Skip to main content

इंग्रजी स्पेलिंग्ज इतकी तर्कशून्य का?

लेखक स्वीट टॉकर यांनी मंगळवार, 16/02/2016 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझं शिक्षण मराठी माध्यमातून मजेत चाललं होतं. पण मुंबईला स्थलांतरित झालो, आणि समस्या उभी राहिली. जवळच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळेना. किंग जॉर्ज शाळेत त्याच वर्षी इंग्रजी माध्यम सुरू होत होतं. तिथे प्रवेश मिळाला आणि मी रुजू झालो. नशिबानी माझे सगळेच वर्गमित्र मराठी माध्यमातून आले असल्यामुळे आम्ही सगळेच बावचळलेले असायचो. आमचे इंग्रजीचे शिक्षक अतिशय उत्तम शिकवायचे. थोड्याच महिन्यात त्यांनी आम्हाला अज्ञानाच्या चिखलातून काढून गोंधळाच्या धुक्यात आणून सोडलं. पण ती चूक आमच्या शिक्षकांची अजिबात नव्हती. इंग्रजी भाषेची होती. त्यांनी आम्हाला उच्चारांचे नियम शिकवले. A चा उच्चार ऍ किंवा अ, e चा ए, i चा इ, o चा ओ किंवा ऑ, u चा उ किंवा अ, डबल ई चा ई, डबल ओ चा ऊ वगैरे वगैरे. आम्ही ते आज्ञाधारकपणे पाठ केले. वापरायला सुरवात केल्यावर मात्र असं लक्षात आलं की जितके शब्द नियमात बसतात तितकेच नियमबाह्य आहेत. आपण मराठीत अपवाद हा शब्द वापरतो कारण नव्व्याण्णव टक्के नियमात, म्हणून एक टक्का अपवाद. इथे अपवादच अपवाद. मग नियमांना किंमत काय? आमची स्थिती पुण्यामध्ये वन वे रस्त्यावर योग्य दिशेनी वाहन चालवणार्यासारखी व्हायची. इतकी वाहनं चुकीच्या दिशेनी येतात की आपणच चुकतो आहोत की काय असं वाटायला लागतं. दुहेरी वाहतुकीच्या रस्त्यावर आपण डाव्या अर्ध्यामध्ये चालवतो. पण या वन वे मध्ये उलटे येणार्यांची एक खासियत असते. एकदा दिशेचा नियम मोडलाच आहे म्हटल्यावर यांना डाव्या उजव्याचंही सोयरसुतक राहात नाही. कुठूनही येतात. मात्र हेडलाइट लावून. चोरोंके भी असूल होते हैं ! इंग्रजीचे शब्दही असेच. ‘डबल ओ’ चा उच्चार ‘ऊ’ होतो हे आम्हाला पाठ. लुक, बुक वगैरे. मग ‘ब्लुड’ का नाही? त्याचा उच्चार ‘ब्लड’ करावा हे कुणी ठरवलं? असं आहे का, की ‘ब्लुड’ अशा उच्चाराचा दुसरा एखादा शब्द आहे आणि त्याचा आणि blood या शब्दाचा गोंधळ होऊ नये म्हणून एक विचारी भाषाशास्त्रज्ञानी हा निर्णय घेतला? अजिबात नाही. म्हणजे हा पूर्णपणे Random Decision आहे. एक महत्वाची गोष्ट नेहमी आपण शिकतो. ती म्हणजे कुठल्याही बाबतीत Random Decision घ्यायचा नसतो. प्रत्येक निर्णय हा उपलब्ध माहिती (Available Data) आणि तर्क (Logic) यावरच घ्यायचा. मग याच भाषेच्या बाबतीत असं का? बरं, आता कुठला शब्द नियमाप्रमाणे उच्चारायचा आणि कुठचा वेडावाकडा हे आम्हाला कसं कळणार? तर ते ‘ऑक्सफोर्ड’ नावाच्या शब्दकोशातून. ‘ऑक्सफोर्ड’ ह्या शब्दाची उत्पत्ती ‘ऑक्स-फोड’ या जोडशब्दात आहे. त्याबद्दल मी पुढे तुम्हाला सांगेनच. War ‘वॅर’ नव्हे, वॉर. Son सॉन नव्हे, सन. ‘ow’ हे n च्या नंतर लागले, उदा. now, की त्याचा उच्चार औ. तेच ‘ow’ हे n च्या आधी लागले, उदा own, की त्याचा उच्चार ओ. One म्हणजे ‘वन’. ह्यातला ‘व’ हा उच्चार कुठून आला? देवास ठाऊक ! Know - सुरवातीला k लावायचा, शेवटी w लावायचा. का ? वेळगंमत म्हणून ? उदाहरणं द्यावी तितकी थोडी. पण ते जाऊ द्या. कळस म्हणजे निःशब्द (silent) अक्षरं ! ती पाठ करायची, लिहायची देखील. पण उच्चार करायचा नाही ! म्हणजे खिसा खालून न शिवण्यासारखं. दिसतो खिशासारखा, आत हात देखील घालता येतो. पण काही ठेवलं की खालून बाहेर पडतं ! हॅ हॅ हॅ हॅ ! याला भाषा म्हणायची, विनोद म्हणायचा का अक्कलशून्यपणा? या सगळ्यांचा बाप म्हणजे silent & anti-silent अक्षरं एकत्र ! काही लिहिलेली अक्षरं वाचायची पण त्यांचा उच्चार करायचा नाही. त्याऐवजी एक न लिहिलेलं अक्षर तिथे आहे अशी कल्पना करायची आणि त्याचा उच्चार करायचा ! शब्द आहे ‘कर्नल’. स्पेलिंग आहे colonel. ‘एल्’ चा उच्चार करायचा नाही. त्याच्या नंतरच्या ‘ओ’ चा ही उच्चार करायचा नाही. त्या दोघांऐवजी तिथे ‘आर’ आहे अशी कल्पना करायची, आणि त्याचा उच्चार करायचा. आधीच्या ‘ओ’ चा उच्चार ‘अ’ असा करायचा. सोप्पं आहे की नाही? थोडक्यात काय, तर नुसता नियम माहीत असून काहीही उपयोग होऊ नये, सगळे शब्द पाठच करायला लागावे अशी व्यवस्था केलेली आहे. शालेय जीवनातलं समांतर उदाहरण द्यायचं म्हटलं तर असं म्हणता येईल. शाळा जर मोठी असेल तर शाळेच्या इमारतीच्या तळमजल्यावर कोठला वर्ग कुठे आहे याचा नकाशा लावलेला असतो. शिवाय साधारणपणे एकाच इयत्तेचे वर्ग एका मजल्यावर असतात. प्रत्येक वर्गावर इयत्ता आणि तुकडी लिहिलेली असते. असं समजा की कुठलाही वर्ग कुठेही भरवला, एकाही वर्गावर इयत्ता आणि तुकडी लिहिली नाही तर काय होईल? मुलं आणि शिक्षकांना ते समजेपर्यंत भटक भटक भटकायला लागेल. पालक तर हरवूनच जातील. वर म्हणायचं, “त्यात काय इतकं? एकदा पाठ झालं की काही प्रॉब्लेम येत नाही!” असं तर काही शक्य नाही की कित्येक भाषापंडित एकत्र बसले आणि त्यांनी ठरवलं, “आपण एक तर्कशून्य स्पेलिंग आणि उच्चार असलेली भाषा बनवूया.” मग ही भाषा अशी झाली तरी कशी? मला माहीत आहे याचं कारण. एकदा भाषांतरदेवी माझ्या स्वप्नात आली होती. तिनी मला सांगितलं. मी तुम्हाला सांगतो. सुरवातीला इंग्रजी भाषेची स्पेलिंग व्यवस्थित होती. रक्त blud होतं, लिहिणं rite होतं, बिबट्या lepard होता, साखर shugar होती. इंग्लंडमध्ये राजेशाही होती. अर्थातच सामान्य जनतेची मुलं शाळेत जात होती. राजाचा मुलगा शाळेत कशाला जाईल? शिक्षकच राजवाड्यात येऊन त्याला शिकवत. एक दिवस राजकुमाराचं इंग्रजीचं शिक्षण चाललं होतं. शिक्षकांनी त्याला ‘रॉन्ग’ चं स्पेलिंग विचारलं. राजकुमारानं बुद्धी राणीकडून घेतलेली होती. त्याला काही केल्या ‘रॉन्ग’ चं स्पेलिंग आठवेना. त्यानी अंदाजानी ठोकून द्यायला सुरवात केली, “डब्ल्यू . . . . आर. . . .”. “नाही. बाळराजे”, शिक्षकांनी हळुवारपणे हस्तक्षेप केला. (अर्थातच 'हळुवारपणे'. राजकुमाराच्या कानाखाली आवाज काढायची कुणा शिक्षकाची शामत असते काय?) "तुमचं स्पेलिंग चुकतंय बाळराजे." आपल्या सर्वांच्या दुर्दैवानी नेमकी तेव्हांच राणी शेजारून चालली होती. आपल्या बाळराजाचं स्पेलिंग चुकलं ? हे कसं शक्य आहे ? तिनी स्वतः मुलाला रॉन्गचं स्पेलिंग विचारलं. त्या म्हशाच्या डोक्यात ‘डब्ल्यू’ घट्ट बसलेला होता. त्यानं सांगितलं “डब्ल्यू आर ओ एन जी – रॉन्ग”. राणी काळजीत पडली. उद्या हा गादीवर बसला की त्याचं हसं होईल. काय करावं ? जर महम्मद डोंगरापर्यंत जाणार नसेल तर डोंगरच महम्मदकडे आणावा. तिनी बाळराजांना सगळ्या शब्दांची स्पेलिंग विचारली. त्यानी मनाला वाटेल ती उत्तरं दिली. सगळी नोकरांकरवी लिहून घेतली गेली. दुसर्या दिवशी इंग्लंडभर दवंड्या पिटल्या गेल्या. “आत्तापासून ही नवीन स्पेलिंग बरोबर धरली जातील. जुनी विसरून जा.” हे सगळं होत असताना राजा स्वारीला गेलेला होता. परत आल्यावर त्याला ही हकीकत समजली. तो हैराण. हा मूर्खपणा त्याला अजिबात पसंत नव्हता. पण राजा असला तरी तो नवरा होता. राणीच्या हट्टापुढे तोही हतबल. आपल्या पु.लं. नी देखील एका कथेत लिहिलं आहे – रामरायाला काय म्हाइत नव्ह्तं काय का सोन्याचं हरीन बिरीन काय पन नसतं मनून? पन बायकोच्या हट्टापुडं कोनाचं काय चालनार? शीतामाई म्हनली असती, “खा कंदमुळं अन् कोपर्यात पडा चीप.” तो गेला आनायला अन् रामायन घडलं. सांगायचा मुद्दा काय, तर राजाराणीचा जाम वाद झाला पण नेहमीप्रमाणे राणी जिंकलीच. आपला पोरगा शुद्ध बैलोबा आहे हे राजाला माहीत होतं. त्याचं थोबाड फोडायला राजाचे हात शिवशिवत होते पण तो तर राणीसाहेबांचा लाडका. त्यामुळे प्रत्यक्षात नाही तर निदान प्रतीकात्मक तरी फोडायचं राजाने ठरवलं. म्हणून या नवीन स्पेलिंग्जचा जो शब्दकोश बनवला त्याला नाव त्यानी ठेवलं बैलाची धुलाई अर्थात ‘ऑक्स-फोड’. याच शब्दाचा पुढे अपभ्रंश ‘ऑक्सफोर्ड’ असा झाला. तेव्हांपासून ऑक्सफोर्ड शब्दकोशाला जगन्मान्यता मिळाली आणि त्यातली स्पेलिंग आणि उच्चार आपल्या मानगुटीवर बसले ते आजपर्यंत ! वाईटातही चांगलं शोधायलाच हवं. जर का तेव्हां राजकुमाराचा गणिताचा किंवा विज्ञानाचा अभ्यास चालला असता तर? गेलो असतो सगळे अबाउट टर्न करून परत अश्मयुगात !

वाचने 47027
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

In reply to by रॉजरमूर

जेव्हा ब्रिटिशांनी बेळगाव हा शब्द प्रथम ऐकला असेल तेव्हा तो बेळगांव असा अनुस्वारयुक्त ऐकला असेल. आता इंग्रजी स्पेलिंगमध्ये या अनुस्वाराला नक्की कुठे बसवले असता 'बेळगाव' या उच्चाराच्या जास्तीत जास्त जवळ जाणारा उच्चार साधता येईल असा प्रश्न त्यांना नक्कीच पडला असेल. आपला 'आ' हा उच्चार तंतोतंत त्यांच्याकडे नाही. फादर, रादर, आस्क यातले आ थोडे भिन्न आहेत. तेव्हा त्यांनी Belgaon' हे त्यांच्याकडून त्यातल्या त्यात बरोबर उच्चार होईल असे स्पेलिंग बनवले. महाराष्ट्राबाहेरील गावांची नावे ही मराठीतल्याप्रमाणे उच्चारली जात नाहीत. तेव्हा आपण जरी गाव असा उच्चार केला तरी इतर लोक गांवच म्हणणार. वसईंचे बसीन हेही उच्चारानुसार झाले आहे. मूळ वसईं हा उच्चार स्थानिक बोलीत अनुस्वारयुक्त होता. अजूनही जुने मूळ स्थानिक लोक वस्सईं असेच म्हणतात. अय किंवा अई या उच्चारासाठी पोर्तुगीज़ आणि कित्येक अन्य भाषांमध्ये ei (Einstein) हे वर्ण वापरले जातात. आणखी म्हणजे आपला जो जोरकस 'व' आहे तो त्यांच्यात नाही. w चा त्यांचा उच्चारही वेगळा आहे. हे सर्व लक्षात घेऊन त्यातल्या त्यात योग्य उच्चारी असे Bassein हे स्पेलिंग बनवले गेले. चंडीगढ किंवा इतर अनेक गढी-गढांचे आणि 'ड'युक्त शब्दांचे उत्तरभारतीय, पंजाबी उच्चार आपल्यासारखे नाहीत. त्यांच्याकडे एक अधिकचा नुक्तावाला ढ, ड असतो आणि त्याच्या उच्चार आपल्यापेक्षा वेगळा, थोडा हलका असतो. तो इंग्लिशमध्ये त्यातल्या त्यात 'rh' दाखवता येतो. खडकीचेही तसेच आहे. 'के' चा त्यांचा उच्चार ख होतो ( उदा फिख्याड्ली) आणि ड चा 'r' च्या जवळपास. म्हणून त्यांना योग्य उच्चार करता येईल असे Kirk-i' हे स्पेलिंग त्यांनी बनवले. इंग्रज लोक नामकरण, लेखन या बाबतीत दक्ष असत.

रॉजर मूर - तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. आपल्याला आता सरळ सोपी स्पेलिंग्स करायला काहीच हरकत नाही. आ ला डबल ए वापरावा.

मार्मिक गोडसे - मी शिकलो होतो त्याप्रमाणे तो शब्द okay असा आहे. त्या चा शॉर्ट फॉर्म OK असा झाला. खरं खोटं देव जाणे!

मस्त, खुसखुशीत लेख.. बहुगुणी आणि गॅरी ट्रुमन साहेबांचा प्रतिसादही चपखल..
“Never make fun of someone who speaks broken English. It means they know another language.”
क्या बात हैं..

बर्नॉर्ड शॉने इंग्रजी भाषेच्या वैशिष्ट्यांची व वैगुण्यांची भरपूर टिंगल केलेली आहे. फिशचे स्पेलिंग जी एच ओ टी आय असे होऊ शकते असे त्याचे विधान प्रसिद्ध आहे. फ, इ, श वगैरे उच्चार अन्य शब्दांत जी एच, ओ व टी आय अशा अक्षरांनी निर्माण केले असतात त्यावर त्याची ही मखलाशी होती. त्याचे असेही वाक्य आहे की एका इंग्रजाने (बोलण्याकरता) तोंड उघडले की दुसर्‍या कुठल्यातरी इंग्रजाला त्याच्या बोलण्याचा तिटकारा वाटलाच समजा! (म्हणजे, इंग्रजी बोलण्याच्या अनेक पद्धती आहेत आणि त्या प्रकारे बोलणारे एकमेकाला पाण्यात पहातात). पूर्वी हे इंग्लंडच्या विविध भागात चालत असेल. पण आज ते जगभराच्या दूरदूरच्या कानाकोपर्‍यात होत असल्यामुळे ते जास्त जाणवेल. अजून एक शॉचे वाक्य : इंग्लंड आणि अमेरिका हे एका समान भाषेने विभागले दोन देश आहेत! अशी एक किंवदंता आहे की फार पूर्वी इंग्लंडच्या एका शहरात एका श्रीमंत माणसाने पैज लावली की २४ तासात एक नवा शब्द मी इंग्रजी भाषेत आणून दाखवीन. मग त्याने एका दिवसात जवळपासच्या सगळ्या गावात नोकर पाठवून एकच शब्द जिथे मिळेल तिथे, भिंतीवर, फलक ठोकून रंगवला. एका दिवसात तो शब्द सगळ्यांच्या तोंडात आला आणि तो माणूस पैज जिंकला. आज फेसबुक आणि ट्विटर् असल्यामुळे ते जास्त सहज शक्य आहे. तो शब्द म्हणजे क्विझ. (ही बहुधा एक दंतकथा आहे!) डेट (कर्ज), रिसिट, डाउट (आणि इतर) ह्या शब्दांतले उपटसुंभ बी आणि पी हे नंतर घुसवलेले आहेत. जुन्या इंग्रजी भाषेतील मूळ शब्दात ही अडगळ नव्हती. पण काही ढुढ्ढाचार्यांना असे वाटले की ज्या मूळ लॅटिन शब्दापासून हे शब्द बनले आहेत त्यांच्याशी जास्त साम्य असणारी स्पेलिंगे बनवली तर इंग्रजीची शान वाढेल आणि म्हणून ही अनुच्चारित अक्षरे चक्क घुसडली आहेत!

लेख आवडला. खुसखुशीत लिहिलंय. प्रतिसादही माहितीपूर्ण. पण अशा गमती जमती प्रत्येक भाषेत असतील. फोनेटिक असूनही जर्मन भाषेच्या इतर अनेक गमतीजमती आहेत, फोनेटिकलाही काही अपवाद आहेत. एक साधा शब्द जर इतर ४ भाषांमध्ये ३ अक्षरी असेल, तर जर्मन मध्ये तोच शब्द १५ अक्षरी असू शकतो. जर्मन भाषेतील विचित्र नियमांबद्दल, शब्दांबद्दल अनेक विनोदी लेख, व्हिडिओ देखील बरेच आहेत आणि ते पटतातही. जेवढा त्या भाषेशी संबंध येतो, तसे ते लक्षात येऊ लागतात. प्रत्येक प्रांतागणिक बोलीभाषा अजूनच वेगळी आहे. इंग्रजीची सवय असल्यामुळे असेल पण सतत जर्मन बोलावे लागले तर इंग्रजी सुद्धा खूप सोपी वाटते बरेचदा. :)

In reply to by मधुरा देशपांडे

एक साधा शब्द जर इतर ४ भाषांमध्ये ३ अक्षरी असेल, तर जर्मन मध्ये तोच शब्द १५ अक्षरी असू शकतो.
या कारणामुळे मी पुस्तके वाचून जर्मन शिकायचा नाद सोडून दिला--एकदा नाही तर दोनदा.एवढे लांबलचक शब्द जर्मन लोक कसे काय लक्षात ठेवतात कोणास ठाऊक. मित्रत्व किंवा सॉलिडॅरीटी यासाठी Freundschaftsbezeigungen हा काहीसा लांबलचक जर्मन शब्द एकाने मध्यंतरी व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला होता.

In reply to by गॅरी ट्रुमन

मित्रत्व किंवा सॉलिडॅरीटी यासाठी Freundschaftsbezeigungen हा काहीसा लांबलचक जर्मन शब्द एकाने मध्यंतरी व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला होता. अश्या शाब्दीक वेल्डिंगबाबतीत जर्मनचे संस्कृत भाषेशी खूप साम्य आहे. :) हे लांबलचक शब्द म्हणजे समास असतात... Freund + schafts + bezeigungen = friend + ship / ly + relation = मित्रत्वाचे नाते. त्यातल्या मूळ शब्दांचे अर्थ माहित असले तर त्या सामासिक शब्दाचा अर्थ समजणे सोपे असते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

त्यातल्या मूळ शबदांचे अर्थ माहित असले तर त्या सामासिक शब्दाचा अर्थ समजणे सोपे असते.
पटले. असे काहीतरी लॉजिक असणार असे वाटलेच होते. मी स्वतः शिकायचा प्रयत्न केला त्यावेळी त्या लॉजिकपर्यंत पोचूच शकलो नव्हतो :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हो बरोबर आहे, असं करून अर्थ पण कळायला सोपं जातं आणि उच्चार सुद्धा. पण तरीही ते उच्चार, ते शब्द लक्षात ठेवणे हे सतत वापरताना नको वाटतं कधीतरी. त्यातही खूप तांत्रिक बाबी किंवा वैद्यकीय क्षेत्रातले असतील तर मग विचारायलाच नको. जर्मन भाषेत डॉक्टरांशी संभाषण, ही प्रत्येक वेळी मोठी परीक्षा असते. ;)

In reply to by मधुरा देशपांडे

अन्य भाषांच्या तुलनेत जर्मन भाषा ऐकावयास कशी वाटते? याबद्दलचा हा एक धमाल व्हिडिओ पहा. https://www.youtube.com/watch?v=-_xUIDRxdmc

स्पेलिंग्ज शिवाय, जुने, आम्ही शिकलेले तर्खडकरी उच्चार आणि इंग्रजी माध्यमातून शिकलेली आमची पुढची पिढी यांतही बराच फरक पडतो. त्यांत आणखी कहर, म्हणजे अमेरिकेत गेलेली आमची पुढची पिढी जे उच्चार करतात त्यापुढे आम्ही गावंढळ ठरतो.

इंग्रजी भाषेत स्वतःचे असे फक्त १२०००च शब्द आहेत बाकी सगळे लॅटीन , फ्रेन्च , ग्रीक, वगैरे शब्द त्यात येवुन मिसळलेले आहेत. पहा राजीव दिक्षीत यांचा हा व्हिडीयो.

In reply to by प्रमोद देर्देकर

इंग्रजी भाषेत स्वतःचे असे फक्त १२०००च शब्द आहेत बाकी सगळे लॅटीन , फ्रेन्च , ग्रीक, वगैरे शब्द त्यात येवुन मिसळलेले आहेत.
तामिळसोडून इतर भारतीय भाषांमध्येही मुळातले शब्द किती आणि किती शब्द संस्कृतमधून जसेच्या तसे आले आहेत आणि किती शब्द संस्कृतोद्भव आहेत हा पण संशोधनाचाच विषय ठरेल. जर का एखाद्या गोष्टीसाठी आपल्या भाषेत चपखल शब्द नसेल तर इतर भाषांमधून शब्द घेऊन ते मुळचे आपलेच आहेत असे वाटावे इतके अंगवळणी पडणे ही माझ्या मते भाषेसाठी चांगली गोष्ट आहे- वाईट नाही. राजीव दिक्षित हे अनेकदा अशा 'अनटिनेबल' गोष्टींवरून टिका करायचे. म्हणूनच त्यांना मिपावरच 'प्रातःविस्मरणीय' असे कुणीतरी म्हटले होते :(

In reply to by गॅरी ट्रुमन

अहो खुद्द तमिळमध्येही अनेक संस्कृतप्राकृत शब्द आहेत- फक्त ते तत्सम ऐवजी तद्भव जास्त आहेत. सोकॉल्ड प्यूरतमिळ वाल्यांच्या पचनी हे पडत नै इतकेच.

In reply to by प्रमोद देर्देकर

भाषणाच्या पहिल्याच मिनिटात ही वाक्यं कानी पडली आणि इतक्या आत्मविश्वासाने, इतकी चुकीची माहिती दिलेली पाहून काही भूतपूर्व (तरीही अभूतपूर्व) आयडी आठवले :) "मात्र बारा देशों में अंग्रेजी चलती है| अमरिका है, कनाडा है, ब्रिटेन है; और थोडासा (sic) लैटिन अमेरिका के देश हैं| और वहाँ तो मैं मानता नहीं अंग्रेजी चलती है, ज्यादा लैटिन चलती है - अंग्रेजी की खिचडी बन गयी है लैटिन के साथ|"