gajhal
फुंकिले मी प्राण माझे...
फुंकिले मी प्राण माझे,बासुरीचा सूर झाले
गायचे तू टाळलेले..गीत मग मशहूर झाले!
हे बरे झाले खरे तर..मी तुला मंजूर नव्हते
जाहले नाही तुझी पण,या जगा मंजूर झाले!
चालले होते कुठे मी? मज कुठे रस्ते कळाले?
पाय जेथे थांबले ते,गाव ही निष्ठूर झाले!
सांगतो आहेस आता,खूण माझ्या आठवांची
पास मी होते तुझ्या तर,कोण होते दूर झाले!
काजवे घेवून हाती,शोध माझ्या सावल्या तू
घेवुनी हाती उन्हे मी,चांदण्याचा धूर झाले!
जीवना बघ..मी तुझाही,साजरा मधुमास केला
तू विखारी दंश करता,अमृताचा पूर झाले!
—सत्यजित
...नवल!
नजर टाळणे..पण पहाणे..नवल!
तुझे लाजणे अन् बहाणे..नवल!
मला जाग आली सुगंधी किती!
तुझे अत्तराचे नहाणे...नवल!
जुनी वाट हरवून गेली तरी
तुझे रोज येणे नि जाणे..नवल!
काव्यरस
झाली...पहाट झाली!
रानात पाखरांची..चर्चा अफाट झाली
उगवेन सूर्य आता ही रात्र दाट झाली!
फांदीवरुन कानी येतात सूर काही
मी ऐकतो भुपाळी जी चिवचिवाट झाली!
गेला चुकून ताफा येथून राजशाही
इतक्यात राजरस्ता ही पायवाट झाली!
काव्यरस
ये,बैस ना जराशी...
ये,बैस ना जराशी,कर बात चांदण्याची
दररोज येत नाही ही रात चांदण्याची!
हिणवून काल मजला,गेलाय चंद्र रात्री
दे दाखवून त्याच्या औकात चांदण्याची!
कळतेय ना मलाही,होतो उशीर आहे
कवळून जा उराशी तादात चांदण्याची!
येतेस तू अताशा,स्वप्नात रोज माझ्या
स्वप्नांत भेट होते साक्षात चांदण्याची!
स्वप्नांत चांदण्याच्या,गेल्या कितीक राती
घेवून रात ये तू दारात चांदण्याची!
आलीस ना छतावर झटकून केस ओले?
शहरात होत आहे बरसात चांदण्याची!
—सत्यजित
काव्यरस
मिसळपाव