✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ब्रेक अप...

ड
डॉ.श्रीराम दिवटे यांनी
Tue, 12/27/2011 - 01:19  ·  लेख
लेख
माझी अपेक्षापूर्ती न करणाऱ्या या अनामिक नात्याचा मला भयंकर कंटाळा आलाय बघ. तू म्हणशील पुरुष इथून तिथून सारखेच असतात, मलाही तसंच समज हवं तर. तुझे सारे आरोप अन् आक्षेप मला मान्य आहेत. हो, मीही पुरुष आहे. मीही तुझ्यावर प्रेम करतांना एकच अपेक्षा ठेवली होती. ती सुरुवातीला तू समरसून पूर्ण करीत गेलीस. परंतु आता काळ बदलला, आपण जरा समंजस झालो आहोत. तुला तुझे करियर घडवायचे आहे. तू आता मध्यावर आली आहेस. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. तू जीव तोडून काम करतेस, प्रसंगी ओव्हर टाईमलाही थांबतेस. त्यामुळे होतं काय की तुझ्याकडे स्वतःसाठीच जिथे वेळ नसतो, तिथे माझ्यासाठी तू कधी वेळ काढणार, कधी मला एकांतात भेटायला येणार? नाहीच जमत ते तुला. गेले काही महिने तू मला जशी हवी होती तशी भेटत नाहीये. वाटतं तू मला टाळते आहेस, भेटण्याचे ठरवूनही येत नाहीस. प्रयत्न करते म्हणतेस अन् ऐनवेळी काहीतरी कारण पुढे करून मला हुलकावणी देतेस. त्यानंतर उडणारा विस्फोट मी शब्दांत नाही सांगू शकत. तू येणार म्हणून केलेली जय्यत तयारी तशीच वाया जाते. मानसिकच नव्हे तर शारीरिक खच्चीकरण केल्यासारखे होते. मी आतल्या आत कोमजून जातो. कशासाठी आपण हा अट्टहास चालवला आहे? असाही प्रश्न पडतो. कामधंदा सोडून तुझी प्रतीक्षा करीत रहावी अन् तू ‘वेळ नाही ना रे मिळाला, बघू पुढच्यावेळी भेटू..’ असं सहज म्हणतेस अन् माझ्या नजीक यायचं प्रकर्षानं टाळतेस. हे काही मला पटत नाही बघ. मी इतक्या आर्जवाने तुला बोलावतो, एकदातरी येच म्हणतो पण तू मात्र किती सफाईदार खोटे बोलून मला वाकुल्या दाखविल्यासारखे करतेस. तुझं हे खिजवणं आहे की तुझी मजबुरी हे कळायला मार्ग नसतो. मी प्रतिप्रश्न करताच तू तुझे अनेक प्रॉब्लेम्स सांगत सुटतेस. ‘घरी खूप कामं पडलीयेत रे, मला कामाहून घरी निघायलाच उशीर झालाय कसं भेटू शकते तुला? आज नाईटशिप करून थकलेय रे, नवऱ्याचा फोन आला होता त्याने लवकर बोलावलंय अरे, घरी पाहुणे आलेत काय करू रे? वेळच नाही बघ तुझ्याकडे यायला.’ अशी कितीतरी संयुक्तिक कारणे तू मला सुनावून सहीसलामत (हसत) सुटतेस. मग मला प्रश्न पडतो की हे अनैतिक संबंध कशासाठी? यात आपला काय फायदा? ही ‘बया’ तर आपल्याला बोटावर नाचविल्यासारखे खेळवीत आहे. जिच्यासाठी आपण धावाधाव करून साड्या खरेदी केल्या, त्यावर मॅचींग ब्लाउज शिवायला टाकले. ब्लाउजचं माप देण्यासाठी तू आलीच नाहीस, पण तुझा एक जुना ब्लाउज टेलरला देण्याकरिता माझ्याकडे सुपूर्त करण्यास तुला बरे वेळ मिळाला? कितीतरी महागडे ड्रेसमटेरियल तुझ्यासाठी मी खरेदी केले होते, त्यांची शिलाई देखील मीच दिली. परंतु तू एकदाही ते ड्रेस घालून मला निवांत बिलगली नाहीस. तू म्हणेल ती चीज हजर करतांना मला किती यातायात करावी लागली हे तुझ्या गावी नसावे असेच तू वागायचीस. केवळ एक सूप्त इच्छेच्या तृप्तीसाठी मी तुझ्याभोवती गोंडा घोळायचो. तुझी मागणी पूर्ण केली की तू मला पुरुष म्हणून जे हवं ते देशील अशी अपेक्षा बाळगून मी गोल गोल फिरत राहायचो. खरं म्हणजे तू मला तुझ्या हितासाठी फक्त वापरून घेतलं, हो वापरूनच घेतलं. तू तुझा स्वार्थ पाहिलास. तुला तुझ्या पायावर उभं करतांना मी हात सढळ ठेवला. तुझी फी भरली. तुला आलेले कित्येक प्रॉब्लेम्स सोल्व्ह केले. बसचा पास काढून दिला. येता जाता मला मिसकॉल देता यावा म्हणून तुला मोबाईल घेऊन दिला. त्यातला बॅलन्स संपत आला की तू मोठ्या अधिकारवाणीने सांगायचीस, ‘अरे तेवढा बॅलन्स टाक रे..’ मी टाकायचो. मला मात्र तू फक्त मिसकॉल देणार, उलटपक्षी मीच फोन करावा अशी तुझी अट असायची. हे मला कधीच न उलगडलेलं कोडं होतं. म्हणजे तुझा मोबाईल रिचार्ज करायचा मी, तू मात्र तो बॅलन्स इतरांना फोन करून उडवून टाकायचीस. मी तुला रिटर्न कॉल का म्हणून करायचा? माझ्याच पैशातून तू मलाच फोन करीत नाहीस म्हणजे टू मच हं. मग मी ठरवले आता रिचार्ज तर करायचा नाहीच शिवाय रिटर्न कॉलही करायचा नाही. मी तसं तुला सांगताच तुझी ओरड सुरु झाली- ‘आता तू पहिल्यासारखा राहिला नाहीस रे, खूप बदललास. आखडू झालास. बरोबर आहे तुला तुझी बायको भेटली ना, आता माझी गरजच उरली नाहीये.’ परंतु तूच मला टाळीत चालली आहेस हे मी सांगू कुणाला? त्यात हे आपले अनैतिक संबंध एकदम चोरी छिपे चालत आलेले. त्याचं बोदरेशन काय कमी असतं? तुझा कधीही मिसकॉल येऊ शकतो म्हणूनच मी माझा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवला आहे. चारचौघांत किंवा कुटुंबीयांत आपले प्रेम उघड करायचे नाही म्हणून किती तारेवरची कसरत करावी लागते म्हणून सांगू? तुलाही तुझ्या नवऱ्यापुढे माझा कॉल घेता येत नसतो. चुकून तू घरी असतांना मी कॉल केला तर तू अजूनही किती झापतेस मला. पण तू मला कधीही मिसकॉल देऊन मोकळी होणार. (अगदी बायकोजवळ झोपलेलो असतांनाही!) हे कसे काय सहन करायचे? का तर म्हणे तुला नाईट ड्युटी असते, झोप येत नाही म्हणून मला मिसकॉल! धन्य तुझी प्रेमकहाणी. म्हणजे तू तुझा स्वार्थ किती पाहत, जपत आलीयेस पहा. जरा काही खुट्ट झालं, तुझं तुझ्या नवऱ्याशी वाजलं किंवा सासू बोलली, कामाच्या ठिकाणी काही वादंग झाले तर पटकन मला दहा-बारा मिसकॉल देऊन टाकायचे. मी करतोच रिटर्न कॉल. की गाऱ्हाणे ऐकवत बसायचं. माझा बॅलन्स संपलाच म्हणून समजा. दुखाःच्या वेळीच मी आठवणार, इतर आनंदाच्या प्रसंगी का नाही? कधी सहज म्हणून मिसकॉल येतच नाही तुझा. तुला चांगली नोकरी मिळाली, किती पेमेंट मिळाले हे तर तू कधीच मला कळविले नाहीस. तसा माझा अधिकार नसेलही परंतु ज्याच्यामुळे आपण शिकून सावरून, नवे क्षितीज पादाक्रांत करून स्वतःच्या पायावर उभे राहिलो आहोत, त्याला एकदा तरी सांगावसं वाटलं नाही तुला की, ‘चल रे, आज माझा पहिला पगार झालाय. चल कुठेतरी मस्तपैकी कॉफी पिऊ यात...’ छे, घरी जातांना मात्र तू आलेल्या पगारातून सासूला चपला नेशील, पोरांना खाऊ नेशील, नवऱ्याला पगाराचं पुडकं देशील. तुला इथवर आणून पोचविणारा मी कोरडाच राहणार. तुझी भेट तर दूरच, दर्शनही दुर्लभ झाले आहे. अलिकडे तू माझ्याशी फटकून वागते आहेस की खरोखरच घरातलं, बाहेरचं उरकता उरकता तुझ्या नाकीनऊ येत असतील कळायला मार्ग नाही. जर तसं असेल आणि भविष्यात आपण भेटूच शकणार नसू तर मग हे प्रेमाचं गोंडस नाव दिलेलं ओझं वागवायचं का म्हणून? जिथे गाठीभेटी होण्याची सुतराम शक्यता नाही ते तकलादू प्रेम टिकवून ठेवायचंच कशासाठी? तू मला भेटत नाहीस तर का म्हणून मी तुझ्यासाठी झुरायचं? तू जर मला टाळते आहेस, माझ्या अर्जवांना किंमत देत नाहीस, फक्त फोनवर बोलतेस (मीच कॉल केल्यावर) तर मी का म्हणून व्यर्थ खर्च करायचा? ज्यातून काही हशील होत नाही तिथे अशील बनून जाण्यात काही अर्थ आहे का? माझ्या मते प्रेम-बीम सबकुछ झूठ असतं बघ. एक पुरुष म्हणून माझी मलाच जाणवलेली तळमळ सांगतो- मी तुझ्यावर प्रेम केलं ते मनात एक छुपा ‘हेतू’ ठेवूनच. माझी इच्छा तू पूर्ण करावीस इतकाच माफक आशय त्यात दडलेला होता. तुझ्या अडीअडचणी समजून घेण्यात मला अजिबात इंटरेस्ट नव्हता, नाही देखील. केवळ तोंडदेखलेपणा म्हणून मी तुला ऐकून घेत आलोय, भलेबुरे जे जसे सुचतील ते सल्ले देत आलोय. त्यामागे उद्देश एकच तुझा एकांत मिळावा, तुझा मदमस्त सहवास लाभावा, तू मला तृप्त करून सोडावंस. हो, नक्कीच. एक पुरुष म्हणून प्रेम करतांना जे त्याला अपेक्षित असतं तेच मीही अपेक्षित ठेवलं होतं. संधी साधून मी तुझं सर्वस्व लुटलं त्यावेळी फार मोठी मर्दुमकी गाजविल्याचा भास होत राहिला. त्याच भ्रमात मला तुझी चटक लागली अन् तू जे जे सांगितले ते ते करीत गेलो. तुझा अनुनय करता करता त्या बदल्यात तुझं शरीर मागू लागलो. वेळ प्रसंगी ते तू माझ्या हवाली करीत गेलीस त्यात वाद नाहीच, परंतु जेव्हा आज तू तुझ्या इच्छित स्थळी पोचली आहेस तेव्हा मला नकळत झिडकारून पुढे जाणं तुला शोभतं का? कबूल मला माझी बायको मिळालीय पण मग तू तुझी पोळी भाजून घेतल्यावर मला टाळणे योग्य नाही. पुरुष म्हणून मी तुझ्याकडून एकच अपेक्षा बाळगून असतो त्या बदल्यात तू तुझी दहा कामे करवून घेतेस आणि वर पुन्हा मला ठेंगा दाखवतेस म्हणून तर खरं माझा जळफळाट चालला आहे. खिसा रिकामा होतोय अन् हाती धुपाटणे राहतेय याची मला तीव्र जाणीव होऊ लागल्यानेच मी तुझ्याशी फारकत घ्यायचं ठरवलं आहे... तू कदाचित म्हणशील, ‘सगळे पुरुष सारखेच असतात. स्त्रीला वासनेच्या दृष्टीनेच बघतात.’ हो हेही मला एकदम कबूल आहे. मी कोणी देव नाही निरपेक्ष प्रेम करायला. मीही एक प्राणीच आहे. त्यातही पुरुष. म्हणजे निसर्गनियमाप्रमाणे मी प्रेम करावं ते वासनेच्या अधीन राहूनच! आणि तुला म्हणून सांगतो जिथे वासना नसते ते प्रेम नसतेच मुळी, त्याला 'निष्काम' मैत्री म्हणता येईल हवं तर! स्त्रीवर प्रेम केलं आणि ‘ते’ घडलं नाही तर तो पुरुष बुळाच म्हणावा अन् दुसरं काय? तेव्हा मी ज्या हेतुपुरस्सर तुझ्यावर प्रेम केलं त्याचा मला पुरुष म्हणून अभिमानच वाटतो. खंत एकच राहते की आजकाल तू फक्त तुझा स्वार्थ साधून घेत आहेस. मी टाळीसाठी हात पुढे करतोय अन् तू दूर जातेस हे काही बरोबर नाहीये. टाळी एका हाताने वाजूच शकत नाही हे माहीत असतांनाही तू जवळ येण्याचे टाळावे हेच मला खटकतेय. माझी इच्छा पूर्ण होत नाही तर मी का म्हणून तुझ्यावर खर्च करावा? म्हणूनच आज आपण ब्रेकअप घ्यायचे म्हणजे घ्यायचे. पुन्हा कधीही भेटायचे नाही. मी तुला रिटर्न कॉल करणार नाही. तुझा कॉल मात्र आजपासून घेणार. ती तयारी ठेव तू. तूही आता कमावते आहेस, तुला खुपच वाटत असेल ना माझ्याशी बोलायचे तर बॅलन्स शिल्लक ठेवत जा. मला वेळ असेल किंवा जर बोलावेसे वाटले तरच मी फोन रिसिव्ह करीन तुझा. नाहीतर नाही. अब मेरी मर्जी... मला माहितीये तू आता आसवे ढाळू लागशील. 'मी इतकी वाईट आहे का रे?' असं विचारशील. पण मी मुळीच बधणार नाही. जिथे मला हवं ते तू देऊ शकत नाहीस तिथे माकडउड्या मारण्यात काहीच अर्थ नाहीये. जे मिळूच शकत नाही त्याची आस धरून वेळ, पैसा, श्रम वाया घालविण्यात मला तरी आता रस उरलेला नाहीये. बघ तुला पटतेय का? नाही पटले तरी चालेल मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम आहे. जितक्या वेळा तू मला उपभोगू दिलंस त्याच्या कैकपटीने अधिक त्याग मी केलेला आहे. घरादाराकडे दुर्लक्ष केलं आहे, वेळ दवडला आहे, पैसा ओतला आहे. आता कुठेतरी हे थांबायलाच हवं. म्हणून हा अंतिम निर्णय- ब्रेक अप. मग तू म्हणशील, ‘तू मला लुटलंस, माझं सर्वस्व तुला देऊन बसले.’ पण हे मी मानीत नाही. एक तर आपले हे अनैतिक संबंध ना तुझ्या नवऱ्याला कळले, ना माझ्या बायकोला. दुनियेपासून कितीतरी लपतछपत आपण भेटत राहिलो. हा व्यभिचार फक्त तुला व मलाच माहीत आहे. हे गैरवर्तन केवळ आपल्या दोघांतच सीमित राहिलं आहे, राहणार आहे. म्हणजे तू जे काचेचं भांडं समजतेस ते आजही शाबूत आहे. त्यावर कुणीही दगडफेक अजून तरी केलेली नाहीये, ते भांडं फुटण्याचा संभव नाहीच. कारण हा मामला म्हणजे तेरी भी चूप मेरी भी चूप या पठडीतला आहे. तू मला जे बहाल केलंस ते निसर्ग नियमाला धरून होतं. विजातीय धृवांमध्ये आकर्षण व्हायलाच पाहिजे तेच खरं प्रेम. मात्र त्या प्रेमाच्या बदल्यात तू मला कफल्लक केलंस, करते आहेस हे निसर्गनियमाला धरून आहे का? आज तू कमावू लागली आहेस, यशस्वी झाली आहेस, तुला तुझा नवरा आदराने वागवू लागला आहे, तुझी सासू तू ड्युटीवर गेल्यानंतर मागे सर्व कामे उरकू लागली आहे, सर्व काही आलबेल चालेलेलं आहे म्हणून तू मोठ्या मिजासखोरीत वावरू लागली आहेस, तुझ्या डोक्यात हवा शिरली आहे, तुझे पाय जमिनीवर ठरू पाहत नाहीत, एकंदर काय तर तू कृतघ्न होत चालली आहेस. गेल्या महिन्यात तुला पेमेंट वाढवून मिळालं हे एका अक्षरानं तू मला कळवलं नाहीस, मात्र नवऱ्यासोबत बटर चिकन खाऊन सेलिब्रेशन केलंस. वाह रे तुझी नियत. तुझं बरं चाललेलं असतांना, तू ऐशोरामात असतांना, आनंदी असतांना माझा विसर तुला का पडावा? ज्याच्यामुळे हे वैभव पाहत आहोत त्याला एक फोन करवत नाही तुला? हा कुठला न्याय म्हणायचा? मग अशा परिस्थितीत मी तुझी संगत सोडणे योग्य नव्हे काय? सांग. मी तर ठरवले आहे, तुझंही अंतर्मत वेगळं असू शकणार नाही. ‘जो माझ्याकडे वासनेची शिकार म्हणून पाहतो त्याला का म्हणून भेटायचे?’ असं तुला वाटत असेल, पटलं असेल तर मान्य. तुझा हा आरोप शिरसावंद्य आहे. कारण मी पुरुष या नात्याने तुझ्या स्त्रीत्वाकडे भोगवस्तू म्हणूनच पाहत आलोय. त्यामुळे तू मला निखालस टाळू शकतेस. माझ्याशी असलेले निनावी संबंध तोडू शकतेस. मलाही तेच हवे आहे. कारण माझ्या लेखी- “जिथे ‘काम’ नाही तिथे रामराम घालण्यात अर्थच नाही.” तेव्हा बाय बाय बाय...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थव्यवहार
जीवनमान
अर्थकारण
राजकारण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
लेख
मत
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
18087 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

लेख.. त्यातील परिस्थीती आणि

गणेशा
Tue, 12/27/2011 - 13:12 नवीन
लेख.. त्यातील परिस्थीती आणि नायकाची मानसिकता सुंदर सांगितले आहे... सर्वस्व जरी प्रेयशीने दिले असले तरी खरे सर्वस्व आपलेच लुटले गेले आहे याची हलकीशी जाण जेंव्हा नायकाल झाली आहे तेंव्हा त्याच्या मनातील विचार एकदम रिअल्यास्टीक वाटत आहे...
  • Log in or register to post comments

बाकीचे जौ द्या भौ पन हा लेख /

मृत्युन्जय
Tue, 12/27/2011 - 14:52 नवीन
बाकीचे जौ द्या भौ पन हा लेख / प्रकटन जे काय आहे ते लै बोर हाय.
  • Log in or register to post comments

विकृत

मनीम्याऊ
Tue, 12/27/2011 - 20:26 नवीन
"मी पुरुष या नात्याने तुझ्या स्त्रीत्वाकडे भोगवस्तू म्हणूनच पाहत आलोय" कुठल्या विकृतविचार धरेचा समर्थन लेखक करत आहेत? तीव्र निषेध !
  • Log in or register to post comments

हे (श्री) राम!

आनंद
Tue, 12/27/2011 - 21:42 नवीन
हे (श्री) राम!
  • Log in or register to post comments

विकृत मनोवृत्तीने लिहीलेले

जाई.
Tue, 12/27/2011 - 22:14 नवीन
विकृत मनोवृत्तीने लिहीलेले अतिशय गलिच्छ लिखाण स्वतच्या नावापुढे डाँक्टर पदवी लावण्याऱ्‍या माणसाने लिहीलेले वाचून खेद वाटला जनांची नाही तर मनाची तरी लाज बाळगा
  • Log in or register to post comments

लेखात विकृत काय आहे ते कळाले

विजुभाऊ
Tue, 12/27/2011 - 23:35 नवीन
लेखात विकृत काय आहे ते कळाले नाही. मात्र लेख बंडल आहे हे नक्की. नायकाचा नव्या वर्षाचा संकल्प चांगला आहे. स्वतःलाच फसवत असलेला नायक त्याचे नेहमी असे धुपाटणेच व्हायचे. हॅप्पी रीअलायझेशन
  • Log in or register to post comments

वरील सर्व प्रतिक्रिया देणारे

माझीही शॅम्पेन
Wed, 12/28/2011 - 00:03 नवीन
वरील सर्व प्रतिक्रिया देणारे याच्या भावना समजून घेतल्या , फक्त लेखककडून वरवर पाहता त्याच धाटनीचे लेख येत असल्यास मिपा चे ओकयसाठी बेसिन करू नये अस वाटत. असो तरी पण धाडसने अस म्हणवास वाटल की लेख चक्क आवडला. थोडाफार "सखाराम" स्टाइल वाटला , व्याभिचार , त्याचे मानवी स्वभावावर होणारे परिणाम हे नेहमीच एक गूढ राहिलेले आहे.
  • Log in or register to post comments

@ जाई, आपला प्रतिसाद पटला

५० फक्त
Wed, 12/28/2011 - 08:22 नवीन
@ जाई, आपला प्रतिसाद पटला नाही, जे घडतंय किंवा घडलंय त्या अनुभवांचं एक भयाण चित्रंण आहे यात गलिच्छ किंवा विकृत काय आहे कळालं नाही, कधी कधी वास्तव आणि त्याचं चित्रण हे विकृत आणि गलिच्छतेच्या सर्वसामान्य आणि सर्वमान्य कल्पनांपेक्षा जास्त विदारक आणि त्रासदायक असतं. जनाची अन मनाची लाज बाळगणे हा प्रतिसाद खरंतर इथल्या ब-याच धाग्यांना टाकता येईल, पण तसं होताना दिसत नाही किमान तुमच्याकडुन तरी., उदा. श्री परा यांचा शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्यतील होउ घातलेल्या शरीरसंबंधांचं वर्णन असलेला धागा. उलट इथं तर दोन प्रौढ व्यक्तींमधल्या अनैतिक पण फक्त शारिरिकच नाही तर इतर व्यावहारीक संबंधांबद्दल उघड उघड चर्चा आणि ती सुद्धा फारशी शारिरिक वर्णनं न येता केलेली आहे आणि त्या फसत गेलेल्या किंवा चाललेल्या व्यवहारांचं पोस्ट मार्टेम आहे. श्री. परा यांच्या वर उल्लेख केलेल्या धाग्यावर श्री. बिकांचा एक उपप्रतिसाद आहे त्यात त्यांनी श्री. श्रामोंना त्या मालिकेचा पुढचा भाग लिहा असं म्हणताना असं लिहिलंय 'तुम्हाला त्यात मानवी मनाचे कंगोरे वगैरेही दाखवता येतील आणि झालंच तर मग समाज नावाची गुंतागुंतीची चीजही दाखवता येईल नीट व्यवस्थित ' - डॉ. दिवटेंच्य लेखात हेच येतं आहे ना, मानवी मनाचे कंगोरे अन समाजाची गुंतागुंत वगैरे,मग त्याबद्दल एवढा गहजब का ? @ मनीम्याउ - मला वाटतं लेखक कशाचं समर्थन करत नाहीत, पण जे वाक्य तुम्ही उचललं आहे, खरंच वास्तव ते तसंच नाही का ? पांढरा रंग लावुन कोळसा ठेवला तरी तो काळाच असंणार ना, पुरुषाला स्त्री ही भोगवस्तु वाटणं स्वाभाविक आहे आणि जे नातं किंवा संबंधाबद्दल हे सगळं लिहिलंय त्याचा पायाच भोग आहे, शरीरसुख हेच तर या सर्वांचं मुळ आहे, मग तिथं हे असं स्पष्ट प्रामाणिक प्रतिपादन म्हणजे कोणत्याही विचारधारेचं समर्थन होत नाही तर वर्तनाचा खुलासा होतो. आणि इथं पुरुष स्त्रीकडे भोगवस्तु म्हणुन पाहतो आहे तर ती स्त्री सुद्धा त्या पुरुषाकडुन तिला हवेहवेसे शरीरसुख सोडुन इतर भौतिक भोग पुरवुन घेत आहेच ना, मग त्या बदल्यात पुरुषांनं त्याच्या शरीराचे लाड पुरवले जाण्याची अपेक्षा ठेवली तर त्यात चुक काय आहे ? आणि अशा राजीखुशीच्या अन जाणुन बुजुन ठेवलेल्या संबंधांमध्ये पुरुषाच्या शरीराचे असे लाड पुरवले जाण्यात ते पुरवंणा-या स्त्रीला सुख मि़ळतच नाही असं होण्याची शक्यता फार कमी असते. हा आपापसातला राजीखुशीचा देण्याघेण्याचा खुला पण एकतर्फी होउन फसलेला व्यवहार आहे, फक्त त्याचं इंटर्नल ऑडिट करुन इथं रिपोर्ट मांडलाच तो वाचताना त्रास होतोय असं असु शकेल. गुलजार नार- भाग १-२ वरचे प्रतिसाद, विशेषत: भाग २ च्या पुढचा भाग लवकर टाका किंवा वाट पाह्तो आहे म्हणणारे प्रतिसाद आणि इथलं प्रतिसाद पाहिले तर ब-याचजणांचा दुट्ट्पीपण मात्र अधोरेखित होतो आहे. उरला प्रश्न, धागाकर्त्यानं इथं फक्त लेख टाकायचा अन निघुन जायचा किंवा बाकी कुठेही प्रतिसाद द्यायचे नाहीत हा एक प्रकारचा डँबिसपणा असु शकतो, पण डॉ, दिवटेंच्या बाबतीत तसं घडतंय असं दिसत तरी नाही, (http://www.misalpav.com/user/9217/track) तरी याबद्दल मिपाचं धोरण काय म्हणतं, म्हणजे वर्षाला किमान ३० लेखांना प्रतिसाद दिल्याशिवाय लेख टाकता येणार नाही, किमान १२ कवितांबा रुदयस्पर्शी म्हणल्याखेरीज कविता टाकता येणार नाही, असं काही प्रि क्वालिफिकेशन आहे का ?
  • Log in or register to post comments

काहीसं असंच म्हणायला आलो

गवि
Wed, 12/28/2011 - 09:08 नवीन
काहीसं असंच म्हणायला आलो होतो. अर्थात प्रतिक्रियाही "चूक" नाहीत त्या केवळ स्वाभाविक आहेत.. जितका लेख स्वाभाविक आहे तितक्याच. लेखकाने एखाद्या विचाराचं दर्शन घडवणं म्हणजे समर्थन करणं असा अर्थ काढता येत नाही. तशा अर्थाने शोले लिहिणार्‍याने गब्बरसिंग डीटेलवार रंगवला म्हणून तो खलप्रवृत्तीचं समर्थन करत होता असं नव्हे. इथे तर खलप्रवृत्तीही दिसत नाहीये केवळ सामान्य क्षुद्र (पुन्हा रिलेटिव्ह कल्पना) मनाच्या चौकटीत स्वतःला कल्पून लेखक लिहितो आहे. लेखनातून नेहमी नीतीकथा किंवा इसापच्या चांगले संदेश देणार्‍या गोष्टीच उतरल्या पाहिजेत असं आहे का? अर्थात नेहमी एकाच प्रकारचं लिहिणं याला दोषही म्हणता येईल किंवा स्पेशालिटीही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

+१

प्रचेतस
Wed, 12/28/2011 - 09:55 नवीन
सहमत आहे. आम्ही तर बुवा दिवटे साहेबांचे फ्यान आहोत. त्यांच्या लिखाणाची आम्ही चातकाप्रमाणे वाट पाहात असतो आणि ते कधीही आम्हास निराश करत नाहीत. गणपा, सास्व नेहमी पाकृ टाकतात म्हणून त्यांच्यावर कधीही सतत त्याच प्रकारच्या लिखाणाचा दोषारोप झाल्याचे कधीही ऐकिवात नाही उलट अजून येऊ द्यात म्हणून कौतुकही होते मग दिवट्यांनाच नेहमी दोषाचे धनी का बरे व्हावे लागत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

५० फक्त , बरोबर

गणेशा
Wed, 12/28/2011 - 13:19 नवीन
५० फक्त , बरोबर प्रतिसाद, त्यात एक अ‍ॅड करतो. स्त्री कडे फक्त भोगवस्तु म्हणुन सर्व पुरुष पाहत नाहित, तरीही येथील नायकाचे हे स्वगत असल्याने तो तसे त्याच्या मनातील विचार सांगतो आहे, आणि तसे चित्रण समजात ही दिसतेच..
गणपा, सास्व नेहमी पाकृ टाकतात म्हणून त्यांच्यावर कधीही सतत त्याच प्रकारच्या लिखाणाचा दोषारोप झाल्याचे कधीही ऐकिवात नाही
वल्ली, वरील वाक्य भारीच विनोदी आहे राव..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गणपा, सास्व नेहमी पाकृ टाकतात

गणपा
Wed, 12/28/2011 - 13:22 नवीन
गणपा, सास्व नेहमी पाकृ टाकतात म्हणून त्यांच्यावर कधीही सतत त्याच प्रकारच्या लिखाणाचा दोषारोप झाल्याचे कधीही ऐकिवात नाही उलट अजून येऊ द्यात म्हणून कौतुकही होते मग दिवट्यांनाच नेहमी दोषाचे धनी का बरे व्हावे लागत?
वल्ली आपल्या कर्माची फळं भोगायला तयार रहा आता. ;) ए पऱ्या तो कवितांचा साचा आण रे लवकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

म्हणजे

गवि
Wed, 12/28/2011 - 13:25 नवीन
वल्ली आपल्या कर्माची फळं
म्हणजे स्ट्रॉबेरीज का रे भाऊ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

कुठंय तो साचा? येऊ द्यात

प्रचेतस
Wed, 12/28/2011 - 13:26 नवीन
कुठंय तो साचा? येऊ द्यात लवकर. पाहू द्या जरा डोळे भरून. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

येउ देच तो कवितेचा साला,

५० फक्त
Wed, 12/28/2011 - 13:29 नवीन
येउ देच तो कवितेचा साला, म्हणजे साचा, आम्ही आहोतच मा.संपादिका पैसातै च्या आदेशानुसार आणि श्री परांच्या वांगम यीन प्रेरणेवरुन विडंबनं पाडायला - उदाहरण- http://www.misalpav.com/node/20225
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

साचा नाही!

पैसा
Wed, 12/28/2011 - 13:35 नवीन
चकल्यांचा सोर् या नायतर जिलबी मेकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+१ टू ५०

मी-सौरभ
Wed, 12/28/2011 - 14:04 नवीन
वल्ली शेठ: तुम्ही कुणाकुणाचे फॅन आहात ते सांगा ना प्ली़ज :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

http://www.misalpav.com/user/9217/track

मन१
Wed, 12/28/2011 - 10:27 नवीन
सदर दुवा आपण दिलात त्यावरून इतके नक्कीच दिसते की अजून तरी डॉक्टर सायबाला खुद्द ह्या लेखावरील प्रतिसादांची दखल घ्यावयास वेळ मिळालेला नाही. किंवा डॉक साहेब आपले नुसती मज्जा पाहताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

विवाहबाह्य संबध हा विषय पाहून...

किसन शिंदे
Wed, 12/28/2011 - 09:50 नवीन
हल्लीच कभी अलविदा ना कहना पाहिलात कि काय? ;)
  • Log in or register to post comments

अपूर्ण कथा आहे!

sagarpdy
Wed, 12/28/2011 - 10:15 नवीन
दुसरी बाजू सुद्धा मांडा येथे. 'ती' काय विचार करत आहे ते हि लिहा. मग पुढील लेखात दोघांना एकत्र आणा. 'होगी प्यार कि जीत'! ;) (अर्थात हा स्वानुभव असेल तर यापुढे लिहिणे होणार नाही. काल्पनिक असेल तर मात्र होऊ शकते. )
  • Log in or register to post comments

अतिशय अप्रतिम लेख

आदिजोशी
Wed, 12/28/2011 - 18:57 नवीन
जग काहीही म्हणो, आपल्याला लेख आवडला. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. लोकांच्या टिकेकडे लक्ष देऊ नका. तुम्ही लिहीत रहा, आम्ही वाचतो आहोत. अशा धर्तीचे लेख सगळ्यांना आवडत नाहीत. किंबहुना फारच कमी लोकांना आवडतात आणि ते असे लेख पचवू शकतात. त्यातला मी एक आहे. अवांतर - लेख वाचून काही जालीम जालीय मित्रांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

'अशा धर्तीचे लेख सगळ्यांना

५० फक्त
Wed, 12/28/2011 - 19:06 नवीन
'अशा धर्तीचे लेख सगळ्यांना आवडत नाहीत. किंबहुना फारच कमी लोकांना आवडतात आणि ते असे लेख पचवू शकतात. त्यातला मी एक आहे.' +१०० टु आदिजोशी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा