Skip to main content

प्रकटन

अधांतर

लेखक नीलमोहर यांनी गुरुवार, 14/07/2016 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
"तुझ्या दारी आलो आई, पायी दे ठाव तू, उध्दार करी भक्तांचा, हाकेला धाव तू, तुझ्याच नावे खेळ हा मांडिला, तुझ्याचपायी जन्म ह्यो सांडिला, आई तुझ्याचसाठी जागर घातला, किरपा करी आम्हावरी, तू जोगव्याला ये, जोगवा मागते गं अंबे, जोगव्याला ये..." गावच्या देवीच्या मंदिरासमोर जागराचा कार्यक्रम सुरू होता. मंदिरात ही गर्दी जमली होती, गावकऱ्यांबरोबरच आसपासच्या गावांतले लोकही देवीच्या जागराला आले होते. जोगतिण पारुबाई आणि तिच्या साथीदारांनी जोमात देवीची गाणी म्हटली, जोगवा मागितला. काही बाया तिथेच घुमू लागल्या. भंडारा, गुलाल उधळला जात होता. साऱ्या जोगतिणी त्यात रंगून निघाल्या होत्या, बेभान होऊन नाचत होत्या. त्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. लोकांचेही समाधान होत नव्हते, ते गाण्यांवर गाणी म्हणवून घेत होते. सगळं वातावरण चैतन्यमय झालं होतं. त्या जोगतिणींत फुलाही होती, सावळी, नीटस फुला. टपोरे मोठे डोळे असलेली, डोळ्यांत काजळाची रेघ, कपाळी चंद्रकोर, केसात बकुळीचा गजरा अन हनुवटीवर चांदणं गोंदलेली. साधीशी सुंदर फुला. बेभान नाचून साऱ्याजणी घामाघूम झाल्या होत्या, मात्र त्यांची पावले ठेका सोडत नव्हती. उशिरा केव्हातरी जागर संपला. त्या रात्री त्यांना गावकऱ्यांकडून भरघोस जोगवा मिळाला. त्या जागरात, इतक्या लोकांतही आपल्यावर खिळलेली एक नजर फुलाला सतत जाणवत होती, ती नजर पूर्णवेळ तिचा पिच्छा करत होती. ते आठवून ती स्वत:शीच हसली, मग परत सगळ्या बायकांच्या घोळक्यात मिसळून गेली. पारुबाई जोगतिणींची प्रमुख होती, तिचा सगळीकडे दरारा होता, पोरी-सोरी, सगळ्यांवर तिची करडी नजर असायची, त्यामुळे त्यांच्या वाटेला सहसा कुणी जायचे नाही अन बायकाही तिच्या शब्दाबाहेर नसायच्या. जागर व्यव्स्थित पार पडल्याने आणि भरघोस जोगवा मिळाल्याने तीही खुशीत होती. तिने सगळ्या बायकांना हाका मारत परत निघायला लावलं. रात्र बरीच सरत आली होती. .................................................................................................................................................................. सकाळी फुला आरशात बघत कुंकू लावत होती, आपली छबी न्याहाळत तिने पारुबायला हाक मारली, 'मावशे..' 'काय गं? ' चाचरत फुला म्हटली,'किती दिस आपन ह्ये आसं गावोगाव जोगवा मागत फिरायचं गं?' पारुबाय तिच्याकडे निरखून पाहात बोलली,'का गं बये, अचानक ह्ये आसं इचाराय लागलीस?' 'न्हाई गं, म्हंजी.. आपन बी इतर बायांसारखं एका ठिकानी, घर करून का न्हाई ऱ्हायचं? ही काय जिनगी हाय व्हय? आज हितं, उंद्या आनी कुटं, निस्तं भटकत ऱ्हायचं, नाचगानी करायची, लोकांनी दिल्या जोगव्यावं समाधान मानायचं, त्येच्यावं जगायचं. आपन देवीची गानी म्हनतो. देवी म्होरं नाचतो, पर लोकांची आपल्याकडं बगायची नजर कशी वंगाळ असतीय, जनु आपन पापच करतो काई, का गं ह्ये असं जगनं आपलं, आन कवा पातुर? ' पारुबाई जागची उठली, फुलासमोर आली, 'बाय माजे, इतके दिस ह्येच तं करत आलोया आपुन, आजपातुर असे इचार न्हवते आले डोस्क्यात तुज्या, आजच काय गं झालं? ऐक, आपन देवाच्या जोगतिनी, देवाला वाह्यलेल्या. आपला जनमबी आपला न्हाय बग, त्या द्येवाच्या नावं दान करून टाकलेला त्यो. आपलं जगनं त्येच्यावं ववाळून टाकलेलं आन मरन बी त्याच्या पाई लिव्हलेलं, ध्येनात ठीव. ' मावशे, पर ते गुर्जी सांगत्यात, तुमी ह्ये समदं सोडून द्या, साळा सिका, काम करा, कामाच्या पैशावं जगा. ह्ये आसं मागून मागून कंवर खाणार, आयुक्श असंच काडनार का म्हंत्यात, बराबर हाय की त्येंचंबी. 'फुला.. लय बोललीस, ह्यापुरं आसलं कायबी वंगाळ मनात आनाईचं न्हाई. त्या मास्तरड्याला काय अक्कल हाय व्हय? लागला दुसऱ्याला शिकवायला. आपन जोगतिनी आन जोगवा मागनं आपला धरम, कोन काय म्हंतय म्हून आपला धरम सोडायचा व्हय गं? इतका कसला माज आलाय तुला? आन ही अक्कल कुटून आली तेबी कळतंया बग मला, तुज्याकडं माजं लक्ष न्हाय असं समजू नको. त्या आरन्या बरबर गुलूगुलू बोलताना, फिरताना कितीकदा पाह्यलया तुला, त्येच्या नादी लागू नगंस सांगून ठीवते, दोन घडी वापरंल आन दील सोडून तुला, काय करशीला मंग ? 'मावशे, तसे न्हाईत गं त्ये, लई चांगले हाईत, अर्ध्यातून सोडनार न्हाईत त्ये मला, लगीन करतील माज्यासंगट, इस्वास हाये बग मला. पारुबायने सुस्कारा सोडला, पोर पारच भुललीय तिच्या ध्यानात आलं,' बयो, ही पुरशाची जात लय खोटी, ग्वाड बोलून भुलवतील आन मन भरलं की तू कोन म्हून हाकलून लावतील. तो लगीन लावनार तुज्येशी, पक्कं का? इच्चार पाहू त्येला. आन सगळ्यांम्होरं सांग म्हनाव, मंग इस्वास ठुवीन म्या. आगं बड्या धेंडाचं पोरगं त्ये, पैसंवालं. त्ये तशीच मालदार अन खानदानी पोट्टी बगील की लग्नासाटी, जोगतिनीशी लगीन लावाया खुळा हाय का त्यो.' 'मावशे, बास कर की, थांब तो यीलच बग, माजा हात मागाया, तवा मागं फिरू नकोस मंग.' 'व्हय व्हय यीऊ दे अगुदर त्येला, आन चल आता आवर जरा हात उचल. लई काम पडलंय.' पारुबाय बाहेर गेली, फुलाच्या कानात तिचं बोलणं घुमत राहिलं, तिने ते सारं ऐकून घेतलं होतं खरं पण तिचं मन काही मानत नव्हतं. तिला दिसत होता अरण्या, तिचा अरुण. ती रस्त्याने जात असतांना ती दिसेनाशी होईपर्यंत एकटक तिला डोळे भरून पाहणारा, ती नाचत, गात असतांना फक्त तिच्यावर नजर रोखून बघणारा अरुण. गावकुसाबाहेरील गर्द झाडीत ते दोघं भेटायचे, सगळ्यांची नजर चुकवून, त्याचं प्रेम होतं तिच्यावर, तिला ठाऊक होतं, तो म्हणायचा नेहमी तसं, 'फुला, या राजाची रानी हाईस बग तू, माजं पिरमाचं फूल हाईस..' मग ती हसत बसायची, तो चिडायचा, माज्या पिरमावर हासती म्हणून रुसायचा, मग ती त्याची समजूत काढायची.. आत्ताही ते सारं आठवून फुलाला खुदकन हसू आलं, लाजून दाताशी पदर दाबून धरत ती हसत आत पळाली. पारुबायने सांगितलेलं काहीही तिच्या डोक्यात शिरलं नव्हतं, तिच्या मनाला उमजलं होतं, समजलं होतं ते एकच, अरुण तिचा अन ती फक्त त्याचीच. .................................................................................................................................................................. रात्रीचा जागर जोरातच झाला, ढोल आणि संबळ वाजवणारे अखंड वाजवत होते, त्या तालावर अशा काही नाचल्या साऱ्याजणी, त्यांच्या त्या आवेगी उत्साहामुळे, अनावर ऊर्जेमुळे आज देवीला झोप येणे शक्यच नव्हते, तीही आपल्या भक्तांचा जागर डोळे भरून पाहात होती, समाधान पावली होती. सकाळी कोंबड्याच्या आरवण्याने फुलाला जाग आली, बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. आळसावलेली फुला हळूच उठून बसली. तिच्या डोळ्यांत रात्रीचं सुंदर स्वप्न तरळत होतं. स्वतःशी लाजून मग ती उठली आणि पटापट आवरायला लागली. साऱ्याजणी बाहेर घोळका करून निवांत बसून चहा पीत होत्या. चहा पीत पारुबाई म्हटली,'फुले आज वाईच बाजारात जाऊन ये, भाजीपाला सामान आनायचंय त्ये घिऊन ये. गोदाला संगट घिऊन जा आन, काय ?' 'व्हय मावशे, आनती, काय काय आनायचंय त्ये सांग फकस्त.' फुला तयार झाली, छानशी गुलाबी नक्षीदार साडी नेसून, केसांत गजरा, डोळ्यांत काजळ, कपाळी चंद्रकोर, आरशात हनुवटीवरील गोंदनीकडे पाहत खुश होऊन ती बाहेर पडली, एकटीच. पारुबायने सांगितलेलं सारं सामान घेऊन फुला बाजारातून निघाली, पण वाड्याचा रस्ता न धरता ती नेहमीच्या जागी गेली, ठरल्याप्रमाणे. अरुण होताच तिथे. तो तिच्याकडे पाहत खुश होऊन हसला,' झ्याक दिसतीयास, काय इशेश म्हनायचं आज?' ती लाजली,'तुमी भ्येटनार ह्येच इशेश.' 'बरं चल आता डोळे मीट.' ती जरा बावरली,' आता नको हां, उगा काहीतरी तुमचं..' 'आगं किती घाबरतीस, ह्ये बग तुज्यासाटी काय आनलंय ते, डोळं मीट आन हात पुडं कर. ' हे ऐकून फुला खुश झाली, तिने डोळे मिटून हात पुढे केले. क्षणात तिच्या हातांना कसलातरी मऊ, रेशमी स्पर्श जाणवला, ओळखीचा तरीही अनोळखी. तिने डोळे उघडले. तिच्या हातांत एक साडी होती. गर्द हिरवी साडी, अंगभर जरीचे सोनेरी बुट्टे, सोनेरी जरतारी किनार असलेली तलम गर्भरेशमी साडी. साडी बघून फुला हरखून गेली. तिचा अवघा जीव जणू त्या साडीत उतरून आला, तिने ती साडी अगदी जवळ, घट्ट धरली, तिचा नवा कोरा गंध मनात साठवून घेतला. 'काय गं, आवडली का?' फुलाने त्याच्याकडे बघत समाधानाने हसत मान डोलावली. तिचा आनंद पाहून तोही खुश झाला. 'मंग, आज रातीच्या जागराला हीच साडी नयेस, आन भ्येट नंतर हितंच, काय?' 'व्हय जी, पर.. म्हंजी समदी मला इच्चारतील न्हवं साडी कुटून आनलीस म्हून, त्येंना काय सांगू?' 'सांग की बिंदास म्या दिली म्हून, आपन काय घाबरत न्हाय कुनाला, आपलं सगळं खुल्लमखुल्ला आसतंय.' हे ऐकून फुला लाजली आणि सुखावलीही. ................................................................................................................................................................... आजही जागर चांगलाच रंगला होता. खूप साऱ्या जोगतिणी जमा झाल्या होत्या, त्या जोशात गात होत्या, घुमत होत्या, नाचत होत्या, देवीचा जोगवा मागत होत्या. ढोलांचा जोरदार आवाज घुमत होता, गावकरीही दंग झाले होते, भंडार्‍याच्या रंगात सगळे रंगून गेले होते. आजचा जागर काही वेगळाच होता, सारा गाव उत्साहाने न्हाऊन निघाला होता, एक वेगळीच ऊर्जा वातावरणात भरून राहिली होती. आज कुणीही झोपणार नव्हतं, देवीही नाही. त्या साऱ्या बायांमध्ये फुला उठून दिसत होती, जणू देवीचंच दुसरं रूप. गडद हिरवी साडी, कपाळी मोठं कुंकू, त्यावर हळदीचा मळवट भरलेला, केसांत फुलांची वेणी. तीही जोशात नाचली, गायली. जोगवा मागता मागता तिने देवीकडून स्वतःसाठीही काही मागून घेतलं होतं. तिचे डोळे जागेपणीही स्वप्न पाहू लागले होते, एका सुंदर भविष्याचं स्वप्न, तिच्या आणि अरुणच्या सुखी संसाराचं स्वप्न. जन्मभर ज्या वणव्यात ती होरपळली होती, त्या वणव्यातून सुटकेचं स्वप्न. दु:खाचं एक काळं सावट तिच्या अवघ्या आयुष्यावर पसरण्याची चिन्हे होती, ते सावट कायमचं दूर होण्याचं स्वप्न. समोर उभ्या अरुणकडे पाहत ती मनापासून हसत होती. .................................................................................................................................................................. जागर झाल्यावर बाया जोगवा गोळा करत होत्या, तेवढ्यात ती ठरल्याप्रमाणे मागच्या रानात जाऊन थांबली, मागोमाग अरुणही आला. तिच्याकडे पाहत त्याने तिला जवळ ओढून घेतले,'काय दिसतीयास गं, पिच्चरची हिरवीन जनू.' 'चला, काहीतरीच तुमचं.' 'हाई का आता, खरं बोललं तरीबी आसं, बरं ऱ्हायलं, तसंबी आपलेला बोलन्यात येळ नाही घालवायचा, काय म्हनती.' अरुण तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाला. फुला लाजली, मोहरली. त्याच्या मिठीत सामावून गेली. रात्र चढू लागली होती. आभाळात चंद्र नव्हता, पण त्याची कमी चांदण्या भरून काढत होत्या. निळ्या आसमंतात चांदण्यांची नक्षी चमकत होती, त्यांचा टिपूर प्रकाश सर्वत्र पसरला होता. मंद वार्‍याच्या हळूवार झुळूका येत होत्या, वेलींना, पानांना गोंजारून जात होत्या, मंतरलेलं वातावरण झालं होतं सारंच. वेळ कुठं, कसा चालला होता दोघांनाही कळत नव्हतं. हा क्षण कधीच सरू नये, इथेच थांबून रहावा कायमचा, असं फुलाला वाटत होतं. अचानक तिला काहीतरी आठवलं, 'ओ, मी काय म्हनती..' 'बोल की, आता फकस्त तू बोलायचं आन म्या ऐकायचं..' 'मस्करी बास की वो आता, तुमी पुडं काय ठरवलासा?' 'कशाचं गं ?' 'म्हंजी आपलंच की, तुमी...' 'तुमी काय?' '...' 'आता बोलतीस का.' 'तुमी.. म्हंजी आपन लगीन लावायचं ना? कंदी लावायचं?' 'बगू, आता काय त्येचं.' 'न्हाई, मला आत्ताच सांगा तुमी मावशीला भ्येटाय कवा यीताय त्ये. 'ह्ये काय घेतलंईस गं डोस्क्यात, चांगलं रंगात आलो होतो तर तुजं काय यगळंच चाललंय' 'अवं आसं काय करता, पारुमावशी मागं लागलीया माज्या, तुमास्नी आसं भ्येटू नको म्हून, तिला मी सांगितलंय तुमी लगीन लावनारात माज्याशी..' अरुण ताडकन उठून बसला, 'काय लावलंस गं लगीन लगीन? कोणाचं लगीन? तुजं नी माजं? तुज्याशी लगीन करायला काय खुळा झालो व्हय मी, मला काय चांगली पोरगी मिळनार न्हाई लग्नासाटी? आन न्हाई मिळाली तरी तुज्यासंगट लगीन न्हाई लावनार मी, समजलीस? ' गाव भटकनाऱ्या जोगतिनी तुमी, कुटं कुटं काय काय दिवं लावता तुमास्नीच ठाऊक, न आगा न पिच्छा, आसं गावोगाव श्यान खात फिरणाऱ्या बाईशी लगीन लावीन व्हय मी.' फुला थरथर कापायला लागली, ती जणू बधीर होऊन गेली होती, तिच्या कानावर शब्द पडत होते पण डोक्यात काहीच शिरत नव्हतं, आपण काय ऐकतोय तेच समजत नव्हतं, काहीच सुधरेनासं झालं होतं तिला.. तिच्याकडे कुत्सितपणे पाहत अरुण म्हटला,'एक साडी काय दिली तुला, तू लग्नाचा शालू निसायचं सपान पाहू लागलीस, आजपत्तूर अशा कितीकींना ढिगाने साड्या वाटल्यात, त्यातली तू बी एक. तुज्यासारख्यांसंगं चार घडी मजा मारली चिक्कार झालं. आगं, आदी आपन कोन तेचा तरी इचार करायचा, कोन कुटली जोगतीन आन राजाची रानी व्हायचं सपान बघतीस?' फुला आवेशात उठली,'लई बोललास, पर तुला बोलायला त्वांड हाय रं, कारन चुकी माजीच हाये, तुज्या गुलछबूपणाला पिरेम समजून भाळले म्या, खुळ्यागत पिरेम केलं तुज्यावर आन आंदळ्यागत इस्वास ठिवला.' 'आगं हट.. जोगतिनीवर काय पिरेम करायचं आसतंय व्हय? तरी तुजं नशीब समज, माज्यासंगट चार सुखाचे दिस पाह्याला मिळाले तुला, न्हाईतर कोन इचारनार व्हतं गं तुला ? उपकार केलं तुज्यावर, ध्येनात ठीव, उपकार.' तिच्याकडे पाहत, छद्मी हसत अरुण उठून तिथून निघूनही गेला. फुला बसून राहिली, तशीच, कितीतरी वेळ.. पहाट व्हायला लागली होती, पक्षी किलबिलाट करायला लागले होते. आता थोड्याच वेळात उजाडणार होतं. फुला बसून राहिली, तशीच. .................................................................................................................................................................. 'मावशे, आगं ये मावशे...' 'काय गं भवाने, का वरडतीस माज्या नावाने?' 'चल माज्यासंगट .' 'आगं पन कुटं, सांगशील की न्हाई ?' 'तू पयले चल.' त्या पटापट देवळाजवळ गेल्या. देवीच्या देवळात आरती चालली होती, अखंड घंटानाद सुरू होता, टाळ मृदंगाचा स्वर चोहीकडे निनादत होता. सर्वत्र धूप कापराचा सुगंध दरवळत होता. देवीच्या चेहऱ्यावर एक निराळंच तेज, एक अनोखं समाधान विलसत होतं. आज देवी शांत झाली होती. "प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा । क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा । अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा । नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा "॥ .................................................................................................................................................................. पारुबाई एक एक पाऊल टाकत हळूच पुढे आली. मंदिरामागील डोहासमोर ती उभी होती. सकाळच्या कोवळ्या उन्हाने डोहातलं पाणी चमकून उठत होतं. डोहात हिरव्या रंगाचं काहीतरी पडलेलं होतं, त्याच्यावर उन्हं पडल्याने ते अजूनच झळाळून उठलं होतं, हिरवं कापड.. साडी.. हिरवी साडी.. गर्भरेशमी हिरवी साडी, मध्ये सोनेरी बुट्टे, सोनेरी जरतारी किनार असलेली.. फुला नेसलेली गडद हिरवी साडी, हिरव्या साडीतली फुला... तो खोल काळाशार डोह... त्याला काहीही अर्पण केलं की ते आत कुठेतरी गुडूप व्हायचं, आज मात्र त्यानेही फुलाला आपल्यात सामावून घेण्यास नकार दिला होता, अखेरीसही फुलाच्या नशिबी तरंगत राहणेच होते. जसं जगणं.. तसंच मरणही होतं तिचं, अधांतरी..

शी क्षण

लेखक vcdatrange यांनी बुधवार, 13/07/2016 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा भंडारदरा परिसरात भटकंती होती. पाऊस पडतोय छान... ओलावा जसा मुरायला लागला, तसा एका शाळेत शिरलो.. जि. प. शाळा, सहा वर्गखोल्यांसाठी पाच इमारत. त्यातल्या दोन वापरण्यास अयोग्य अशा अवस्थेतल्या. शाळेला शिक्षक चार, एका शिक्षिकेची गाडी चुकल्यामुळे त्या थोड्याश्या उशिरा येणार होत्या.(खिक) मुख्याध्यापक मिटिंगसाठी केंद्र शाळेत गेलेले उर्वरित दोघे मग सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवुन सामाजिक सलोखा अनुभवत होते.. शाळेला वेगवेगळ्या चार पद्धतीची स्वच्छता गृह आहेत. एकदम लेटेस्ट असलेले तयार (Prefabricated) बहुतेक अजुन निर्माण अवस्थेत असावे कारण सांगाडा उभा ठेवलाय पण पाइप जोडणी झालेली नाही.

ऐका भारतीय ग्राहकांनो तुमची कहाणी..

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 11/07/2016 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
एक आटपाट (नेहमी नगर असते, इथे मात्र..) देश होता. कोणे एकेकाळी सोन्याचा धूर निघणा-या या देशाला काही वर्षापूर्वीपर्यंत मात्र तिस-या जगातील (थोडक्यात, मागासलेला) देश असे म्हटले जायचे. Consumer जागतिकीकरणाच्या रेटयामुळे या देशातही अनेक बदल घडले, रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या. उत्तम शिक्षण मिळू लागले. तंत्रज्ञानाच्या अनेक वाटा खुल्या झाल्या.

कवितेपलिकडील कविता

लेखक आनन्दा यांनी रविवार, 10/07/2016 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता एका धाग्यावर हा उल्लेख वाचला
हा मोगाखान निदान जसा आहे तसा दाखवतो. त्याच्यापेक्षा मुंह में राम बगल में छुरी असले लोक जास्त डेंजरस. वरनं संभावितपणाचा आव आणतात आणि आपणच मिपाचे हितकर्ते म्हणून बोंबा मारतात. स्वतः डझनावारी आयडी काढणारे आणि त्याचे सार्वजनिक वाटप करून सहकारी तत्वावर वापरणारे लोक आहेत. ते सुद्धा डुप्लिकेट आयडींच्या नावाने शिमगा करतात. ही मोठी गंमत आहे.

ती कॉलर ट्युन

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 08/07/2016 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
योगायोग... दैनंदिन जीवनात घडणारी एक गोष्ट.. काही योगायोग चांगले तर काही वाईट. काही दीर्घकाळ लक्षात रहाणारे. पण एखादा विलक्षण योगायोग केवळ सुन्न करुन जातो आणि नेहमीसाठी लक्षात रहातो. हा योगायोगही तसाच.. ना चांगला ना वाईट. पण एका अतिशय दु:खद क्षणी घडला आणि विलक्षण सुन्न करुन गेला. जवळपास पाच वर्षापुर्वीची गोष्ट. माझं लग्न होवून जेमतेम दोन महिने उलटून गेले होते. लग्नानंतरच्या पहिल्या सणाकरिता पत्नीला नेण्यासाठी सासरे आले होते. शनिवारी सायंकाळी त्या दोघांना बस स्टॉपवर सोडून आलो. तासाभरातच पत्नीने रेल्वे स्टेशनला पोहोचून गाडीत बसल्याचे कळवले.

एक मृत्युपत्र: पल दो पल का शायर, काही गोष्टी आणि "जान्हवीची आई"!

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 08/07/2016 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार! हे एक प्रत्यक्षात लिहिलेलं पत्र आहे. एका काकाच्या मृत्युनंतर तीन महिन्यांनी त्याच्या आई- पत्नी (माझी आजी- मावशी) आणि मुलींना (माझ्या बहिणींना) लिहिलेलं. ह्यामधला आशय आपल्या सर्वांसोबत- आपल्या प्रत्येकासोबत शेअर करावासा वाटला म्हणून फक्त नावं बदलून हे पत्र आहे तसं इथे देतोय. थोडं मोठं आहे, पण शेअर करावं असं वाटलं. खूप खूप धन्यवाद. || ॐ || दि. २७ एप्रिल २०१६ ती. आजी, ती. मावशी आणि मिताली- प्राजक्ता! तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. अगदी सविस्तर आणि मनमोकळेपणाने बोलायचं आहे. तुम्हांला माहितीच आहे की मी किती अबोल आहे! त्यामुळे समोरासमोर बोलताना मला कंठ फुटत नाही.

मिपा बाप्पा मोरया

लेखक अभ्या.. यांनी गुरुवार, 07/07/2016 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. गणेशलेखमालेचे सूतोवाच झालेले आहे. बाप्पांच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत. गणेशोत्सवातल्या या उत्सवी वातावरणाला अजून एक सोनेरी झालर असते ती म्हणजे आपल्या मिपाचा वर्धापनदिन गणेशचतुर्थीचाच. प्रत्येक वर्धापन दिनासोबतच प्रगतीचे नवनवे टप्पे पार करणारे मिपा आगामी वर्षात खूप काही घेउन येणारे. गणेश हा जसा विद्यांचा स्वामी तसाच तो कलांचाही. नानाविध कला गणेशस्तुतीत अत्यंत कलात्मक रित्या प्रकट होतात. मिपाकरांच्या अंगात किती कला आहेत हे मी वेगळे सांगायला नकोच. त्या निरनिराळे लेख, काव्ये, भटकंत्या, पाककृती आणि जोरदार काथ्याकूटातून रोजच प्रकट होत असतात.

सॉफिस्टीकेटेड

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 05/07/2016 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
सॉफिस्टीकेटेड ही दहा एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी दादर पश्चिमला कॅमेरा दुरुस्तीसाठी गेलो होतो. तेथे प्लाझा सिनेमासमोर तृप्ती म्हणून एक उत्तम हॉटेल आहे. याचे मालक श्री भागवत हे आमचे तसे दूरचे नातेवाईक आहेत. परंतु ते सर्व कुटुंब आमच्या कुटुंबाचे अत्यंत जवळचे स्नेही आहेत. तृप्ती हॉटेल हे राजेंद्र आणि श्रीरंग हे दोन चुलत भाऊ चालवतात. ती जागा त्यांची वडिलोपार्जित असून त्याचा त्यांनी अतिशय सदुपयोग केला आहे. मी त्या हॉटेलच्या समोरून चाललो असतात श्री राजेंद्र भागवत बाहेर उभे होते. ते आमच्या कडून पैसे घेते नाहीत आणि कुणाकडून काहीही फुकट घेऊ नये ही आमची घरची शिकवण.

मागे वळून पाहताना .. काल आज उद्या

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 04/07/2016 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.youtube.com/watch?v=ameDmBSPciM&t=4332s इथे घमासान चर्चा झाली. चर्चेत सहभागी असलेले बहुतेक लोक... मुंबईकर आहेत आणि त्यांची वयं पाहता त्यांनी बाळासाहेबांची वाटचाल जाणत्या वयात पाहीलेली आहे. चर्चेत अनेक मुद्दे आले. सेनेने सुरुवातीला मराठीचा मुद्दा हातात घेतला. तो मुंबईत मराठी माणसाला अपील झाला. लोकांना बाळासाहेबामधे आपला कुणी तारणहार दिसू लागला.. पुढे १९९३ ची दंगल.