कुठे वस्ती न घर होते.. मला सारे शहर होते
तुझ्यासाठी र्रुतू सारे,तुझ्यासाठी बहर होते
दिला तू कोणता प्याला, फुटे हा प्राण म्रुत्यूला..
कळेना काय ते होते: दवा होती, जहर होते..
घरांचे बंद दरवाजे, कुणी माणूसही नाही..
सुन्या गावात म्रुत्यूचे किती वेडे कहर होते !
नको कोठेच अश्रूंना मिळू दे माझिया थारा
तुझी दुःखे सुखी होती : तुझे अश्रू अमर होते
जरा पाहून घे राणी र्रुतूंच्या जिर्ण तसबीरी
कधी येथे फुले होती, कधी येथे भ्रमर होते
अता मी वेचतो आहे तुझ्या विरहातले मोती
मला स्मरते युगे होती ..तुझ्यासाठी प्रहर होते !
डॉ.सुनील अहिरराव