Skip to main content

मराठी गझल

गहाणात ७/१२.....

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 13/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
गहाणात ७/१२.....

गहाणात हा सातबारा वगैरे
तरी वाढतो शेतसारा वगैरे

कुठे राहिली आज ही गाय माझी?
घरी खात नाहीच चारा वगैरे

रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला
हवी काय खुर्ची, निवारा वगैरे?

मला अन्य काहीच पर्याय नाही
करावाच लागेल ’मारा’ वगैरे

बढाई असूदे तुझी तूजपाशी
कुणी ना इथे ऐकणारा वगैरे

कशाला अशी सांग दर्पोक्तवाणी?
तुला कोण येथे भिणारा वगैरे?

खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला
खरा तोच असतो पिणारा वगैरे

बेरीज

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 04/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिली डोळ्यात तुझिया वीज मी झेलण्या केले खुले काळीज मी भेटुनी जाते त्सुनामीसारखी मिरवतो आयुष्यभर ती झीज मी आज स्वप्नांनो, नको तसदी मला काल कवडीमोल विकली नीज मी पूर्णता नाही तुला माझ्याविना मी तरी कोठे तुझ्याखेरीज मी ठरवले आहेस तू उत्तर तुझे, की चुकीची मांडतो बेरीज मी? -- उपटसुंभ
काव्यरस

विदूषक

लेखक उपटसुंभ यांनी मंगळवार, 29/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
काय माझ्या रेखिले आहे कपाळी व्हायचे वटवृक्ष की साधी लव्हाळी मागते आहेस का आषाढ श्रावण वाट चुकला मेघ आहे मी उन्हाळी स्पर्श,स्वप्ने,पाकळ्या,गझला नि माझ्या काळजामध्ये किती जपशील जाळी लागतो द्यावा सुखाला रोज पत्ता दुःख येते प्रत्यही शोधीत आळी आसवांवर तेवते आयुष्य माझे वेदनांची साजरी करतो दिवाळी फुंकरी घालू नका जखमांवरी या मी विदूषक द्या मला निर्व्याज टाळी -- उपटसुंभ
काव्यरस

अन्यथा

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 26/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
जीवना, भेट केव्हातरी अंतरीच्या उमाळ्यापरी आसवांच्या उधाणातही पापण्यांच्या रित्या घागरी भांडणावाचुनी व्हायची भेट माझी-तुझी का खरी? नाव मी भोवर्‍याला दिली, साद देती किनारे जरी जीवघेणा कडाका इथे, सांत्वनाच्या तिथे चादरी ! पाचवीलाच मी पूजिली शब्द झेलायची चाकरी अंत पाहू नको रे सुखा, साथ दे, अन्यथा जा तरी!
काव्यरस

घायाळ पापण्यांनी मैफ़ील सोडताना

लेखक उपटसुंभ यांनी बुधवार, 23/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
घायाळ पापण्यांनी मैफ़ील सोडताना नाही जमेस काही आयुष्य मोजताना भाळून चालते का लाटेवरी कुणाच्या काळीज सागराचे घेऊन हिंडताना ना घातली हवा तू राखेस एकदाही सारी हयात गेली अंगार शोधताना आहेत कान त्यांच्या भिंतीस जाणतो मी आवाज होत नाही स्वप्नात बोलताना होतो बर्‍याचदा मी माझाच हाडवैरी बेभान अक्षरांचे आसूड ओढताना - उपटसुंभ
काव्यरस

शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 14/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.

शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)


मी तुझा साथ सोडून गाऊ कसा?
तूच माझा गळा, कंठ, नरडी, घसा

वाटले मोगर्‍याला तुला पाहुनी
पालखीला मिळालाय भोई जसा

मारली मी मिठी त्या क्षणी वाटले
शेरनीच्याच जबड्यात गेला ससा

झोप पाण्यात घेतोय मासा कसा?
प्रश्न हा फ़ालतू;  फ़क्त खावा रसा

कार्य बाकी किती ते उद्याला बघू
मंडळींनो चला भोजनाला बसा

भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा