✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कुत्री पालन ---- भाग १ ---- निवड, कुत्र्यांची काळजी, शिक्षण आणि लॅब्रेडॉरचे अनुभव.....

म
मुक्त विहारि यांनी
Tue, 02/09/2016 - 11:29  ·  लेख
लेख
वैधानिक इशारे १.---> कुत्री पाळणे, हे अतिशय घातक व्यसन असल्याने, जबाबदारीने, आर्थिक कुवतीने आणि सामाजिक भान ठेवूनच, ह्या व्यसनाच्या नादी लागावे. २.---> कुत्री एखाद्या लहान मुलासारखीच असतात.त्यांच्या देहबोलीवरून, खाण्या-पिण्यावरून आणि भुंकण्यावरून त्यांच्या आजारपणाचा, त्यांच्या मागणीचा, अंदाज घ्यावा लागतो.त्यांची भाषा फक्त त्यांच्यावर मनापासून प्रेम करणार्‍या व्यक्तीलाच समजू शकते. ३.---> कुत्र्यांना शिकवणे हे अत्यंत वेळखाऊ आणि शांतपणे करायचे तप आहे.विशेषतः त्यांच्या "शी-शू"च्या सवयी बाबतीत.त्यांच्यावर जास्त न रागावता ह्या सवयी लावणे, सुरुवातीला थोडे त्रासदायक ठरेल, पण ह्या सवयी लागतात. ४.---> आली लहर आणि घेतला कुत्रा, असे अजिबात करू नका.कुत्रा पाळणे हे तिन्ही-त्रिकाळ करायची गोष्ट आहे.घरात २४ तास कुणी ना कुणी असेल तर (विशेषतः जेष्ठ लोक) कुत्रा जरूर पाळा.मला तरी ह्या बाबतीत कुत्र्यांचा खूपच उत्तम अनुभव आला आहे.आमच्या सासूबाई आता घर सोडून जावू शकत नाहीत.घरात कुत्री आणल्यापासून, त्यांना ह्या कुत्र्यांची छान सोबत होते. ================================================================== काही सूचना सूचना १ ----> ह्या भागात कृपया "कुत्र्यांची तोंडओळख आणि लॅब्रेडोर" ह्या विषयीच माहितीची देवाण-घेवाण करु या. सूचना २ ----> पुढील भागात आपण "बीगल" ह्या जातीविषयी माहिती घेवू या. सूचना ३ ----> आम्ही जरी श्र्वान-व्यसनी असलो तरी, ह्या व्यसना बाबतीत जाणकारही नाही आणि विशेषज्ञ तर अजिबात नाही.त्यामुळे, मी इथे लिहीत असलेली माहिती. बरीचशी मिळवलेली आणि थोडी-फार स्वानुभवाची आहे.कृपया माझी माहिती चुकीची असल्यास, दुरुस्त करण्यात यावी, ही कळकळीची विनंती. सूचना ४ ----> कूठलाही कुत्रा किंवा कुत्री घेण्यापुर्वी, आपल्या घराजवळ किंवा आपल्याला सहज नेता-आणता येईल इतक्या अंतरावर पशूवैद्यक असावा. सूचना ५ ----> आपल्या घराजवळ एखादे पाळीव श्र्वान असेल तर फार उत्तम.साधारणपणे ज्या कुटुंबात श्र्वान असते ते पाळीव श्र्वानांना आणि त्यांच्या मालकांना नेहमीच मदत करतात आणि दोन्ही घरातली कुत्री एकमेकांबरोबर छान खेळतात. ============================================================== कुत्र्यांची निवड ======> कुत्र्यांची निवड करतांना मी खालील गोष्टींना प्राधान्य देतो. १. कारण अ) सोबत ----> आमच्या सासू बाईंना अजिबात ऐकायला येत नाही.त्यामुळे आमच्या अपरोक्ष, त्यांची काळजी घ्यायला कुणी तरी त्यांच्या बरोबर असावे. ब) संरक्षण ----> बाहेरची कुणी व्यक्ती घरांत आली तर, ती सतत आपल्या जवळ असली पाहिजे.आपल्या इशार्‍या नुसार त्यांनी भुंकायला पाहिजे. २. घराचे आकारमान ----> माझा अनुभव, सुरुवातीला आम्ही हा निकष धान्यात घेतला न्हवता.सुदैवाने आमच्या लॅब्रेडॉर जातीच्या कुत्रीने, आमच्या घराचे आकारमान कमी असले तरी, त्रास दिला नाही.पण प्रत्येक लॅब्रेडॉर तसे नसते.किंबहूना, लॅब्रेडीर, ग्रेट-डेन, डॉबरमन, गोल्डन रीट्रीव्हर, अल्सेशियन जातीच्या कुत्र्यांना किमान गॅलरी असलेले घर उत्तम. पग, बीगल, पामेरियन, ह्या अशा दीड-फुटी कुत्र्यांना कमी जागा असली तरी चालते. ३. आज्ञाधारक पणा ----> प्रशिक्षित कुत्री, मालकाने आज्ञा दिल्याशिवाय, शक्यतो घरात भुंकत नाहीत.तरी पण रॉटवायलर सारखी नाठाळ(?) कुत्री फ्लॅट धारकांनी पाळू नयेत, असे मला वाटते. बंगला असेल तर रॉटवायलर सगळ्यात उत्तम, असे माझे मत. ------------------------------------------------------ श्र्वानांची काळजी =====> १. खाणे-पिणे =====> प्रत्येक श्र्वान हे आपापल्या कुवतीनुसारच खाते.लॅब्रेडॉर, ग्रेट-डेन, रॉटवायलर एका वैठकीत २-४ भाकर्‍या सहज रिचवतात आणि आपण काही खाल्लेच नाही अशा अविर्भावात बसतात. आहार नियमित, वेळच्यावेळी आणि संतुलीत असावा.शक्यतो, कुत्र्यांना भरवायला जावू नये.त्यांची खाण्या-पिण्याची भांडी पण वेळोवेळी बदलावी.कुत्री बर्‍याचदा एककल्ली असल्याने, ठरावीक व्यक्ती आणि ठरावीक भांडे, ह्याची सवय, त्यांना लगेच लागू शकते. पुढे-मागे काही कारणांंमुळे, त्या व्यक्तीला कुत्र्याला अन्न द्यायला न जमल्यास किंवा ते भांडे नसल्यास, कुत्रे इतरांनी दिलेल्या किंवा दुसर्‍या भांड्यातील अन्नाला तोंड लावत नाहीत.(ह्या दोन्ही गोष्टी बघीतलेल्या आहेत.) पे-डीग्रीचे खाद्य सुरुवातीला, ३-४ महिन्यांपर्यंत जरूर द्या.पण पुढे मात्र हळूहळू घरच्या जेवणाची सवय त्यांना लावा. भात-पोळी-भाकरी-अंडी-मासे-मटन आणि कोंबडी आठवडाभर आलटून-पालटून द्या.शक्यतो मैद्याचे पदार्थ जास्त देवू नका. त्यांच्या पाण्याच्या भांड्यात सतत पाणी असेल ह्याची काळजी घ्या. २. जंतू संसर्ग ====> श्र्वानांना जंतू संसर्ग फार लवकर होतो.विशेषतः छोट्या श्र्वानांना.त्यामुळे, वेळच्या वेळी कोमट पाण्याने आणि साबण लावून श्र्वानांना आंघोळ घालणे. आपण आजारी असलो तर, श्र्वानांच्या जवळ फार वेळ जावू नका. ३. कातडीचे रोग ====> तापमान आणि इतर आजारी कुत्र्यांच्या सहवासामुळे (मग भले तो थोडा वेळासाठी तरी का असेना) आपल्या श्र्वानाला पण हे रोग होवू शकतात. कुत्र्यांच्या कातडीरोगावर मलमे उपलब्ध असली तरी, ती मलमे कुत्र्यांच्या अंगावर जास्त वेळ टिकत नाहीत.कुत्रे लगेच ती मलमे चाटायला लागतात. त्यामुळे शक्यतो, आम्ही ही मलमे, कुत्रे झोपल्यावर लावतो.कधी यश मिळते तर कधी मिळत नाही. ४. श्र्वानांना फिरायला नेणे ====> सुरुवातीचे २-३ महिने किंवा श्र्वानांचे लसीकरण पुर्ण होईपर्यंत, श्र्वानांना फिरायला नेवू नये. कारण, एकतर त्यांना अद्याप आपल्या सुचना समजत नसतात, त्यांना रहदारीचा अंदाज येत नसतो आणि रस्त्यावरच्या घाणीला ते कधी तोंड लावतील, ह्याची खात्री नसते. २-३ महिने झाले की, मग प्रत्येक श्र्वानाला. मग तो छोटा असो वा मोठा, त्यांना रोजच्या रोज फिरायला न्यावेच लागते.इथे कुठल्याही प्रकारे अळं-टाळं करून चालत नाही.लॅब्रेडॉर सारख्या मोठ्या श्र्वानांना किमान २-३ किमी आणि ते पण दिवसातून २ वेळा अत्यंत आवश्यक आहे. छोटा श्र्वान असेल तर त्याला पण त्याला झेपेल इतपत फिरवायला हवेच. किंबहूना श्र्वानांना जितका व्यायाम द्याल तितके त्यांचे आरोग्य उत्तम राहील. ५. श्र्वानांना शिकवणे ====> खरेतर श्र्वानांना शिकवणे फार सोपे.संयम आणि अंदाज ह्या गोष्टी असतील तर फारच सोपे. ते लहान असतानांच त्यांना शिकवायला घ्या. सुरुवात, त्यांना शांत बसवण्या पासून करा. इथे थोडी-फार चापटी मारलीत तरी चालते.कारण तसेही जास्तीत-जास्त २ चापट्यांनीच काम होते. एकदा त्यांना बसायची सवय झाली, की मग आपण "खा" म्हटल्याशिवाय, त्यांनी खायला नको, ही सवय लावणे, सोपे जाते. कुत्र्यांना घेवून फिरायला जातांना, ह्या दोन्ही सुचनांचे पालन त्यांनी केलेच पाहिजे. तिसरी सवय म्हणजे, बेल वाजवल्या वर भुंकणे किंवा दरवाजा जवळ येणे. चौथी आणि सर्वात महत्वाची सवय म्हणजे, श्र्वानांना त्यांच्या शी-शूची जागा ठरवून देणे. सुरुवातीला, त्यांना द्रव पदार्थच जास्त प्रमाणात द्यायला लागतात.साहजीकच त्यांचे "शू"चे प्रमाण आणि वारंवारता जास्त असते.३-४ महिन्यांनी घन आहार चालू झाला की, शूची वारंवारता फार कमी होते. साधारणपणे खायला दिल्यानंतर, एक १०-१५ मिनिटातच त्यांना "शू" होते.अशावेळी त्यांचे खाणे आम्ही बाथरूम मध्येच देतो.एकदा त्यांनी सलग ३-४ खाणी आणि लगेचची "शू" बाथरूम मध्ये केली की, मग ती देवाघरी जाई पर्यंत पुढील प्रत्येक "शू" ती बाथरूम मध्येच करतात. "शू" प्रमाणेच त्यांच्या "शी"च्या वेळा आणि जागा पण ठराविक असतात."शी" करण्यापुर्वी प्रत्येक कुत्री स्वतः भोवती रिंगण घालतात.त्यांनी असा पिंगा घालायला सुरुवात केली, की सरळ त्यांना बाथरूम मध्ये नेतो.४-५ दिवसांत सवय लागते. शेकहँड द्यायला किंवा सलाम करायला शिकवण्यापेक्षा, ह्या ४ मुलभूत सवयी, श्र्वानांनी आत्मसात केल्या की श्र्वानाचे आणि श्र्वान मालकाचे सुखी-समाधानी-आनंदी जीवन सुरु होते. आता आपण श्र्वानांच्या जातींच्या आणि त्या-त्या जातीतल्या श्र्वानांच्या गुणावगुणांच्या माहितीची देवाण-घेवाण करू या. ६. बाळंतपण ----> त्र्यांचे बाळंतपण हा एक आनंदाचा सोहळा असतो आणि त्याच प्रमाणे जबाबदारीचा. आपल्या कुत्रीला दिवस गेले की, एखाद्या बाळंतिणी सारखी तिची काळजी घ्यायला लागते.तिला सकस आणि चौरस आहार, किती वेळा आणि कुठला द्यावा हे पशुवैद्यका कडून जाणून घ्या. दुर्दैवाने, आमच्या पहिल्या कुत्रीची पिल्ले काही कारणांमुळे गर्भाशयातच वारली. आम्हा उभयतांचे अज्ञान, चुकीची औषध-योजना, घरापासून दूर असलेले पशुवैद्यक आणि लॅब्रेडॉरचे आकारमान, ही त्यामागची कारण-मीमांसा. पिल्ले आतल्या आत गेल्यामुळे, तिचे गर्भाशय काढायला लागले.त्याची परिणिती कुत्रीचे वजन वाढण्यात झाली. त्यामुळे तुमची कुत्री जर गर्भवती झाली तर, अनुभवी पशुवैद्यकाला पर्याय नाही. कुत्र्यांच्या बाळंतपणाबाबत जास्त अनुभव नसल्याने, मी इथेच थांबतो. ================================================== श्र्वान क्रमांक १ ======> लॅब्रेडॉर आणि गोल्डन रिटिव्हर होतील बहू, असतील बहू, पण माझ्या दृष्टीने सर्वोत्तम कौटुंबिक श्र्वान म्हणजे लॅब्रेडॉर आणि गोल्डन रिटिव्हर. मी बघीतलेले ९९% लॅब्रेडॉर आणि गोल्डन रिटिव्हर, अतिशय प्रेमळ, बर्‍यापैकी समजूतदार आणि सहनशील होते आणि आहेत. ह्यांचे दुर्गूण म्हणजे, प्रचंड खादाडपणा, अवाढव्य शरीर, वजन आणि केसगळती. शरीराने बर्‍यापैकी अवाढव्य असल्याने डॉक्टर जवळ नसेल आणि स्वतःची गाडी नसेल तर फार कमी रिक्षावले, ह्यांना न्यायला तयार होतात. आधी ह्यांना जेवायला घालून मग जेवायला बसतात तर थोडी शांत असतात, पण जर तुम्ही आधी खायला बसलात तर तुमच्या ताटात तोंड घालायचा नक्कीच प्रयत्न करतील. तशी ही जात बर्‍यापैकी आळशी.लहानपणी जी काय मस्ती करतील तीच.पण साधारणपणे १-२ वर्षांची झाली की, आपण बरे आणि आपले घर बरे, ह्याच भुमिकेत शिरतात.ह्यांना शिकवायला जास्त त्रास पडत नाही.बाहेर फिरायला काढले की आमच्या लॅबूला तर नंतर-नंतर पट्टा पण लावत न्हवतो. आता इथेच थांबतो.पुढे भेटू या प्रतिसादात. पुढच्या भागात आपण बीगल विषयी माहिती घेवू या.
  • कुत्री पालन ---- भाग २ ---- बीगल

Book traversal links for कुत्री पालन ---- भाग १ ---- निवड, कुत्र्यांची काळजी, शिक्षण आणि लॅब्रेडॉरचे अनुभव.....

  • कुत्री पालन ---- भाग २ ---- बीगल ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
शिक्षण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
अनुभव
माहिती
प्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया द्या
115857 वाचन

💬 प्रतिसाद (170)

प्रतिक्रिया

हे माहीतच नव्हतं ! रच्याकने

उगा काहितरीच
गुरुवार, 02/11/2016 - 17:15 नवीन
हे माहीतच नव्हतं ! रच्याकने चुळा भरतात का नाही ? बापरे भलती काळजी घ्यावी लागते तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

ही माहिती कोणीच सांगितली

अजया
गुरुवार, 02/11/2016 - 11:28 नवीन
ही माहिती कोणीच सांगितली नव्हती.धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मी तर आमच्या फट्या ला पप्पी

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 02/11/2016 - 11:33 नवीन
मी तर आमच्या फट्या ला पप्पी द्यायला शिकवले होते!! त्याच्यासमोर मुंडके वाकवून "फट्या पप्पी दे रेsss" म्हणले की हलकेच आपला डावा किंवा उजवा कान कुरतडल्या सारखा चावत असे हलकेच!! थोड़े खाली वाकुन जमीनीवर थापटी मारली का धावत येऊन अंगावरुन पलीकडे उडी मारे ग़ुलाम!
  • Log in or register to post comments

मी जेनी असे अं अ कुलकर्णी

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/11/2016 - 14:56 नवीन
मी जेनी असे अं अ कुलकर्णी यांचे कॉन्टिनेंटल प्रकाशनाचे पुस्तक आहे. त्यात ती जेनी भुभु लेखिका आहे व शब्दांकन फक्त कुलकर्णींनी केल आहे. मागच्या आठवड्यात इशान्य भारतात फिरायला गेलो होतो.तिथे अनेक भुभु लोक भेटले.सगळ्यांना 'मराठी' समजत होत. आमच्या मते भुभु लोकांना सर्व भाषा येतात. कारण त्यांना मुख्य प्रेमाची भाषा समजते. भुभुच्या पिल्लांचे निरागस तिरळेपण फार मजेशीर असते. माझ्या काल्पनिक आत्मचरित्राचे नाव आहे भुभारडे दिवस!
  • Log in or register to post comments

लॅब्रेडॉरच्या मनमिळावू बद्दलचा आज घडलेला एक किस्सा...

मुक्त विहारि
गुरुवार, 02/11/2016 - 19:25 नवीन
आज संध्याकाळी आमच्या डोंबोलीतल्या, मॉडर्न पाईडच्या मालकीचा, लॅब्रेडॉर फाटक सोडून पळाला.सुदैवाने त्यावेळी मी तिथेच होतो.त्या कुत्र्याच्या गळ्यात ना पट्टा ना गळ्याचा बेल्ट.ते नौकर बिचारे हातात हात घालून गप्प उभे.ते त्याला बोलवायचा प्रयत्न करत होते पण तो पठ्ठा काही फाटकाच्या आत यायला तयार न्हवता. एक रिक्षावाला पण हळूच त्या कुत्र्याला स्प्रर्श करून गेला. मी आधी त्या लॅबूच्या जवळ गेलो.२-३ मिनिटे त्याच्या जवळ जावून, त्याच्या गळ्यापाशी आणि मानेवर खाजवायला लागलो.एकीकडे त्या कुत्र्याशी सरळ मराठीतून बोलायला लागलो. (कुत्र्याला फक्त एकच भाषा समजते आणि ती म्हण्जे "प्रेमाची.") माझ्या अंगावरील "बीगलूचा" वास त्याला यायला लागला आणि तो हळूहळू कंफर्ट झोन मध्ये गेला आणि माझे हात चाटायला लागला.लॅबूने मला स्वीकारल्यानंतर तिथला स्टाफ पण जरा फ्री झाला.त्या हॉटेलवाल्याकडून त्याची आवडती गोष्ट मागीतली.सुदैवाने त्याच्याकडे डॉग-स्टीक होती. मग त्या डॉग-स्टीकचे आमीष दाखवून त्या लॅबूला फाटकाच्या आत सोडले. स्वगत : नीट लक्ष देता येत नसेल तर, कुत्रा पालनाचे पाप करू नका.भेंडी ते काही तुमच्याकडे येत नाहीत.तुम्हीच त्यांना आपल्याकडे आणता आणि मग सांभाळता येत नाही म्हणून नौकरांच्या भरवशावर सोडता.असले मालक, आमच्यासारख्या इमानदारीत श्र्वानांची काळजी घेणार्‍यांचे, नाव मात्र नाहक बदनाम करतात.
  • Log in or register to post comments

कुत्र्याचे लसीकरण आणि

अजया
गुरुवार, 02/11/2016 - 19:31 नवीन
कुत्र्याचे लसीकरण आणि डिवर्मिंग याबद्दलचे अनुभव आणि माहिती पण वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

हो, हे हवंच होतं. कुणीतरी मदत

संदीप डांगे
गुरुवार, 02/11/2016 - 19:52 नवीन
हो, हे हवंच होतं. कुणीतरी मदत करा बॉ... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

लसीकरण आणि डिवर्मिंग

सुनील
गुरुवार, 02/11/2016 - 20:23 नवीन
डिवर्मिंगबद्दल अधिक माहिती नजिकचा पशुवैद्यक अधिक सांगू शकेल. परंतु, किमान सहा महिन्यातून एकदा तरी डिवर्मिंग करून घ्यावे. डिवर्मिंगच्या गोळ्या कुत्र्याच्या घशात घालणे हा एक अनुभवच असतो!! गोळ्यांच्या स्ट्रीपमधून गोळी काढली रे काढली की आमचा टफी सोफ्याच्या मागे, खुर्चीच्या खाली किंवा आणखी कुठेतरी तोंड लपवून बसतो! मग त्याला पकडायचे आणि जबड्याचा वरचा भाग उचलून गोळी घशात आत ढकलायची आणि तोंडाचे दोन्ही जबडे घट्ट बंद करून ठेवायचे. त्याने जीभ बाहेर काढली म्हणजे गोळी पोटात गेली! आणि मग मात्र त्याला त्याचे आवडणारे ट्रीट द्यायचे!! लसीकरण वर्षातून एकदा करावेच लागते. अन्यथा नोंदणीचे नूतनीकरण होत नाही. एकूण ४ लसी (इंजेक्शन्स) दिल्या जातात (अँटी रेबीज, हिपॅटिटिस आणि अन्य २). त्यानंतर १-२ दिवस कुत्रा थोडा मलूल असतो पण काळजी करायचे कारण नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

डिवर्मिंगच्या गोळ्या कुत्र्याच्या घशात घालणे हा एक अनुभवच असतो!!

मुक्त विहारि
गुरुवार, 02/11/2016 - 21:43 नवीन
एकदम साधे उपाय... १. आधीच्या कुत्रीला "खजूर" खूप आवडायचा.खजूराची "बी" काढून, त्या जागी "गोळी" ठेवायची.ती लगेच हा गोळी +खजूर खावून टाकायची. खजूराच्या ऐवजी कधी-कधी पेढा किंवा गूळ पण वापरला होता. २. आमच्या सध्याच्या कुत्रीला, खजूर जास्त आवडत नाही.तिला ५रु.च्या फाइव्ह-स्टार मधे गोळी घालून देतो. कुत्री तितक्या प्रवृत्ती, हेच खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

कुत्र्यांना गोड, चॉकलेट्स देऊ

यशोधरा
Fri, 02/12/2016 - 00:52 नवीन
कुत्र्यांना गोड, चॉकलेट्स देऊ नयेत ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कुत्र्यांना गोड पदार्थ शक्यतो देवू नयेत...

मुक्त विहारि
Fri, 02/12/2016 - 09:15 नवीन
आणि तसेच मसालेदार, तिखट पदार्थ देखील जास्त प्रमाणात देवू नयेत. मासे देणार असाल तर, उकडून (थोडे मीठ+थोडॅ हिंग+थोडी हळद घालून.) आणि त्यातील काटे काढून.काटे घशात अडकायचा संभव असतो. चिकन आणि मटन पण ह्याच पद्धतीने द्यावे.मटणातील आणि चिकन मधील लिव्हर कुत्र्यांना एकदम बेस्ट. केक, खीर, बासुंदी इत्यादी साख्रयुक्त गोड पदार्थ जास्त प्रमाणात देवू नयेत.साधारण १५-२० दिवसातून एकदम थोड्या प्रमाणात दिले तरी हरकत नसते.(१५-२० ग्रॅम मुळे खूप काही फरक पडत नाही.) चॉकलेट मात्र जंताची गोळी आणि घन औषधे देणार असाल तरच द्या.रोजचा डोस असेल तर, सकाळचा डोस चॉकलेट बरोबर, दुपारचा डोस खजूराबरोबर अणि रात्रीचा डोस मधात कालवून दिलात तरी खूप काही बिघडत नाही. खजूर, आंबा, पपई, संत्री, मोसंबी, चिकू, केळी इत्यादी फळे आठवड्यातून एकदा दिलीत तरी चालून जाते. बीट, बटाटे, गाजर, सुरण इत्यादी पदार्थ पण उकडून आणि मीठ न घालता, थोड्या प्रमाणात दिले तरी चालते. अंडी शक्यतो उकडून आणि आतला बलक काढून आठवड्यातून ३ वेळा दिलात तरी चालते. मध १५-२० दिवसातून एखाद-दुसरा चमचा दिलात तर उत्तम. (कुत्र्याला मधाची चव आवडली तर, द्रव औषधे मधातून द्यायला जड जात नाही.वैयक्तिक अनुभव) थोडक्यात काय तर कुत्र्याला उकडलेल्या भाज्या, अंडी, मटन्,मासे किंचित मीठ्,हळद आणि हिंग घालून दिलेत तरी चालते. प्रंमाणामध्ये सर्व काही असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अनुभव

भंकस बाबा
Fri, 02/12/2016 - 23:50 नवीन
माझ्याकडिल पामेरियन पुष्कळ हट्टी होती. तिला आम्ही द्रव रूपातले औषध द्यायचो, अजिबात प्यायची नाही. मग आम्ही तिला ते इंजेक्षनच्या सहाय्याने द्यायचो. पुष्कळ अकांडताण्डव करायची पण एकदा पकडून तोंडात इंजेक्षन खूपसुन औषध दिले की मग गप घ्यायची. दूसरी रोट्विलेर इतकी समंजस होती की मी विष जरी समोर ठेवले असते तर आनंदाने घेतले असते. मी फ़क्त बशीत औषध ठेवले की ती ते घ्यायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

डिवर्मिंगच्या गोळ्या कुत्र्याच्या घशात घालणे हा एक अनुभवच असतो!!

मुक्त विहारि
गुरुवार, 02/11/2016 - 21:48 नवीन
एकदम साधे उपाय... १. आधीच्या कुत्रीला "खजूर" खूप आवडायचा.खजूराची "बी" काढून, त्या जागी "गोळी" ठेवायची.ती लगेच हा गोळी +खजूर खावून टाकायची. खजूराच्या ऐवजी कधी-कधी पेढा किंवा गूळ पण वापरला होता. २. आमच्या सध्याच्या कुत्रीला, खजूर जास्त आवडत नाही.तिला ५रु.च्या फाइव्ह-स्टार मधे गोळी घालून देतो. कुत्री तितक्या प्रवृत्ती, हेच खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

ह्म्मम्म

अर्धवटराव
Sat, 02/13/2016 - 02:13 नवीन
आम्हि लहानपणि कुत्रं पाळण्याबाबत घरी विचारणा केली असता तीर्थरुपांचं टिपीकल उत्तर असायच... "दोन अगोदरच पाळतोय ना.." (म्हणजे अस्मादीक व आमचे जेष्ठ बंधू). आईला खात्री होती कि कुत्र्याचं सगळं तिलाच करायला लागणार.. आमची मदत शुण्य. त्यामुळे ति देखील श्वानपालनाबाबत उत्सुकता दाखवत नसे. आमच्या सौ. ने सासु-सासर्‍यांचे हे गुण एकत्रच उचलले, त्यामुळे आता देखील श्वानपालनाचे चान्सेस नगण्य. तेंव्हा इतरांचं कौतुक बघण्या पलिकडे सध्यातरी काहि करता येत नाहि. पण एकुणच श्वानपालकांकडे बघुन वाटतं कि हाय कंबख्त, ये तो अपुनने पिया हि नहि.
  • Log in or register to post comments

आईला खात्री होती कि कुत्र्याचं सगळं तिलाच करायला लागणार.....

मुक्त विहारि
Sat, 02/13/2016 - 07:33 नवीन
तुमच्या आईने एकदम योग्य निर्णय घेतला. मला पण बरेच जण हेच विचारतात की, आमची मुले कुत्रा पाळण्याचा मुले हट्ट करतात. मी पण त्यांना ३-४ पथ्ये सांगतो. १. मुलाकडे भरपूर फावला वेळ आहे का? आणि २-३ दिवसांनी जर त्यांनी कंटाळा केला तर, तुम्ही ही (कुत्रा पालनाची जबाबदारी) अंगावर घेवू शकता का? २. कुत्र्याचे पालन-पोषण करायला सरासरी ५००० ते ७००० रुपये वार्षिक खर्च येतो.तो तुम्ही करू शकाल का? ३. कुत्र्याला काही शारिरीक इजा झाली तर तुम्ही त्याला घराबाहेर काढणार की त्याला तहहयात सांभाळणार? शारिरीक इजा झालेल्या कुत्र्याला सांभाळायचे असेल तर काळीज दगडाचेच हवे. कुत्र्याला शारिरीक इजा झाल्यामुळे, काही विचित्र पालक कुत्र्याला बेवारस सोडून देतात.कालच एक किस्सा समजला. एक-दोन दिवसात, माहितीची खातरजमा करून. किस्सा टाकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

किस्सा टाकतो. >> अजिबात नको :

यशोधरा
Sat, 02/13/2016 - 07:55 नवीन
किस्सा टाकतो. >> अजिबात नको :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

"अजिबात नको :("

अन्नू
Sat, 02/13/2016 - 10:09 नवीन
"अजिबात नको :(" अर्रर्र.. मिपा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

It is

vikramaditya
Sat, 02/27/2016 - 08:23 नवीन
a regular sight when pets which are old or ill are dumped from car and the car speeds away. This is done by the very family which kept the pet for years at home. How cruel and selfish humans can get? Pets become helpless on streets unless they find an angel..... Often due to shock of being abandoned the pet dies....really heart wrenching.
  • Log in or register to post comments

It is

vikramaditya
Sat, 02/27/2016 - 08:53 नवीन
a regular sight when pets which are old or ill are dumped from car and the car speeds away. This is done by the very family which kept the pet for years at home. How cruel and selfish humans can get? Pets become helpless on streets unless they find an angel..... Often due to shock of being abandoned the pet dies....really heart wrenching.
  • Log in or register to post comments

शीर्षक कस तरी वाटत. कुत्री

प्रकाश घाटपांडे
Sat, 02/27/2016 - 15:55 नवीन
शीर्षक कस तरी वाटत. कुत्री पालन ऐवजी श्वानपालन किंवा भुभुपालन हवे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा