"अहो कितीची गाडी आहे रात्री? नऊची ना? मग इथेच या की सगळे! उगाच घरी कशाला स्वयंपाक करत बसता? सामानसुमान बांधून तयार ठेवा, इथेच जेवा आणि निघा."
"छे! अहो त्यात कसला आलाय त्रास? आणि ५-६ मंडळींच्या आमटीभाताला असा कितीसा वेळ लागणार आहे? केव्हाच होईल! या या, नक्की या हां!"
मोघेकाकू चा़ळीतल्या कुणाला तरी आग्रह करत असतात. त्यांचा आग्रह इतका मनापासून असतो की सहसा तो कुणाला मोडवत नाही. ठरल्याप्रमाणे ती कोण ती ५-६ मंडळी रात्री मोघेकाकूंकडेच जेवायला येतात. साधा आमटीभात, मटकीची उसळ, गरमागरम पोळ्या.