प्रिय निखील,
कसा आहेस रे ?
खुप दिवस झाले, तुला लिहीन , लिहीन म्हणतोय पण सालं लक्षातच राहत नाही ! आताशा फार विसरायला होतं मला. माफ कर मित्रा.
तुला आठवतं आपली पहिली भेट झाली होती ती शाळेतल्या "स्मरणशक्ती" च्या परिक्षेच्या वेळी?
नेहेमी सहजपणे जिंकणारा तु, यावेळी मात्र बाजी मी मारली होती. पण तु ते स्पोर्टिंगली घेतलंस आणि आपली ओळख झाली. पुढे या ओळखीचं हळु हळु मैत्रीत रुपांतर होत गेलं.
ते दिवस कसे सुरेख होते ना ? शाळेत कुठलीही स्पर्धा असली कि आपल्या दोघांत चुरस सुरु व्हायची. मग तु जिंकतो का मी याचे अंदाज इतरांकडुन ऐकायला खुप मजा यायची.