कधीकाळी झालेल्या कविता
कधीकाळी झालेल्या कविता
(1)
वेळही अशी ती होती
उगवती न फटफटलेली
पक्षीही तुरळक जागे
नुकतेच जरा फडफडले
माणसे होऊन जागी
चालली खाया वारा
या शांत पहाट वेळी
ती मला भेटते म्हटली
आलीच पहा ती आली
येताच तिला ओळखले
मी मनात माझ्या गुपचूप
सांगूच नको मी म्हटले
ती बसली अगदी चुपचूप
अशी दोघे गुपचूप बसता
बोलणे खुंटले अगदी
पण बोलून काही ना येता
ती कसली भेट म्हणावी
सावरुन मी हे वदलो
डोळ्यात तुला साठवण्या
मी रात्र-पहाट ही केली
पाहून घेऊ दे आता
तुज सुंदर शांत सकाळी
ते वस्त्र रंग गुलाबी
मुखचंद्र अनावरण करता
ह्रदयास हुडहूडी भरली
नजरेस तिच्या त्या वरता
बोलास काही ना सुचले
ते मूक-मूक गलबलले
शेवटी तिने पाहियले
त्या निष्ठुर घटिकायंत्री
मी येते आता म्हटली
मी येते आता म्हटली
ही कविता आम्ही एका यक्षिणीवर फिदा झाल्यानं उद्भवली होती हे वेगळं सांगायला नकोच. ती यक्षिण नंतर कुठल्यातरी नाडीवैद्याच्या शालीला पदर बांधून आगीभोवती फिरली म्हणे! हे कळालं तेव्हा दुधो नहाओ पुतो फलो म्हणून (मनातल्या मनात) आम्ही मोकळे झालो. आता तिचं लग्न होणार आहे हे मला कळालं तर मी आडवा येईन असा आमच्या सासर्याचा वहीम होता म्हणे (हो, मी तेव्हा त्यांना कॉलनीभर आमचे सासरे असेच म्हणत असे). तर असो.
कुणाला कविता कळली नसेल तर सांगतो की - कवितेत वर्णन केलेली भेट होण्यापूर्वी आम्ही एकमेकांना समोरासमोर पाहिलं नव्हतं.
पुढे-पुढे जिथं ही भेट झाली ती पूर्ण जागा विकत घेऊन ती संरक्षित स्मारक करायला पाहिजे असं माझं म्हणणं होतं. पण ती जागा कोर्टाच्या जागेत मागे असल्याने प्लॅन बारगळला.
आज ही कविता विनोदी वाटते. याचे सगळे श्रेय बालभारती, युवकभारती ही पुस्तकं रचणार्यांना जाते. आता उगाच यमक जुळवण्यासाठी गुपचूप-चुपचूप असे शब्द वापरल्यावर, अनघड घडामोडी व्यक्त करण्यासाठी बालभारती, युवकभारतीतल्या जुन्या कवींच्या टायली मारल्यावर प्रेमकविता पण विनोदी होणार नाय तर काय होईल?
- पण जेव्हा कविता होत असत तेव्हा मी माझ्या मित्राला चहा पाजवण्याच्या मिषाने टपरीवर नेऊन हळुच त्याच्या कानात कविता ओतत असे. नंतर त्यानं चहाच सोडला म्हणे!
बायका-माणसांना जशी पोरे होतात तशा प्रेमात पडलं की कविता 'हो-ता-त'. मी कधीच कविता 'केल्या' नाहीत - त्या 'झाल्या'. आता होत नाहीत. माणसं आपल्या पुढील आवृत्तीची ओळख करुन देताना म्हणतात - ही आमची सीमा.. हा आमचा संजू.. हा आम्हाला अमक्या साली 'झाला' - आमचा संजू आम्ही अमुक साली तयार 'केला' असं म्हणत नाहीत. तसंच कवी लोकांनीही कविता 'झाली' असं म्हणायला पाहिजे - आणि कविता 'होऊच' द्यायला पाहिजेत, त्या टेस्ट ट्युब बेबीसारख्या करायला नकोत - नाहीतर त्या अकाली मरतात.
(2)
मौनाच्या अभेद्य काळ्या पत्थराआडून
स्फुरणांच्या नाजुक झुळझुळीचे गीत
असेच चुकून माकून कधीतरी ऐकू येते
हे गीत इतकं चंचल की
मुखड्याचा अर्थ लागतो न लागतो
तोच त्यानं सम देखील गाठलेली असते
या गीताला शब्द देणं हा खरा गुन्हाच
पण या शब्दांना आर्जवं करुनही
न उजवताच परत पाठवावे लागणे
ही खरी निर्लज्ज नामुष्की
शब्द बिचारे
लादलेल्या अर्थाच्या प्राक्तनाचे ओझे वाहात
कागदावर उतरतात
शब्द उतरूनही मी मात्र
त्या मौनाच्या अभेद्य काळ्या पत्थरालाच कान लाऊन असतो
नंतर पुढे कविता कशा होतात ते थोडं पाहिलं होतं तर ही कविता झाली होती.
(3)
शब्द शब्द मुका
अर्थ सदा वांझोटा
वादाच्या हाती सदा
संवादाचा खराटा
मेंदूत भरली विचारांची जळमटे
त्यात फडफडती कल्पनांचे किडे
शोधती सदा तत्त्वांचे आधार
हा सगळा उधारीचा बाजार
प्रज्ञा कुपोषणाने मेली
बुद्धी पोटामागे गेली
मन बसले गाणी गात
फिडलवाल्या नीरोची त्याची जात
आणि काही लोक म्हणे चंद्रावर गेले
उद्या सूर्यावरही जातील; आणखी कुठेही मसणात जातील
पण या आतल्या जगाचं काय?
कविता होत नसल्याने चिडून उगाच बळंबळं केलेली ही कविता.
मस्त रे...
तिसरी जाम आवडली रे
बायका-माणसांना जशी पोरे होतात
+१
शेवटच्या
चायला येवढ्या सुंदर कविताना
अरे वा ! मस्तच झाल्यात ...
लै भारी !
दे घुमाक्के
=))
ते वस्त्र रंग गुलाबी मुखचंद्र
कडक
पहिली कविता कुठ्ल्या वयात
कधीकाळी 'झालेल्या'
वेगळाच प्रयोग. जाम आवडल्या
प्रासंगिक
हे हे हे
धन्यवाद दोस्त हो!
मस्तंय रे!
दुसरी आणि तिसरी छान
वाचायचं राह्यलेलं.