विकल्प
आयुष्याच्या वाटेने चालताना जगण्यात विसावणाऱ्या क्षणांचे प्रयोजन आपल्यासाठी नेमके काय असते, याचा आपण ठरवून सखोल वगैरे विचार कधी केलेला असतो का? मुळात ते असते की, फक्त समाधानासाठी तसं म्हणायचं असतं? तसेही समाधान शब्दाचे निश्चित असे परिमाण सांगता येईल, असे वाटत नाही. समजा या प्रयोजनांचं उत्तर कृतकृत्य होणे वगैरे असे काही असेल, तर सगळ्यांच्या वाट्यास ते सारखेच असते, की प्रेत्येकासाठी भिन्न? बरं, या क्षणांचं मोल मोजून घेण्याचं शहाणपण सगळ्यांना सारखं अवगत असतं का, की ज्याच्या-त्याच्या वकुबाने त्याचे स्तर ठरतात? निश्चित विधान करणे जरा अवघड आहे.