चाळीशीत शिरलं की आपल्या आयुष्याचा डाव परत मांडावासा वाटतो (अर्थात, काही सोंगट्या न हलवता.) मग आपल्या आयुष्यातल्या राहून गेलेल्या गोष्टींचा आपण शोध घ्यायला लागतो. माझे पण असेच झाले. आणि शोध घेता घेता अचानक एके दिवशी मला माझा आवडणारा पण राहून गेलेला एक छंद अगदी कडकडून भेटला. क्रोशे.
शाळेत निर्माण झालेली माझी लोकरीचे विणकाम करण्याची आवड बरीच टिकून राहिली, पण क्रोशे मात्र कुठल्यातरी वळणावर माझे बोट सोडून निघून गेले. शाळेत असताना मी क्रोशे शिकले होते पण नंतर का कुणास ठाऊक, मी परत त्या वाटेला गेले नही. आता इतक्या वर्षानंतर मला क्रोशेकाम अजिबात आठवत नव्हते. खांब ...