Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्वीट टॉकर on Tue, 02/16/2016 - 01:30
लेखनविषय (Tags)
कथा
भाषा
शब्दक्रीडा
विनोद
kathaa
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लेख
अनुभव
विरंगुळा
माझं शिक्षण मराठी माध्यमातून मजेत चाललं होतं. पण मुंबईला स्थलांतरित झालो, आणि समस्या उभी राहिली. जवळच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळेना. किंग जॉर्ज शाळेत त्याच वर्षी इंग्रजी माध्यम सुरू होत होतं. तिथे प्रवेश मिळाला आणि मी रुजू झालो. नशिबानी माझे सगळेच वर्गमित्र मराठी माध्यमातून आले असल्यामुळे आम्ही सगळेच बावचळलेले असायचो. आमचे इंग्रजीचे शिक्षक अतिशय उत्तम शिकवायचे. थोड्याच महिन्यात त्यांनी आम्हाला अज्ञानाच्या चिखलातून काढून गोंधळाच्या धुक्यात आणून सोडलं. पण ती चूक आमच्या शिक्षकांची अजिबात नव्हती. इंग्रजी भाषेची होती. त्यांनी आम्हाला उच्चारांचे नियम शिकवले. A चा उच्चार ऍ किंवा अ, e चा ए, i चा इ, o चा ओ किंवा ऑ, u चा उ किंवा अ, डबल ई चा ई, डबल ओ चा ऊ वगैरे वगैरे. आम्ही ते आज्ञाधारकपणे पाठ केले. वापरायला सुरवात केल्यावर मात्र असं लक्षात आलं की जितके शब्द नियमात बसतात तितकेच नियमबाह्य आहेत. आपण मराठीत अपवाद हा शब्द वापरतो कारण नव्व्याण्णव टक्के नियमात, म्हणून एक टक्का अपवाद. इथे अपवादच अपवाद. मग नियमांना किंमत काय? आमची स्थिती पुण्यामध्ये वन वे रस्त्यावर योग्य दिशेनी वाहन चालवणार्यासारखी व्हायची. इतकी वाहनं चुकीच्या दिशेनी येतात की आपणच चुकतो आहोत की काय असं वाटायला लागतं. दुहेरी वाहतुकीच्या रस्त्यावर आपण डाव्या अर्ध्यामध्ये चालवतो. पण या वन वे मध्ये उलटे येणार्यांची एक खासियत असते. एकदा दिशेचा नियम मोडलाच आहे म्हटल्यावर यांना डाव्या उजव्याचंही सोयरसुतक राहात नाही. कुठूनही येतात. मात्र हेडलाइट लावून. चोरोंके भी असूल होते हैं ! इंग्रजीचे शब्दही असेच. ‘डबल ओ’ चा उच्चार ‘ऊ’ होतो हे आम्हाला पाठ. लुक, बुक वगैरे. मग ‘ब्लुड’ का नाही? त्याचा उच्चार ‘ब्लड’ करावा हे कुणी ठरवलं? असं आहे का, की ‘ब्लुड’ अशा उच्चाराचा दुसरा एखादा शब्द आहे आणि त्याचा आणि blood या शब्दाचा गोंधळ होऊ नये म्हणून एक विचारी भाषाशास्त्रज्ञानी हा निर्णय घेतला? अजिबात नाही. म्हणजे हा पूर्णपणे Random Decision आहे. एक महत्वाची गोष्ट नेहमी आपण शिकतो. ती म्हणजे कुठल्याही बाबतीत Random Decision घ्यायचा नसतो. प्रत्येक निर्णय हा उपलब्ध माहिती (Available Data) आणि तर्क (Logic) यावरच घ्यायचा. मग याच भाषेच्या बाबतीत असं का? बरं, आता कुठला शब्द नियमाप्रमाणे उच्चारायचा आणि कुठचा वेडावाकडा हे आम्हाला कसं कळणार? तर ते ‘ऑक्सफोर्ड’ नावाच्या शब्दकोशातून. ‘ऑक्सफोर्ड’ ह्या शब्दाची उत्पत्ती ‘ऑक्स-फोड’ या जोडशब्दात आहे. त्याबद्दल मी पुढे तुम्हाला सांगेनच. War ‘वॅर’ नव्हे, वॉर. Son सॉन नव्हे, सन. ‘ow’ हे n च्या नंतर लागले, उदा. now, की त्याचा उच्चार औ. तेच ‘ow’ हे n च्या आधी लागले, उदा own, की त्याचा उच्चार ओ. One म्हणजे ‘वन’. ह्यातला ‘व’ हा उच्चार कुठून आला? देवास ठाऊक ! Know - सुरवातीला k लावायचा, शेवटी w लावायचा. का ? वेळगंमत म्हणून ? उदाहरणं द्यावी तितकी थोडी. पण ते जाऊ द्या. कळस म्हणजे निःशब्द (silent) अक्षरं ! ती पाठ करायची, लिहायची देखील. पण उच्चार करायचा नाही ! म्हणजे खिसा खालून न शिवण्यासारखं. दिसतो खिशासारखा, आत हात देखील घालता येतो. पण काही ठेवलं की खालून बाहेर पडतं ! हॅ हॅ हॅ हॅ ! याला भाषा म्हणायची, विनोद म्हणायचा का अक्कलशून्यपणा? या सगळ्यांचा बाप म्हणजे silent & anti-silent अक्षरं एकत्र ! काही लिहिलेली अक्षरं वाचायची पण त्यांचा उच्चार करायचा नाही. त्याऐवजी एक न लिहिलेलं अक्षर तिथे आहे अशी कल्पना करायची आणि त्याचा उच्चार करायचा ! शब्द आहे ‘कर्नल’. स्पेलिंग आहे colonel. ‘एल्’ चा उच्चार करायचा नाही. त्याच्या नंतरच्या ‘ओ’ चा ही उच्चार करायचा नाही. त्या दोघांऐवजी तिथे ‘आर’ आहे अशी कल्पना करायची, आणि त्याचा उच्चार करायचा. आधीच्या ‘ओ’ चा उच्चार ‘अ’ असा करायचा. सोप्पं आहे की नाही? थोडक्यात काय, तर नुसता नियम माहीत असून काहीही उपयोग होऊ नये, सगळे शब्द पाठच करायला लागावे अशी व्यवस्था केलेली आहे. शालेय जीवनातलं समांतर उदाहरण द्यायचं म्हटलं तर असं म्हणता येईल. शाळा जर मोठी असेल तर शाळेच्या इमारतीच्या तळमजल्यावर कोठला वर्ग कुठे आहे याचा नकाशा लावलेला असतो. शिवाय साधारणपणे एकाच इयत्तेचे वर्ग एका मजल्यावर असतात. प्रत्येक वर्गावर इयत्ता आणि तुकडी लिहिलेली असते. असं समजा की कुठलाही वर्ग कुठेही भरवला, एकाही वर्गावर इयत्ता आणि तुकडी लिहिली नाही तर काय होईल? मुलं आणि शिक्षकांना ते समजेपर्यंत भटक भटक भटकायला लागेल. पालक तर हरवूनच जातील. वर म्हणायचं, “त्यात काय इतकं? एकदा पाठ झालं की काही प्रॉब्लेम येत नाही!” असं तर काही शक्य नाही की कित्येक भाषापंडित एकत्र बसले आणि त्यांनी ठरवलं, “आपण एक तर्कशून्य स्पेलिंग आणि उच्चार असलेली भाषा बनवूया.” मग ही भाषा अशी झाली तरी कशी? मला माहीत आहे याचं कारण. एकदा भाषांतरदेवी माझ्या स्वप्नात आली होती. तिनी मला सांगितलं. मी तुम्हाला सांगतो. सुरवातीला इंग्रजी भाषेची स्पेलिंग व्यवस्थित होती. रक्त blud होतं, लिहिणं rite होतं, बिबट्या lepard होता, साखर shugar होती. इंग्लंडमध्ये राजेशाही होती. अर्थातच सामान्य जनतेची मुलं शाळेत जात होती. राजाचा मुलगा शाळेत कशाला जाईल? शिक्षकच राजवाड्यात येऊन त्याला शिकवत. एक दिवस राजकुमाराचं इंग्रजीचं शिक्षण चाललं होतं. शिक्षकांनी त्याला ‘रॉन्ग’ चं स्पेलिंग विचारलं. राजकुमारानं बुद्धी राणीकडून घेतलेली होती. त्याला काही केल्या ‘रॉन्ग’ चं स्पेलिंग आठवेना. त्यानी अंदाजानी ठोकून द्यायला सुरवात केली, “डब्ल्यू . . . . आर. . . .”. “नाही. बाळराजे”, शिक्षकांनी हळुवारपणे हस्तक्षेप केला. (अर्थातच 'हळुवारपणे'. राजकुमाराच्या कानाखाली आवाज काढायची कुणा शिक्षकाची शामत असते काय?) "तुमचं स्पेलिंग चुकतंय बाळराजे." आपल्या सर्वांच्या दुर्दैवानी नेमकी तेव्हांच राणी शेजारून चालली होती. आपल्या बाळराजाचं स्पेलिंग चुकलं ? हे कसं शक्य आहे ? तिनी स्वतः मुलाला रॉन्गचं स्पेलिंग विचारलं. त्या म्हशाच्या डोक्यात ‘डब्ल्यू’ घट्ट बसलेला होता. त्यानं सांगितलं “डब्ल्यू आर ओ एन जी – रॉन्ग”. राणी काळजीत पडली. उद्या हा गादीवर बसला की त्याचं हसं होईल. काय करावं ? जर महम्मद डोंगरापर्यंत जाणार नसेल तर डोंगरच महम्मदकडे आणावा. तिनी बाळराजांना सगळ्या शब्दांची स्पेलिंग विचारली. त्यानी मनाला वाटेल ती उत्तरं दिली. सगळी नोकरांकरवी लिहून घेतली गेली. दुसर्या दिवशी इंग्लंडभर दवंड्या पिटल्या गेल्या. “आत्तापासून ही नवीन स्पेलिंग बरोबर धरली जातील. जुनी विसरून जा.” हे सगळं होत असताना राजा स्वारीला गेलेला होता. परत आल्यावर त्याला ही हकीकत समजली. तो हैराण. हा मूर्खपणा त्याला अजिबात पसंत नव्हता. पण राजा असला तरी तो नवरा होता. राणीच्या हट्टापुढे तोही हतबल. आपल्या पु.लं. नी देखील एका कथेत लिहिलं आहे – रामरायाला काय म्हाइत नव्ह्तं काय का सोन्याचं हरीन बिरीन काय पन नसतं मनून? पन बायकोच्या हट्टापुडं कोनाचं काय चालनार? शीतामाई म्हनली असती, “खा कंदमुळं अन् कोपर्यात पडा चीप.” तो गेला आनायला अन् रामायन घडलं. सांगायचा मुद्दा काय, तर राजाराणीचा जाम वाद झाला पण नेहमीप्रमाणे राणी जिंकलीच. आपला पोरगा शुद्ध बैलोबा आहे हे राजाला माहीत होतं. त्याचं थोबाड फोडायला राजाचे हात शिवशिवत होते पण तो तर राणीसाहेबांचा लाडका. त्यामुळे प्रत्यक्षात नाही तर निदान प्रतीकात्मक तरी फोडायचं राजाने ठरवलं. म्हणून या नवीन स्पेलिंग्जचा जो शब्दकोश बनवला त्याला नाव त्यानी ठेवलं बैलाची धुलाई अर्थात ‘ऑक्स-फोड’. याच शब्दाचा पुढे अपभ्रंश ‘ऑक्सफोर्ड’ असा झाला. तेव्हांपासून ऑक्सफोर्ड शब्दकोशाला जगन्मान्यता मिळाली आणि त्यातली स्पेलिंग आणि उच्चार आपल्या मानगुटीवर बसले ते आजपर्यंत ! वाईटातही चांगलं शोधायलाच हवं. जर का तेव्हां राजकुमाराचा गणिताचा किंवा विज्ञानाचा अभ्यास चालला असता तर? गेलो असतो सगळे अबाउट टर्न करून परत अश्मयुगात !
  • Log in or register to post comments
  • 46747 views

प्रतिक्रिया

Submitted by माहितगार on Tue, 02/16/2016 - 03:03

Permalink

मस्त लिहिलय, लेखन कौशल्याला

मस्त लिहिलय, लेखन कौशल्याला १०० मार्क आणि विचार मांडणीला १०० मार्क, तुम्ही मार्क मागितले नव्हते पण आम्ही दिले ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 02/16/2016 - 04:02

In reply to मस्त लिहिलय, लेखन कौशल्याला by माहितगार

Permalink

+१

चांगला कल्पनाविस्तार! आणि त्या पुण्यनगरीच्या उल्लेखाने धाग्याच्या 'शंभरी'ची निश्चिती :-) “English grammar is so complex and confusing for the one very simple reason that its rules and terminology are based on Latin, a language with which it has precious little in common. Making English grammar conform to Latin rules is like asking people to play baseball using the rules of football.” - Bill Bryson या निमित्ताने काही quotes आठवले: “Why do we have noses that run and feet that smell?” “Never make fun of someone who speaks broken English. It means they know another language.” “English is a funny language; that explains why we park our car on the driveway and drive our car on the parkway.” आणि ही एक कविता: Why English Is So Hard We'll begin with a box, and the plural is boxes. But the plural of ox should be oxen, not oxes. Then one fowl is goose, but two are called geese. Yet the plural of moose should never be meese. You may find a lone mouse or a whole lot of mice. But the plural of house is houses, not hice. If the plural of man is always called men, Why shouldn't the plural of pan be called pen? The cow in a plural may be cows or kine, But the plural of vow is vows, not vine. And I speak of foot, and you show me your feet, But I give you a boot ... would a pair be called beet ? If one is a tooth and the whole set are teeth, Why shouldn't the plural of booth be called beeth ? If the singular is this and the plural is these, Should the plural of kiss be nicknamed kese ? Then one may be that, and three may be those, Yet the plural of hat would never be hose. We speak of a brother, and also of brethern, But though we say mother, we never say methern . The masculine pronouns are he, his and him, But imagine the feminine she, shis and shim! So our English, I think you'll all agree, Is the trickiest language you ever did see. - author unknown

[अवांतरः “‘I am’ is reportedly the shortest sentence in the English language. Could it be that ‘I do’ is the longest sentence?”]

  • Log in or register to post comments

Submitted by क्रेझी on Tue, 02/16/2016 - 08:30

In reply to +१ by बहुगुणी

Permalink

कविता मस्तच आहे :)

कविता मस्तच आहे :) आणि लेखपण आवडला :) :)
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 02/16/2016 - 09:09

In reply to +१ by बहुगुणी

Permalink

आय डू इज द लाँगेस्ट सेन्टेन्स!

श्लेष अफलातून आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 02/16/2016 - 15:27

In reply to +१ by बहुगुणी

Permalink

अवांतर मस्तं आहे =))

अवांतर मस्तं आहे =))
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Wed, 02/17/2016 - 06:15

In reply to +१ by बहुगुणी

Permalink

हाहा.. तल्लख बुद्धीमान

हाहा.. तल्लख बुद्धीमान विनोद ( विटी जोक ;) ) अवांतर फार च हुशार :)
  • Log in or register to post comments

Submitted by पहाटवारा on Wed, 02/17/2016 - 11:42

In reply to +१ by बहुगुणी

Permalink

:)

मस्त लेख अन प्रतीक्रिया.. अजून एक वाचले होते.. Is cheese the plural of choose? If teachers taught, why didn't preachers praught? If a vegetarian eats vegetables, what does a humanitarian eat? In what language do people recite at a play, and play at a recital? Ship by truck, and send cargo by ship? Have noses that run and feet that smell? Park on driveways and drive on parkways? Sweetmeats are candies, while sweetbreads, which aren't sweet, are meat. We take English for granted. But if we explore its paradoxes, we find that quicksand can work slowly, boxing rings are square, and a guinea pig is neither from Guinea nor is it a pig. And why is it that writers write, but fingers don't fing, grocers don't groce, and hammers don't ham? If the plural of tooth is teeth, why isn't the plural of booth beeth? One goose, 2 geese. So, one moose, 2 meese? One index, two indices? How can the weather be hot as hell one day and cold as hell another? When a house burns up, it burns down. You fill in a form by filling it out, and an alarm clock goes off by going on. When the stars are out, they are visible, but when the lights are out, they are invisible. And why, when I wind up my watch, I start it, but when I wind up this essay, I end it? .English muffins were not invented in England or French fries in France. How can 'slim chance and a fat chance' be the same, while ' wise man and a wise guy' are opposites? -पहाटवारा
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Tue, 02/16/2016 - 09:15

Permalink

मुळचे पुण्याचे असलेल्या गोडबोल्यांनी……

लिहिलेला एक छान लेखं.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Tue, 02/16/2016 - 09:28

Permalink

चुपके चुपके मधल्या धर्मेंद्रला

पडलेले प्रश्न आहेत हे. इंग्लिश शिकवताना आपल्या मराठी भाषेचा सोपेपणा आणि उच्चारांप्रमाणे शब्द लिहिले जाणं हे किती दिलासादायक आहे ते समजतं. कौतुक या गोष्टीचं आहे की अशी धेडगुजरी भाषा असूनही इंग्लिश आज जगाची ज्ञानभाषा आहे. बाकी लेख सुंदर. पुलेशु.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 02/16/2016 - 12:15

In reply to चुपके चुपके मधल्या धर्मेंद्रला by बोका-ए-आझम

Permalink

@बोका प्रतिसादातील तुमचे

@बोका प्रतिसादातील तुमचे विचार आणि भावना पोचली, पण इंग्रजीवर टिका करण्यासाठी आपल्यास धेड आणि गुजर अशा दोन समाजांना डावावर लावणे खूपते.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Tue, 02/16/2016 - 15:41

In reply to @बोका प्रतिसादातील तुमचे by माहितगार

Permalink

तो एक वाक्प्रचार आहे मा.गा.

तो एक वाक्प्रचार आहे मा.गा. तसं इतर जातींचा नामोल्लेख असणारेही अनेक वाक्प्रचार आणि म्हणी आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Tue, 02/16/2016 - 16:41

In reply to @बोका प्रतिसादातील तुमचे by माहितगार

Permalink

माहितगार सर - ही खालची लिंक वाचावी.

http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80&display=utf8&table=molesworth याच्यानुसार धेडगुजरी हा शब्द जातिवाचक ठरत नाही. मुळात त वापरताना जातिवाचक आहे हे मला माहित नव्हते पण माझे मित्र विश्वनाथ मेहेंदळे उर्फ विमे यांनी ही link पाठवून पुरावाच दिला, तो मी इथे देतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Tue, 02/16/2016 - 10:27

Permalink

भारी लेख !!

colonel = कर्नल, शुध्द अन्याय आहे हा :) ऑक्स-फोड = ऑक्सफोर्ड ;) शाळेपासूनच इंग्लिशशी छान मैत्री झाल्यामुळे अडचण सहसा येत नाही, जरी प्रश्न अनेक पडतात.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाखा पाटील on Tue, 02/16/2016 - 10:29

Permalink

छान लिहिलंय :) फार त्रासदायक

छान लिहिलंय :) फार त्रासदायक भाषा आहे ही. इतकी वर्ष अभ्यास करूनही छळते. २६ मुळाक्षरे आणि त्यांचे उच्चार ४४. स्वर फक्त ५ , पण उच्चार २१. मग होतो बुवा गोंधळ... शाळेत असताना उच्चारासाठी 'phonemic script' का शिकवत नाही, कोण जाणे! आमच्या वेळी (इ. स. १९८० चा काळ) तरी शिकवत नव्हते. कॉलेजला गेल्यावर आणि तेही इंग्रजी विषय मुख्य होता म्हणून डिक्शनरीत उच्चार कसे शोधायचे ते कळले.
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश आठवले on Tue, 02/16/2016 - 10:54

Permalink

फीश आणि घोटी

George Bernard Shaw याना इंग्लिश भाषेतील स्पेलिंग आणि उच्चार यांच्या नियम शुन्यतेचा फार राग होता. तो व्यक्त करण्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिले. ते म्हणाले की फीश या शब्दाचा उच्चार मी घोटी असा करू शकतो .ते कसे ते पहा. F असा उच्चार rough या शब्दात gh या अक्षरांनी होतो. तसेच विमेन या शब्दात ओ चा उचार इ असा करतात आणि nation या शब्दात श या उच्चारासाठी ti ही अक्षरे वापरतात. त्यांच्या मृत्युपत्रात त्यांनी ही उचार आणि स्पेलिंग यांच्या मधील तफावत दूर करण्याच्या कामासाठी निधी ठेवला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Tue, 02/16/2016 - 10:55

Permalink

त्याचे कारण म्हणजे जशी आत्ता

त्याचे कारण म्हणजे जशी आत्ता स्पेलिंग दिसतात त्याच प्रकारचे उच्चार पूर्वी ( अनेक शतका पूर्वी ) लोक करत असत. नंतर उच्चार बदलले पण स्पेलिंग तिच राहीली. उत्तर इंग्लंड मधल्या लोकांचे उच्चार म्हणुनच वेगळे वाटतात. अजुनही तिथे लोक "लक" ला "लुक" म्हणतात अशी अनेक उदाहरणे.
  • Log in or register to post comments

Submitted by गॅरी ट्रुमन on Tue, 02/16/2016 - 11:21

Permalink

मस्त लेख. आवडला

इंग्रजी भाषा पहिल्यांदा शिकायला लागलो तेव्हा या प्रकारामुळे खूपच गोंधळ उडायचा.पण नंतर ते अंगवळणी पडत गेले. सायबाच्या भाषेतील नवेनवे शब्द शिकायला तर मला खूपच आवडते.जी.आर.ई च्या परीक्षेच्या वेळी असेच कित्येक नवे शब्द माहित झाले होते.त्यातले बरेचसे शब्द नेहमीच्या वापरात नसल्यामुळे विसरायला झाले असले तरी कधीतरी अनपेक्षितपणे त्यापैकी एखादा शब्द वाचायला/ऐकायला मिळाला तर कुणी "कुंभ के मेले मे बिछडा हुआ अपना" मिळाल्याचे समाधान होते. (सुरवातीला इंग्रजी भाषा अजिबात न आवडणारा पण आता इंग्रजी भाषेचा विशेषतः व्होकॅब्युलरीचा प्रचंड मोठा पंखा) ट्रुमन
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on Tue, 02/16/2016 - 11:28

Permalink

कालच लहान मुलानी शिकवल

लहान मुलानी मला शिकवल स ऑ न सॉन आणि स अ न सन. पाच वर्षाच्या पोराला हे अपवाद शिकवायचा मला कंटाळा आला आणि मी सोडून दिल. तसे बऱ्याच भाषेत वेगवेगळ्या प्रकारचे अपवाद असतात. या अपवादांमुळे मग ती भाषा शिकायला कठीण जाते. त्यावर उपाय म्हणून esperanto भाषा तयार केली गेली पण तीचा हवा तेवढा प्रसार झाला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Tue, 02/16/2016 - 11:35

Permalink

इंग्रजी शिकतांना सुरुवातीला हा त्रास झाला

पण वडिलांनी एकच सांगितलं, ही आपली भाषा नाही, तुला ती आत्मसात करायची असेल तर जशी आहे तशी शिक. विषयच संपला !
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Tue, 02/16/2016 - 12:55

Permalink

पुलंच 'फ़िख्याडली'

पुलंच 'फ़िख्याडली' आठवल! पुण्यावरचा विनोद ठीकठाक...इथे सुधारणेला वाव आहे! तरीही वर बहुगुणी म्हणतात तसे.....
आणि त्या पुण्यनगरीच्या उल्लेखाने धाग्याच्या 'शंभरी'ची निश्चिती :-)
बाकी लेखन उत्तम, आवडले! Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 02/16/2016 - 14:39

Permalink

सुरुवातीला इंग्रजीचे स्पेलिंग

सुरुवातीला इंग्रजीचे स्पेलिंग आणि उच्चार हे बरोबर लायनीत होते. पुढे पुढे ग्रेट व्हॉवेल शिफ्ट नामक प्रकारामुळे बोलीभाषा झपाट्याने बदलली परंतु लिखित भाषा मात्र त्यांच्याप्रमाणे बदलली नाही, जुनीच स्पेलिंग्स वापरात राहिली. त्यामुळे त्रांगडे झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 02/16/2016 - 14:40

In reply to सुरुवातीला इंग्रजीचे स्पेलिंग by बॅटमॅन

Permalink

हे सगळे इंग्रज जगभर

हे सगळे इंग्रज जगभर फैलावण्याच्या जस्ट अगोदरचे. त्यामुळे इंग्रज आपल्या देशात आला तो अशी अडनीड स्पेलिंग्स घेऊनच.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Tue, 02/16/2016 - 16:43

In reply to सुरुवातीला इंग्रजीचे स्पेलिंग by बॅटमॅन

Permalink

हा काय प्रकार आहे?

Great Vowel Shift?
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Tue, 02/16/2016 - 17:50

In reply to हा काय प्रकार आहे? by बोका-ए-आझम

Permalink

बॅटमणा

या विषयावर एक स्वतंत्र लेख टंक की. ब्लोग लिहून लिन्क दिलीस तरीही चालेल.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 02/16/2016 - 14:54

Permalink

हॅ हॅ हॅ..खुसखुशीत.

हॅ हॅ हॅ..खुसखुशीत. बाय द वे, फ्रेंचशी गाठ पडलेली दिसत नाही. नाव घेऊन च्यायला वाईन मागायची पंचाईत होते. ... झालस्तर त्या पॅरिसमधल्या champ elysees या रस्त्याचा उच्चार "शाँजेलिझे". आय रेस्ट माय केस.
  • Log in or register to post comments

Submitted by अस्वस्थामा on Tue, 02/16/2016 - 19:22

In reply to हॅ हॅ हॅ..खुसखुशीत. by गवि

Permalink

एवढा समुद्र तरी ओलांडून कशाला

एवढा समुद्र तरी ओलांडून कशाला जायचं? इंग्रजाच्या वेल्स मधली वेल्श भाषा सगळ्यांना पुरुन उरणारी आहे. नुसतं कार्डिफ लिहायचं तर हे स्पेलिंग पहा "Caerdydd" आणि हो हे पहा एका गावाचं नाव "Llanfairpwllgwyngyll", गावतली लहान पोरं कसा पत्ता सांगत असतील कोण जाणे. :) अजून म्हणजे, इतर युरोपियनांच्या तर्‍हा पाहिल्या की इग्रजी लय प्रेमळ आणि समजूतदार वाटते हो. चालवून घेतेत सगळ्या दुनियेतल्या लोकांचे उच्चार. फ्रेंच आणि जर्मन लोकांना तुम्ही wine ला vine म्हटल्याबद्दल किती वाईट वाटतं (की राग येतो!) ते पाह्यलंय (मला अजून दोन्हीतला फरक कळालेला नाही).
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Tue, 02/16/2016 - 21:56

In reply to एवढा समुद्र तरी ओलांडून कशाला by अस्वस्थामा

Permalink

vine म्हणजे वेल ना?

vine म्हणजे वेल ना?
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on Tue, 02/16/2016 - 15:11

Permalink

कळस म्हणजे निःशब्द (silent)

कळस म्हणजे निःशब्द (silent) अक्षरं ! ती पाठ करायची, लिहायची देखील. पण उच्चार करायचा नाही ! म्हणजे खिसा खालून न शिवण्यासारखं. दिसतो खिशासारखा, आत हात देखील घालता येतो. पण काही ठेवलं की खालून बाहेर पडतं ! हॅ हॅ हॅ हॅ ! याला भाषा म्हणायची, विनोद म्हणायचा का अक्कलशून्यपणा? मस्तंच लिहीलाय लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by नया है वह on Tue, 02/16/2016 - 15:52

Permalink

मस्त लिहिले आहे

+१
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 02/16/2016 - 15:57

Permalink

मस्तं खुसखुशीत लेख !

मस्तं खुसखुशीत लेख ! इंग्लिश ही जगभराच्या भाषांकडून केलेल्या उसनवारीवर बनलेली भाषा आहे (बॉरोव्ड लँगवेज)... सद्याच्या इंग्लिशमधील ८०% शब्द इतर भाषांतून आलेले आहेत ! https://en.wikipedia.org/wiki/Lists_of_English_words_by_country_or_language_of_origin कधी ते शब्द स्पेलिंग घेऊन पण उच्चार बदलून आले तर कधी उच्चार घेऊन पण स्पेलिंग बदलून आले. त्यात स्थानिक भाषिकांनी केलेल्या उच्चार व स्पेलिंगच्या बदलांनी अजूनच खिचडी झाली आहे. Image removed. फ्रेंच भाषेत काय लिहितात आणि त्याचा काय उच्चार करतात हे पाहिले तर इंग्लिश परवडली असे म्हणायची पाळी येते ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 02/16/2016 - 16:00

In reply to मस्तं खुसखुशीत लेख ! by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

फ्रेंच भाषेत काय लिहितात आणि

फ्रेंच भाषेत काय लिहितात आणि त्याचा काय उच्चार करतात हे पाहिले तर इंग्लिश परवडली असे म्हणायची पाळी येते !
अगदी!! खिरापतीसारखी मुळाक्षरं वापरुन उच्चार पळीभर तीर्थ दिल्यासारखा असतो बर्‍याचदा.
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on Tue, 02/16/2016 - 19:24

In reply to फ्रेंच भाषेत काय लिहितात आणि by सूड

Permalink

सहमत

खिरापतीसारखी मुळाक्षरं वापरुन उच्चार पळीभर तीर्थ दिल्यासारखा असतो बर्‍याचदा
१०० टक्के सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश आठवले on Tue, 02/16/2016 - 21:15

In reply to फ्रेंच भाषेत काय लिहितात आणि by सूड

Permalink

फ्रेंच उच्चार नियम

फ्रेंच भाषेतील स्पेलिंग वरून उच्चार करण्यासाठी एक नियम नेहमी लागू पडतो. तुम्ही जो उच्चार कराल तो स्पेलिंग प्रमाणे नसला पाहिजे .
  • Log in or register to post comments

Submitted by आगाऊ म्हादया...... on Fri, 02/26/2016 - 07:51

In reply to फ्रेंच भाषेत काय लिहितात आणि by सूड

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 02/16/2016 - 17:42

Permalink

हाहाहा!

मस्त खुसखुशीत लिहिलंय! बहुगुणींचा प्रतिसाद पण भारी!
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 02/16/2016 - 18:55

Permalink

25-maps-that-explain-english

इंग्रजी व तीमधील बदलांकरता हा एक उत्तम दुवा बघावा. http://www.vox.com/2015/3/3/8053521/25-maps-that-explain-english यात वॉवेलशिफ्टबद्दलही आहेच.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वीट टॉकर on Tue, 02/16/2016 - 21:05

Permalink

सर्वजण,

सर्वजण, मनापासून धन्यवाद. माहितगार, माझ्या मिसळपाववरील पहिल्या लेखाचे तुम्ही पहिले प्रतिसादगार. तुम्ही शंभर मार्क दिलेत! लेख worth झाला! ही इंग्रजी स्पेलिंग्सची जखम कायमच ठसठसंत राहाणार. त्यावर विनोदाची फुंकर घालण्याचा प्रयत्न. पुण्यनगरीवर टिपण्णी केल्याबाबत - मी स्वतः पुणेकर आहे. पुणेकर आणि मुंबईकर यांच्या स्वभावात मला काहीही फरक आढळला नाही. (दोन्हीकडचे छान आहेत.) आणि हो. मी स्वतः स्पष्टवक्ता नसलो तरी पुणेरी पाट्यांमधला स्पष्टपणा मला अतिशय प्रॅक्टिकल वाटतो.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Tue, 02/16/2016 - 21:14

Permalink

मस्त..

खुसखुशीत लेख.. गविंसारखेच मलाही फ्रेंच भाषाच आठवली पटकन. इंग्रजी बरीच बरी म्हणायची त्या फ्रेंच उच्चार आणि स्पेलिंग्ज पुढे.. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 02/16/2016 - 21:21

In reply to मस्त.. by स्वाती दिनेश

Permalink

नायतर काय..

नायतर काय.. "कुलकर्णी" लिहून उच्चार "अल्बुकर्क" करण्यापैकी.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 02/16/2016 - 21:20

Permalink

लेख आवडला..

लेख आवडला..
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Tue, 02/16/2016 - 21:49

Permalink

लेख आवडला. "स्वीट टॉल्केर" .

लेख आवडला. "स्वीट टॉल्केर" . ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by गॅरी ट्रुमन on Tue, 02/16/2016 - 22:55

Permalink

व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड

काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सऍपवर मला हा फॉरवर्ड आला होता: "मध्यंतरी माझ्याकडे एक तामिळ मुलगी मराठी शिकायला येत असे. असेल आठवी-नववीत.पण चेन्नईहून थेट पुण्याला; मग मराठीचा गंध कसा असणार?थोडं शिकवल्यावर मी तिला काही छोटी पुस्तकं वाचायला दिली होती. एकदा तिने काही अडलेले शब्द लिहून आणले. तीन चार शब्दांचे अर्थ सांगितले. शेवटचा शब्द होता-- लाव/लावणे. मी तिला म्हटलं, 'अगं, वाक्य लिहून आणायचंस,नुसता अर्थ कसा सांगू? काहीही असू शकेल'. एका शब्दाचा/व्हर्बचा अर्थ काहीही?तिला कळेना. 'ओके, टेल मी ऑल द मीनिंग्ज'. ती म्हणाली. तिला वाटलं असतील दोन तीन अर्थ! पण मराठीचा इंगा तिला अजून कळायचा होता. मी मनात म्हटलं, चला, आजचा वेळ या लावालावीतच घालवू. 'हे बघ, तू मराठीचा क्लास लावला आहेस '. 'ओह्, आय हॅव जॉइंण्ड द क्लास '.लगेच वहीत क्लास लावणे =जॉइंन असं लिहिलं. 'क्लासला येताना तू आरशासमोर काय तयारी केलीस? पावडर लावलीस? ''ओ येस '. 'आपण पार्टीला,फंक्शनला जाताना लिपस्टिक,कुंकू/टिकली लावतो.''येस, आय अंडस्टँड '.- टु अप्लाय. तिनं लिहिलं. 'पण आपण केसांना पिन्स, हेअरबॅंडही लावतो. तिथे तो अर्थ नाही होत '. 'ओके; वी पुट ऑन दॅट''. 'आता बघ. मी चहाचा कप तोंडाला लावला, आणि बेल वाजली. कालच्या तुझ्या पुस्तकात गाईने चाऱ्याला तोंड लावलं. आपण बाळाच्या गालाला हात लावतो. इथे काय? प्रत्यक्ष स्पर्श करतो. टच्! ' चौथा अर्थ लिहिता लिहिता तिची ट्यूब पेटली. म्हणाली, 'हां, तुम्ही पार्कमधला बोर्ड वाचून दाखवला ना त्यादिवशी; फुलांना हात लावू नये. आणि त्या छोट्याला त्याची आई म्हणाली ना, 'पुस्तकाला पाय लावू नको. सो—टु टच्.' 'मॅम, मी आले तेव्हा यू टोल्ड मी दार लाव. मीन्स शट् द डोअर '. 'हो. दार लाव किंवा दार बंद कर म्हणजे तेच '. 'मीन्स लाव,बंद कर सेम! पण मग तुम्ही दिवा लावते म्हणता, देअर इट इज ऑपोझिट ऑफ दिवा बंद कर!' 'बरोबरच आहे. कारण दाराच्या बाबतीत लाव = शट् = बंद कर. पण दिवा लाव = स्विच ऑन. म्हणूनच तुला म्हटलं वाक्य लिहून आण बाई! संदर्भ/रेफरन्स शिवाय नुसता लाव कसा समजणार? आणखी खूप ठिकाणी लावणे हे व्हर्ब आपण वापरतो, पण तुला आत्ताच एवढ्या गोंधळात नाही टाकत. ' 'नो,नो. प्लीज टेल मी मोअर '. म्हणत ती उत्साहानं सरसावून बसली. 'बरं! आता अपण इलेक्ट्रिकचा दिवा, टी.व्ही, रेडिओ इ. लावतो तेव्हा स्विच ऑन करतो. पण देवासमोर नीरांजन,उदबत्ती,समई लावतो तेव्हा काय करतो? लाइट ऑन! पेटवतो.फटाके लावतो, आग लावतो, गॅस लावतो = पेटवतो.' ती भराभरा लिहून घेत होती. तेवढ्यात आतून कुकरची शिट्टी आली. 'बघ, मी कुकर लावलाय. दोघी हसलो. आधीचा कुठला अर्थ आहे का यात? खरं तर यात अनेक क्रिया आहेत. सगळ्याला मिळून एक सुटसुटीत शब्द — 'लावलाय.' आंघोळीचं पाणी लावलंय मधे असंच! ' 'मी रोज सकाळी अलार्म लावते'. ती अचानक म्हणाली आणि हसत सुटली. ओह्! एव्हरीथिंग इज सो डिफरंट! ' 'सो कनक्लूजन? –एव्हरी लाव इज डिफरंट! ' जिगसॉ पझल घेऊन बसलेल्या नातवाला मी हाक मारली. तर तो म्हणाला, 'थांब गं आजी! मी हे लावतोय ना!' 'हे,लुक. तो लावतोय = ही इज अरेंजिंग द पीसेस. टु अरेंज! ' 'तो शहाणा आहे.वह्या-पुस्तकं कपाटात नीट लावून ठेवतो. कपाट छान लावलेलं असतं त्याचं'. वहीत लिहून घेऊन ती उठली, गुड बॉय, असं त्याचं कौतुक करून ती घरी गेली. पण माझं विचारचक्र चालूच राहिलं.आता मनाच्या अदृश्य स्क्रीनवर लाव, लावते, लावले हे सगळं बोल्ड मधे यायला लागलं. रोजच कोणालातरी आपण फोन लावतो. बडबड, कटकट करणाऱ्यांना आपण म्हणतो, 'ए, काय लावलंय मगापासून?' आजीने कवळी लावली = फिक्स केली आणि आजी कवळी लावते. म्हणजे रोज वापरते.(यूज) पट्टा लाव=बांध. बकल, बटन लाव = अडकव बिया लावणे, झाडे लावणे = पेरणे, उगवणे. इतके इतके मजूर कामाला लावले.(एम्प्लॉइड.) वजन ढकलणारा,ओढणारा नेट/जोर लावतो. (अप्लाइज स्ट्रेंग्थ) आपण वडिलांचं, नवऱ्याचं नाव लावतो म्हणजे काय करतो? सुंदर गोष्ट मनाला वेड लावते. या शब्दांच्या खेळानंही मला वेड लावलं. इतक्यात आमची बाई आली. आल्याआल्याच म्हणाली, 'विचारलं काओ सायबांला?' (मुलाच्या नोकरीबद्दल) 'विचारलं की, पाठव म्हणाले उद्या '. 'हा, मंग देते त्याला लावून उद्या'. (ओहो! लावून देते = पाठवते!) आणि लावालावी मधे तर कोण,कुठे काय लावेल! अशी आपली ही मायमराठी! शिकणाऱ्याला अवघड, पण आपल्याला सुंदर! आता 'हे आर्टिकल सगळ्यांना ग्लोबल मराठीवर लाव' '. घरच्यांनी सल्ला दिला. 'आणि नाही लावलं तर मनाला लावून घेऊ नको ' अशी चेष्टाही केली" मराठीत लावणे या क्रियापदाचे इतके वेगवेगळे अर्थ होतात. इतरही अनेक क्रियापदांविषयी असे लिहिता येऊ शकेल. इंग्रजीतल्या स्पेलिंगला नियमापेक्षा अपवाद जास्त म्हणून मराठीतील मिसळपाव.कॉमवर इंग्रजीत स्पेलिंग्ज तर्कशून्य का ही चर्चा होत असेल तर तशीच इंग्रजीतील एखाद्या पिझ्झाबर्गर.कॉमवर मराठीतील क्रियापदे तर्कशून्य का (परस्परांशी काहीही संबंध नसलेल्या अनेक वेगवेगळ्या परिस्थितीत एकच क्रियापद कसे "लावता येते") अशी चर्चा होत असेल का? मराठी ही आपली मातृभाषा म्हणून अमृतातही पैजा जिंकत वगैरे असली आणि आपण या गोष्टीला भाषेची लवचिकता वगैरे म्हणत असलो तरी अशा गोष्टींमुळे नव्याने मराठी शिकत असलेल्यांनाही त्रास होतच असेल की. आपल्याच भाषेची ही बाजू अनेकदा आपल्याला अतीपरिचयामुळे लक्षातही येत नाही. खरे तर इतर भाषांमधील कुठल्या तरी गोष्टीला आपण तर्कहिन म्हणणे हे असे खुसखुशीत लेख लिहिण्या-वाचण्यापुरतेच आणि त्यावरून थोडेफार मनोरंजन करण्यापुरतेच ठेवावे असे मला वाटते. कसली ती इंग्रजी (किंवा अन्य कोणतीही भाषा), "आमची मराठी बघा कशी लवचिक" म्हणून फुकाचे अभिमान देत मिशीला पिळ नको. डिस्क्लेमर: ही गोष्ट मी एक जनरल गोष्ट म्हणून लिहित आहे. लेखकाला किंवा अन्य कोणाही सदस्याला तसे वाटते असे मला म्हणायचे नाही. हा खुसखुशीत लेख मलाही आवडला आहेच.
  • Log in or register to post comments

Submitted by चैदजा on Mon, 02/29/2016 - 01:43

In reply to व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड by गॅरी ट्रुमन

Permalink

अहो, आपल्या मराठीत क्रियापदे

अहो, आपल्या मराठीत क्रियापदे इंग्रजीपेक्षा खूप कमी आहेत. अर्थात ती लॉजिकल नाही असे कुणी म्हणु शकणार नाही़. कालच माझ्या मुलाला (वय ६) क्रो आणि क्रोकोडाईल या स्पेलिंगचा फरक सांगतांना माझी भंबेरी उडली.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Wed, 02/17/2016 - 02:37

Permalink

डोस्क्याचा मासळीबाजार ....

डोस्क्याचा मासळीबाजार करून घ्यायचा असेल तर ससेक्स बोलीभाषेतले उच्चार पहावेत. ही ससेक्समधल्या गावांची यादी आहे : ---------------------------------------------------------------------- स्थानिक उच्चार - वर्णक्रम (स्पेलिंग) - देवनागरी ---------------------------------------------------------------------- Ahson - Alciston - आह्सन Arndel - Arundel - आर्नडेल Blashnun - Blatchington - ब्लाशनन Chanklebury - Chanctonbury - शांकलबरी Charnton - Chalvington - शाऽनटन Chiddester - Chichester - चिडेस्टाऽ Envul - Henfield - एन्वूल Furrel - Firle - फाराल Gorun - Goring - गाओरन Heffel - Heathfield - हेफेल Helsum - Hailsham - हेल्सम Hors-am - Horsham - हॉर्स-अम Lunnon - London - लुनन Medhas - Midhurst - मेडास Merricur - America - 'मरिकऽऽ Pemsy - Pevensey - पेम्झी Pettuth - Petworth - पेटअथ Stammer - Stanmer - स्टॅमर Tarrun - Tarring - टारन Simson - Selmeston - सिम्सन ---------------------------------------------------------------------- स्रोत : https://en.wikipedia.org/wiki/Sussex_dialect#Places ग्लासगोची इंग्रजी तर महाभयानक आहे. ती इंग्लिश लोकांनाही समजत नाही. ग्लासगोतल्या स्थानिक ग्राहकांसाठी कॉल सेंटरात नोकरभरती करायच्या वेळेस English with glaswegian accent अशी चक्क जाहिरात करतात. -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Wed, 02/17/2016 - 02:48

In reply to डोस्क्याचा मासळीबाजार .... by गामा पैलवान

Permalink

केविन ब्रिजेस नावाचा एक

केविन ब्रिजेस नावाचा एक स्टँडअप कॉमेडियन आहे. त्याचे ग्लासगोवियन / स्कॉटिश बोलीतले कार्यक्रम जरूर ऐका. तो सिनेमाचं तिकीट काढण्यासाठी फोन करतो तो प्रसंग महालोल आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मयुरेश फडके on गुरुवार, 02/18/2016 - 14:28

In reply to डोस्क्याचा मासळीबाजार .... by गामा पैलवान

Permalink

पार भुस्काट झालय डोक्याच.

पार भुस्काट झालय डोक्याच. बापरे एव्हढा फरक फक्त इग्रजीत ???
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 02/18/2016 - 22:22

In reply to पार भुस्काट झालय डोक्याच. by मयुरेश फडके

Permalink

महाराष्ट्रात ३०७ हजार चौ किमी

महाराष्ट्रात ३०७ हजार चौ किमी क्षेत्रफळावर ११.५ कोटी मराठी भाषिक राहतात. महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व जिल्ह्यामधल्या मराठीत तिचे वेगळेपण ओळखता येईल इतके फरक आहेत. युकेत २४२ हजार चौ किमी क्षेत्रफळावर ६.५ कोटी लोक राहतात. त्यामुळे तेथे विभागवार इंग्लिशमध्ये फरक असणे सहाजिक आहे. जगात देशोदेशी बोलल्या जाणार्‍या इंग्लिशमध्येही बरेच फरक असतात व त्यावरून अनेक देशांच्या नावांवरून तेथिल इंग्लिश भाषा ओळखली जाते; उदाहरणार्थ, अमेरिकन इंग्लिश, ऑस्ट्रेलियन इंग्लिश, इंडियन इंग्लिश (भारत, पाकिस्तान, बांगला देश आणि नेपाळमध्ये बोलली जाणारी इंग्लिश), इ. असे फरक सगळ्याच भाषांमध्ये आढळतात... म्हणूनच म्हणतात की, दर २० मैलांवर भाषा बदलते.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Wed, 02/17/2016 - 05:56

Permalink

डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या

डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या दुव्यात म्हटल्याप्रमाणे, इंग्रजीने अनेक भाषांतून आलेले शब्द सामावून घेतल्याने हा स्पेलिंगचा घोळ निर्माण झाला आहे. 'कर्नल' शब्दाबाबत बोलायचं तरः
ह्या शब्दाचं मूळ इटालियन. सैन्याची एखादी तुकडी एका रांगेत चालत असताना, त्या रांगेवर - इंग्लिश column, इटालियन colonna - नियंत्रण ठेवणारा अधिकारी तो कोलोनेलो (colonnello). हाच शब्द जेव्हा फ्रेंचमध्ये आला तेव्हा त्यातला 'ल' बदलून 'र' झाला आणि त्याच शब्दाचा फ्रेंच उच्चार 'कोरोनेल'च्या जवळपास जाणारा होऊ लागला. फ्रेंचमधून जे हजारो शब्द इंग्लिशने उचलले, त्यात ह्या 'कोरोनेल'चाही समावेश होता. तत्पूर्वी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. जवळजवळ सतराव्या शतकापर्यंत इंग्रजीत एकाच शब्दाची निरनिराळी स्पेलिंग्ज अस्तित्वात असणं, ही अगदी सामान्य बाब होती. दस्तुरखुद्द शेक्सपिअरनेही आपल्या नावाचे स्पेलिंग सध्याच्या प्रचलित Shakespeareप्रमाणे कधीच लिहिलं नाही. १६११ मध्ये प्रसिद्ध झालेलं 'किंग जेम्स बायबल', छपाईतल्या तंत्रातली प्रगती आणि वाढती साक्षरता ह्यासारख्या कारणांमुळे पुढे एका शब्दाचे एक ठरावीक स्पेलिंग नक्की होत गेले. ब्युबॉनिक प्लेगच्या साथीमुळे लंडनच्या दिशेने झालेल्या मोठ्या स्थलांतरामुळे इंग्लिशमधल्या स्वरांच्या उच्चारात घडून आलेल्या बदलांचाही (ग्रेट वॉव्हल शिफ्ट) यात मोठा वाटा होता. फ्रेंचमधून पंधराव्या शतकात जेव्हा हा शब्द इंग्लिशमध्ये आला, तेव्हा अर्थातच त्याची अनेक स्पेलिंग्ज रूढ होती. पण coronel हे स्पेलिंग आणि 'कोरोनेल' हा उच्चार त्यातल्या त्यात सर्वमान्य होता. योगायोगाने याच काळात ग्रीक आणि लॅटिनमधले क्लासिक साहित्य इंग्लिशमध्ये येऊ लागले होते. १४५३ मध्ये कॉन्स्टँटिनोपलच्या (आजचे इस्तंबूल) झालेल्या पाडावामुळे तेथील ग्रीक साहित्याचे व व्याकरणाचे विद्वान, शास्त्रज्ञ, कवी, संगीतकार, खगोलशास्त्रज्ञ, वास्तुविशारद पश्चिम युरोपाकडे वळले. रेनेसान्सचा पाया रचण्याचे काम याच 'ब्रेन ड्रेन'मुळे झाले असं म्हणायला हरकत नसावी. भाषांतराच्या ह्या सुवर्णयुगात जेव्हा इंग्लिश भाषांतरकारांचे इटालियन सैनिकी साहित्याकडे लक्ष गेले तेव्हा त्यांनी 'कोरोनेल'च्या स्पेलिंगचे शुद्धीकरण करून ते मूळ इटालियन स्पेलिंगशी - colonnello शी नाते सांगणारे colonel असे केले. तेव्हापासून कर्नल हा उच्चार आणि त्याचे वरकरणी विसंगत वाटणारे colonel हे स्पेलिंग अस्तित्वात आले. 'ल' आणि 'र' मधल्या ह्या संगीतखुर्चीला भाषाशास्त्रात 'लिंग्विस्टिक डिस्सिमिलेशन' (linguistic dissimilation) अशी संज्ञा आहे. त्याचे उपप्रकार आणि अधिक उदाहरणे येथे वाचता येतील. पण ही अदलाबदली केवळ युरोपियन भाषांतच होते असं नाही. 'पूर्वरंग'मध्ये पुलंनी जपानमध्ये 'परूळेकर'चा उच्चार पालुरीकर कसा होतो, त्याचा विनोदी किस्सा सांगितला आहे.
(अन्यत्र पूर्वप्रकाशित लेखातून) बाकी समजून घेतले, तर फ्रेंच उच्चारांचे नियम इंग्रजीपेक्षा बरेच सोपे आणि युनिफॉर्म आहेत. मात्र थेट पुलंनीच यावरच्या विनोदांची परंपरा घालून दिल्याने (महाजनो येन गता: स शान्जेलिझे? :)), मराठी जनांना हे बहुधा स्वीकारणं जड जात असावं असं स्वानुभवावरून वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Wed, 02/17/2016 - 08:31

In reply to डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या by नंदन

Permalink

+१

अगदी हाच परिच्छेद शोधत होतो, पण काल मिळाला नव्हता!
बाकी समजून घेतले, तर फ्रेंच उच्चारांचे नियम इंग्रजीपेक्षा बरेच सोपे आणि युनिफॉर्म आहेत
सहमत. वरकरणी अनियमित भासणार्‍या फ्रेंच स्पेलिंग-नियमात भलतीच नियमितता आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 02/17/2016 - 12:09

In reply to डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या by नंदन

Permalink

+१११११११११११११११११११११११११

सहमत, इंग्रजी सोडल्यास अन्य युरोपियन भाषांचे स्पेलिंगनियम एकदम नियमित आहेत-अगदी भारतीय भाषांसारखेच. पण सर्व युरोपियन भाषांकडे आपण इंग्रजीच्या चष्म्यातून पाहत असल्यामुळे त्यांची स्पेलिंग्स अनियमित वाटतात इतकेच.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com