जागतिक महिला दिन विशेष कविता: 'अक्षरांचे पंख'

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in जे न देखे रवी...
7 Mar 2026 - 9:12 pm

अक्षरांचे पंख

होऊनी परकी मला मी प्रश्न आज विचारते
बेहिशेबी जीवनाचा ताळमेळच मांडते

का कला साहित्य सारे ठेविले वेशीवरी
अन् कुणाची पत्नी होऊन माप हे ओलांडते

त्या नळाचे गीत सोबत ताल साधे भाकरी
तान्हुल्याचा गोड चेहरा चंद्र म्हणूनी पाहते

चांदण्यांचे शब्दमोती विखुरले दारी सडा
कल्पना सारूनीही घर लख्ख माझे झाडते

सोडुनी मज अन्य सर्वांना इथे प्राधान्य पण
मीच मजला उचलूनी मग अग्रस्थानी ठेवते!

अक्षरांचे पंख मजला हार का मग मानू मी?
घेउनी स्वप्ने आभाळी मुक्त मी झेपावते...!!

— श्वेता माईणकर सूर्यवंशी © 2026

आयुष्यकविता माझीप्रेरणात्मकमराठी गझलमाझी कविताकविता

प्रतिक्रिया

बाजीगर's picture

8 Mar 2026 - 9:50 am | बाजीगर

आपली ही अतिसुंदर कविता वाचून इंदिरा संत यांची आठवण झाली.

यात तुम्ही सर्व च समावेशले आहे, की कशी एक स्त्री आपले प्रतिभेचे पंख मिटून घरट्यात समर्पित झाली आहे, आपली उडान अर्पण करून.

अभिनंदन.

श्वेता२४'s picture

8 Mar 2026 - 3:35 pm | श्वेता२४

आपला प्रतिसाद प्रोत्साहन देणारा आहे...मनःपूर्वक धन्यवाद--/\--

परिस्थितीला भेदून आशावादी आणि आनंदी होण्याची कल्पना आवडली.
जगात विविध देशांत स्त्रियांना जे स्वातंत्र्य आहे त्यात भारत अगदी वरती आहे. फक्त त्यांनी पाऊल पुढे टाकायचे आहे.

श्वेता२४'s picture

8 Mar 2026 - 3:36 pm | श्वेता२४

आपल्या प्रतिसादाबद्दल व कविता प्रकाशित करण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मनापासून धन्यवाद __/\__

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Mar 2026 - 12:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान आवडली रचना. लिहिते राहावे.

महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

श्वेता२४'s picture

9 Mar 2026 - 12:39 pm | श्वेता२४

आपल्याला रचना आवडली हे वाचून आनंद झाला. आपल्या मार्गदर्शन व प्रोत्साहनासाठी आभारी आहे.

प्रचेतस's picture

9 Mar 2026 - 1:05 pm | प्रचेतस

कविता आवडली. शीर्षक अजूनच आवडले.

श्वेता२४'s picture

9 Mar 2026 - 6:39 pm | श्वेता२४

प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद! __/\__