चल एक गुन्हा, दोघे मिळून करूया
आणि मग परत, आपापलं जगूया
पाऊस पडला नाही तरी
आपण मात्र भिजूया
पावसात कोरडे राहण्यापेक्षा
नभालाच फितवूया
.....चल एक गुन्हा, दोघे मिळून करूया
परीघ आहे तुलाही
परीघ आहे मलाही
परीघातच राहून आपापल्या
त्रिज्या थोड्या वाढवूया
.....चल एक गुन्हा दोघे मिळून करूया
किंवा शहारलेल्या चांदण्यात कधी
नुसते बोलत राहूया
खूप वेळ......रात्रभर....
नुसते बोलतंच राहूया
.....चल एक 'सभ्य' गुन्हा, दोघे मिळून करूया
आणि नाहीच जमलं काही
तर नजरेनेच सांगूया
अनाहूत या 'वाटण्याचा'
सोहळा साजरा करूया
.....चल एक गुन्हा, आवर्जून करूया
आणि मग परत आपापलं जगूया