खंड पहिला
भाग – २.
तिने सकाळी उठून अंगणात सडा सारवण केले. आंघोळ उरकून तुळशीला पाणी घातले. अजून सगळे घर शांत झोपेत होते. लवकरच म्हशीचे दूध काढायला गडी येईल. नंतर हरकाम्या नोकर, स्वयंपाकाची बाई, एकेक राबता सुरू होईल. बाईने सगळ्यांचा चहा, ताजे दूध शेगडीवर चढवले की मग ती जागे होणाऱ्या मुलाबाळांकडे लक्ष पुरवायला मोकळी. भरलेले सुखी घर होते ते. दोन भाऊ, या दोघी जावा, लहान मोठे मिळून नऊ बाळगोपाल शिवाय त्यांचे आजी आजोबा. ती मोठी जाऊ म्हणून घरातली मुख्य जबाबदारी तिच्यावरच होती. सगळ्यांना तिच्या प्रेमळ अधिकाराची इतकी सवय झाली होती, की तिच्याशिवाय घरातले पान हलत नव्हते. धाकटी जाऊ सगळी मदत करायची.