मराठी-इंग्रजी शब्दकोष असं सांगतो की ‘व्यायामशाळा’ याचा समानार्थी इंग्रजी शब्द आहे ‘जिम्नॅशियम’. मात्र बोली भाषेत ह्या दोन्हीमध्ये फारच तफावत आहे.
पूर्वी व्यायामशाळा असायच्या. व्यायामशाळा म्हणजे जिथे दंड, जोर, बैठका, मुद्गल, डंब-बेल्स आणि तत्सम उचलण्याची वजने हे मुख्य व्यायामप्रकार. थोडक्यात म्हणजे गुरुत्वाकर्षणाविरुद्ध सगळे व्यायाम. सिंगल बार, डबल बार, शिवाय जागा असली तर आखाडा आणि मलखांब. चपला बूट बाहेर काढायचे. व्यायाम अनवाणी करायचा.
लॉकर्स वगैरे नाहीत. काढलेले कपडे अडकवायला भिंतींवर खिळे. बहुतेक जण बनियनवर व्यायाम करायचे. काही उघडबंबही असायचे आणि त्यात कोणालाही काही गैर वाटत नसे.