिकीट-खिडकीवरून घेताना आतली व्यक्ती ते एका यंत्रावर दाबून त्यावर तारीख व वेळ उमटवत असे. आम्ही मुले ती तिकीटे कौतुकाने जमवून जपून ठेवत असू. तिकीट घेऊन फलाटावर गेल्यावर तुझी इंजिन्स कर्कश शिट्या करीत उभी असायची. त्या आवाजाची तर अगदी भीती वाटायची. सखे, तेव्हा तू खरोखरीच झुकझुक गाडी होतीस. तुझ्या काही मार्गांवर तू खूपदा बोगद्यातून जायचीस त्याचे तर आम्हाला कोण कौतुक. तुझ्या काही स्थानकांवरचे बटाटेवडे तर अगदी नावाजलेले. ते खाण्यासाठी लहानमोठे सगळेच आतुर असत. एकून काय, तर तुझ्या बरोबरचा प्रवास म्हणजे मुलांसाठी खाणेपिणे व धमाल करणे यासाठीच असायचा. उपनगरी रेल्वे हा तुझा एक महानगरी अवतार आहे. लहानपणी मी माझ्या आजोबांबरोबर मुंबईच्या लोकल्सने प्रवास करी. तुडुंब गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या डब्यांमध्ये शिरणे व त्यातून उतरणे हे एक अग्निदिव्यच. असेच एकदा आम्ही फलाटावर गाडीची वाट पाहत होतो. गाडी आली. आमच्या समोरच्या डब्यात गर्दीचा महापूर होता. परंतु, त्याला लागूनच्या डब्यात बऱ्याच रिकाम्या जागा होत्या (हे वर्णन १९७५ मधले !). माझे आजोबा गर्दीच्या डब्याकडे बघत हताशपणे म्हणाले की त्यात शिरणे अवघड आहे, तेव्हा आपण ही गाडी सोडून देऊ. त्यावर मी त्यांना कुतूहलाने म्हणालो की आपण त्या शेजारच्या बऱ्यापैकी रिकाम्या डब्यात चढूयाकी. त्यावर ते किंचितसे हसले व मला म्हणाले, “ अरे, तो पहिल्या वर्गाचा डबा आहे.’’ मी ते ऐकले मात्र अन मला जणू ४४० व्होल्टचा विजेचा झटका बसला ! म्हणजे या डब्यांमध्ये अशी वर्गवारी असते तर.( खरं तर माणसांमधली वर्गवारी सुद्धा कळायचे माझे वय नव्हते ते ). मग मला आजोबांनी या दोन्ही वर्गांच्या भाड्यातील लक्षणीय फरक सांगितला. मला झालेला तो एक साक्षात्कारच होता. त्यानंतर बरीच वर्षे पहिल्या वर्गाचा डबा हा माझ्यासाठी फक्त ‘लांबून बघण्याचा’ डबा होता. तेव्हा निमूटपणे दुसऱ्या वर्गाच्या डब्यात घुसण्याला पर्याय नव्हता. मोठेपणी मी कमावता झाल्यावर तुझ्या सर्व वरच्या वर्गाच्या प्रवासांचा पुरेपूर अनुभव घेतला. पण एक सांगू ? मला तुझ्या त्या वातानुकुलीत वर्गाचा प्रवास मनापासून आवडत नाही. त्यातला थंडपणा मला सोसत नाही. तसेच तिथल्या बंद खिडक्या, आतमध्ये झालेली झुरळे आणि कुंद वातावरण नकोसे वाटते. त्यातून तिथले प्रवासी पण कसे बघ. फारसे कोणीच कोणाशी बोलत नाही. बहुतेक सगळे एकतर मोबाईलवर चढ्या गप्पा मारण्यात मग्न किंवा कानात इअरफोन्स खुपसून हातातल्या स्मार्टफोन्स मध्ये गुंगून गेलेले. या सगळ्यांमुळे मी तिथे अक्षरशः गुदमरून जातो. त्यामुळे मी एकटा प्रवास करताना शक्यतो तुझ्या दुसऱ्या वर्गाने जाणे पसंत करतो. तिथल्या उघड्या खिडक्या, सुसाट वारा, तुझ्या वेगाची होणारी जाणीव आणि एकूणच त्या डब्यातले मोकळेढाकळे वातावरण मला बेहोष करते. मला चांगले आठवतंय की मी काही प्रवास पूर्वीच्या तुझ्या बिगरवातानुकुलीत पहिल्या वर्गातून केले होते. खरं म्हणजे माझा सर्वात मनपसंत वर्ग तोच होता. जेव्हापासून तो साधा पहिला वर्गच रद्द झाला तेव्हापासून मी मनोमन खट्टू आहे. अलीकडच्या काही वर्षात तुझ्या दुसऱ्या वर्गाच्या प्रवाशांना अजून एक त्रास सुरू झालाय. तू धावत असताना डब्याच्या उघड्या खिडक्यांतून हलते निसर्गसौंदर्य मनसोक्त पाहणे हे खरे तर या प्रवाशांचे हक्काचे सुख. पण, तुझ्या काही मार्गांवर या मूलभूत सुखावरच घाला घातला गेला आहे. या मार्गांवरून तू जात असताना बाहेरील काही दुष्ट मंडळी गाडीवर जोरात दगड मारतात. बहुदा असे लोक याप्रकारे त्यांच्यातील असंतोष व नैराश्य बाहेर काढत असावेत. पण त्यामुळे प्रवाशांनी मात्र जीव मुठीत धरून प्रवास करायचा. मग यावर उपाय म्हणून पोलीस प्रत्येक डब्यात येऊन प्रवाशांना खिडक्यांचे लोखंडी शटर्स सक्तीने लाऊन घ्यायला लावतात. मग अशा बंदिस्त डब्यातून प्रवाशांनी जिवाची घालमेल सहन करत आणि एकमेकांकडे कंटाळा येईस्तोवर बघत बसायचे. बाकी प्रचंड गर्दीच्या वेळी तुझ्या दारात उभे राहून जाणाऱ्यांना तर कायमच धोका. अधेमध्ये असा जोराचा दगड लागून एखादा प्रवासी गंभीर जखमी झालाय वा मरणही पावलाय. किती चटका लावून जाते अशी घटना. तुझ्यातून प्रवास करणे ही माझ्यासाठी आयुष्यभराची करमणूक आहे प्रवास सुखकर व्हावा म्हणून माझ्यासारखे अनेक जण तिकिटाचे व्यवस्थित आरक्षण करूनच प्रवास करतात.पण, आम्हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षितांचे एक कायमचे दुखः आहे.ते म्हणजे आरक्षित डब्यांत होणारी बिगरआरक्षित मंडळींची त्रासदायक व संतापजनक घुसखोरी. या घुसखोरांमध्ये सामान्य तिकीटवाले, प्रतीक्षा यादीवाले, तृतीयपंथी आणि भिकारी असे विविधरंगी लोक असतात. या सर्वांचा असा ठाम समज असतो की कोणीही कुठल्याही डब्यात बसले तरी चालते. म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाण्यातला हा प्रकार. ही मंडळी एकदा का आरक्षित डब्यात घुसली की इतकी शिरजोर होतात की आम्हालाच विस्थापितासारखे वाटू लागते.एकंदरीत काय तर दुसऱ्या वर्गाचे आरक्षित डबे हे ‘’आओ जाओ घर तुम्हारा’’ असे झालेले आहेत. यातील प्रवाशांच्या सुखसोयीबाबत रेल्वे प्रशासनही बेफिकीर आहे. प्रवाशांच्या तक्रारींना तर काडीचीही किमंत दिली जात नाही. दुसऱ्या वर्गाचे आरक्षण केलेल्या प्रवाशाला डब्यात मोकळा श्वास घेता येईल, त्याला त्याचे सामान त्याच्या आसपास हक्काने ठेवता येईल, डब्यातली मधली मार्गिका ही चालण्यासाठी मोकळी असेल आणि गरज लागेल तेव्हा त्याला स्वच्छतागृहात विनासंकोच जाता येईल अशा मूलभूत अपेक्षा हा ‘बिचारा प्रवासी’ ठेऊन आहे. मध्यंतरी मी एकदा तुझ्या डब्याचे बाहेरून बारकाईने निरीक्षण केले. तुझ्या प्रत्येक डब्याला दोन दरवाजे आहेत. त्यातील एकावर ‘प्रवाशांनी चढण्यासाठी’ व दुसऱ्यावर ‘उतरण्यासाठी’ असे व्यवस्थित लिहेलेले आहे. मनात आले की खरोखरच जर याप्रमाणे आपली जनता वागली तर ! पण वास्तव मात्र भीषण आहे.उतरणाऱ्याना उतरू देण्यापूर्वीच चढणारे घुसखोर नकोनकोसे करून टाकतात. काही निर्लज्ज तर आधीच रुळांवर उतरून फलाटाच्या विरुद्ध बाजूच्या दाराने आत घुसतात. हे पाहून तिडीक येते व शिस्तीबाबतच्या आपल्या मागासपणाची अगदी लाज वाटते. एका दारातून प्रवासी उतरताहेत व जसा डबा रिकामा होतोय तसे शिस्तीत दुसऱ्या दारातून नवे प्रवासी चढताहेत असे ‘रम्य’ दृश्य बघायला एखाद्या सम्रुद्ध परदेशातच जावे लागेल ! तुझ्यामधून नियमित प्रवास करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांच्या जीवनाचा तू अविभाज्य भाग झाली आहेस. तुझ्या संगतीत मला जीवनातले आनंद व चैतन्यदायी प्रसंग अनुभवायला मिळाले आहेत. माझ्या बरोबरचे काही सहप्रवासी आता माझे जिवलग मित्र झाले आहेत. तू जेव्हा वेगाने धावत असतेस तेव्हा खिडकीतून बाहेर बघताना माझे विचारचक्रही वेगाने फिरत राहते. मग त्यातूनच काही भन्नाट कल्पनांचा जन्म होतो. माझ्या लेखनाचे कित्येक विषय मला अशा प्रवासांमध्ये सुचले आहेत. अनेक विषयांचे सखोल चिंतन मी तुझ्या बरोबरच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात करू शकलो आहे. माझा जास्त प्रवास हा तुझ्या ‘एक्स्प्रेस’ व ‘लोकल’ या प्रकारांतून होतो. पण, अधूनमधून मी तुझ्या ’passenger’ या अवताराचाही अनुभव घेतलाय. त्या प्रवासामुळे मला स्वतःभोवतीच्या सुरक्षित कोशातून बाहेर पडता आले. तसेच ‘महासत्ता’ वगैरे गप्पा मारणारा भारत वास्तवात काय आहे याचे भान आले. तुझ्या प्रवासादरम्यान कधीकधी होणारे गैरप्रकार आणि काही दुखःद प्रसंग मात्र अस्वस्थ करून जातात. कधी तुझ्यावर दरोडा पडतो अन प्रवाशांची लूटमार होते. कधी तुझ्या यंत्रणेत गडबडघोटाळा होतो अन छोटेमोठे अपघात होतात. काही देशद्रोही तुला घातपात करण्यात मग्न असतात. आयूष्यात प्रचंड नैराश्य आलेले काही जीव आत्महत्या करण्यासाठी तुझ्यापुढे उडी मारतात. तर कधीतरी काही भडक डोक्याचे प्रवासी आपापसातील भांडणातून एखाद्या प्रवाशाला गाडीतून बाहेर फेकतात. अशा हृदयद्रावक घटना कधीही न घडोत अशी माझी मनोमन प्रार्थना आहे. तुला आपल्या देशात रूळांवरून धावायला लागून आता दीडशेहून अधिक वर्षे होऊन गेलीत. तुझ्यावर पूर्णपणे सरकारी मालकी आहे. तेव्हा सरकारी यंत्रणांमध्ये आढळणारे सगळे फायदे-तोटेही तुझ्या ठायी आढळतात. तुझ्या गलथानपणाबाबत आपण सतत ऐकताच असतो. पण, मध्यंतरी मला तुझा एक सुखद अनुभव आला. तुझ्या एका मूळ स्थानकावर मी तुझ्यात बसलो होतो. तुला सुटायला अजून अवकाश होता.डब्यात तुरळक प्रवासी होते. मी खिडकीतून बाहेर बघत होतो.तेवढ्यात एक गणवेषधारी माणूस माझ्याजवळ आला. तो सफाई कामगारांवरचा पर्यवेक्षक होता. त्याने मला सांगितले की तुमच्या डब्यांची व स्वच्छतागृहांची साफसफाई कामगारांनी केली आहे. ती कशी झाली आहे यावर त्याला माझे लेखी मत हवे होते. त्याने मला अधिकृत नमुन्यातील कागद भरण्यास दिला.मग मलाही हुरूप आला व मी प्रत्यक्ष जाऊन सगळे बघून आलो. सर्व स्वच्छता चांगली केलेली होती व तसे मी त्याला लिहून दिले. त्या कागदात शेवटी प्रतिसादकाचे नाव, आसन क्रमांक व फोन नं. इ. सर्व लिहायचे होते. हा अनपेक्षित प्रकार बघूनच मी सुखावलो व मनात म्हणालो, ‘’ चला आता भारतीय रेल्वेला ‘corporate look’ येतोय तर !” अर्थात हा अपवादात्मक अनुभव आहे. तो वरचेवर येवो ही अपेक्षा !! तसेच भविष्यात तुझी श्रीमंती व अतिवेगवान रूपे विकसित होण्यापूर्वी सध्याच्या तुझ्यातील मूलभूत सोयी सर्व वर्गाच्या प्रवाशांना व्यवस्थित मिळोत ही इच्छा. ... माझा या प्रेयसी बरोबरचा संवाद हा न संपणारा आहे. पण, आताच्या प्रवासाचे चार तास मात्र आता संपत आले आहेत. आता गाडी स्थानकाच्या जवळ आल्याने हळू झाली आहे. काही प्रवासी त्यांच्या सामानासह दाराजवळ गर्दी करत आहेत. स्थानकात शिरून फलाटाला लागेपर्यंत गाडी खूप हळू जाते व थांबायला भरपूर वेळ घेते. म्हणून मी अजून शांतपणे माझ्या आसनावर बसून आहे. अहो, आता सखीच्या विरहाची वेळ आल्याने खरे तर उठवत नाहीये ! अखेर गाडी थांबते. लगेचच गाडीत चढू पाहणाऱ्या अति उतावीळ प्रवाशांना मोठ्या कष्टाने रोखत आम्ही खाली उतरतो. मी फलाटावरून चालत असतानाच एकीकडे ध्वनिवर्धकातून घोषणा होत असते, ‘’हे मध्य रेल्वेचे XXXX स्थानक आहे. इंटरसिटी एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशांचे आम्ही स्वागत करतो.’’ आम्हा हजारभर प्रवाशांचे होत असलेले हे स्वागत ऐकून मी भारावतो. माझ्या ‘प्रवास-सखी’ कडे निरोपादाखल एक प्रेमभरी नजर टाकतो आणि हातातले सामान सावरत मार्गस्थ होतो. ********************************
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 231312
प्रतिक्रिया 589

प्रतिक्रिया

In reply to by हेमंतकुमार

बसून जाण्याचे असलेली पुणे- सोलापूर इंद्रायणी इंटरसिटी ही एकमेव गाडी काढलीच. इतर गाड्या स्लीपरवाल्या आहेत.

In reply to by कंजूस

हुतात्मा एक्सप्रेस ही देखील बसून जायचीच गाडी आहे पण ती केव्हाच चालू केली. शताब्दी तर पूर्ण आरक्षित गाडी असते. तरी ती का चालू करत नाहीत काय माहिती ?

In reply to by हेमंतकुमार

अगोदर सिटिंग अरेंजमेंट मध्ये असलेले २ * २ किंवा ३ * ३ पुश बॅक कॉम्बो सोशल डिस्टन्सला मारक असावेत, ते पाळून बुकिंग घेता गाडी चालवणे तोट्यात जात असेल रेल्वेला

In reply to by हेमंतकुमार

पूर्वी इंद्रायणी ने पुण्याला जाऊन तीच गाडी नंबर बदलून सोलापूरला जात असे. परतीला तीच गाडी पुण्याला येऊन नंतर इंद्रायणी नावाने मुंबईत जायची. म्हणजे सोलापूर मुंबई एक सुपरफास्टचे कार्ड तिकिट काढून मुंबईला जाता येत असे बसून. ही गाडी अशावेळी पोहोचते पुण्याला/ पुण्याहून सुटते की मुंबई / येणारी गाडी मिळू नये. रेल्वेत मराठी अधिकारी नाहीत फारसे याचा प्रताप आहे.

तुतारी एक्सप्रेस - रात्री साडेबाराला ठाणे. सकाळची दिवा सावंतवाडी बसून जायची पसेंजर आता एक्सप्रेस नावाखाली डबल पैसे, पेण गाळले फक्त. दादर रत्नागिरी दिव्याला कापली. बाकी गाड्या गोवा,कर्नाटक, केरळच्या. त्यात जा.

मुंबई स्थानकावर कॅप्सूल पद्धतीची अशी निवासस्थाने उभी करणार आहेत. ok ज्यांना स्वस्तात थोडा काळा स्थानकावर राहण्याची सोय हवी आहे त्यांच्यासाठी ती उपयुक्त ठरतील.

In reply to by कंजूस

या गाडीचे रेक शेअरिंग आहे.( तीच अख्खी गाडी पांडियन एक्स्प्रेस आणि रॉक फोर्ट एक्सप्रेस म्हणून धावते)

In reply to by सुबोध खरे

तिकडे तमिळनाडूत फिरण्याची चाचपणी चालू आहे. म्हणून गाड्या पाहात आहे. रेल्वेच सोयीची वाटते. पण मदुराई फार दूर आहे. ब्रेक जर्नीसाठी कांचिपूरम/चेंगलपट्टू बरं वाटतंय. विमान प्रवास परवडत नाही.

In reply to by सुबोध खरे

तिकडे तमिळनाडूत फिरण्याची चाचपणी चालू आहे. म्हणून गाड्या पाहात आहे. रेल्वेच सोयीची वाटते. पण मदुराई फार दूर आहे. ब्रेक जर्नीसाठी कांचिपूरम/चेंगलपट्टू बरं वाटतंय. विमान प्रवास परवडत नाही.

In reply to by हेमंतकुमार

मंत्री साहेब म्हणतात की Rear-end collision testing is successful. लोकसत्ता उगाच भरधाव, समोरासमोर वगैरे सनसनाटी विधाने करते.

आत्ताच बातमी वाचली की रेल्वेखाते आता वातानुकुलित डब्यांमधून अंथरूण-पांघरूण देणे पुन्हा सुरू करीत आहे... तसेच पडदे ही लावले जातील.

In reply to by हेमंतकुमार

बातमी आणि वास्तव सदर बातमी येऊन आठ दिवस होऊन गेलेत. काल मी ट्रेनने प्रवास केला तेव्हा पांघरूणे दिलेली नव्हती. चौकशी करता असे समजले : या निर्णयाची अंमलबजावणी उत्तर भारताकडून सुरू झालेली आहे. दक्षिण भारतात ती पूर्ण व्हायला १ एप्रिल उजाडेल. पडदे लावून झालेले आहेत.

रेल्वेच्या तिजोरीत चित्रपट चित्रीकरणातून पावणेतीन कोटी ; १० चित्रपटांचे चित्रीकरण https://www.loksatta.com/nagpur/central-railway-earns-over-rs-2-50-cror… …. माझा असा समज होता की चित्रपटातील रेल्वे संबंधीची बहुतेक दृश्य रामोजी किंवा अन्य फिल्मसिटी सारख्या प्रकल्पांमध्ये चित्रित करतात.

In reply to by हेमंतकुमार

स्टेशनवर करत असावेत, जब वी मेट बहुतेक खुद्द रतलाम स्टेशनवर शूट केला होता स्पेसिफिक सीन. कधीकधी रेल्वे शूटच्या नादात दिग्गज पण घोडचूका करतात. श्याम बेनेगल दिगदर्शित "बोस द फॉरगोटन हिरो" सिनेमात अशीच एक चूक भातातील खड्याप्रमाणे कचकन दाताखाली आली होती. प्रसंग हा की नेताजी घरातून नजरकैद चुकवून ब्रिटिशांना गुंगारा देऊन महंमद झियाउद्दीन म्हणून गोमोह स्टेशन (तत्कालीन बंगाल सुभा, हल्ली झारखंड) इथून फ्रंटीयर मेलने सुरू करतात (इथे बरोबर जुने लाल डबे, ओढणारे वाफेचे इंजिन दाखवले आहे), पुढे ट्रेन ने ते पेशावरला पोचतात तेव्हा मिया अकबर शहा त्यांना घ्यायला पोचतात स्टेशनवर तिथं मात्र मॉडर्न निळ्या लिव्हरी मधले डबे दाखवले गेले होते. निळे डबे नव्वदीच्या दशकात जुन्या ब्रिक रेड लिव्हरीला चेंज करून लागू केले गेले होते, त्या इंटेन्स नाटकीय ऐतिहासिक क्षणात एकदम ते बघून कसेसे झाले होते.

In reply to by जेम्स वांड

*"नाटकीय ऐतिहासिक क्षणात एकदम ते बघून कसेसे झाले होते.>>> सहमत

In reply to by जेम्स वांड

जेम्स वांड, अगदी समर्पक उदाहरण आहे. त्यातलं नाटकीय हे विशेषणही तुम्ही वर्णिलेल्या खड्यासारखंच दाताखाली आलं. तुम्हाला नाट्यमय म्हणायचं होतं बहुतेक. आ.न., -गा.पै.

In reply to by जेम्स वांड

रतलाम जंक्शन बरेच मोठे आहे. इथे थोडे पाहायला मिळेल. पिक्चर मधे दाखवलेले स्टेशन बहुधा महाराष्ट्रातील एखादे लहान स्टेशन होते. रतलाम ला राजधानी थांबते. बाकी पिक्चर मधे दाखवलेली पंजाब मेल मुळातच रतलामहून जात नाही. बाकी याबद्दल इथे वाचा :) https://www.misalpav.com/node/41372

In reply to by फारएन्ड

रेल्वे विडिओसाठी मी Extreme roads channel - vaishali seta पाहतो. हिंदी सिनेमे भावनिक पायावर उभे असतात. त्यामुळे ब्लूपर साइडिंगला. तो लेखही वाचला. प्रतिसादांतले फक्त तीनचार आईडीच उरले आहेत मिपावर.

In reply to by कंजूस

कंजूस - धन्यवाद. मी ही मोकळा वेळ असला की ट्रेन्सच्या क्लिप्स पाहतो. या तुम्ही दिलेल्या चेक करतो आता. काही लोक प्रवास करताना व्हिडीओ ब्लॉग तयार करतात - अनेकजण केवळ ते करण्याकरताही प्रवास करतात. असे अनेक पाहिले आहेत. पण हे स्पेसिफिकली पाहिल्याचे आठवत नाही.

In reply to by फारएन्ड

सर्वच प्रवास आपण करणार धसतो पण त्यात काय गंमत आहे हे जाणून घेण्यासाठी ट्रेन प्रवासाचे विडिओ पाहावे लागतात. बऱ्याच जणांचे पाहिले पण वैशाली चांगले करते. एकदा गाडीत बसून त्यातली रचना दाखवल्यावर पुढचे आठ ते दहा तास विडिओ ढकलणे कठीण आहे. ते तिला जमतं.

करोनामुळे काढलेच नाही. शेवटचे सेंट्ल/ वेस्टन झोनचे २०१८ जुलैचे. तेच आहे साइटवर.

रेल्वे हे केंद्र सरकारचे एकमेव 'प्राप्ती' करून देणारे मंत्रालय असून त्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार त्या उत्पन्नातून निघतात. काही काळापूर्वी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन सुद्धा त्या उत्पन्नात बसत होते. परंतु आता त्या विभागात तूट आलेली आहे. https://www.thehindu.com/opinion/lead/transmogrifying-a-behemoth-the-ra…

In reply to by हेमंतकुमार

बातमी द हिंदू नावाच्या वर्तमान पत्रातली आहे. हा चीन अजेंडा चालवणारा भारत विरोधी पेपर आहे. यातल्या बातम्यांवर विश्वास ठेवणे जड जाते. सध्या पायाभूत सुविधा वाढवण्याचे कार्य वेगाने चालले आहे. अशा काळात भांडवली खर्च मोठा होतो आहे. रेल्वे विद्युतीकरण, शेती समर्पित रेल्वे, समर्पित मालवाहू मार्ग या देशभर विणल्या जात आहेत. हे घडण्यासाठी धोरण म्हणजे पॉलिसी आवश्यक असतेच. नाहीतर हे कसे आखून पुर्ण केले असते? आणि लेखातले शब्द पहा also accompanied by a deafening silence on crucial policy issues. म्हणजे याच काळात रेल्वेकडे पैसे नाहीत - अशी हाकाटी पिटण्याची टिपिकल डावी प्रपोगंडा पद्धती आहे बाकी काही नाही.

In reply to by निनाद

१) हा चीन अजेंडा चालवणारा भारत विरोधी पेपर आहे. चीन काय करते हे लोकांना माहिती आहे का? किंवा असली तर २००० पूर्वीची असेल. आता चीन बदलला आहे. २)It can be translated as: ‘Will bureaucrats do everything? Just because they’ve become IAS, does it mean they will run fertilizer factories, chemical industries,... if one becomes IAS will he even fly aircraft? What is this humongous force that we’ve created?’ का नाही? एंजिनिअरला एखादा तांत्रिक प्रश्न दिला तर तो सोडवणार हे नक्की. पण त्याला कोणता प्रश्न सोडवायला द्यायचा हे अधिक महत्त्वाचे असते. एक उदाहरण म्हणजे '७० च्या दशकात मुंबई युनिवर्सिटीच्या परीक्षा आणि निकाल याचा गोंधळ असे. सरकारने लक्ष घालून एक आइएस अधिकारी आणून बसवला यासाठी. त्याने झटक्यात प्रश्न सोडवला. कसा? तर त्याने परीक्षा नियोजन, पेपर तपासणी आणि निकाल याचे निरीक्षण केले. त्याने टाइमटेबल आखले. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रोफेसर लोकांचा इगो गेला. काम चोख झाले. आता रेल्वेकडे जागा,स्टेशने, स्टाफ आहे. त्यातून अधिकाधिक रिटन मिळवण्यासाठी डोकेबाज माणूसच हवा. लोकांना ( प्रवाशांना )काय हवे हे ओळखून पर्यटनावर भर दिला. उदाहरणार्थ रामायण एक्सप्रेस टुरिस्ट ट्रेन ( लक्शरी रु ८४हजार, तर साधी सोळा हजार. दोन्हींसाठी प्रवासी आहेत. श्रीमंय आणि सामान्य असे दोन्ही भाविक खुश. 200 journeys channel पाहा.) गाड्या चालवल्या आणि यातूनच आवक वाढली. रेल्वे स्टेशनांत अद्ययावत सोयी आणत आहेत. स्वच्छता वाढवली आहे. एके काळी लालूच्या वेळी रेल्वेने आठ हजार कोटी नफा दाखवला होता. तो आता नाही याचे कारण काय? तर हा वरील खर्च सुरू झाल्यावर नफा गेला. पण कुठे? तर तो परत प्रवाशांना मिळाला सुंदर स्वच्छ स्टेशन आणि गाडी रूपात.

डोंबिवलीच्या सुभाष राव यांचा रेल्वे इंजिनांच्या प्रतिकृती बनविण्याचा छंद आहे. त्यांनी ही कला उत्तम प्रकारे विकसित केली आहे. नुकतेच त्यांना राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयाकडून त्यांच्या कलाप्रदर्शनातकरिता आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी बनविलेली कुठलीही प्रतिकृती पाचशे रुपयांपेक्षा कमी खर्चात झालेली आहे. मात्र ती तयार करण्यामागे त्यांचे अविरत कष्ट आहेत. मुलाखत इथे : https://www.freepressjournal.in/amp/mumbai/how-dombivli-resident-subhas…

जयपूर मध्ये फक्त सहा तरुणांनी स्वतःसाठी संपूर्ण मेट्रो ट्रेन आरक्षित केली होती. त्यांना रात्री दहाची वेळ देण्यात आली होती. संबंधित चित्रफित येथे आहे बातमीची सत्यासत्यता माहित नाही.

भारतीय रेल्वेची एक वैशिष्ट्यपूर्ण ट्रेन वर्षातून फक्त 23 मार्चला चालवली जाते : फिरोजपुर ते हुसैनीवाला इथपर्यंत. आजच्या शहीद दिनी हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी या ट्रेनचे प्रयोजन आहे. ok

न्यूझीलंडमध्ये दळणवळणासाठी प्रामुख्याने विमानांचा वापर जास्तच आहे. त्यातून कर्ब उत्सर्जन समस्या वाढत आहे. त्यांच्याकडे देशाच्या दोन टोकांना जोडणारी लांब पल्ल्याची रेल्वेसेवा नाही. अस्तित्वात असलेल्या काही रेल्वे बंद केल्या गेल्य नंतर तिथे रेल्वे बचाव सारख्या मागण्या होत असतात. रेल्वेचे जाळे वाढवण्यास संबंधी प्रदूषण समितीने काही सूचना केलेल्या आहेत.

रेल्वेसेवा आता ब्रॉडगेज मार्गावर नव्याने सुरू झाली आहे. 2014 पर्यंत ही सेवा नॅरोगेज वर चालत असल्याने त्यासाठी कोळसा अधिक लागत होता. त्यामुळे ती बंद करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी आठशे कोटी रुपये खर्च आला आहे

भारतातील पहिली प्रवासी ट्रेन 16 एप्रिल 1853 रोजी धावली होती. आज भारतीय रेल्वे 170 व्या वर्षात पदार्पण करीत आहे हार्दिक शुभेच्छा !!

भारतातील पहिली प्रवासी ट्रेन 16 एप्रिल 1853 रोजी धावली होती. आज भारतीय रेल्वे 170 व्या वर्षात पदार्पण करीत आहे हार्दिक शुभेच्छा !!

भारतातील पहिली प्रवासी ट्रेन 16 एप्रिल 1853 रोजी धावली होती. आज भारतीय रेल्वे 170 व्या वर्षात पदार्पण करीत आहे हार्दिक शुभेच्छा !!

भारतातील पहिली प्रवासी ट्रेन 16 एप्रिल 1853 रोजी धावली होती. आज भारतीय रेल्वे 170 व्या वर्षात पदार्पण करीत आहे हार्दिक शुभेच्छा !!

पठाणकोट-जोगिंदर नगर, हिमाचल प्रदेश, कांगडा व्हॅली रेल्वे या नॅरोगेज सेक्शन या १६४ किलोमीटर अंतरावरील हेरिटेज ट्रेनमध्ये अत्याधुनिक एसी व्हिस्टाडोम कोच लाँच करण्यात आला आहे. ४० आसनी असलेली ही ट्रेन पठाणकोट येथून सकाळी ८:४५ वाजता सुरू होते आणि दुपारी १४.०० वाजता बैजनाथमधील पाप्रोला येथे संपते.

छान. ….. वातानुकूलित डब्यांमधून पांघरुणे मिळणार अशी घोषणा होऊन महिना झाला आहे. पण सर्व गाड्यांमध्ये ती सोय झालेली नाही. परवा रात्री मी प्रवास केला तेव्हा एक तास आधी मला रेल्वेकडून संदेश आला, की ज्या गाड्यांमध्ये ती सोय झालेली आहे त्याचा तक्ता अमुक अमुक ठिकाणी बघावा. तिथे पाहिले असता काही मोजक्याच गाड्यांना ती सोय झाली असल्याचे दिसले. गाडीत चौकशी केली असता असे समजले की हळूहळू त्या कामाचे कंत्राटदार नेमणे चालू आहे.

ईशान्य भारतातील Dooars हा एक सुंदर भाग आहे. तो रेल्वेतून छानपैकी पाहता यावा यासाठी एक विस्टाडोम गाडी अलीकडे सुरू झाली आहे. ती जलपाईगुडी ते अलीपूरदूर या स्थानकांदरम्यान शनिवार-रविवारी धावते.

डोंगराळ भागात narrow गेजवर धावणाऱ्या एकूण पाच ट्रेन्स भारतात आतापर्यंत आहेत : 1. शिमला कालका 2. दार्जीलिंग 3. माथेरान 4. निलगिरी 5. कांगडा दरी आता त्यांच्यात अजून तीन नव्या ट्रेनची भर पडणार आहे. या तिन्ही शिमला कालका मार्गावर धावतील. या गाड्या १२ महिने चालू नसतात. पावसाळ्यात दरडींचा धोका असला की त्या बंद करतात. माथेरानच्या ट्रेनचा मी दोनदा अनुभव घेतला आहे. शिमल्यात मात्र मी गेलो तेव्हा ती बंद होती.

In reply to by हेमंतकुमार

माथेरानची हल्लीच चौकशी केली तेव्हा कळले की तिची तिकिटे ऑनलाइन मिळत नाही, गाडी सुटायच्या पंचेचाळीस मिनिटे अगोदर काउंटरवरूनच मिळतात, असे का करत असतील देवजाणे, सांगणारा म्हणाला की नाही मिळाले तिकीट तर टॅक्सीन जाता येते, मनात म्हणले तिच्यासाठी तर जायचं माथेरानला, सोबतची बच्चेकंपनी अन त्याहून जास्त त्यांच्या बापाचा किती हिरमोड होईल रेलफॅन असल्यामुळे ते सांगणाऱ्याला माहिती नव्हते राव

In reply to by जेम्स वांड

खरं आहे. ते म्हणतात ना कोणाला कशाची चव काय ? असला हा प्रकार झाला. छोट्या ट्रेनचा प्रवास म्हणजे अक्षरशा झुक झुक गाडी असते. वाटेत आपल्याला वाटलं तर खाली उतरायचं, काही पावलं तिच्याबरोबर चालायचं अन परत आत जायचं... अशी गंमत जंमत मुलांना नक्कीच आवडेल.

In reply to by जेम्स वांड

आणि unreserved train झाल्याने रेल्वेचे NTES ,IRCTC apps नी टाइमटेबल दाखवणे बंद केले. Taxiवाल्यांनी राडा करून बंद पाडले.

श्री. एन के सिन्हा हे मुंबईच्या रे रोड रेल्वे स्थानकाचे प्रमुख आहेत स्थानकाच्या स्वच्छता आणि अतिरिक्त सौंदर्यवर्धन यासाठी ते स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करतात त्यांची मुलाखत इथे वाचता येईल .

मोदी सरकारने वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर मालवाहतूक गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे मालवाहतूक गाड्यांना भारताच्या लॉजिस्टिक प्रवासात त्यांचा बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यासाठी अधिक मार्ग मिळण्यास मदत होईल हाय-स्पीड वंदे भारत पॅसेंजर ट्रेन्सच्या फास्ट ट्रॅकिंगनंतर, भारतीय रेल्वे हाय-स्पीड मालवाहू गाड्या सुरू करण्यासाठी त्याच प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची योजना बनवते आहे. ही योजना प्रामुख्याने ई-कॉमर्स कंपन्यांचे पार्सल वाहून नेण्यासाठी असणार आहे. या गाड्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत आणि यांचे लक्ष्य Amazon आणि Flipkart सारख्या कंपन्यांचे पार्सल वाहून नेण्याचे असेल. ही रेल्वे रस्ते वाहतुकीपेक्षा पेक्षा सुमारे अडीच पट वेगवान असेल. आणि काही सेक्टरमध्ये एअर कार्गो वाहकांशी देखील स्पर्धा अरेल असे दिसते आहे. सध्या भारतात धावणाऱ्या मालवाहू गाड्यांचा वेग सरासरी ७५ किमी प्रतितास आहे. तथापि, सादर करण्यात येणार्‍या नवीन गाड्या ताशी १६०किमी वेगाने धावतील. या गाड्यांचे प्रोटोटाइप यावर्षी डिसेंबरपर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर, सरकार त्यांना टप्प्याटप्प्याने दर महिन्याला एक अशा 'फ्रेट मेट्रो' द्वारे तैनात करेल. रेल्वेला देशातील मालवाहतूकीमध्ये एकूण बाजारपेठेच्या किमान ४० टक्के वाटा हवा आहे. त्यासाठी हा एक प्रयत्न आहे.

In reply to by निनाद

हा सगळा मालवाहतुकीबद्दलचा प्रोजेक्ट मीडिया मधे अंडररेटेड आहे. फारशी प्रसिद्धी नाही (अ-राजकीय व सरकारसमर्थक मिडियात सुद्धा). मी इथेच वरती "डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर" बद्दल लिहीले आहे. यू ट्युबवरही एक दोन जबरदस्त क्लिप्स आहेत. मालवाहतुकीत वेग व माल कोठे कधी पोहोचेल याबद्दल स्पष्टता दोन्ही यामुळे येइल. कमर्शियल शिपिंग मधे ते प्रचंड महत्त्वाचे असते व सध्याची मालवाहतूक ते देउ शकत नाही. या सुधारणांमुळे रेल्वेने केली जाणारी मालवाहतूक प्रचंड वाढेल, व यावर विसंबून राहू शकणार्‍या कंपन्यांची गुंतवणूकही भारतात होईल.

In reply to by फारएन्ड

हा सगळा मालवाहतुकीबद्दलचा प्रोजेक्ट मीडिया मधे अंडररेटेड आहे. फारशी प्रसिद्धी नाही असे का हे मला ही कळले नाही. कारण हा महत्त्वाचा प्रकल्प आहे.

In reply to by निनाद

लोकांना जे आवडतं तेच मीडिया दाखवते का मीडिया जे दाखवते तेच लोकांना बघावं लागतंय हे समजत नाही. परंतु भारतीय मीडिया बद्दल बहुतेक लोकांचं मत हे नकारात्मकच आहे. दुसरा पर्याय नाही म्हणूण मीडिया जे दाखवते तेच गोड म्हणुन बघावं लागतंय. सध्यातरी असल्या बातम्या मिडियावर जास्त येत नाहीत आणि आल्या तरी त्यात बातमी कमी आणि मसाला जास्त असतो.

नांगल ते भाकरा धावणाऱ्या ट्रेनच्या प्रवासाला कुठलेही तिकीट नाही. चक्क फुकट प्रवास !! ही गाडी चालवण्याचा हेतू भाकरा नांगल धरणाविषयी सर्वांना माहिती व्हावी हा आहे. 73 वर्षे हा मोफत उपक्रम चालू आहे ok

आपल्या प्रवासाची रेल्वे विजेवर चालली आहे की डिझेल व त्यानुसार आता प्रवासी भाड्यात भेदभाव केला जाणार आहे ! लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या निम्म्याहून अधिक अंतरासाठी डिझेल वापरतात त्यांच्यावर आता अतिरिक्त कर लावला जाणार आहे - पन्नास रुपये वातानुकुलित वर्ग; पंचवीस रुपये स्लीपर.

In reply to by हेमंतकुमार

या निर्णयाला कोणताही तर्कपूर्ण आधार नाही. कुणातरी रेम्याडोक्याच्या डोक्यात आलेली आचरट कल्पना आहे. तुमच्या गावाला डिझेलवर चालणारी गाडी येते कि विजेवर याचा ग्राहकाशी काय संबंध? विद्युतीकरण हे रेल्वेने इतकी वर्षे केले नाही याचा भुर्दंड तेथल्या ग्राहकांना लावणे हे तर्कशून्य आहे. विद्युतीकरणा साठी अधिभार लावायचा तो सरसकट लावावा. मुम्बैत विद्युतिकरण१९२५ पासून आहे तर मराठवाड्यात अजूनही गाड्या डिझेलवर चालतात यात मुंबईच्या माणसांचे काय कर्तृत्व आहे आणि मराठवाड्यातील माणसांचे काय चूक आहे?

In reply to by सुबोध खरे

पूर्णपणे सहमत आहे ! त्या बातमीनुसार दोन मुद्दे आहेत १. तेलाच्या वाढलेल्या जागतिक किमती २. नवा जो अधिभार लावत आहेत त्यातील काही वाटा विद्युतीकरण योजनेसाठी वापरणार आहेत म्हणे.

In reply to by हेमंतकुमार

फक्त यातील दिलासादायक गोष्ट अशी दिसते आहे की हे लांब पल्ल्याच्या गाड्यांनाच लागू आहे. म्हणजेच, अविकसित भागातील जो माणूस लघुपल्ल्याचा प्रवास डिझेलवर करेल त्याला तो अधिभार असणार नाही. हे योग्य आहे.

भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिले वातानुकूलन 1934 मध्ये फ्रंटियर मेलला देण्यात आले. तेव्हाची तांत्रिक पद्धत मजेदार होती. डब्यांच्या खाली मोठाल्या बर्फांच्या विटा सरकवरण्यात येत : ok

चालत्या रेल्वेत सकाळी ०६०० ते रात्री २२०० ह्यावेळेच्या व्यतिरिक्त तिकीट तपासनीस तुमचे तिकीट तपासणे किंवा तुमचे आयडी प्रूफ मागणे इत्यादी (तुम्हाला झोपेतून उठवून) करू शकत नाहीत. मिडल बर्थ वरून होणाऱ्या खडाजंगीत पण निर्णय हा आहे की रात्री २२०० ते सकाळी ०६०० वाजेपर्यंत मिडल बर्थ आरक्षित प्रवाशाला झोपण्यास मनाई केली जाऊ शकत नाही, पण सकाळी ठराविक वेळेनंतर त्या प्रवाशाने मिडल बर्थ बंद करून खालील (लोवर) बर्थ असणाऱ्या मंडळीला बसण्यास सुविधा होईल असे करणे अपेक्षित आहे.

In reply to by हेमंतकुमार

Ask Disha आहे। पण करून पाहिले नाही. तो कर्मचारी असेल एखाद्या फलाटावर/पुलावर . पण काही स्टेशनात पाच सहावर लांबलचक फलाट असतात. कोच पोझिशन चार्ट तयार झाल्यावर या साईटसवर दिसतो म्हणतात. करून पाहा. 1) https://www.irctchelp.in/train-coach-position/ 2) https://www.trainspnrstatus.com/train-coach-position