आखाड सरल्याची खूण म्हणजे गटारी आमुशा. अर्थात आषाढ मासाची अंतिम तिथी. खेडोपाडी या आमावस्येला भलतेच महत्त्व असते. श्रावणात मांस-मच्छी-दारू सबकुछ वर्ज्य असल्याने जे काही खायचे प्यायचे ते या शेवटाच्या दिवसापर्यँतच अशी रूढी रुळलेली दिसते.
सगळ्यांसाठी दिवस ठरवून दिलेत. मातृदिन, पितृदिन, मैत्रीदिन एवढेच काय स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन अशा कितीतरी दिवसांची दिनदिन दिवाळी वर्षभर सुरु असते. मग आपलाही एखादा हक्काचा दिवस का नसावा? अशी शंका घेऊन समस्त देवदासांनी एकत्र येऊन ही गटारी आमुशाची योजना उचलून धरली असावी. आणि नित्यनेमाने ते ती पाळत आले असावेत.