Skip to main content

काय, कधी कुठे? - अमेरिका

लेखक पिलीयन रायडर यांनी शनिवार, 27/08/2016 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेत अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चालु असतात. आम्हा नवीन माणसांना पटकन समजत नाही की कोणते कार्यक्रम पाहु शकतो, कुठे जाऊ शकतो, कोणत्या सीझन मध्ये काय पहायला हवं.. तेव्हा मोदकने जसे पुणे - मुंबईसाठी धागे काढले आहेत, तसा अमेरिकेसाठी एक धागा असावा म्हणलं. जसं की ह्या वीकांताला (२५-२८ ऑगस्ट) अमेरिकेतले सर्व नॅशनल पार्क्स फ्री असतात. ह्या वर्षी नॅशनल पार्क सर्विसला १०० वर्ष झाली आहेत. आणि आता सांगण्यात अर्थ नाही पण मागच्या रविवारी इंडिया डे परेड होऊन गेली! किंवा दर गुरुवारी ब्रुकलिन चिल्ड्रन म्युझियम ३-५ ह्या वेळात फ्री असतं! अमेरिकेतल्या समस्त मिपाकरांनी अशी उपयुक्त माहिती इथे टाकलीत तर फार बरं होईल! धन्यवाद!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 108016
प्रतिक्रिया 227

प्रतिक्रिया

या धाग्याला भेट देणार्‍यांना खालील दुवे उपयुक्त वाटू शकतात.

In reply to by राघवेंद्र

अहा! ही पण मुर्ती खुपच मोठी आहे!! माझ्या अपेक्षेपेक्षा खुपच जोरात झाला हो गणेशोत्सव! प्रसादाचा शिरा तर फारच अहाहा होता! =))

सप्टेंबर १८ ला सुमा फूड्स ने गणपती विसर्जन Johnson Park, Grove 4, Piscataway, NJ इथे आयोजित केले आहे. अधिक माहिती व तिकिटासाठी http://www.sumafoods.com/ इथे संपर्क साधा.

अमेरिकेत पाहण्यासारख्या / चुकवू नये अशा गोष्टी मध्ये नॅशनल पार्क येतील. उदा. योसेमिटी , ग्रँड कॅनियन , यलोस्टोन, आर्चेस, ब्रायस, झायन. त्याव्यतिरिक्त सांता फे, न्यू ऑर्लीयन्स सारखी काही स्वताचे वेगळेपण जपणारी शहरे आहेत. बाकी अमेरिकेत जे टुरिस्ट स्पॉट आहेत तसे जगभर अनेक ठिकाणी आहेत.

अमेरिकेतल्या लोकांनो.. एक मदत कराल का? नवर्‍याला कुठेही जायला सध्या सुट्टीच मिळत नाहीये. मिळेल ती आता ख्रिसमस - न्यु इयर ह्याच आठवड्यात. तर फिरायला जाण्यासाठी ह्या काळात सर्वात चांगला पर्याय कोणता? मला क्रुझ काय प्रकार असतो ते ही एकदा बघायचे होते. कुणाला अनुभव आहे का? सोबत अबीर असल्याने वेस्ट कोस्टला गेलो तरी वेगसमध्ये कसे जमवावे हा प्रश्न आहे. पण वेस्ट कोस्टही बघायची इच्छा आहे. तर काय करावे?

In reply to by पिलीयन रायडर

पिरा, वेस्ट कोस्ट मस्तं आहेच पण अजुन एक ऑप्षन म्हणजे कॅरिबियन आइलॅंड्स ला जा. बहामा आणि प्यूरिटो रीको सगळ्यात जवळचे पर्याय आहेत. बहामा ला मी कधीही गेली नाहीये पण पोर्टो रीको ला आम्ही नेहमी जायचो. मस्तं आहे. नेवर्क ते सॅन जुआन अगदी तीन तासांची फ्लाइट आहे. क्रूज़ चा मात्र अनुभव नाही मला:(

In reply to by पद्मावति

करिबिअन टाळा सध्या. झिका व्हायरस चा हाय अलर्ट आहे तिकडे. पिरा एल ए वगैरे पण बघ अबीर साठी युनिव्हर्सल , डिझ्ने लँड्स वगैरे पर्याय आहेत तिथे. फ्लॉरिडा ला जाऊ शकतेस किंवा एस एफ ओ - तिथे करायला खुप काही आहे.

In reply to by पद्मावति

हॉलिडे सिझन मुळे विमान प्रवास (एकंदरीत कुठलाही प्रवास) महाग असतो. हवामानामुळे/ गर्दी मुळे विमान रद्द होणे, उशिरा सुटणे हे पण होते. पूर्व किनाऱ्यावर फ्लोरिडा उत्तम पर्याय आहे आणि पश्चिमेकडे हवाई (हवाई ला कदाचित क्रूज पण मिळेल). सॅन फ्रान्सिस्को, लॉस अँजेलिस हे पण पर्याय आहेत. लास वेगास ला लहान मुलाला घेऊन जाणे काही ठीक नाही. कारण त्याच्या मनोरंजनाचे तिथे काही नाही. आणि त्यामुळे मोठ्यांना स्वतःच्या मनोरंजनाचे कार्यक्रम पाहता/ करता येत नाहीत. ग्रँड कॅनियॉन पण थंडी मुळे फारसा चांगला पर्याय नाही. दक्षिणेकडे टेक्सास आहे. अरोरा बोरोलीस पाहायचे असेल तर वायव्येला अलास्का :) हे पण सुचवू शकतो.

In reply to by पिलीयन रायडर

डिस्ने कींवा सीवर्ल्ड ...दोन्ही ख्रिसमस - न्यु इयर सेलेब्रेशन मस्त असतात्,,आणी थंडी पण नस्ते..

In reply to by पिलीयन रायडर

वेगस छानच आहे, पण तिथे स्ट्रीपवर स्मोकींगचा अती त्रास आहे. डिसेंबरच्या थंडीत तर जास्तच. मोठ्यांनाही होतो, त्यामुळे लहान मुलांना आणखीच अवघड आहे असे मला वाटते. वेस्ट कोस्टला बघण्यासारखे बरेच असले तरी मुलांना घेऊन मी स्वत:च फिरले नाहीय त्यामुळे नक्की कुठे जावेस याबद्दल फार काही सांगू नाही शकत. कट्टा मात्र नक्की करु :) माझ्या काही मैत्रिणी मुलांबरोबर फिरताना राईस कूकर वगैरे बरोबर ठेवतात, सात-आठ दिवस बाहेर खाऊन कंटाळा येतो त्यामुळे तो चांगला पर्याय असावा.

In reply to by पिलीयन रायडर

वेस्ट कोस्टला जाता येईल. वेगासला लहान मुलांना घेऊन जायला काही प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही. कॅसिनोमध्ये लहान मुलांना घेऊन फक्त गॅम्बलिंग एरियात जाता येत नाही पण कॅसिनोजमध्ये बाकी बघण्यासारखं बरंच आहे. मी माझ्या मुलीला ती ४ वर्षाची असताना घेऊन गेलो होतो. नेवार्क ते वेगास फ्लाईटने तेथून कारने ग्रँड कॅन्यन आणि लॉस अँजेल्स शक्य आहे. लॉस अँजेल्समध्ये डिस्नेलॅण्डला जा. माझं वैयक्तिक मत असं आहे की युनिव्हर्सलमध्ये मोठ्यांसाठीच्या राईड्स जास्त आहेत, ज्यांना रोलर कोस्टर टाईप राईड्स आवडतात त्यांची तिथे चंगळ आहे . त्यामानाने डिस्ने लहान मुलांसाठी चांगला पर्याय आहे. पैसे जास्त (भरपूर) खर्च करायची तयारी असेल तर LA वरून क्रूझने हवाईला जा. किंवा बहामा, प्युर्टो रिको, कॅनकून (मेक्सिको) हे पर्याय आहेतच. पण यासाठी व्हिसाची सोया करायला लागेल.

यु.के. मध्ये क्रूजचा प्रवास केला आहे. पहिल्यांदाच करत असल्याने जाताना 2-3 दा उलट्या झाल्या. येताना काही त्रास नाही झाला. लहान मुलं बरोबर असल्याने जास्त वेळेचा प्रवास करण्यापूर्वी विचार करा.

@स्रुजा - अरे बापरे! मग नकोच ते सध्या. @ रुपी - राईस कुकरचा पर्याय कधी डोक्यात आलाच नाही. आणि खरंच जास्त बरं पडेल ते कदाचित. एक व्हेगस अवघड आहे लहान मुलांना घेऊन, पण अजुन काय काय करावं तिकडे आलोच तर? @अभिजीत - मला मोशन सिकनेस आहे. अबीरलाही लहानपणी त्रास झालाय. आणि शिवाय इतके दिवस एका जहाजात नक्की काय करायचं असतं हे ही मला माहिती नाही. तेवढा इंटरेस्टींग पर्याय असेल तरच विचार करेन. @टिवटिव - पण रांगा असतात ना मोठमोठ्या डिस्नेला? परवाच चित्रगुप्त काका वैतागले होते की उगाच पैसेकाढु प्रकार आहे आणि खुप ताटकळावं लागतं वगैरे...

In reply to by पिलीयन रायडर

लहानांच्या नजरेतला डिस्ने आणि मोठ्यांच्या नजरेतला यात फार मोठा फरक आहे. मला आणि बायकोला डिस्ने प्रचंड आवडला होता. अर्थात गर्दी, मोठमोठ्या रांगा, खुप चालायला लागणे हे प्रॉब्लेम्स आहेतच पण आपल्या परीने काही उपाय करता येतील, जसे की मोठ्या विकेंडला अशी ठिकणे टाळणे, सर्वच्या सर्व पार्क बघुन झालाच पाहिजे असा अट्टहास न धरता सिलेक्टिवली गोष्टी पाहणे. पार्क हॉपर ऑप्शनही आहेच ज्यात तुम्ही दोन पार्क एका दिवशी पाहु शकता (लहान मुलांसोबत हा ऑप्शन किती वर्काउट होइल याचा अनुभव नाही). डिस्नेच्या कॅसल समोर होणारी परेड आणि आतिषबाजी हा एक पैसावसूल आयटम आहे असं माझं मत आहे.

In reply to by पिलीयन रायडर

करण्यासारखं म्हणजे - डिस्नेलँड, युनिव्हर्सल स्टुडीओ, सी-वर्ल्ड, LA, San Francisco शहरांमधली आकर्षणे, मिस्टरी स्पॉट. LA चं मला फार माहीत नाही. SF मध्ये गोल्डनगेट ब्रिज, फिशरमन्स व्हार्फ, युनियन स्क्वेअर इ.इ. डेथ व्हॅली, 17 miles drive, अल्कट्राझ मुळीच करु नका (हा माझा अनाहूत सल्ला). खरं सांगायचं तर यातल्या (गोल्डन गेट सोडून) प्रत्येक ठिकाणाबद्दल आवर्जून जायलाच हवे किंवा जाऊन काहीच उपयोग नाही अशी वेगवेगळी मते आहेत. एगदी वेगसचंही मी तुला म्हटलंय - पण पुन्हा पहायला मिळेल न मिळेल असे वाटत असेल तर त्याला लगेच यादीतून काढून टाकू नका. डिस्ने, युनिव्हर्सल, सी-वर्ल्ड मध्ये मुले नसताना गेले होते तरी मला आवडलं. रांगा कशा मॅनेज करायच्या हे जमलं तर पैसे जास्त वाटत असले तरी वसूल करता येऊ शकतात ;) पण मुलाची उंची किती राईड्ससाठी पुरेशी आहे त्याप्रमाणे ठरवा. सकाळी लवकर गेलात आणि लोकप्रिय राईड्स आधी करुन घेतल्या तर फार ताटकळावे लागले असे वाटणार नाही. काही ठिकाणी फास्ट पासही असतात. तुझा मुलगा किती सोशिक आहे त्यावरही बरेच अवलंबून आहे. फक्त पाहण्यासाठीच्या गोष्टींमध्ये तो फार रमणार नसेल तर काही जागा त्याच्यासाठी, काही मोठ्यांसाठी असे आलटून पालटून करु शकता. जिथे तिकीटे आहेत त्यांचे ग्रुपॉन किंवा दुसरे काही डील्स मिळाले तर उत्तम.

मी ही बातमी वाचली आहे फक्त. ज्याला कुणाला शक्य असेल, त्यांनी पहावे. गोल्डन टॉयलेट सामान्य लोकांसाठी खुले १८ कॅरेट सोने वापरून बनवलेले शौचालय लोकसत्ता ऑनलाइन | September 16, 2016 6:45 PM [गोल्डन टॉयलेट सामान्य लोकांसाठी खुले] हे सोन्याचे शौचालय वापरण्यासाठी जास्त पैसेही मोजावे लागणार नाही. सोन्याचे दागिने, सोन्याचा पुतळा, सोन्याचे दात, सोन्याची फळे असे सोन्यापासून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तूंबदद्दल तुम्ही ऐकले असेल पण तुम्ही सोन्याच्या शौचालयाबद्दल ऐकले आहे का ? आता आपल्याकडे सोन्याचा जाऊ दे पण साधा शौचालय तरी कोणी बांधून दिला तरी मोठी गोष्ट म्हणावी लागेल सोन्याच्या शौचालयाची गोष्ट् तर दूरच राहिली. पण सध्या सोशल मीडियावर सोन्याच्या शौचालयाची चर्चा खूपच रंगली आहे. अमेरिकेतल्या गुगेनहेम संग्रहालयात सोन्याचा कमोड ठेवण्यात आला आहे. आता संग्रहालयात हा सोन्याचा कमोड ठेवला आहे म्हटल्यावर तो केवळ आणि केवळ बघण्यासाठी असेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. हा कमोड सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात आला आहे. न्यूयॉर्क शहरात हे संग्राहलय आहे. आता हे शौचालय फक्त श्रीमंत लोक वापरू शकतात अशाप्रकारचेही कोणतेच बंधन नाही. या संग्राहलयाला भेट देणारा कोणताही व्यक्ती हे सोन्याचे शौचालय वापरू शकतो. १६ सप्टेंबर म्हणजेच आजपासूनच हे शौचालय सामान्य लोकांसाठी खुले करण्यात आले आहे विशेष म्हणजे हे सोन्याचे शौचालय वापरण्यासाठी जास्त पैसेही मोजावे लागणार नाही. जो कोणी संग्रहालयाची तिकिट काढेल त्याला ते वापरायला मिळणार आहे. या संग्रहालयाच्या चौथ्या मजल्यावरील रेस्ट रुममध्ये हा सोन्याचा कमोड ठेवण्यात आला आहे. पुरुष आणि महिला दोघेही हे शौचालय वापरू शकतात. इटलीचे प्रसिद्ध आर्टिस्ट मौरिजियो कैटिलेन यांनी हा सोन्याचा कमोड तयार केला आहे. हा कमोड तयार करण्यासाठी किती खर्च आला हे मात्र सांगितले नाही. गेल्याच महिन्यात या संग्रहालयात हा कमोड आणण्यात आला होता. परंतु, तो जोडण्यासाठी मात्र अडचणी येत होत्या.

व्हरमाँट मधे फॉल पाहायला जायचे आहे. पण फॉल पाहायला जायचे म्हणजे नक्की काय असते? काही वेगळ्या जागा असतात का त्यासाठी?

In reply to by सही रे सई

फॉलिएज ची वेबसाईट आहे बघ व्हर्माँट राज्यासाठी. http://www.foliage-vermont.com/ आणि ते पाथ पण रेकमेंड करतात. साधारण तासा दिड तासाचा तो रस्ता असतो (लूप असतो बेसिकली) तिथे तुला सुंदर फॉल कलर्स बघायला मिळतील. बाकी रस्त्याने जाता येता तर दिसतील च एकदा व्हर्माँट मध्ये गेलीस की. स्ट्वो मध्ये राहा असं मी सुचवेन. अप्रतिम जागा आहे. करण्याजोगं खुप काही आहे आणि. छोट्या मोठ्या हाईक्स आहेत. फॉल्स आहेत. झिप लायनिंग आहे. झालंच तर बेन अँड जेरिज ची फॅक्टरी आहे. त्याची टुअर नक्की घ्या. बर्लिंगट्न मध्ये पण सुंदर मार्केट, शिवाय रेस्टॉरंट्स उत्तम. एकुण एखादा लाँग वीकेंड साठी आदर्श जागा आहे. किती ही वेळा जा. इति व्हर्माँट जाहिरात संपन्न ;)

हाम्रीकेतल्या मिपाकरांनो, नायगाराला जायचे होते. इथे (पिट्सबर्ग) मध्ये कुठलीही टूर कंपनी नाही. बसने जायचे तर 2 दा बदलावी लागते आणी 3.5 तासाच्या प्रवासाला 13 तास लागतात. न्यू यॉर्कला येऊन तिथून टूरने जाणे हा एक पर्याय आहे. पण मग तेवढाच वेळा जाणार जवळपास 12 तास. मी इथे एकदाच कार चालवली. घरापासून पिट्सबर्ग विमानतळ आणी परत. रोड साईन्स बघून बघून वैतागलो. एवढ्या 1.5 तासाच्या अनुभवावरून इथे रेंटेड कार घेऊन स्वतः चालवण्याची रिस्क घ्यावी का?

In reply to by अभिजीत अवलिया

कधी जाणार आहात आणि बरोबर कोण कोण आहे? भारतात गाडी चालवली आहे का आणि किती चालवली आहे? आधी एक दिवस रेंटल कार घेऊन थोडा सराव करा. GPS घ्या एक आणि GPS बघून त्या सूचनेप्रमाणे गाडी चालवायची सवय पण करणे महत्वाचे आहे. एका दिवसात होऊन जाईल. गाडीत तुमच्या बरोबर जे कोणी असेल त्या व्यक्तीला पण GPS बघायची आणि रस्ते (मुख्यतः एक्झिट्स) बघायची थोडी तरी सवय असणे उपयुक्त ठरते. सवय नसल्याने रेंटल कार घेताना नेहमी पूर्ण इन्शुरन्स रेंटल कंपनीकडूनच घ्यावा. थोडे पैसे जातील पण पूर्ण इन्शुरन्स असणे महत्वाचे. रच्याकने: आता जाऊन मेड ऑफ द मिस्ट मध्ये जायला मिळेल का?

In reply to by ट्रेड मार्क

अजून 2 जण आहेत बरोबर. त्यांनी भारतात पण कधीच चालवलेली नाही त्यामुळे प्रश्नच मिटला त्यांचा :) मी भारतात 4 वर्षे चालवली आहे. भारतात पण प्रत्येक नियम पाळूनच चालवतो. पण इथे खूपच रोड साईन्स आहेत. रेंटल कार घेऊन सराव करायला बाजूला कुणी तरी इथे भरपूर गाडी चालवण्याचा अनुभव असलेली व्यक्ती हवी ना तीच नाहीये :( मेड ऑफ द मिस्ट 6 नोव्हेंबर ला बंद होणार आहे. मी 26 नोव्हेंबर ला परत चाललोय आणी कदाचित परत कधीच अमेरिकेत येणार नाहीये.

In reply to by अभिजीत अवलिया

माझा विचारण्याचा उद्देश बरोबर लहान मूल बरोबर नाही ना हा होता. बरोबर भरपूर गाडी चालवण्याचा अनुभव असलेली व्यक्ती हवी हे वाटणं साहजिक आहे पण गरजेचं नाहीये. शहरात बऱ्याच रोड साईन्स असतात पण एकदा हायवे ला लागलात की मग फारश्या नसतात. हायवेला महत्वाचं म्हणजे तुम्ही स्पीड आणि लेन मेंटेन करू शकला पाहिजे आणि GPS दाखवेल त्याप्रमाणे गाडी चालवू शकला पाहिजे, म्हणजे एंट्री एक्झिटचं गणित जमलं पाहिजे. ते जमलं की गाडी चालवणं फारसं अवघड नाहीये. डाव्या उजव्याची अडचण होतेय का? त्यासाठी एक सोपा नियम म्हणजे चालकाच्या बाजूला मेडियन म्हणजे रस्ता दुभाजक पाहिजे हे डोक्यात ठेवायचं. तुम्ही एकदा गाडी चालवलीये त्यामुळे थोड्या सवयीने जमून जाईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे बाकीचे लोक्स तुम्हाला सांभाळून घेतात. म्हणजे चौकात तुम्ही कुठे जायचं याचा अंदाज घ्यायला थांबलात तरी मागचे भुंकणार नाहीत. फक्त अगदी कोणच्या जवळ गाडी न्यायची नाही (भारतातल्याप्रमाणे), चालणारे आणि सायकलवाले यांना प्रथम जाऊ द्यायचे आणि राईट ऑफ वे म्हणजे काय ते समजून घ्या.

In reply to by ट्रेड मार्क

तुमच्या शब्दांनी धीर आलाय. :) तसे इथे बाकीच्या लोकांचे गाडी चालवतांना निरीक्षण करून मी बऱ्याच गोष्टी शिकलोय.

In reply to by ट्रेड मार्क

धन्यवाद.10 ऑक्टोबरला रेंटल कार घेऊन falling water ह्या ठिकाणी फिरायला गेलो. एक जण ओळखीचा बाजूला बसला त्याने सर्व नियम समजावून सांगितले. मग 15-16 तारखेला नायगारा ट्रिप करून आलो. 6 जण झाले शेवटी त्यामुळे SUV भाड्याने घेतली. आदल्या दिवशी नियमांची pdf वाचून काढली ज्याचा खूप उपयोग झाला. संपूर्ण प्रवासात सुंदर फॉल कलर्स दिसले. एकंदरीत सर्व लोक वेगात पण शिस्तीत गाडी चालवत असल्याने गाडी चालवायला खूप मजा आली. पुढच्या आठवड्यात 24-31 न्यू यॉर्क मध्ये आहे. 24-29 संध्याकाळी 5:30 नंतर आणि एक शनिवार रविवार एवढाच वेळ हाताशी असल्याने न्यू यॉर्क मधील अजिबात चुकवू नये अशा जागा सांगा.

In reply to by अभिजीत अवलिया

१. सेंट्रलपार्क मध्ये अजुन म्हणावा तसा फॉल मला तरी दिसला नाही, पण तरीही १००% जाच. मी सेंट्रल पार्कला ३ दा गेले आहे, पण अजुनही खुप काही पहायचे राहिले आहे. मी दर वेळी चालतच फिरल्याने फार बघणं होत नाही एका वेळेला. सिटी बँकेच्या ज्या सायकल्स मिळतात त्याने फिरलात तर जास्त पाहुन होईल, जास्त मजा येईल. मी जेवढं पाहिलं आहे त्यात म्हणाल तर वरुन खाली उतरताना "द पुल" म्हणुन एक जागा आहे, फार सुंदर आहे. ती बघा जमल्यास. कयाकिंग करता येतं. दमवणारा पण मस्त अनुभव. पिकनिक करण्यासाठी उत्तम जागा आहे सेंट्रल पार्क. २. म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी तर आहेच. त्याला संपुर्ण एक दिवसही कमी पडतो. तेव्हा आवड असले तर इथे वेळ द्या. पण पैसा वसुल आहे हे नक्की. अत्यंत माहितीपुर्ण पण तेवढेच दमवणारे म्युझियम. सबवे दारात सोडते. ३.मग थोडं खाली उतरा आणि सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल पहा. (प हा च). डोळे दिपणे म्हणजे काय प्रकार असतो हे लक्षात येईल! त्याच्याच मागच्या ब्लॉकमध्ये सेंट बार्ट्सचे चर्च आहे. ते मात्र जुने पण अत्यंत शांत आणि सुंदर चर्च आहे. ह्या दोघांच्या जवळ रॉकफेलर सेंटर आहे. तिथे बहुदा आईस स्केटींग सुरु झालंय आता. ते ही बघुन घ्या. ४. टाईम्स स्क्वेअर तर आहेच आपला. तुम्ही शाकाहारी असाल तर मी "माओज" ही फलाफल मिळणारी जागा सुचवेन. फलाफल म्हणल्यावर रस्त्याच्या कडेला लागलेल्या गाड्या आठवतील, पण माओज ही एक सबवे सारखी चेन आहे. सेंट्रल पार्क मध्येही एक ब्रांच आहे त्यांची. स्वच्छ आणि स्वस्त. गुगल करा, सगळ्या लोकेशन्स मिळतील. पण सगळ्या अपटाऊनलाच आहेत. ५. मग अजुन थोडं खाली उतरा आणि ग्रॅण्ड सेंट्रलला जाऊन या. १०० वर्ष जुने स्टेशन आहे ते.( तिथे समोसा मिळतो छान.) ६. मग अजुन थोडंसं खाली आलात की आहेच एंपायर स्टेट बिल्डींग. ह्यावरौन आठवलं, टॉप ऑफ द रॉक (म्हणजे रॉकफेलरच्या वर) किंवा वन ऑब्झरवेटरी (वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या वर) असे दोन पर्याय आहेत तुमच्या कडे. दोन्ही उत्तम आहेत. ७. डाऊनटाऊनला वन ऑब्झरवेटरी / वर्ल्ड ट्रेड सेंटर आहेच. तिथुन वॉल स्ट्रिटवर जा. जाताना ट्रिनिटी चर्च आणि चार्जिंग बुल पाहुन घ्या. चालत चालत बॅटरी पार्कला पोहचाल. तिथुन निवांत बसुन नजारा पहा. जर्सीत लावलेलेल कोलगेटचे घड्याळ दिसेल. इथुनच लिबर्टीला जायला फेरी मिळते. ८. लिबर्टी - इथे जायला एकतर तिकिट आधीच बुक करावं लागतं. क्राऊनचं मिळणार नाही तेव्हा लिबर्टीच्या पायाशी जाता येईल फक्त. तिथुनही छान दिसतो नजारा. ह्या तिकिटात एलीस आयलंड सुद्धा दाखवतात. तिथे एक म्युझियम आहे. आम्हाला असल्या जागा आवडतात, तेव्हा लिबर्टीलाच आम्हाला जवळपास ५-६ तास लागले होते. तुम्हाला रस नसेल तर स्किप करा, वेळ वाचवा. ९. तुम्हाला लिबर्टी जवळुन पहाण्यात तितका रस नसेल तर तुम्ही समोरच्या गव्हर्नर्स आयलंडवर फेरीतुन सकाळी फुकट (किंवा दुपारी २$ मध्ये) जाऊ शकता आणि लिबर्टी पाहु शकता. पण मी म्हणेन की लिबर्टी पाहुन या जवळुन. लिबर्टी आतुन पहायलाही फार मस्त वाटतं. शेवटी ती जगातलं एक आश्चर्य आहे. १०. ब्रुकलिन ब्रिज तर पहायचा आहेच. संध्याकाळी मस्त चालत जा इथे. ११. हायलाईन पार्क - वेळ असेल तर जा. १२. बहुदा मुक्काम जर्सी सिटीत असेल. नसेल तर मग आधी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नव्या स्टेशनला या. उडणार्‍या हंसाच्या पंखासारख्या पांढर्‍या शुभ्र स्टेशनमध्ये फिरा. अ‍ॅपलच्या बाहेर लागलेली रांग बघा. मग पाथ पकडुन एक्सचेंज प्लेसला या. तिथे बोर्ड वॉकवर संध्याकाळी चालत जा. समोर न्यु यॉर्कची स्कायलाईन बघा. वेळ असलाच तर जिथे आम्ही कट्टा केला होता त्या न्युपोर्ट मॉलला चक्करही मारु शकता. खरेदी करायची असेल तर जवळपास सगळी फेमस दुकानं इथे आहेत. इथे चीजकेक फॅक्टरीला छान जेवण मिळतं. स्वस्त पर्याय हवा असेल तर फुड कोर्ट आहेच. १३. वेळ असलाच तर क्विन्समध्ये फ्लशिंगला एक मंदिर आहे. तिथे डोसा फारच सुंदर मिळतो. प्लान असेल तर जर्सीत स्वामीनारायण मंदिरात जा. तिथेही चांगला डोसा आणि सांबार मिळतं असं राघव भाऊ म्हणतात. मी जाणारे. १४. जर्सीत असाल तर इंडियन स्ट्रिटला यालच! नेमके दिवाळीत येत आहात. तिथे काही कार्यक्रम असेल का ते बघावं लागेल. १५. जर्सी सिटीच्या वर सांगितलेल्या कोणत्याही जागी आलात तरी मला भेटुन जाऊ शकता. मी त्याच भागात रहाते. :) दिवाळी कट्टा करु आपण! १६. खाण्याचं म्हणाल तर मला मॅग्नोलियाचा रेड व्हेल्वेट केक, चिपोतले, सेंट्रल पार्कच्या वरच्या टोकाला कॅफे अम्रिता आहे- तिथे ब्लुबेरी पॅनकेक्स, माऑजचे फलाफल, डाऊनटाऊन मध्ये El Luchador म्हणुन मॅक्सिकन मिळतं, इन्सोमेनियाच्या कुकिज, चीजकेक फॅक्टरीमध्ये काहीही, मंदिरांमधला डोसा, ईंडियन स्ट्रिटवरचं मिठास / बिर्याणी पॉट, टु बुट्सचा पिझ्झा, कॅफे ऑक्सफर्डचे सलाद इ इ खुप काही आवडतं. तुम्हाला नॉन व्हेज पर्याय हवे असतील तर नवर्‍याला विचारते. बाकी न्यु यॉर्कही चालत फिरण्याची जागा आहे. त्यानेच ह्या शहराची खरी मजा कळते. इथे वॉकिंग टुर्सही मिळतात. फक्त तेवढा वेळ हातात हवा. नाहीच जमलं तर सबवेचा पास काढालच. तो खिशात असेल तर काही चिंता नाही. आपल्या डॅमने (ह्या नावाचा एक आयडी आहे!!) दोन दिवसात सगळं महत्वाचं सबवेने फिरुन पाहिलं होतं. मला आठवेल तसं अजुन सांगेनच.

In reply to by पिलीयन रायडर

चांगली माहिती. माझी थोडी भर: १. सेंट्रल पार्कमध्ये Belvedere castle व Bethesda fountain ह्याही पाहण्यासारख्या जागा आहेत. कॅसल नावावरून फार खूश होऊन जाऊ नका फक्त, त्यामानाने बारकंसं आहे ते. २. मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स (मेट): पाहाच. हे एक संग्रहालय नसून भलीमोठी १०-१५ संग्रहालये एकत्र असल्यासारखे आहे. काही लोक आर्ट म्युझियम ऐकूनच काहीतरी हुच्चभ्रू प्रकार असेल असे धरून चालतात, पण तसे नाही. प्रत्येकाला आवडेल अशा भरपूर गोष्टी आहेत. इथे तिकीटाची सुचवलेली रक्कम २५ डॉलर म्हणतात, पण तिकीटाचे आपण हवे तितके पैसे देऊ शकतो. (पे अॅज यू विश). शुक्रवार व शनिवारी तर रात्री ९ पर्यंत उघडे असते. सेंट्रल पार्कला चिकटूनच आहे. ३. सेंट पॅट्रिक्स बघायला गेलात तर जवळच न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी आहे तीही बघून घ्या. ४. वेळ कमी असला तर लिबर्टी बेटावर जाण्याऐवजी स्टॅटन आयलंड फेरी घ्या. द. मॅनहॅटनमधील बॅटरी पार्काजवळून निघते आणि फुकट असते. गव्हर्नर बेटाच्या बोटीपेक्षा पुतळा चांगला दिसतो ह्यातून.

In reply to by मिहिर

मेट बद्दल माझं हेच मत होतं. म्हणुन मी बिचकुन कधी गेलेच नाही. =)) आता तू म्हणतोस तर जाते. पब्लिक लायब्ररी कशी विसरले मी?!! येस.. लिश्टीत अ‍ॅडवा हो! स्टॅटन आयलंडची फेरी केव्हाची घ्यायची आहे. खुद्द स्टॅटन आयलंड वर काय काय अजुन पहाता येईल हे सांगशील का?

In reply to by पिलीयन रायडर

पिरा बरंच हिंडलेलं दिसताय गेल्या काही दिवसात, पक्क्या न्यू यॉर्कर झालात की :)... तुम्ही बहुतेक सगळं सांगितलंच आहे. फक्त अ अ ला काही सूचना.. न्यू यॉर्क मध्ये स्वतःची गाडी घेऊन जायचा विचारसुद्धा मनात आणू नका. पिरा म्हणल्याप्रमाणे सबवे आहेच पण काही ठिकाणी ४-५ लोक असाल तर टॅक्सी स्वस्त पडते आणि अगदी दारात सोडते. न्यू जर्सी मध्ये राहिलात तर पाथने NYC ला जायचं. NYC मध्ये हॉटेल्स बरीच महाग असल्याने जर्सी सिटीत राहणं चांगलं. बँक ऑफ अमेरिकेचं डेबिट कार्ड असेल तर काही म्युझिअममध्ये प्रवेश फुकट असतो. तसेच इतरही बँकांचे काही ना काही असतेच. सेंट्रल पार्क खूप मोठं आहे त्यामुळे आंतरजालावर आधीच बघून ठेवा नक्की तुम्हाला काय बघायचंय. बाकी न्यू यॉर्क मध्ये खाण्यापिण्याचं अजिबात टेन्शन नाही. तुम्हाला पाहिजे ते मिळतं. चिकन खात असाल तर रस्त्यावर चिकन ओव्हर राईस मिळतो तो मस्त असतो व्हेज असाल तर फलाफल ओव्हर राईस मिळतो. पिरा म्हणाल्या तसं MOES किंवा Chipotle आहेच. Intrepid Museum पण मस्त आहे. म्हात्रे काकांच्या धाग्यावर याची समग्र माहिती मिळेल.

In reply to by ट्रेड मार्क

बार्क्लेज स्ट्रीटवर राहणार आहे कंपनीच्या गेस्टहाऊस वर. त्यामुळे बरीच ठिकाणे रोज येता जाता होऊन जातील. chipotle पिट्सबर्गमध्ये पण आहे. आवडले. चिकन खात असाल तर रस्त्यावर चिकन ओव्हर राईस मिळतो तो मस्त --- भारतात कोंबड्या चळा चळा कापतात मी आजूबाजूला दिसलो की. :)

In reply to by अभिजीत अवलिया

स्वतः चालवून जाण्यात मजा असते. आता तुम्ही तुम्हाला वाटेल तेव्हा रोड ट्रिपला जाऊ शकाल.

भारतातुन अमेरिकेत पार्सल पाठवायला कोणती सर्व्हिस चांगली आहे? भारतीय पोस्ट चांगलं आहे असं मागे कुठे तरी वाचलं होतं. ५ किलो वगैरे पाठवायची स्वस्तात सोय होत असेल तर चकल्या-लाडु मागविन म्हणते आईकडुन!!

In reply to by पिलीयन रायडर

अगं खास दिवाळीचा फराळ पाठवण्यासाठी कुणीतरी सेवा देतात. दर किलोप्रमाणे पैसे आकारतात बहुतेक. मैत्रिणीला विचारुन सांगते.

In reply to by रुपी

चितळे देतात ना. ऑनलाईन पण बुकिंग करता येतं. मागच्या वेळी बहिणीने एक पॅकेज (चितळ्यांकडचं नव्हतं) पाठवलं होतं. ते २ दिवसात आमच्याकडे आलं. त्यात रांगोळीचे छाप , फोल्ड केलेला कंदील, मोती चंदन, सुगंधी तेल, उटणं, ४ पणत्या आणि स ग ळा फराळ होता. चवीला उत्तम फराळ आणि अप्रतिम पॅकिंग ! फार म्हणजे फार छान वाटलेलं ते सरप्राईझ पॅकेज बघून. तुला देते मी तिला विचारुन त्यांचं नाव नंबर.

In reply to by पिलीयन रायडर

मी बर्‍याचवेळा युनिक कुरियर या पुण्यातल्या कुरियर सर्विसने वस्तु पदार्थ मागवले आहेत. कमीत कमी ८ किलो मागवावे लागतात (मग रेट चांगला मिळतो). त्यांचा माणूस घरी येऊन वस्तु पदार्थ मोजून पॅक करून घेऊन जातो. पुण्यातल्या बर्‍याच इतर कुरीयरवाल्यांपेक्षा यांचे दर कमी आणि सेवा चोख आहे. त्यांचा फोन नंबर +९१ ९८८११३८८१४. चितळे व इतरही काही लोक खास दिवाळी निमित्त फराळाचे कुरियर सकट पैसे घेऊन पाठवतात. कदाचित ते थोड स्वस्त पण पडत असेल. पण घरचे आईच्या हातचे पदार्थ आणि वस्तु यांची सर त्या फराळाला नाही. कोणाला दुसरी कुठली कुरियर सेवा स्वस्त आणि मस्त माहित असेल तर जाणून घ्यायला आवडेल.

पूर्वी जल्लोश डोट कॉमवरून लोक चितळे फराळ मागवून घेत असत पण आत्ता मला त्यांचं काही सापडत नाहीये.

केव्हाची एक इष्टुरी सांगायची आहे! झालं असं की माझ्या मुलाचे १० सप्टेंबरला इथल्या शाळेसाठी नाव नोंदवले. शाळेत प्रवेश मिळणार की नाही ते २ आठवड्याने कळणार होते. पण त्यांनी तिथेच सांगितले की "जिम" साठी तुम्हाला कार्डिओलॉजी क्लिअरन्स लागेल. तेव्हा कार्डिओलॉजिस्ट कडुन नोट आणा. मी तातडीने शोधाशोध सुरु केली. पण इथे डॉक्टर भेटणे इतके सोपे नाही. मला लक्षात आलं की असं लगेच कुणी सापडणार नाही तर पर्यायी व्यवस्था काय ते विचारायल हवं. म्हणुन मी त्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला आणि हे सर्व सांगितलं. तिथली व्यक्ति म्हणाली की कदाचित तुम्हाला शाळेत अ‍ॅडमिशन मिळणारच नाही. कारण ह्यावेळेस खुप नावं आली आहेत. तेव्हा आत्ताच गडबड करु नका. अ‍ॅडमिशन मिळाली की त्या शाळेच्या नर्सला जाऊन भेटा आणि मार्ग काढा. म्हणुन मग आम्ही हरी हरी करत स्वस्थ बसलो! २६ सप्टेंबरला पत्र आलं की पुढच्या सोमवार पासुन शाळेत या! मी दुसर्‍याच दिवशी शाळेत फोन केला आणि सगळं सांगितलं. म्हणलं माझ्याकडे भारतातुन आणलेले रिपोर्ट्स आहेत. हवं असल्यास भारतातल्या डॉक्टरांकडुन तात्पुरती नोट मागवते. नर्स म्हणे शाळेत भेटायला या उद्या. मी सगळी कागदपत्र घेऊन दुसर्‍या दिवशी शाळेत. तिथे मात्र न जाणे त्या बाईला काय वाटलं, कदाचित ऑपरेशनची केस असेल म्हणुन.. पण म्हणे जोवर तुम्ही ही नोट आणत नाही, मी शाळेत ह्याला घेऊ शकत नाही. म्हणलं अहो २ दिवसात कशी मिळणार मला नोट?? आणि पहिला दिवस अनुपस्थिती असेल तर तुम्ही कॅन्सल करता अ‍ॅडमिशन. ती म्हणे तुम्ही पुन्हा शिक्षण खात्याला फोन करा. मी काही करु शकत नाही. आम्ही युद्धपातळीवर आजुबाजुच्या हॉस्पिटल्सना फोन सुरु केले. सुमारे ५ तास आम्ही फोन करत होतो तेव्हा दुपारी ३:३० ला एन.आय.यु मध्ये लगेच पुढच्या दिवशीची वेळ मिळाली. आम्ही लगेच रिलॅक्स! पण हे होणे आमच्या नशिबातच नव्हते.. अर्ध्याच तासात त्या हॉस्पिटलचा फोन आला की आम्ही तुमचा इन्शुरन्स पाहिला. डिडक्टिबल मीट न झाल्याने उद्या तुमचा सगळा डिस्काऊंट वगैरे धरुन खर्च ३०००$ आहे. तेव्हा येताना किमान १५००$ तरी घेऊन या!! मी तिथल्या तिथे अपॉइंटमेंट कॅन्सल केली!! म्हणलं मुलाला घरीच शिकवु. =)) मग दुसर्‍या दिवशी शिक्षण खात्यात फोन केले. शाळेत केले. माझं म्हणणं असं की शाळेत घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. असं कसं तुम्ही प्रवेश नाकारता? मी आणते ना पिडीयाट्रिशनची नोट. जरा आवाज चढलाच माझा. मग नर्स म्हणे उद्या या काय ते घेऊन. दुसर्‍या दिवशी पिडीयाट्रिशनची नोट घेऊन जायच्या आधी सहज फोन केला तर म्हणे कोण तुम्ही? नाही नाही.. आत्ता येऊ नका. आता डायरेक्ट सोमवारी पहिल्या दिवशीच भेटु!! शिक्षण खातं म्हणे बघा बुवा.. तुमची मर्जी! जायचं तर जा, नसेल तर नका जाऊ =)) खरी गम्मत आता आहे.. हे सगळं चालु असतानाच मी दोन तीन दिवसांपुर्वीच बहुगुणी काकांना व्यनि केला होता की काही करु शकता का मदत? आणि मिपामित्र युएसए च्या चेपु ग्रुपवरही काका आहेत का इथे अशी विचारणा केली होती. जी पंतांनी पाहिली होती. बहुगुणींनी व्यनि वाचुन मला संध्याकाळी फोन केला. पण तोवर ५ तास सतत फोन करुन करुन माझा फोन बंद पडला. तर त्यांनी पंताना कळवलं की पिराला म्हणाव मला फोन कर. पंतानी मला कळवलंच पण बॅकप म्हणुन स्रुजालाही कळवलं. माझा फोन सुरु झाला की धडाधड मेसेज! मी तातडीने काकांना फोन केला. त्यांनी मला डॉ. प्रियांका ह्यांचा नंबर दिला. त्यांच्याशी मी बोलले. त्या म्हणाल्या की बघते काय करता येतं ते. त्या स्वतः फ्लोरिडामध्ये असल्याने त्यांनाही इकडचे काही माहिती नव्हते. पण दुसर्‍याच दिवशी सकाळी त्यांनी मला डॉ. सुनिल सहारन (कार्डिओलॉजिस्ट) ह्यांचा मेसेज फॉर्वर्ड केला की "मी करतो मदत. हा माझा मेल आयडी. लवकरात लवकर अपॉईम्ट्मेंट देतो". आम्ही लगेच त्यांना मेलने सर्व काही पाठवलं. त्यांनी स्वतः आम्हाला फोन केला. पैशाची काळजी करु नका म्हणे. इतके पैसे लागत नाहीत. आम्हाला तातडीने आजची वेळ दिली. आज मी त्यांना भेटुन आले. अत्यंत भारी मनुष्य आहे! व्यवस्थित तपासलं. ज्यांनी इको केला त्या डॉ. अंबिका नायर ह्यांनाही आधीच कळवुन ठेवलं होतं की असा असा एक मुलगा येतोय. त्या बाई दारात माझी वाट पहात उभ्या. त्यांनी "४५ मिनिट" इको केला!! मी आजतागायत एवढा डिट्टेल इको केलेला पाहिला नाही. बरं एवढंच नाही तर आम्ही डॉ. सुनिल ह्यांची बाहेर वाट पहात बसलो होतो तर "तुम्हाला भुक लागली असेल" म्हणुन हातात मावणार नाही इतकं काय काय खायला देऊन गेल्या!! विचार करा.. माझी आणि बहुगुणी काकांची ओळख फक्त मिपावरची..तरी मी त्यांना विचारलं.. त्यांनी डॉ. प्रियांकांना विचारलं.. त्यांनी डॉ. इतिशा ह्यांना विचारलं.. त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला विचारलं जिचा नवरा म्हणजे डॉ. सहारन!!! आणि ह्या माणसाने आऊट ऑफ द वे जाऊन आम्हाला स्वतःहुन फोन करुन अगदी इन्शुरन्स पासुन सगळी मदत केली! हे सगळं घडलं केवळ मिपामुळे!! आणि बहुगुणींसारख्या मिपाकरांमुळे! जियो मिपा!! (बादवे.. मी शाळेत भांडुन भुस्क्ट पाडुन अबीरला घ्यायलाच लावलं. असं हार्ट हिस्टरी आहे म्हणुन कुणी माझ्या पोराला घरी बसवायला पाहिल तर कोण ऐकुन घेणार?!)

In reply to by पिलीयन रायडर

वा वा वा वा... बहुगुणी काका, स्नेहाताई ह्यांनी नजिकच्या काळात फार छान अनुभव दिलेत. अभिनंदन. घे आणि तुला भांडुन व्हिसा नाही तरी अ‍ॅडमिशन पदरात पाडण्याची संधी मिळाली. आता हौस फिटली म्हण आणि बोअरिंग बना दो जी अब इस के बात अमेरिका को असं सांग देवाला ;)

In reply to by स्रुजा

वा वा वा वा... बहुगुणी काका, स्नेहाताई ह्यांनी नजिकच्या काळात फार छान अनुभव दिलेत. >> सहमत आहे :)

In reply to by पिलीयन रायडर

हाबिनंदन. एक सहज शंका. इथे शाळेत प्रवेश घ्यायला मुलांना इंग्रजी यावे लागते का अगोदरपासून? जर लागत असेल आणी पुढे मागे मला कधी जास्त काळासाठी अमेरिकेत राहावे लागले तर समस्या येईल का? कारण माझा मुलगा मराठी माध्यमात शिकतो.

In reply to by अभिजीत अवलिया

इंग्रजी आलेलं बरं असतं. माझा मुलगा इंग्रजी माध्यमात शिकला होता एक वर्ष, म्हणुन त्याला थोडं कळायचं. पण बोलता येत नव्हतं. इथे येऊन ३ महिने इथल्या लोकांशी बोलुन आणि पेपा पिग सारखे कार्टुन्स पाहुन पाहुन तो उत्तम इंग्रजी बोलायला शिकला. आता शाळेत काही त्रास नाही. पण नशिबाने त्याच्या शिक्षिका भारतीय आहेत! पण अजुन एक महत्वाचं.. माझा मुलगा ४ वर्षाचा आहे म्हणुन त्याला गरज पडली नाही. पण ५व्या वर्षापासुन पुढे अ‍ॅडमिशनच्या वेळेला मुलाला इंग्रजी येत नसेल तर खास एक प्रोग्राम आहे - मल्टिलिग्वल का काहितरी.. आत्ता लिंक सापड्त नाहीये. ते बहुदा मदत करतात अशा मुलांना. त्यांच्याकडुनच अ‍ॅडमिशन होते ह्या मुलांची. इथे इंग्रजी येत नसलेल्या मुलांची फार काळजी घेतली जाते. तेव्हा तुम्ही काळजी करु नका. शाळा ती करेलच!

In reply to by पिलीयन रायडर

माहितीबद्दल धन्यवाद. माझ्या मुलाचे वय पण ४ आहे. घरी थोडेफार इंग्रजी शिकवून ठेवले पाहिजे म्हणजे.

In reply to by अभिजीत अवलिया

मग काळजी करू नका. मुले अगदी पटापट शिकतात. जरुरीचे शब्द, आपल्या गरजा एवढे शिकवून ठेवल्यास सोपे होईल.

In reply to by अभिजीत अवलिया

पेपा पिग, थॉमस, चक असे कार्टुन दाखवा १ २ महिने मुलं आपोआप शिकतात...

In reply to by अभिजीत अवलिया

भारतातल्यासारखा इथल्या शाळांमध्ये इंटरव्ह्यू नसतो. ते फक्त मुलाला एकदा बोलतं करायचा प्रयत्न करतात. फक्त थोडंफार इंग्लिश कळेल एवढं बघा. पण नाही आलं तरी काही फरक पडत नाही. माझी मुलगी ४ वर्षांची असतानाच अमेरिकेत आली. इंग्लिश येत नव्हतंच त्यात ती प्रचंड लाजाळू होती. आई आणि बाबा सोडून दुसऱ्या कोणाशी बोलणे तर दूरच पण बघायचीसुद्धा नाही. पण तिला शाळेत काहीच त्रास नाही झाला ना ऍडमिशनला ना नंतर कधी. आता म्हणजे ही तीच मुलगी आहे हे खरं वाटणार नाही एवढी बदलली आहे. टिवटिव म्हणल्याप्रमाणे इथले कार्टून्स (Curious George, Cat in the hat हे पण चांगले आहेत) दाखवा आपोआप इंग्लिश सुधारेल. भारतातून जरी थोडी मोठी मुलं इथे आली तरी काही त्रास नसतो. इथे फक्त इंग्लिश किती येतंय हे समजून घेण्यासाठी एक परीक्षा घेतात. त्याच्या रिझल्ट प्रमाणे ते ठरवतात त्यांना कसं ट्रेन करायचं ते. ESL (English as secondary language) म्हणून एक वेगळा वर्ग असतो. हा फक्त १ तासाचा वेगळा वर्ग घेतात (शाळेच्या वेळेतच) ज्यात शिक्षक एशियन असतात. भारतीय मुलं साधारणतः १ वर्षात पूर्ण तयार होतात. परंतु बाकी एशियन देशातली किंवा ME मधली मुलं इंग्लिशच्या बाबतीत फारच मागासलेली असतात. ते जास्तीत जास्त ३ वर्षे ESL मध्ये जाऊ शकतात. त्यामुळे चिंता नसावी. अधिक माहिती हवी असेल तर मला व्यनी करा, मला जेवढं माहित आहे ते सगळं सांगीन.

In reply to by पिलीयन रायडर

अभिनंदन! इंटरेस्टींग ष्टोरी. बहुगुणींचेही आभार.

In reply to by रेवती

पिरा यांचे अभिनंदन. अवलिया साहेब, भारतात जेवढं इंग्रजीचं स्तोम माजवलं गेलंय तेवढं काही घाबरायची गरज नाही.

In reply to by खटपट्या

भारतात जेवढं इंग्रजीचं स्तोम माजवलं गेलंय तेवढं काही घाबरायची गरज नाही. --- मला पण असंच वाटतं. बऱ्याच नातेवाईकांनी 'इंग्रजी माध्यमातच घाला' अशा ढुश्या देऊन पण मी मुलाला मराठी शाळेत घातले. ऑफिस मधील बरेच सहकारी अधून मधून मराठी माध्यमात घातले म्हणून चोचा मारत असतातच. मी मुलाचे आयुष्य बरबाद करत आहे असे बोलून दाखवतात. मी शक्यतो कुणाला वाईट वाटू नये म्हणून प्रत्युत्तर करत नाही पण आता कुणी मराठी माध्यमात घातले म्हणून चोच मारली की एक सर्जिकल स्ट्राईक करणार आहे अशा माणसांवर.

In reply to by अभिजीत अवलिया

करत जा प्रत्युत्तर. हे असलं काही तरी नाक खुपसुन त्यांनी स्वतःला वाईट वाटुन घेण्याची सोय आधीच करुन ठेवली आहे. त्यामुळे तुम्ही बिन्धास बोला. आणि तसंही हल्ली मराठी शाळेत पण पहिलीपासून च ए बी सी डी पण शिकवतात ना? ६ व्या ऐवजी १० व्या वर्षी शिकली मुलं ईंग्रजी बोलायला तर काय आभाळ कोसळणार आहे?

In reply to by पिलीयन रायडर

तुमचं काम झालं ते एकदम छान झालं. डॉ. शर्मांशी संपर्क न झाल्याने मला पण चुटपुट लागून राहिली होती. जियो मिपा, मिपाकर बहुगुणी काका आणि डॉक्टर सुद्धा. शाळेत मराठीत भांडला नसाल आशा करतो (ह घ्या). मला अजूनही इंग्लिशमध्ये भांडताना कॉन्फिडन्स येत नाही आणि मजा तर अजिबात येत नाही.

In reply to by ट्रेड मार्क

मजा नाही आली. पण सात्विक संताप झाली की आपोआप इंग्रजीतुन भांडण आतुन बाहेर पडलं! अधुन मधुन मी इंग्रजी वाक्यात "नाही पण.." ... "हो हो".. "चालेल की" वगैरे शब्द अगदी व्यवस्थित वापरते!!

सध्या वास्तव्य प्रिन्स्टन मध्ये आहे... कुणी मिपाकर आहेत का आजूबाजूला... तसाच शाळे संबंधी माहिती हवी आहे...

पिरा, छान अनुभव शेअर केलास अ‍ॅडमिशनचा..आणि इंग्रजी बोलण्याचे भारतात असलेले स्तोम बघून अमेरिकेत खरच सुखद परिस्थिती आहे म्हणायच..आपल्याकडे किती बागुलबुवा केला जातो.

खरं तर इंग्रजी बोलण्याबद्दल मी थोडं वेगळंही ऐकलं आहे. स्वतःचा अनुभव नाही अजून कारण मुलं लहान आहेत, पण नातेवाईकांचाच आहे त्यामुळे १००% खरा आहे हे माहीत आहे. तर त्यांच्या दोन्ही मुलांना शाळेत जायला लागल्यावर जास्त इंग्लिश बोलायला शिकवा असे सांगितले गेले होते. मग अचानक घरी मातृभाषेतून बोलणे बंद करुन पूर्ण इंग्लिश असा मारा सुरु झाला. काही काळाने पोरं फक्त इंग्लिशमधून बोलायला लागली. त्यामुळे आजीआजोबांशी तर संवाद जवळजवळ संपलाच. त्यांचा मोठा मुलगा हायस्कूलमध्ये असताना आम्ही त्याला आग्रह करायचो मराठीत बोलायचा तेव्हा तो म्हणाला मी लहान असताना बोलायचो तेव्हा मला रागावून इंग्लिशमध्ये बोलायला लावायचे, आता मी इंग्लिशमध्ये बोलतो म्हणून तक्रार का? त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित लहान असतानाच दोन्ही भाषेतून संवाद चालू राहिला तर अशी वेळ येणार नाही. एका मिपाकरांच्याच ७वी- ८वीतल्या मुलाला व्यवस्थित मराठीत बोलताना ऐकून विचारले तेव्हा त्यांनीही असेच सांगितले होते. नक्की सर्वांबरोबरच असे होईल की नाही माहीत नाही. पण आपणही भारतात लहानपणीपासून २-३ भाषा शिकत-बोलत असतो आणि अजूनही बोलू शकतो त्यावरुन हे शक्य आहे असे वाटते.

In reply to by रुपी

हे अगदी खरं आहे. हा प्रकार मी सुद्धा इथे पाहिला. मुलं इंग्रजीच बोलतात. म्हणुन मी पहिल्यापासुनच मराठीत बोलते. आणि काय जे असेल ते एकाच भाषेत. उगाच तुला अ‍ॅप्पल हवं का? असं धेडगुजरी नाही. ज्या गोष्टी त्याला कदाचित शाळेत बोलाव्या लागतील (जसं की "मला तुमचं बोलणं समजलं नाही, परत सांगाल का?" टाईप वाक्य) त्या सांगताना पुर्ण इंग्रजी मध्येच काय ते बोलायचं. पण मराठी मात्र सोडायची नाही. मी इथल्या सर्व फॉर्म्स मध्येही "घरात कोणती भाषा बोलता? तुम्हाला (समजा शक्य झालंच शाळेला तर) कोणत्या भाषेत आमची पत्र आलेली आवडतील" वगैरे सर्व प्रश्नांना "मराठी" हेच लिहीलं आहे. इथेही "तुम्ही कुठुन आलात" ह्याचं उत्तर मोघम इंडिया किंवा महाराष्ट्र न देता "पुणे, महाराष्ट्र" असंच देतो. मुलालाही तेच सांगतो. इथे लोक गलेच "पुना" म्हणायला जातात, पण तातडीने तिथेच "नाही.. पुणे" असं सांगतो. इथे येऊन माझा जाज्वल्य अभिमान अजुन वाढिला लागलाय!! =)) आणि पुण्यात बिहारी लोक हेच करायचे तेव्हा मी बोंबा ठोकायचे! =))

In reply to by पिलीयन रायडर

ही मीही शक्य तितके एकाच भाषेतले शब्द वापरते शक्यतो. पण अ‍ॅपल मुळात भारतात आणलंच अमेरिकन माणसाने. आणि "सफरचंद" शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली असावी याचा शोध घेतल्यावर मला तरी काही सापडलं नाही :)

माझी सव्वादोन वर्षाची मुलगी घेऊन अमेरीकेत मी जेव्हा दाखल झाले तेव्हा माझ्या जीवाला घोर लागून राहिला होता की ती इथल्या डे केअर कम प्ले स्कुल मधे कशी काय रूळेल. दिवसाचे ८ तास तिला ठेवावं लागणार होत आणि तिथे एकही मराठी किंवा गेलाबाजार भारतीय माणूस शिक्षक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून नव्हते. आम्ही पहिल्या दिवशी तिथे गेल्यावर माझी लेक लगेच त्या अनोळखी मुलांबरोबर खेळायला पण लागली. आम्ही आमची काळजी बोलून दाखवली की हिला अजिबात इंग्लिश कळत नाही. त्यावर तिथले व्यवस्थापक व मुख्यशिक्षक दोघांनी आम्हाला काळजी करू नका व सुरवातीला थोड अवघड जाईल पण ती लहान असल्यामुळे लवकर तिथे रुळेल असा विश्वास दिला. पहिले काही दिवस त्यांनी साईन लँग्वेज मधे तिच्याशी बोलण सुरू केलं. पुढच्या महिन्या दिड महिन्यात ती पण हळू हळू इंग्लिश बोलायला शिकली. आता तर ती फक्त इंग्लिशच नाही तर स्पॅनिश पण सफाईदार बोलते (त्या डे केअर मधे बहुतांश लोक स्पॅनिश पण बोलतात). काही वेळा तिचं अमेरिकन अ‍ॅक्सेंट मधलं इंग्लिश मला नाही कळल तर मराठीत भाषांतर करून किंवा खुणांनी सुधा ती सांगते. हे सगळं फक्त गेल्या ८ महिन्यात झालं आहे. इथल्या डे केअर वाल्यांनी आपली मराठी शिकण्याचा देखील प्रयत्न केला. तिच्या साठी सुरवातीला पाणी, जेवण, झोप, खेळणे व अजून बर्याच गोष्टींसाठी त्यांनी चित्र व्हिडियो अश्या गोष्टी पण तयार केल्या होत्या जेणे करून तिला काय म्हणायचय ते त्यांना आणि त्यांच म्हणण तिला कळेल. घरात नवनीन मराठी शब्द शिकवण तर चालू आहेच. मी मुद्दाम मराठी बालगीतं, गोष्टी तिला लावून देते जेणे करून आपल्या लहानपणी ज्या गोष्टी आपण शिकलो त्या तिला कळतील आणि मराठीचा तिचा शब्दकोषही समृध्द होईल. तसेच संस्कृत श्लोक, शुभंकरोती, मराठी बाराखडीची ओळख या गोष्टी पण सुरू ठेवल्या आहेत. मुद्दा काय तर इथले लोक, शाळा तुम्हाला एखादी भाषा येत नाही म्हणून दुर्ल्क्ष न करता उलट खास लक्ष देऊन ते करवून घेतात. त्यामुळे भाषा येत नाही म्हणून फारस अडत नाही. तसचं लहानपणी ५-१० वर्षापर्यंत मुलांना जितक्या जास्त गोष्टी, भाषा कानावर पडतील तेव्हढ्या ते लगेच आत्मसात करू शकतात.

इथे कुणी मला ७-८ दिवसांच्या वेस्ट कोस्टच्या ट्रिप संदर्भात माहिती देईल का? माझ्या डोक्यात सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एन्जिलिसचा युनिव्हर्सल स्टुडिओ करायचे नक्की आहे. आता अजुन काय पाहु ते सांगा. शिवाय रहाण्याचे चीप ऑप्शनही सांगा :)

In reply to by पिलीयन रायडर

माझा पण अशी ट्रिप करायचा विचार आहे.प्रतिसादांच्या प्रतीक्षेत ...

In reply to by राघवेंद्र

इकडे एक Lassen Tours म्हणून आहे, त्यांची ३ दिवसांची टूर आईबाबांनी घेतली होती, अनुभव चांगला होता. ७-८ दिवसांची टूर आहे, त्याचा अनुभव नाही. पण त्यात मुकामाचे ठिकाण वगैरे सर्व त्यांनी ठरवलेलेच असते. दुसरा पर्याय म्हणजे स्वतः कार रेंट करुन हवे तसे फिरणे आणि सोयीची हॉटेल्स शोधणे. युनिव्हर्सलला जाण्यासाठी सोयीच्या एका हॉटेलचा अनुभव चांगला आहे, माहिती हवी असेल तर व्य.नि.तून कळवते.

In reply to by रुपी

हो नक्कीच. मला कळवच. पण इन जनरल काय काय पहायला आहे हे सांगितलंस तर अनेकांना उपयोगी पडेल.

In reply to by पिलीयन रायडर

हो, व्यनितून हॉटेलची माहिती देऊ शकते. काय काय पाहायला आहे, थोडी चर्चा मागच्या पानावर आहे, माझी भर म्हणजे युनिव्हर्सल पाहणार असाल तर मुलासाठी डिस्नेलँडही करावं - अर्थात त्याच्या वयासाठी योग्य बर्‍याच राइड्स असतील तर. इडोने लिहिलंय तसं योसेमिटी चांगलं आहे, पण आत्ता हिवाळ्यात काही वेळा रस्ते बंदही असतात, तोही विचार करुन ठेवावा लागेल. मिस्टरी स्पॉटही शक्यतो बघाच.