आजोबा आज्जी .. मावश्या तीन !!
हरवलेलं सुख शोधता शोधता मी एकदा अवचित एका जुन्या लाकडी दारावर येउन थांबलो. त्या दाराची भिंत स्वच्छ चुन्याने रंगवलेली होती, दाराच्या उजवीकडे डावीकडे गेरुच्या रंगाने भालदार चोपदार काढलेले होते, दारावर एक छोटासा कोनाडा होता, आणी त्यात एक सुंदर, टप्पोर्या डोळ्यांची बाल गणेशाची मुर्ती होती. आजोबा पहाटे पहाटे देवपुजा झाली की या गणपती पुढेही जास्वंदाचे फुल ठेवत. दाराकडे चेहरा केला तर उजव्या बाजुला एक दगडी सोपा बांधलेला होता. दारामधे आणी सोप्यामधे एक खिडकी होती, सोप्यावरुन त्या खिडकीत सहज चढता येई. खिडकीत चढुन गणपतीसमोर ठेवलेला प्रसाद उचलतांना कित्येक वेळा घसरुन पडायचो मी.
मिसळपाव