शिवसेना दसरा मेळावा २०११, ६ ऑक्टोबर
६ ऑक्टोबर २०११ला आयुक्ष्यात पहिलयांदा सेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजीपार्कावर हजेरी लावली. तीही बायकोसोबत. बाळासाहेबांची जादू नेमकी काय ते याचि देही याचि डोळां बघणं आवश्यक होतं. माध्यमांवर यांबाबतीत अवलंबून रहाता येतच नाही. पाहिलं तर खरंच, दुसऱ्या दिवशी ‘अण्णा हजाऱ्यांबद्दल ठाकरे असं असं म्हणाले' अशी एक खोडसाळ बातमी पेपरवाल्यांनी सर्व-संगनमताने दिलेलीच होती. मग एका दिवसासाठी व्यवस्थित ठाकरे-हजारे कुस्ती रंगली. वास्तविक अण्णांना अवमानकारक असं काहीही बाळासाहेब बोललेलेच नव्हते. मैदानावरचा प्रत्यक्षदर्शी म्हणून हे मी खात्रीपूर्वक सांगतो. आणखी हेही की बाळासाहेब ठाकरे ही एक जादू आहे. जमलेल्या अलोट गर्दीतला प्रत्येक जण त्यांना नि त्यांनाच जीवाचा कान करून ऐकायला आला होता. आणि ही अशीच गर्दी याच ओढीने गेली ४६ वर्षे शिवाजीपार्कवर लोटत आहे.
समान नागरी कायद्याची अस्खलितपणे मागणी करणारा, राष्ट्रीय महत्वाच्या मुद्द्यांवरून उमर अब्दुल्ला, सोनिया, मनमोहन, चिदंबरम् यांचा मुद्देसूद समाचार घेणारा, 'पाकव्याप्त काश्मीरात चीनी सैन्य घुसलंय. त्यांच्यातला एकही सैनिक जीवंत परत जाता नये' हे समोरच्या मराठी गर्दीला ठासून सांगणारा नि भर सभेत पोलिसांना नि पत्रकारांना उद्देशून 'बाबांनो, तुमची कामं नीट करा. आम्ही चुकलो तर आम्हांलाही सोडू नका. पण भ्रष्ट होउ नका रे' असं अधिकारवाणीनं सांगणारा कुठला प्रांतीय नेता आज भारतात उरलाय? चंद्राबाबू, मुल्लामुलायम, दीदी, अम्मा, करुणानिधी - कोणीतरी हे करील काय? ते हे बोलायला गेले तर त्यांचे लोक त्यांचे ऐकतील काय? प्रांतीयच काय, कुठल्याही राष्ट्रीय नेत्याकडेही ही धमक, कुमक, कुवत आणि इज्जत शिल्लक आहे का हा प्रश्नच आहे.
थेट संवाद साधल्यासारखं वक्तृत्व! पल्लेदार वाक्यं नाहीत, अभिनिवेश नाही, आक्रस्ताळे हावभाव - हातवारे नाहीत ... पण एक एक शब्द खणखणित. वयाच्या नव्वदीतही आवाजातली धग आणि जरब जबरदस्त. ठाकरी विनोदाची फ़ोडणी जागोजागी. अजीत पवारांची खिल्ली उडवताना म्हणाले, 'अरे तुम्ही मर्दासारखे मर्द त्या परक्या बाईच्या नादी लागता? राष्ट्रवादी नाव बदलून परराष्ट्रवादी तरी ठेवा'! बाळासाहेबांशी मतभेद असू शकतात, पण शैलीला दाद द्यायला कसली लाज? "आजकाल काय तर म्हणे सगळं फ़्री आहे. समलिंगी संबंधही अलाउड. हे अलाउ करणारे तुम्ही कोण? तुम्ही याला अलाउ केलंत तर तुम्हाला कसं माहिती हे चालतं? तुम्हाला कसं कळलं?" त्यांच्या डरकाळीत शिवराळ भाषा, अश्लील संदर्भ नि आता डेसिबल्स शोधत बसणाऱ्यांना त्यांचा सोवळेपणा लखलाभ. वाघाला त्याची परवा असण्याचं कारण नाही.
बाळासाहेबांच्या भाषणातले काही परिणामकारक हातोडे सोडले तर खुद्द त्यांच्या भाषणासकट पूर्ण सभा काहीशी विस्कळितच झाली. मुंबई म.न.पा. निवडणुकीवर कोणी बोलावे, अधिक व्यापक विषय कुणी घ्यावेत, रिपब्लिकन युतीविषयी कुणी नि काय बोलावे, राष्ट्रीय मुद्दे कुणी उचलावेत अशी वाटणी जर करून घेतली असती तर टीम-सेना अधिक कणखर भासली असती. महापौर श्रद्धा जाधव, प्रिं. जोशीसर यांची भाषणं निव्वळ सो सो! कुठलाही विचार नाही, मुद्दा नाही, संदेश नाही ... नुसता टाईमपास. रामदास कदमांचं भाषण आवेशपूर्ण खरंच, पण त्यालाही खोली नाही. ते बहुदा नाऱ्याचा फ़ोटो समोर ठेवून त्यामुळे आपोआप उफ़ाळून येणारा आवेश भाषणात वापरत असावेत! ९ कोटींच्या महाराष्ट्र राज्याच्या विरोधीपक्षनेत्यात असावी ती व्युत्पन्नता त्यांच्यात जाणवत नाही. उद्धव ठाकऱ्यांनी स्वतःचा नेतृत्वगुण एव्हाना सिद्ध केलेला आहे पण बाळासाहेबांच्या छायेखाली राहून त्यांना सतत तुलनेचे धनी व्हावे लागते त्याला ते तरी बिचारे काय करणार? त्यांच्या भाषणात जाणवतो तो कामाच्या झपाट्यातून आलेला आत्मविश्वास. ठसठशीत मुद्दे. नुसतं मुंबईपुरतंच बोलणं नाही, तर पूर्ण महाराष्ट्राच्या इतिहास भूगोलाचं आणि प्रश्नांचं समर्पक ज्ञान. बाळासाहेबांप्रमाणेच त्यांना परिणामकारक आवाजाची देणगी मिळालेली आहे, पण त्याचबरोबर संयत नि शहाणपणाची भाषा हा त्यांचा स्थायीभाव नि बलस्थान आहे. त्यांना धरूनच त्यांनी पुढे जायला हवं. विनाकारण बाळासाहेबांची सहीसही नक्कल करण्याचा 'राजरोस' मोह असलाच तर टाळायला हवा.
सभेची शिस्त मुद्दाम नोंद करावी अशी. ४६ वर्षांचा शिरस्ता असल्याने असेल, पण लोक आपोआप येत होते, बसत होते, सरकून घेत होते, जागा देत होते, हसून खेळून बोलत होते - सगळं कसं शिस्तीत! वाहतुक पोलिसांची व्यवस्थाही चोख. मला माझी बुलेट ठेवायला मैदानाच्या अगदी समोर जागा मिळेल असं वाटलंच नव्हतं.
पण अजूनही फ़क्त बाळासाहेब म्हणजेच सेना असंच चित्र आहे. त्यांचं भाषण संपत येतं आहे हे लक्षात येताच लोक मागच्यामागे उठून जाऊ लागले. भाषण संपण्याची वाट पाहणं नाही की राष्ट्रगीतासाठी थांबणं. अशा सर्व सैनिकांना फ़क्त सेनेशीच जोडण्याचं काम उद्धवना करायचं आहे. भारताचा आजवरचा इतिहास पाहता ते किती कठीण आहे हे स्पष्टच आहे. पण काहीही झालं तरी सेनेचं अस्तित्व किती आवश्यक आहे हे काँग्रेस भाजपासकट सगळेच जाणतात. त्यामुळे उद्धवना या भगीरथ कामासाठी शुभेच्छापूर्वक 'जय हिंद, जय महाराष्ट्र'!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नोंद घेण्याजोगे !
This
पण अजूनही फ़क्त बाळासाहेब
खरं आहे
गांधीवाद, समाजवाद, साम्यवाद
(शिवसेना) उणे (बाळासाहेब
वास्तविक अण्णांना अवमानकारक
मिळमिळीत मेळावा...
+१
लोकशाही म्हणजे -
एक वाक्य
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे.
मतभेद व्यक्त करणे वेगळे , पण
''मुंबई महाराष्ट्रात आहे पण
उत्तरप्रदेशी....
हम्म...
वसंतसेना
पुढे शरद पवार व विलासराव असे
>>>>>>>पुढे शरद पवार व
मिळमिळीत मेळावा...
वास्तविक अण्णांना अवमानकारक
शरद पवार .. बाळासाहेब ठाकरे
माननीय श्री शरच्चंद्ररावजी
अगदी अगदी
श्रीरंग जी, मला माहिती आहे,
दूरद्रूष्टी
गणेशा जी, विनाकारण आक्रमकता
+१११११ (इन्फिनिटी)
दसरा मेळावा कितीही गर्दीने
मी बाळासाहेब ठाकर्यांचे भाषण
ठाकर्यांचे कि ठाकरेंचे ??
त्याचं काये की हे मान्यवर
अनेकवचन...
तो अनुस्वार काढून टाकला तरी
कृपया वाद सुरु होतील अशी
अजुनही
बाकी
उद्धव हा एक बालिश माणूस आहे
बादवे.. अरे तुम्ही मर्दासारखे
सेनेचे अपयश
हे शिवसेनेचे अपयशच नाही
पैसा...
मुंबई
आता साहेबांच्या भाषणाचा कंटाळा येतो.
निष्कर्ष -
तळटीप...
क्षमस्वाची कृपया -
कौन्तेय साहेब वाईट वाटून घेऊ
शिवसेना म्हणुन एक पक्ष होता
राग नाही...