Skip to main content

ती कॉलर ट्युन

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 08/07/2016 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
योगायोग... दैनंदिन जीवनात घडणारी एक गोष्ट.. काही योगायोग चांगले तर काही वाईट. काही दीर्घकाळ लक्षात रहाणारे. पण एखादा विलक्षण योगायोग केवळ सुन्न करुन जातो आणि नेहमीसाठी लक्षात रहातो. हा योगायोगही तसाच.. ना चांगला ना वाईट. पण एका अतिशय दु:खद क्षणी घडला आणि विलक्षण सुन्न करुन गेला. जवळपास पाच वर्षापुर्वीची गोष्ट. माझं लग्न होवून जेमतेम दोन महिने उलटून गेले होते. लग्नानंतरच्या पहिल्या सणाकरिता पत्नीला नेण्यासाठी सासरे आले होते. शनिवारी सायंकाळी त्या दोघांना बस स्टॉपवर सोडून आलो. तासाभरातच पत्नीने रेल्वे स्टेशनला पोहोचून गाडीत बसल्याचे कळवले. अजून थोडा वेळ गेला आणि मेहूण्याच्या एका जवळच्या मित्राचा फोन आला...माझ्या धाकट्या (अविवाहित) मेहूणीने स्वतःला संपवले होते. त्या मित्राने सांगितले की माझ्या पत्नीला आताच म्हणजे प्रवासात असताना याबद्दल काही कळू देणे योग्य होणार नाही तेव्हा मी तिच्याशी काही बोलू नये. तातडीने निघून शक्यतो पत्नीच्या आधीच तिथे पोहोचावे हा विचार करुन मी आई-वडील आणि माझ्यासाठी दुसर्‍या दिवशी सकाळची विमानाची तिकिटे काढली, पहाटे विमानतळावर जाण्याकरिता कॅबही ठरवली. सकाळी कॅबचालकाने मला कॉल केला, घर सापडूपर्यंत त्याला मला आणखी एक-दोन वेळेस बहूधा कॉल करावा लागला. नंतर पत्नीच्या माहेरी पोहोचलो. हताशपणे सगळेजण अत्यंविधीच्या तयारीला लागले होते, त्यात मीही सामील झालो. इतक्यात एक कॉल आला, क्रमांक जरा ओळखीचा वाटला. "साहेब मी कॅब ड्रायवर बोलतोय " अरे.. हा तर सकाळचा कॅबचालक याने का कॉल केला असेल? "हो.. बोला" मी गोंधळत विचारले. "साहेब ते तुमचं गाणं कॉपी करायच होतं, तुम्ही फोन उचलू नका" "बरं..." त्याला माझी कॉलर ट्युन कॉपी करायची होती. पुन्हा माझा फोन वाजत राहिला मी उचलला नाही. मी सुन्न झालो... ती कॉलर ट्युन होती "या जन्मावर , या जगण्यावर शतदा प्रेम करावे" [ही सत्यघटना आहे आणि इथे ती लिहिणं खूप कठीण होतं.]
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3387
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

so sad....

ओह

........

काय विचित्र दु:खद योगायोग म्हणावा. नखाला जिव्हाळी लागावं तसं झालं...

In reply to by रातराणी

कॅबचालकाच्या फोन करण्याने मला त्रास नाही झाला. त्याला माझी कॉलर ट्युन आवडली आणि कॉपी करावीशी वाटली इतकचं.. फक्त योगायोग विचित्र होता ..

दुर्दैवी घटना. यात कॅब चालकाचा दोष नाहीये. पण सर्व साधारपणे मी तरी फोन करताना समोरच्या व्यक्तीला गडबडीत आहात का?बोलू शकता का?असे विचारते.म्हणजे समोरच्याची पंचाईत होत नाही असे मला वाटते.

In reply to by भिंगरी

बरोबर आहे..मी कॅबचालकाला दोष दिलाच नाही. मुख्य म्हणजे त्याच्या अशा फोन करण्याने मला काही त्रास झाला असंही नाही. पण नेमकी त्याच दिवशी कुणाला तरी ती कॉलर ट्युन इतकी आवडावी हा एक विचित्र योगायोग होता इतकंच. मनात कुठेतरी वाटलं की "काल जर माझ्या मेहूणीने मला कॉल केला असता ..तिने माझ्या पत्नीला त्या दिवशी सकाळी एक कॉल केला होता...समजा एक शक्यता म्हणून असे वाटले की जर माझ्या पत्नीचा कॉल न लागल्याने वगैरे तिने माझ्या क्रमांकावर कॉल केला असता आणि तीच कॉलर ट्युन ऐकून कदाचित ती त्या दुर्दैवी विचारांपासून मागे फिरली असती .." पण अशा जर-तर ला काहीच अर्थ नसतो.