✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हायटेक चितळे बंधू

आ
आनंद भातखंडे यांनी
Fri, 08/31/2012 - 15:38  ·  लेख
लेख
एका शनिवारी भाच्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब पुण्याला जायचा योग आला. पुण्याला गेलं की येताना काय खाऊ आणायचा असा प्रश्नच पडत नाही. चितळ्यांची बाकरवडी तर ठरलेली.मस्त कप भर चहा बरोबर १०-१२ बाकरवड्या कधी फस्त होतात तेच कळत नाही. माझी बहिण कोथरूडच्या Happy Colony मध्ये राहते.तिच्या घराजवळच चितळे बंधूंची शाखा आहे. संध्याकाळी ५ वाजता वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी ६:३० वाजायच्या सुमारास सगळ्या बालगोपाळ मित्र मंडळीना बोलावले होते. संध्याकाळी ५:३० वाजता चितळ्यांच्या दुकानात ताजी बाकरवडी येते अशी ताजी बातमी कानावर पडली आणि दुकाना पर्यंत जायला पाऊले चळवळ करू लागली. अवघ्या ५ मिनिटात मी सपत्नीक चितळे बंधूच्या कोथरूड शाखे समोर येऊन थडकलो. या आधी पण तिथे गेलेलो असल्याने दुकान परिचयाचं होतं. पण त्या दिवशी मात्र बराच फरक/बदल जाणवत होता. दुकानात शिरण्यासाठी जो दरवाजा होता तिथे बरेच अडथळे ठेवलेले दिसले. किंबहुना फालतू, वेळकाढू किंवा उगीच “चवी पुरत्या” येणाऱ्या गिऱ्हाईकाला मज्जाव करण्यासाठी केलेली ही तरतूद असावी. ते अडथळे पार करून आत शिरणार तितक्यात दुकानाच्या बाजूला असलेल्या बोळकांडी वजा जागेतून आवाज आला ” अहो शुक् शुक्, इकडे या …प्रवेश इथून आहे”. त्यातच दुकानाच्या गल्ल्यावर बसलेल्या माणसाने आपली तर्जनी जमिनीला समांतर धरून वाटेकडे बोट दाखवले. मग लक्षात आलं पूर्वीचा मार्ग जो येण्या जाण्या साठी वापरला जायचा त्याचा आता एकदिशा मार्ग झाला होता. पुण्यातील शिस्तबद्ध वाहतुकीला अजून शिस्त लागावी म्हणून एखादा मार्ग अचानक पणे एकदिशा मार्ग घोषित करतात तेच सूत्र इथे पण लागू झालेले बघून मला जरा आश्चर्यच वाटले. कदाचित उगीच गिऱ्हाईकांची गर्दी वाढली असावी. मग परत त्या अडथळ्यातून बाहेर पडून त्या प्रवेश करण्याच्या जागे पर्यंत गेलो. “मग आधी नाही सांगता येत? जरा एक पाउल अजून पुढे पडले असते तर झालेला अपमान कुणी सहन केला असता? बाकरवडी विकत घ्यायला आलोय बाहेरून बरणीतले लाडू बघण्या साठी नाही” मी जरा तुसडेपणानेच विचारले. “इथे बरणीत लाडू ठेवत नाहीत. बरणीत सुकामेवा आहे” या त्याच्या थंड प्रतिक्रियेने मी सराईत पुणेकर आहे हे भासवण्याचा निरर्थक प्रयत्न फोल ठरला. आणि त्याच्या सकट सगळ्या दुकानाला कळले मी पुणेकर नसून ३/४ विजार घालून आलेला एक मुंबईकर आहे. आम्ही त्या प्रवेश दरवाज्यातून आत शिरणार तितक्यात या शुक् शुक् गृहस्थांनी परत थांबवले. मला वाटले इथे येणाऱ्या जाणाऱ्या गिऱ्हाईकाची झडती घेत असावेत असं समजून मी त्याच्या जवळ गेलो आणि कवायतीत करतात त्या प्रमाणे खांद्याच्या सरळ रेषेत हात करून उभा राहिलो. ते गृहस्थ तितक्याच थंडपणे म्हणाले “याची काही गरज नाही आणि अजून ही सिस्टीम चालू झालेली नाही” आणि त्याने माझ्या हातात चक्क एक पोस्टकार्डा किंवा शुभेच्छापत्रा पेक्षा थोडं मोठं प्याड वजा आयताकृती प्लायवूडचे फळकुट दिले. त्या वर कसली तरी स्क्रीन होती. तो जेंव्हा हीच अगम्य वस्तू माझ्या पत्नीला द्यायला लागला तेंव्हा मी म्हणालो “एकच पुरे आम्ही एकत्रच आहोत” परत कुणीही प्रतिप्रश्न करायचे धाडस करू नये अश्या ठसक्यात तो गृहस्थ म्हणाला “जो कुणी इथून आत जाईल त्याने हे बरोबर घेऊन जायचे आहे. आणि जाताना काउंटर वर परत द्या. काहीही खरेदी करताना आणि झाल्यावर हे बरोबर लागेल. तुम्हांला काहीही करायचे नाही फक्त मागितल्यावर हे कार्ड द्या”. एका हातात ते फळकुट ज्याला हे कार्ड म्हणतात ते घेऊन आम्ही उभयतांनी चितळे बंधूंच्या दुकानात एकदाचा प्रवेश केला. आमचा एक हात या फळकुटाने व्यापला होता त्यामुळे उरलेल्या एका हाताने जमेल इतकीच खरेदी करावी लागणार होती. गिऱ्हाईकांना कमीत कमी खरेदी करायला मिळावी, उगाच अनावश्यक वस्तू घेऊन पैश्याचा अपव्यय करू नये असा उदात्त हेतू केवळ पुण्यातच असू शकतो. दुकानात मस्त बाकरवडीचा घमघमाट सुटला होता. आत शिरल्या शिरल्या बाकरवडीच्या काउंटर जवळ गेलो. काउंटर वरचा माणूस एका मोठ्या क्रेट मधील बाकरवड्या पाव पाव किलो मोजून त्याचे हवाबंद पाकीट बनवत होता. मी पाव पाव किलोचे ४ पुडे बनवून देण्यास सांगितले आणि त्याने त्याचं तत्परतेने पुडे भरायला सुरुवात पण केली. मुंबईच्या सवयीने मी त्याला म्हणालो “आत्ता ५:३० ला जी ताजी येते तीच भर” हे वाक्य ऐकताच त्याने हातातले काम थांबवले आणि माझ्याकडे एकच पुणेरी कटाक्ष टाकला. मला वाटलं आता हा मला म्हणणार निघा …बाकरवड्या मिळणार नाहीत आणि वरून काहीतरी उपदेशाचे चार शब्द माझ्यावर फेकणार हे एखाद्या शेंबड्या पुणेकर पोराने देखील सांगितले असते. सौजन्य सप्ताह चालू आहे, कधी नव्हे ते येणाऱ्या गिऱ्हाईकाचा सन्मान करून त्याला दुर्मुख करू नये असा चेहेऱ्यावर सोज्वळ भाव आणून तो काउंटरवरचा पुणेरी दुकानदार मझी मंजुळवाणीने कानउघाडणी करू लागला “सकाळी आलेली बाकरवडी संध्याकाळी विकत नाही ….कारण ती विकण्यासाठी उरतंच नाही. इथे रोज सकाळ संध्याकाळी ताजा माल येतो. देऊ का? खात्री नसेल तर उद्या संध्याकाळी ५:३० वाजता क्रेट मोजायला या” सकाळच्या का संपतात म्हणजे कमी बनवता की विकल्या जातात असा खोडसाळ प्रश्न विचारण्याचे मुद्दाम टाळले आणि त्याला चार पुडे बांधून देण्याची विनवणी वजा आर्जव केलं. पटापट त्याने ४ पुडे भरले आणि म्हणाला “कार्ड द्या”. प्रवेश करताना दिलेल्या मोठ्या आयताकृती फळकुटाला कार्ड म्हणणं जरा हास्यास्पदच होतं. कार्ड कसलं ते कार्ड बोर्ड होता तो … तुमच्या दरवाज्यावरची पाटी लिहिता येईल इतका मोठा. “तुमच्या हातात आहे तेच कार्ड द्या. त्याच्या वर तुम्ही घेतलेल्या वस्तूंची नोंद होईल आणि पुढे याच कार्डचा उपयोग तुम्ही काय काय वस्तू घेतल्यात त्या प्रमाणे बिल बनवले जाईल. बिला प्रमाणे पैसे द्यावे लागतील.” मी परत एकदा त्या फळकुटाकडे बघितलं आणि ते “कार्ड” त्याला देता देता म्हणालो “अरे वा … एकदम अत्याधुनिक प्रणाली आहे तुमच्या कडे” त्याला बहुदा माझा खोचकपणा देखील कळला नाही किंवा माझं “प्रणाली” वगैरे पण त्याच्या डोक्यावरून गेलं. त्या सद्गृहस्थाने ते कार्ड माझ्याकडून खेचून घेतले आणि त्याच्याकडील मोजणी यंत्रावर ठेवले. त्यावर असलेली काही बटणे दाबून ते कार्ड मला परत दिले. मी त्या बाकरवडीच्या वासाने इतका अधीर झालो होतो की काउंटर सोडता सोडता मी बाकरवडीची एक पुडी फोडली. आणि त्यातली एक बाकरवडी उचलून तोंडात टाकणार इतक्यात बाकरवडी काउंटरवरचा इसम ओरडला “बिल बनवायच्या आगोदर इथे खाऊ नका.” आणि त्याच्या सुरात माझ्या बायकोने पण सूर मिसळला “तुला काही कळतं की नाही … लहान मुला सारखं इथेच काय पाकीट फोडून खायला सुरुवात केलीस?” दोन बोटांनी पकडलेली बाकरवडी तशीच पुडीत सोडून द्यावी लागली. पुढे लाडू, पेढे, बर्फी यांचा काउंटर होता. काय मस्त मस्त रंगांच्या बर्फ्या ठेवल्या होत्या … अगदी बघता क्षणी एक डिश भर घेऊन तिथेच फस्त कराव्याश्या वाटत होत्या. लाडूंची तर रेलचेल होती. मेथी लाडू, बुंदी लाडू, मोतीचूर लाडू, बेसन लाडू, रवा लाडू झालच तर डिंक लाडू … पण या सगळ्या लाडवांमधून “पौष्टिक” लाडूने माझे लक्ष वेधून घेतले. “हा पौष्टिक लाडू काय प्रकार आहे?” असे विचारताच त्या काउंटर वरील माणसाने पौष्टिक लाडू, त्याचे घटक, पौष्टीकतेचे परिमाण सविस्तर सांगितले. पाव किलो पौष्टीक लाडू घेतले आणि सराईतपणे कार्ड पुढे केले. परत ते कार्ड त्या मोजणी-नोंदणी यंत्रावर ठेवले गेले आणि त्या कार्डावर नोंद करून ते मला परत दिले. अजून बाकी काही चकणा आयटम नको ना असं विचारताच भर चितळ्यांच्या दुकानातच कुणाचाही मुलाहिजा नं ठेवता बायको म्हणाली “नको इथून नको. या पेक्षा चांगले आणि स्वस्त चकणे आपल्या डोंबिवलीला मिळतात तुझ्या त्या गुजराथ्याकडे मिळतात”. ती असं म्हणताच मी इकडे तिकडे बघायला लागलो आणि मेन काउंटर वरचा मालक माझ्या हावभावांकडे बघून मिश्किलपणे हसत होता. … अश्या काही प्रसंगावरून मला नेहेमी वाटतं की माझी बायको पूर्व जन्मीची पुणेकर असावी. ;) एका हातात सामान आणि दुसऱ्या हातात माझे आणि माझ्या बायकोचे कार्ड घेऊन मी सामानाचे पैसे देण्यासाठी शेवटच्या काउंटरवर आलो. कुठल्याही काउंटर वर गेलं की कार्ड पुढे करायचं हे माहीत झाल्यामुळे मी माझ्या हातातील दोन्ही कार्ड त्याच्या समोर धरली. त्याने त्यातले एक फळकुट घेतले आणि त्याच्या कडील मोजणी यंत्रावर ठेवले. ते बहुतेक बायकोच्या हातातले असल्याने त्या कार्डावर कुठलीही नोंद आढळली नाही. आधी मला वाटले वा …काहीच नोंद नाही म्हणजे काही तरी गल्लत झाली असणार आणि आता हा माल चकटफू मिळणार. “दुसरे कार्ड द्या” या मालकाच्या वाक्याने मी वास्तवात आलो. दुसऱ्या कार्डात सगळ्या नोंदी सापडल्या मालकाच्या चेहेऱ्यावर प्रसन्न भाव बघितले. किती झाले हे विचारायच्या आताच मालकाने त्याची तर्जनी संगणकाच्या पटलावर जिथे मोठ्या अक्षरात किंमत दिसत होती तिथे ठेवली. आणि त्याचं तर्जनीने बिल छापण्यासाठी असलेले बटन दाबले. छापील बिलाप्रमाणे रक्कम दिल्यावर मालक आदबीने म्हणाला “डोंबिवली मधून आलात का? बघा अजून काही नकोय ना?” मी म्हटलं “हो, डोंबिवलीहून आलोय. नको अजून काही नको” (आणि जरी हवं असेल तरी हा माणूस मला परत प्रवेश द्वारावर जाऊन फळकुट घेऊन यायला सांगेल”) “इथे प्लास्टिकच्या पिशव्या मिळणार नाहीत” अशी हुकुमावरून स्वरातील पाटी ठळकपणे दिसत असताना सुद्धा पिशवी आहे का? असे विचारले असते तर कदाचित त्याने बाकरवड्या काढून घेतल्या असत्या आणि मला रिकाम्या हाताने पाठवले असते या भीतीने मी पिशवी बद्दल विचारले नाही. पण काय आश्चर्य मालकांनी माझ्या कडून समान घेतले ते प्लास्टिकच्या पिशवीत भरले आणि ती पिशवी चेहेऱ्यावर स्मितहास्य ठेवून मला परत केली. मी परत एकदा ‘पिशवीचे किती झाले?’ हे विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही कारण एकच भीती ….ताज्या बाकरवड्या हातून निसटल्या तर???
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
संस्कृती
विनोद
समाज
जीवनमान
राहणी
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
मत
अनुभव
माहिती
आस्वाद
समीक्षा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
30288 वाचन

💬 प्रतिसाद (203)

प्रतिक्रिया

लेखन आवडले नाही. चितळ्यांवर

रेवती
Fri, 08/31/2012 - 19:35 नवीन
लेखन आवडले नाही. चितळ्यांवर लिहिले आहे म्हणून नाही तर एकंदरीतच ते 'नावे ठेवणे' या क्याट्यागरीतले वाटते. तुम्हाला एक ग्राहक म्हणून अगदी (कोणत्याही) दुकानाच्या समोर, बाजूला, मागे, तळघरात वाहन पार्क करण्यापासून ते दुकानात शिरून वस्तू घेऊन बाहेर (दुकानाच्या कायदेशीर हद्दीबाहेर) पडेपर्यंत अनेक 'सेवा' अपेक्षित असतात. त्या न मिळाल्यास खुशाल दुकान बदला. त्यांना पुन्हा हिंग लावून विचारू नका. भारतात सुदैवाने अनेक उत्तम मिठाईवाले आहेत. चितळे हे काही एकमेव नाहीत. तुम्हाला इतक्या खटकणार्‍या गोष्टी वाटतायत तर स्वत: फिरकू नका म्हणजे असा त्रास पुन्हा होणार नाही. बाकी त्या फळकुटाबद्दल बोललेले त्या काउंटरवरच्या मनुष्यास समजले नाही म्हणता? पण ते नक्की काय आहे? कुठे आणि कधी बनवले आहे याची कल्पना तुम्हालाही नाही. जर्रा शोध घेतलात तर समजेल.

आज्जे...

मी-सौरभ
Mon, 09/03/2012 - 13:07 नवीन
यु टू :O
↩ प्रतिसाद: रेवती

लेख आवडला

घाटि प्रम्या
Fri, 08/31/2012 - 19:40 नवीन
लेख अवडला पु.ले.शु

पर्‍याशी सहमत. एकुणच आम्ही

रमताराम
Fri, 08/31/2012 - 21:09 नवीन
पर्‍याशी सहमत. एकुणच आम्ही पुण्यात पोटे भरायला येऊन असली रडगाणी गाणार्‍यांना नेहमीच सांगतो 'जा रे बाबा. तुझ्या तुझ्या देखण्या नि वक्तशीर, नेटक्या गावी. आमचे गबाळे नि उद्धट पुणे राहू द्या आमच्यासाठी. आम्हाला प्रगती वगैरे काही करायची नाही. उगाच आमचे डोके उठवू नका. काय दिवे लावायचे ते आपापल्या गावी जाऊन लावा. वर इथल्या बाकीच्यांनाही घेऊन जा नि रोजगार द्या. आम्ही आपले शांतपणे एकवेळ जेवून राहू इथे.' फक्त सांगलीच्या लोकांना एक विनंती. चितळेंच्या नावे 'पुणेकर' म्हणून इतका शंख झाल्यावर आता ते भिलवडी-वांगीचे आहेत म्हणून त्यांना घेऊन जाऊ नका. आता ते सर्टिफाईड पुणेकर झालेत ना, तसेच राहू द्या.

“मग आधी नाही सांगता येत? जरा

गणपा
Fri, 08/31/2012 - 21:43 नवीन
“मग आधी नाही सांगता येत? जरा एक पाउल अजून पुढे पडले असते तर झालेला अपमान कुणी सहन केला असता? बाकरवडी विकत घ्यायला आलोय बाहेरून बरणीतले लाडू बघण्या साठी नाही” मी जरा तुसडेपणानेच विचारले.
सदर प्रसंगातला खरेदीकर्ता धुतल्या तांदळाचा नाही हेच वरील वाक्यातुन जाणवले. बाकी पराशी बर्‍याच अंशी सहमत. - गणा मुंबैकर.

आनंदा, लेख भारीच रे! पुणेकर

सोत्रि
Sat, 09/01/2012 - 00:01 नवीन
आनंदा, लेख भारीच रे! पुणेकर आणि मुबैकर ह्या वादाचा चष्मा न लावता लेख वाचला तर मजा आली. तसं म्हटलं तर पुणे मुबै वाद ह्या लेखाने उद्भवू शकतो खरा! पण पराशी नाही म्हटले तरी सहमत व्हावे लागते आहे. उगा पराला बरें वाटावे म्हणुन नाही तर मीही एक पुणेकर आहे म्हणून. (पूर्वाश्रमीचा मुबैकर असलो म्हणुन काय झाले ;) ) - ( सोयीनुसार मुबैकर किंवा पुणेकर होणारा ) सोकाजी

ईथे साफसफाई झाली वाटतं.

गणामास्तर
Sat, 09/01/2012 - 01:23 नवीन
ईथे साफसफाई झाली वाटतं.

बाकरवडी

रामपुरी
Sat, 09/01/2012 - 02:34 नवीन
ती बडिशेप घातलेली गोड बाकरवडी आणि पाणी न काढलेल्या चक्क्याचं (चक्का कसला दहीच ते) पातळ श्रीखंड म्हणून विकलं जाणारं दही साखर... ब्याsssssssक

मजा आली

satish63
Sat, 09/01/2012 - 04:54 नवीन
आनंदराव, लेख खुमासदार आहे. एक वाचक म्हणुन मजा आली.

मजेदार

फारएन्ड
Sat, 09/01/2012 - 06:07 नवीन
मजेदार लिखाण म्हणून ठीक आहे. पण मी त्या दुकानात अनेक वेळा गेलेलो आहे. अत्यंत चिंचोळ्या जागेत असूनही या सिस्टीममुळे तेथील व्यवस्था कायम चांगली वाटलेली आहे. प्रवेश समोर रस्त्यावरून्/फुटपाथवरून येणार्‍या माणसांकरता तेथेच न ठेवता बाजूने ठेवल्याने लोकांची गडबड होते, पण एकदा कळले की त्यात गैरसोय काही नाही. चार-पाच वेगवेगळे 'आयटेम' घेऊन काउंटरवरच्या ला टोटल करायला लावण्यापेक्षा ती कार्ड सिस्टीम जास्त एफिशियंट वाटली. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या दारासमोर जागा असेल तर गाडी लावता येते. इतर 'स्वीट मार्ट्स' प्रमाणे पार्किंगच्या जागेत पाणीपुरीची गाडी लावून आपली गैरसोय करून साईड बिझिनेस केलेला नाही ( अर्थात जेथे तो केलेला आहे तेथे आपले लोकही बिनदिक्कतपणे बाहेर नो पार्किंग मधे गाड्या लावून आतील मूळच्या पार्किंगच्या जागेत उभ्या केलेल्या गाड्यांवरचे पदार्थ हाणत असतात :) ).

लेख मस्त जमला आहे..

मुक्त विहारि
Sat, 09/01/2012 - 07:52 नवीन
लेख मस्त जमला आहे..

मी अजिबात खवैय्या नसल्याने

चौकटराजा
Sat, 09/01/2012 - 08:57 नवीन
मी अजिबात खवैय्या नसल्याने गेल्या ४० वर्षात मी चितळेंच्या दुकानात मोजून चार वेळा गेलो असेन . त्यामुळे तेथील व्यवस्थे बदद्द्ल व खवचटपणा ( असला तर ) बद्द्ल अनभिज्ञ म्हणून भाग्यवान !

चितळे ग्रेट आहेतच आणि त्याहून

सुहास झेले
Sat, 09/01/2012 - 09:03 नवीन
चितळे ग्रेट आहेतच आणि त्याहून ग्रेट पराचा पुणेरी प्रतिसाद ;)

ज्याम आवडलेले सत्यवचन.......

नाखु
Sat, 09/01/2012 - 09:15 नवीन
सर्वात महत्वाचे :- चितळे कोणालाही पत्रीका पाठवून 'अगदी सहकुटूंब सहपरिवार खरेदीला यायचे हां!' असे आमंत्रण देत नाहीत. तेंव्हा उगाच 'किती ती यातायात' असल्या टाईपात कुंथू नये. आपण ज्या कुठल्या शहरात राहता तिथेच आपल्या आवडीचे दुकान बघून खरेदी करावी. सदाशिव पेठेत राहिलेला ( आणि शाळा शिकलेला).....

३/४ विजार बाहेर घालणार्‍या

शुचि
Sat, 09/01/2012 - 10:09 नवीन
३/४ विजार बाहेर घालणार्‍या लोकांबद्दल माझे चांगले मत नाही. माझ्या मताला पुष्टी देणाराच लेख. वाचून डोक्याचे दही झाले.

आईशप्पथ सांगतो, गुगळे आणि

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 09/01/2012 - 10:48 नवीन
आईशप्पथ सांगतो, गुगळे आणि त्यांची जीन्स बद्दलची मते आठवली.
↩ प्रतिसाद: शुचि

जीन्स म्हणजे वस्त्रातले कि

sagarpdy
Mon, 09/03/2012 - 11:09 नवीन
जीन्स म्हणजे वस्त्रातले कि जीवाशात्रातले ? ;) (उपलब्ध असल्यास माहितीचा दुवा द्या.)
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

की सोत्रिशास्त्रातले??

गवि
Mon, 09/03/2012 - 11:22 नवीन
की सोत्रिशास्त्रातले??
↩ प्रतिसाद: sagarpdy

हे हे हे!

sagarpdy
Mon, 09/03/2012 - 15:19 नवीन
हे हे हे!
↩ प्रतिसाद: गवि

=))

सोत्रि
Tue, 09/04/2012 - 11:42 नवीन
खि खी खी.... -(शास्त्री) सोकाजी
↩ प्रतिसाद: गवि

चितळेबंधूंच्या दुकानावर

मनीषा
Sat, 09/01/2012 - 10:14 नवीन
चितळेबंधूंच्या दुकानावर तुम्ही केलेल्या रोमहर्षक स्वारीचे वर्णन ठिकठाक जमले आहे. बाकरवडी आवडली की नाही ह्या बद्दल काहीच लिहिलेले नाही. ते लिहिले असते तर आणखी काही स्तुतीपर शब्द लिहिता आले असते. असो...

चितळे - एक आदरणीय संस्था

सर्वसाक्षी
Sat, 09/01/2012 - 10:35 नवीन
मला चितळे या संस्थेविषयी विलक्षण आदर आहे. लोक ज्याची टवाळी करतात तो तर्‍हेवाईकपणा वा कोणाला वाटत असलेला माज सहन करुनही लोक तिथेच का येतात हे विचार करण्यासारखे आहे. शुद्धता आणि गुणवत्तासातत्य हे चितळ्यांचे वैशिष्ठ्य आहे. नपेक्षा खंडोगणती हलवाई असताना आणि रांगेत उभे राहुन खरेदी करायला लोक इथेच का येतात? बाकरवडी आणि आंबा बर्फी खूप लोक बनवितात पण तरीही चितळ्यांच्या वस्तू त्या चितळ्यांच्या वस्तू. उगाच वजन भरल्यावरसुद्धा एखाद तुकडा पुड्यात टाकुन 'बघा आम्ही किती ग्राहकप्रेमी आणि दानशूर आहोत' असे भाव चेहेर्‍यावर आणायचे उद्योग चितळ्यांना करावे लागत नाहीत. किंबहुना जर तुमच्या मालाची गुणवत्ता उत्तम असेल तर तुम्हाला किंमत वा नाराजीची पर्वा करायला लागत नाही हे चितळ्यांनी सप्रमाण दाखवुन दिले आहे. त्यांची खरेदी नोंदपत्र पद्धत निदान भारतात व या क्षेत्रात तरी मी प्रथमच पाहिली - चोख व्यवहार. 'आणखी काय घेतलेत ?' असे अपमानकारक व अजागळ प्रश्न ग्राहकाला विचारण्यापेक्षा हे उत्तम. चितळ्यांचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे बासुंदीसारखा द्रवपदार्थ जर ग्राहकाने भांडे वा डबा नेला तरच दिला जातो. प्लास्टिकच्या पिशवीवर बंदी नसलेल्या काळातही तो तसा दिला जात नसे. कदाचित यामागे पिशवी अनवधानाने फुटुन अन्न वाया जाऊ नये असा विचार असावा. स्वतःच्या उत्पादनाईतका विश्वास कदाचित प्लास्टिकचे डबे पुरविणार्‍यांवर नसल्यामुळे असेल पण ते अशा पदार्थासाठी डबे ठेवत नाहीत हे खरे, नपेक्षा त्याचे वेगळे पैसे मोजायला ग्राहकाची ना नसावी. हा एक अपवास सोडता चितळे ग्राहकाभिमुख आहेत हे खरे. कुणाला 'रोख ठोक बोली पण चविष्ठ आणि चोख माला' पेक्षा 'मिठ्ठास बोली आणि सुमार माल' बरा वाटत असेल तर त्याने चितळ्यांकडे न जाणे बरे. बाकी लेखाविषयी बोलण्यासारखे काही नाही, अवांतराबद्दल क्षमस्व..

+१

अमोल खरे
Sat, 09/01/2012 - 10:55 नवीन
अतिशय टुकार लेख. चितळे हा आज एक यशस्वी ब्रँड आहे. चितळे म्हणाल्यावर पदार्थाची गुणवत्ता ही बरोबरीने येतेच. पण काय आहे ना, कि मोठ्या लोकांवर चिखलफेक केली की आसुरी आनंद होणारी एक कॅटेगरी असते. त्याला काहीच करु शकत नाही. जाता जाता एक उदाहरण म्हणुन सांगतो, चितळ्यांच्या आम्रखंडासारखी चव दुसरीकडे कुठेही पाहिली नाही. मुंबईत अनेक गुजराथी, मारवाडी आवर्जुन चितळ्यांचेच आम्रखंड घेतात. आज मुंबईतील अनेक दुकानदार चितळ्यांचे प्रॉडक्ट्स भरभरुन विकायला ठेवतात. चितळ्यांइतका टॅक्स किती हलवाई भरतात ? आ़णखीही ब-याच गोष्टी आहेत पण एकदा चितळ्यांवर डोकं बाजुला ठेवुन बिनबुडाचे आरोप करायचे म्हणाल्यावर बाकी सर्व स्पष्टीकरण व्यर्थ ठरते.
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

प्रतिसाद आवडला

आनंद भातखंडे
Wed, 09/05/2012 - 12:10 नवीन
सदर लेखात चितळे किंवा त्यांच्या दर्जावर कुठलेही आरोप केलेले नाहीत.
↩ प्रतिसाद: अमोल खरे

बाकी चव वगैरे मुद्दे तसे ठीक

बॅटमॅन
Wed, 09/05/2012 - 12:45 नवीन
बाकी चव वगैरे मुद्दे तसे ठीक पण
चितळ्यांइतका टॅक्स किती हलवाई भरतात ?
हे कुठून आलं मध्येच? की समर्थन करायचं म्हटल्यावर काहीही कैच्याकै मुद्दे उचलून धरायचे? या विधानाच्या पुष्ट्यर्थ काहीतरी विदा आहे की दिलं आपलं बिनबुडाचं ठोकून?
↩ प्रतिसाद: अमोल खरे

+१

स्पा
Wed, 09/05/2012 - 15:21 नवीन
+१११११
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अतिशय सहमत

संपत
Sat, 09/01/2012 - 19:56 नवीन
मी मुंबईचा असूनही चितळ्याचा आणि इतरही अनेक पुणेकर दुकानदारांचा माज मला आवडतो. कारण असा माज अनेक वर्षे मालाची खात्री असल्याशिवाय करता येत नाही. अनेक गुजराथी आणि मारवाडी दुकानदारांना दर्जाचे सातत्य टिकवता येत नाही हा माझा अनुभव. दुसरा नेहमी उल्लेखाला जाणारा मुद्दा म्हणजे १-४ दुकान बंद. आता दुपारी दुकान उघडे ठेवायला ते काय हॉस्पिटल आहे काय? डॉक्टरदेखील आपला दवाखाना दुपारी बंद ठेवतात. आपापल्या कार्यालयात work-life balance हवा, मग दुकानदाराने ३ तास ते बंद ठेवले तर एवढा काय कहर कोसळतो.
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

हम्म

तिमा
Sat, 09/01/2012 - 11:00 नवीन
आम्ही दरवेळेस पुण्याला आलो की चितळ्यांच्या दुकानात जातो पण बाकरवडी खरेदी करत नाही. मोतीचुराचे अस्सल लाडु व लाडवाइतके मोठे केशरी पेढे !!! बाकरवडी का घेत नाही असे कधीही चितळ्यांनी आम्हास विचारले नाही.

उगाचच इतका मोठ्ठा पकाऊ लेख

चेतन माने
Sat, 09/01/2012 - 11:08 नवीन
उगाचच इतका मोठ्ठा पकाऊ लेख लिहिलाय!! खिल्ली उडवण्याच्या प्रयत्नात स्वतःचीच उडवून घेतलीये (पुणे १ - मुंबई ०)

खुनशी प्रतिक्रिया

हुप्प्या
Sat, 09/01/2012 - 11:25 नवीन
एखाद्याने आपल्या मित्राची गंमतीत खेचावी इतपतच टीका, चेष्टा मूळ लेखकाने केलेली आहे. त्यात आकस वगैरे आढळला नाही. पण अनाहूतपणे चितळ्यांचा, सदाशिव पेठेचा आणि तमाम पुण्याचा मक्ता घेतलेले पुणेकर इतकी खुन्शी प्रतिक्रिया देताना बघून गंमत वाटली. बहुधा मुठेचे पाणी पिऊन असे आडमुठे लोक बनले असावेत. असो.

सहमत

चेतन माने
Sat, 09/01/2012 - 11:30 नवीन
सहमत
↩ प्रतिसाद: हुप्प्या

सहमत (पुणे १ - मुंबई १ )!!!!

चेतन माने
Sat, 09/01/2012 - 11:31 नवीन
सहमत (पुणे १ - मुंबई १ )!!!!
↩ प्रतिसाद: हुप्प्या

अनाहूतपणे?????????

शुचि
Sat, 09/01/2012 - 16:53 नवीन
अनाहूतपणे????????? बॉर्र!!! चितळे मित्र का लेखकाचे, त्यांची एखाद्या व्यासपीठावर खेचायला? असेल असेल!!
↩ प्रतिसाद: हुप्प्या

हुप्प्या भाऊ, हे नवीन आहे का

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 09/01/2012 - 18:09 नवीन
हुप्प्या भाऊ, हे नवीन आहे का इथे ? हा धागा आठवतो आहे ना ?
↩ प्रतिसाद: हुप्प्या

सहमत.

प्रभाकर पेठकर
Sun, 09/02/2012 - 02:02 नवीन
@हुप्या, संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. फक्त शेवटचे विधान अनावश्यक आणि भडकाऊ आहे.
↩ प्रतिसाद: हुप्प्या

बरोबर आहे........

नाखु
Sat, 09/01/2012 - 11:52 नवीन
नाही तरी "चितळे" काय मिपा वाचत नाहीत . ( मग द्या ठोकून "कल्पनाविलास " अनुभव) . आणि अतिशय महत्वाचे दुकानाची वेळ या बाबतचा सुधीर गाडगीळांचा लोकप्रभातला लेख वाचाच.

दुकानाची वेळ

कुंदन
Sat, 09/01/2012 - 12:27 नवीन
त्यात काये. दुपारी गिर्‍हाईके येत नाहित, तर कशाला दुकान उघडे ठेवा?
↩ प्रतिसाद: नाखु

बेस्ट चिवडा

रमेश आठवले
Sat, 09/01/2012 - 23:39 नवीन
पुण्यातील लक्ष्मीनारायण बेस्ट चिवडा मला फार आवडतो. त्यासंबधी फोनवर चौकशी केल्यावर मालकांनी सांगितले कि हा चिवडा पुण्याबाहेर कुठेही विकला जात नाही आणि कुरिअरने पण पाठविला जात नाही. तरी चितळे यांचा चिवडा आणि लक्ष्मीनारायण चिवडा यांचा कुणी पुणेकराने तौलनिक अभ्यास केला असल्यास त्या संबंधी माहिती द्यावी. चितळे यांचा चिवडा लक्ष्मीनारायण इतकाच किंवा त्याहून चांगला असण्याची शक्यता आहे आणि चितळे यांचा माल पुण्याबाहेरही बर्याच ठिकाणी मिळतो असे वर वाचनात आले म्हणून हि चोकशी .

लक्ष्मी नारायण

मैत्र
Sun, 09/02/2012 - 01:14 नवीन
चितळ्यांचा चिवडा साधारण तसाच असतो. पण तरीही लक्ष्मीनारायण ला तोड नाही. मला वाटतं चितळ्यांचा थोडासा तेलकट असतो. त्यांचाही चांगलाच आहे पण लक्ष्मी नारायण तो लक्ष्मी नारायण! (आता पुण्याला आल्यावर शोधून लक्ष्मी नारायण चिवडा आणणं आलं! पुण्यातल्या पदार्थांची यादी वाढतेच आहे.) अवांतरः हा पुणेरी खाद्यसंस्कृती चा लेख मस्त आहे. काही थोड्या उत्तम जागा विसरल्या आहेत पण एकूण आढावा आणि विशेष भाग छान आहेत.)
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

काँप्रिहेन्सिव्ह लेख आहे.

बॅटमॅन
Sun, 09/02/2012 - 01:48 नवीन
काँप्रिहेन्सिव्ह लेख आहे. आशिष चांदोरकरांच्या ब्लॉगवरतीदेखील या विषयावर बरेच काही लिहिले गेले आहे.
↩ प्रतिसाद: मैत्र

काँप्रिहेन्सिव्ह लेख आहे.

बॅटमॅन
Sun, 09/02/2012 - 01:48 नवीन
काँप्रिहेन्सिव्ह लेख आहे. आशिष चांदोरकरांच्या ब्लॉगवरतीदेखील या विषयावर बरेच काही लिहिले गेले आहे.
↩ प्रतिसाद: मैत्र

लक्ष्मी नारायण भारतात इतरत्र

शिल्पा ब
Sun, 09/02/2012 - 07:05 नवीन
लक्ष्मी नारायण भारतात इतरत्र मिळतो का नाही माहीत नाही पण अमेरीकेतल्या भारतीय दुकानात नेहमी असतो.
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

अत्यंत टुकार

श्रीरंग
Sun, 09/02/2012 - 00:32 नवीन
अत्यंत टुकार लेख!

आत्ता इतक्या उशीरा वाचले की

शुचि
Sun, 09/02/2012 - 02:30 नवीन
आत्ता इतक्या उशीरा वाचले की हा लेख भातखंडे यांनी लिहीला आहे :(. मला त्यां लेख आवडतात. मोर्‍या बापट, मी आणी सुट्टी, डॉक्टर डॉक्टर हे लेख विशेष आवडले. पण हा विषय इतका ज्वलंत (पेटनशील) असल्याने , लेखकाचे नावच पहायला विसरले एकदम "डुक्करमुसंडी" मारून टीकात्मक प्रतिसादच देणे सुरु केले. असो ......... हा लेख आवडला नाही :( पण पुलेशु.

डुक्करमुसुंडी

आनंद भातखंडे
Wed, 09/05/2012 - 12:49 नवीन
हा हा हा .... बऱ्याच जणांनी डुक्करमुसुंडी, धडक, चापट्या, चिमटे काढून झालेले आहेत. पण मज्जा वाटली असे टीकात्मक प्रतिसाद वाचून.
↩ प्रतिसाद: शुचि

लेखनशैली आवडली. चितळे हे नाव

पक्या
Sun, 09/02/2012 - 13:02 नवीन
लेखनशैली आवडली. चितळे हे नाव न लिहिता लेख लिहिला असता तर वेगळ्या प्रतिक्रिया आल्या असत्या. मी एक पक्का पुणेकर असूनही सांगू शकतो की लेख चांगला जमला आहे. काही लोकांनी एकच दृष्टिकोन ठेवून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काल प्रतिसाद टाकायचा होता तो

प्यारे१
Sun, 09/02/2012 - 18:45 नवीन
काल प्रतिसाद टाकायचा होता तो टाकताना मिपा गंडलं....! आज प्रयत्न करतो. "नेहमीचा यशस्वी ट्यार्पी खेचक धागा विथ नेहमीचेच यशस्वी कलाकार नि नकलाकार!"

कुछ जम्या नही. विनोदी

मृत्युन्जय
Mon, 09/03/2012 - 10:51 नवीन
कुछ जम्या नही. विनोदी धाटणीचा लेख आहे आणि त्यातील मांडणी उत्तम आहे याबद्दल शंकाच नाही. पण मूळात प्लॉट थोडा कच्चा असल्याने एकुण अपेक्षित परिणाम साध्य झाला नाही. हेकट , तिरकस, कुजकट पुणेरी दुकानदार अशी प्रतिमा न तयार होता एका थोड्या सरकलेल्या, पुर्वग्रहदूषित, आगाऊ चिडचिड्या, अडाणी आणि किरकिर्‍या ग्राहकाशी सौजन्याने वागणारा दुकानदार अशी प्रतिमा डोळ्यासमोर तयार झाली. त्यामुळे मोठाच भ्रमनिरास झाला. बाकी लेखकाचे बाकीचे लेखन बघता ते याहुन चांगले लिहु शकतात याची खात्री आहे. अवांतरः हॅप्पी कॉलनीजवळील चितळेंच्या दुकानात बर्‍याचदा जाणे होते. दुकानाचे मालक अतिशय सौजन्यशील आहेत. ग्राहकांशी अतिशय व्यवस्थित आणि हसतमुखपणे बोलतात. इतका चांगला दुकानदार पुण्यात मिळणे हे संध्याकाकाळी ६.३० वाजता मुंबईत लोकलमध्ये घामट माणूस शेजारी उभा नसण्याइतकेच अवघड आहे असे नम्रपणे नमूद करु इच्छितो. माझा चितळ्यांशी आणि कर्व्यांशी काही संबंध नाही (एक ग्राहक - दुकानदार हा संबंध सोडुन ) परंतु केवळ लेखाचा लहेजा लक्षात घेउन (बरीच अनुकुल स्तुतिसुमने असुनदेखील) प्रतिकूल मत बनवु नये यासाठी हा प्रतिसाद(अवांतर)प्रपंच.

हेकट , तिरकस, कुजकट पुणेरी

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 09/04/2012 - 01:38 नवीन
हेकट , तिरकस, कुजकट पुणेरी दुकानदार अशी प्रतिमा न तयार होता....
आयला, म्हणून पुणेकर चिडले आहेत होय ? पुढील वेळेस बरोब्बर प्रतिमा तयार करायला सांगूया लेखकांना. काय म्हणता ? ;-)
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

व्हय ना राव. तेवढं वाइच जमवा

मृत्युन्जय
Tue, 09/04/2012 - 10:21 नवीन
व्हय ना राव. तेवढं वाइच जमवा म्होरच्या टायमाला. कस आहे ना की " माझा अनुभव " या सदरात काय पण वाट्टेल ते लिह्यलं तरी कोणाच्या बापाला कळतय? फेकुन द्यायच बिन्धास्त काहिही. थोडी करमणुक झाली म्हणजे झाले. काय? ;) बाकी पुणेकर चिडत नाहित हो. त्यांचा सात्विक संताप होतो.
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा