फार फार मागे, कोणे एके काळी घडलेली; पंचतंत्रात असते तशीच, त्याच काळातली ही एक गोष्ट.
जंगलातले ससे चपळ झाले की सिंह सुस्तावले सांगता येणार नाही. पण येनकेन प्रकारे सिंहांना सशांची शिकार करता येणे अवघड होउ लागले; दुरापास्त होउ लागले.
नव्या सावजांना कसे शोधता येइल ह्याबद्दल विचार करत हळूहळू खंगत जाणारे ते सिंह चिंतित बसले होते.ते फारच अश्क्त दिसू लागले होते. इतक्यात आलेल्या मानभावी सेवकाने, कोल्ह्याने त्यांचे लक्ष विचलित केले. "तू का आलास रे बाबा आता" असं एक वयोवृद्ध सिंह आयाळाला बाजूला सारत गुरगुरत बोलता झाला.
"चिंता कसली दिसतेय सर्व वनश्रेष्ठींच्या मनी, ते जाणून घ्यावे म्हणून यावेसे वाटले." कोल्हा वदला.
सिंहांनी चिंतेचे कारण सांगितले.कोल्हा खुदकन हसला. सिंहांनी कारण विचारताच ते शिताफीने टाळून शिकार मिळवून द्यायचे वचन त्याने दिले; अर्थातच शिकारीतला आपला माफक हिस्सा कबूल करुनच तो निघाला.
.
तिकडे ससे बर्यापैकी खूश होते. हल्ली शिकार्यांचे; विशेषत: सिंहांचे हल्ले सपशेल अपयशी होउ लागले होते. पण दरदिवशी नव्याने हल्ला करायचे सिंह काही सोडित नव्हते. रोज रोज ह्यांच्यापासून पळण्यापेक्षा एकदाच काय ते कायमचे नीट करताच येणार नाही का असं आता सशांमधल्या काहिंना वाटू लागलं.
इतक्यात कोल्ह्याची चाहूल लागली म्हणून सगळे सावध झाले. आपापल्या बिळात खोलवर शिरुन बसले. पण कोल्ह्यानं त्यांना विश्वासात घेतलं. आपलं आधीच पोट भरलय हे पटवून दिलं नि हिताच्या चार गोष्टी बोलायला बाहेर बोलावलं.
"अरे मला कसले घाबरताय? मी तर असा एकटाच, तोही थकत चाललेला." उसासा टाकत कोल्हा बोलला.
"बाबा रे , तू असशील एकटा आणि म्हाताराही . पण म्हणून आम्हाला खायचं सोडशील का?" एक जरासा वृद्ध म्हणाला.
"अरे मीच काय कुणीही तुम्हाला एकट्या दुकटा गाठून खाउन टाकतं. आम्ही दिसलो की तुम्ही सैरावैरा पळता. जरा पहा, मी हा असा एकटा. तुम्ही हे एवढे शंभराच्या घरात. आलात अंगावर धाउन एकाच वेळी, तर काय बिशाद आहे आमची कुणाला काही करायची. "
ज्येष्ठ ससा गालातल्या गालात हसला. पुढल्याच क्षणी सचिंतही झाला. एक तरुण ससा मात्र सळसळत्या उत्साहाने विचार करु लागला. प्रतिकार करण्याच्या कल्पनेनं भारावून गेला. "हो नक्कीच. आम्ही इतके सारे आहोत. आम्ही का घाबरावं." तो तरुण ससा जोरकस बोलता झाला. हळूह़ळू इतरांनाही आपल्या बाजूला प्रवृत्त करु लागला. पोक्त सशाचं अनुभवाचं शहाणपण मात्र कुणीच ऐकून घ्यायच्या तयारीत नव्हतं. एकापाठोपाठ एक ससे त्या विचाराने प्रभावित होउ लागले. नव्या विचारांची जणू साथ पसरु लागली. झालं; सिंहांना अद्दल घडवायचं भरपूर संख्येनं असलेल्या सशांच्या मनी बसलं. कोल्ह्याच्या सूचनेनुसार सगळ्या धाडशी सशांनी त्या मूठभर सिंहांवर ऐन रात्रीच हल्ला करायचं ठरवलं.
ते रात्री निघाले. निबिड अरण्यात, दाट झाडीतून, चिखल वाटेतून आणि घट्टगडद पसरलेल्या नि वाळलेल्या पालापाचोळ्यावरून ते मोठ्या आवेशाने निघाले. ह्या सशांपासून दूर कुठेतरी दोन डोळे मिश्किल चमकले. डोळे मिटून नि मनात गुदगुल्या करुन घेत स्वस्थ अंधारात रमले.
बराच वेळ झाला होता. ससे बरेच अंतर चालून आले होते.सिंह नजरेच्या टप्प्यात आले. सशांनी ठरल्याप्रमाणे अगदि जवळ जाईपर्यंत काहीही गोंगाट केला नाही. सिंह आता त्यांच्या अगदि समोर होते. ससे सर्व शक्तीनिशी आता त्या सर्वांना यथाशक्ती गुद्दे घालणार होते. एकेकट्याचे गुद्दे काहीच नसले तरी सर्वांचा एकत्रित परिणाम फार मोठा होणार ह्याची त्यांना खात्री होती!
त्या सर्वांनी सिंहाला घेरले. आणि हाय रे दैवा !!
त्याच वेळी झोपेचे सोंग घेत असलेला तो सिंह जागा झाला. प्रचंड मोठ्यानं फोडलेली त्याची डरकाळी, त्यावेळचा त्याचा आवेश नि अजस्त्र्/हिंस्त्र रूप पाहून्च काही ससे गलितगात्र झाले.काही घाबरुन तिथेच धापकन पडले, ते पुन्हा न उठण्यासाठीच. एकानं कशी बशी हिम्मत करुन सिंहाच्या पंजापर्यंत जायचा प्रयत्न केला नि सिंहाला भलताच आनंद झाला. आयती शिकार मिळते म्हटल्यावर तो कशाला सोडातोय. पंजाशी खेळणार्या त्या चिमुरड्या सशाला तत्क्षणी कचकन चिरडत त्यानं त्याच्या नरडित नखं खुपसली. दुसर्या पंजानं अजून एकास धरले. बजूलाच पडलेल्या अजून एका सशाला त्याने नुसत्या तोंडातील तीक्ष्ण दातांनी उचलून चावायला, गिळायला सुरुवात केली.
दोन पंजाखाली दोन नि तोंडात एक अशी मस्त मेजवानी त्या उपाशी वनराजास मिळाली. त्याचे रौद्र रूप पाहून आता मात्र उरलेलेही ससे गांगरले. गोंधळले.सैरावैरा धावू लागले. वाट फुटेल तिकडे जीवाच्या आकांताने भयचकित जीव पळाले.अगदि स्वतःच्या कित्येक जातीबांधवांना ढकलत्,बाजूला सारत, कशाचेही भान न ठेवता ते निघाले. कुणी धावता धावता ठेचकाळले. कुणी धक्का लागून ओढ्यात पडले. कुणाच्या नशीबी कपाळमोक्ष आला. आपल्या रक्ताने जमीन लालच लाल करत त्यांचा प्रवास सुरु होता, वाचण्यासाठी! मारण्यासाठी नव्हे!
.
धावता धावता एक ससा दुसर्याला म्हणाला..."काय चुकलं? असं कसं झालं? आपण तर इतके सारे होतो ना."
दुसरा म्हणाला "पण म्हणून काय झालं> ? आपण ससे आहोत ना."
पाहिला उत्तरला:- "पण सिंहामध्ये आणि सशांमध्ये असं काय वेगळय? हिंमत त्यांच्याइतकी आपणही आणलीच होती की. "
दुसरा बोलला :- "आपण आणलं ते नुसतं सिंहाचं काळीज. माणसं ह्याला उसनं अवसान म्हणतात, तसं काहीसं.
सिंहाचं काळीज सिंहालाच शोभतं. आपलं सध्या तितकं सामर्थ्य तरी आहे का? "
पहिल्याला आत्ता कुठे जाणवलं. जे होतय त्यातली गोम उमगल्यासारखं त्याला वाटलं. पण तरीही त्याला प्रश्न पडलाच.
"म्हणजे मग आपण कायम असच घाबरायचं? पळायचं? धूम ठोकायची? सिंहांना कधीच धडा शिकवू शकणार नाही आपण?"
.
धावणारा दुसरा ससा किंचित गूढ स्मित करत बोलला "धडा शिकवूयात की. अगदि जरूर शिकवूयात. पण आपण असं त्यांच्यासारखं लढणं हे त्यांच्याच पथ्यावर पडणारं आहे.अरे आपली खासियत पळणं. आपण अधिक चपळ व्हावं. अधिक जोरात पळावं. अगदि एकानंही सिंहाच्या हाती लागू नये. मग तो उपाशी राहणार नाही का? दरवेळी हल्ला केलाच पाहिजे का? आपण त्याच्यावर हल्ला करणं काय नि त्यानी आपल्यावर करणं काय, ते त्याच्याच हिताचं नाही का?"
.
पहिल्याला आता सारं सारं समजलं. पण आपल्या आप्तांच्या किंकाळ्या त्याला आता अस्वस्थ करत होत्या. इतक्या दूर आल्यावर त्याला ऐन रणात पडलेल्या आपल्या सुहृदांची आठवण झाली.हे जाणवून दुसरा बोलला "अरे ते पडलेत त्यातही तुझच हीत आहे. ते तिथे आहेत, म्हणून सिंह तिथे गुंतलाय. ते सुटले असते, तर ह्याक्षणी कदाचित सिंहाच्या जबड्यात तू लटकत राहिला असतास! नि ते अलगद माझ्यासोबत आले असते. तथा, अधिक शोक करु नकोस. धावणे हाच तुझा धर्म. तोच कसोशीने पाळ.धाव, अधिक जोरात धाव. उत्तम धावक हो . नि त्यातच अधिकाधिक उत्तमतेचा ध्यास घे. धावशील तर वाचशील. समोरासमोर दोन हात करु गेलास तर मरशील. सिंहाचे सामर्थ्य आल्याशिवाय फुकाचे सिंहाचे काळीज असल्याचा आव आणू नकोस"
--मनोबा
वाचन संख्या
3284
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडले.
झक्कास हो मनोबा.
??
कुठल्याही तात्कालिक
In reply to ?? by पैसा
लिखाण आवडल, पण रोख नाही आवडला
असं म्हणताय ? ब्वॉर !
अप्रतिम..!!!
छान. कोल्हे हे शेवटी कोल्हेच.
छान.
आभार आणि भर
सुरेख लेखन आवडले
उत्तम बोधकथा..
छान कथा आहे.