काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तेंव्हा खडकी स्टेशन वरून शनिवारी सक्काळी मुंबईसाठी ट्रेन पकडत असे. शक्यतो सकाळची सिंहगड ठरलेली असायची. शेवटचे दोन डबे आमच्यासारख्या ऐन वेळी आरक्षण नसलेल्यांसाठी ठेवलेले असायचे. आमची कोण पर्वा रेल्वे प्रशासनास. आमच्यासारखे जगात फारच असल्याने दोन डबे, खडकीला उघडत असून पुरेसे पडत नसत. त्यामुळे गाडी फलाटाला लागायच्या आधीच, तिकीट वगैरे काढून आत उडी मारण्याच्या तयारीत राहावे लागे. शनिवारी सकाळी हा व्याप करायला प्रचंड कंटाळा येत असे.
असाच एका शनिवारी मी खडकीला पोहोचलो. सकाळी लवकर म्हणजे ५.४५ झाले होते. फार गर्दी व्हायची होती. त्या दिवशी मे महिन्यातसुद्धा थोडसं गार वातावरण होतं. पूर्ण फलाटावर जाग आली नव्हती. एक कोपऱ्यात रेल आहार चालू झाला होता. सकाळच्या रम्य वेळी, गरम चहाचा सुगंध, थोडसं फटफटू लागलेलं, आणि कहर म्हणजे अतिशय सुंदर असं ‘बलमा जानो मोही प्रीत’ हे गाणं लागलं होतं, बेगम अख्तरांच्या ठेवणीतल्या आवाजात. त्यांचा आवाजही असा अगदी जुन्या ठेवणीतल्या पैठणीसारखा आहे. कधी जुन्या एखाद्या लाकडी कपाटात आत हात घालावा आणि कागदात छान बांधलेली जुनी आजीची पैठणी हळुवार काढावी, त्या तलम वस्त्रावरून हात फिरवताना मऊशार आणि उबदार जाणीवेबरोबर मनही कुठेतरी भूतकाळात हरवून जातं, तसा त्यांचा आवाज. त्या आवाजाला अजून साज चढावा तो जुन्या रेडीओमुळे. हे Bose आणि Sennheiser कालची गोष्ट. तांत्रिकदृष्ट्या उत्तम, पण रेडीओ वरच्या खरखरीची सर त्याला नाही. अशी बेगम अख्तरांच्या आवाजातील एखादी जुनी ग्रामोफोन ची तबकडी ऐकत राहावीशी वाटते.